Home > मॅक्स ब्लॉग्ज > राज ठाकरे : भाजपाच्या राजकीय मर्यादा उघड

राज ठाकरे : भाजपाच्या राजकीय मर्यादा उघड

शिवसेना नेतृत्वाखालील सरकार अडचणीत यावे आणि ते जावे असे वातावरण तयार झालेल्या काही गोष्टी आजवर ज्या घडल्या त्याचे नायक कधी पत्रलेखक पोलीस अधिकारी परमबीर सिंग होते, कधी रश्मी शुक्ला यांचा पोलीस बदल्यांबाबतचा अहवाल होता, तर कधी एसटीच्या संपातील अघोषित नायक गुणरत्न सदावर्ते, कधी मातोश्री येथे हनुमान चालिसा पठण करणारे राणा पतीपत्नी होते. सरकारला बेजार करू शकतील म्हणून नारायण राणे व त्यांची मुले आणि गोपीचंद पडळकर हे ही आहेतच. यातच आता राज ठाकरे यांच्या शिडात हवा भरण्याचे काम सुरू झाले आहे, या सर्व घडामोडींमधे भाजपच्या राजकीय मर्यादा उघड झाल्याचं विश्लेषन केलं आहे, ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी..

राज ठाकरे : भाजपाच्या राजकीय मर्यादा उघड
X

भाजपाचे अकाली निधन पावलेले एक प्रभावशाली नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतीदिनी औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हा नेमका काय योगायोग असावा? १९८७ साली विलेपार्ले विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रमेश प्रभू केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आले होते. तोवर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे पर्याय चाचपडून पाहणारी भारतीय जनता पार्टी दोलायमान अवस्थेत होती. या आधी या पक्षाने जनसंघाच्या नावाखाली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये सहभाग घेतला होता. १९८० आणि ८५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात पवार यांच्या समाजवादी काँग्रेससोबत समझोतेही केले होते. पण म्हणावे तसे यश लाभत नव्हते.

विलेपार्ले पोटनिवडणुकीनंतर चलबिचल

मध्येच १९८७ चा विलेपार्ले पोटनिवडणुकीचा निकाल आला आणि भाजपाच्या राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना वेगाने पुढे जाऊ पाहत आहे हे चाणाक्ष प्रमोद महाजन व इतर नेत्यांच्या लक्षात आले. १९८९ मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसचा बालेकिल्ला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उध्वस्त केला तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या निर्णय भाजपाने घेतला अन प्रमोद महाजन प्रभृतींनी शिवसेनेला मोठा भाऊ मानत राज्यात युतीची पायाभरणी केली. १९९० नंतर पुढे काय झाले हे सर्वांना माहिती आहेच.

महाजन-मुंडे दुकलीचे राजकारण

यानंतर दिल्लीत प्रमोद महाजन यांचे बस्तान बसले आणि राज्य पातळीवर त्यांनी भाजपाची धुरा गोपीनाथ मुंडे यांच्याकडे सोपविली. महाजन यांच्या २००६ मध्ये झालेल्या अकाली निधनापर्यंत राज्यात शिवसेनेसोबत जुळवून घेत घेत भाजपाने मार्गक्रमण केले. पुढे झपाट्याने परिस्थिती बदलत गेली. उद्धव ठाकरे भलेही भोळे म्हणोत पण राजकारणात कमालीचे चाणाक्ष असलेले बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला कधीही डोईजड होऊ दिले नाही. पण त्यांच्या निधनानंतर उद्धव यांनी आपल्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू भाजपाचा दुरावा वाढत गेला अन २०१४ मध्ये तर दोन्ही पक्षांची फारकत झाली. पुढे सत्तेत सोबत असूनही ठाकरे कधी भाजपाच्या कह्यात गेले नाहीत.

मोदींचा करिश्मा चालला नाही

हा दुरावा २०१९ नंतर तिरस्कारात बदलत गेला पण भाजपाला आपले नेते नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावर विश्वास होता. आपला नेता नवा हिंदुहृदयसम्राट होतोय तेव्हा राज्यात शिवसेनेचे काय चालवून घ्यायचे अशीच भाजपा नेत्यांची देहबोली होती. पण २०१४ मध्ये देशभरात मोदींचा झंझावात असतानाही भाजपाला राज्य विधानसभा निवडणुकीत १२२ जागांवरच समाधान का मानावे लागले यावर पुरेसे चिंतन-मनन झाले नाही. वृथा आत्मविश्वास दुराभिमानात बदलल्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जंग जंग पछाडून आणि पडद्यामागे लाख खटपटी करूनही शिवसेना ५६ जागी का होईना विजयी झालीच अन आपण आपल्या बळावर सेनेला सोबत न घेता इतर पर्याय तयार करून राज्यात सत्तेवर येऊ हा फुगा फुटला. तेव्हाही मोदी यांच्या सभांचा झंझावात राज्यात कामाला आला नाही. हे भाजपाचे तसे दुसरे अपयश होते. केंद्रातील सत्तेसाठी लोकसभा निवडणुकीत मोदींना भरघोस मते देणारी महाराष्ट्रातील जनता विधानसभेला आपल्याला असा कौल का देत नाही यावर खरेतर भाजपाने गाढ आत्मचिंतन करणे आवश्यक होते. पण तसे न झाल्याने आज काय परिस्थिती ओढवलीय हे ही बहुधा या पक्षाच्या राज्यातील नेत्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.

अखेर भाजपाच्या चाणक्यांनी असा असा विचार केलेला दिसतो की, शिवसेनेचे जनमानसावरील गारुड म्हणावे तसे कमी होत नाही. केवळ पंढरपूर पोटनिवडणूक जिंकल्याने फायदा होत नाही. देगलूरच्या पोटनिवडणुकीत अनेक प्रयोग करूनही काँग्रेसने विजय मिळविला आणि त्याचीच पुनरावृत्ती कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झाली. दरम्यानच्या काळात नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला वरचष्मा मिळू दिला नाही. याचा विचार करत भलतीच राजकीय समीकरणे जन्माला घालण्याचे या पक्षाच्या धुरीणांनी ठरविलेले दिसते आहे.

राज ठाकरे यांच्या गुढी पाडवाच्या सभेनंतर हळूहळू त्यांचे नामकरण 'हिंदूजननायक' असे होणे, त्यांच्या अंगावर कधी नव्हे ती भगव्या रंगाची शाल येणे, मशिदीवरच्या भोंग्यांना लक्ष्य केले जाताच त्याची री ओढत भाजपाने देशपातळीवर त्याचे समर्थन करणे यातून अनेक अर्थ निघत आहेत. त्यातच जय श्रीराम म्हणत त्यांचा अयोध्या दौराही ठरला आहे. त्याला भाजपाकडून हवा देण्याचेच काम सुरू आहे.

शिवसेनेला खऱ्या अर्थाने डिवचू शकणारा, सेनेच्या मतदारांमध्ये व समर्थकांमध्ये व्यवस्थित संभ्रम निर्माण करू शकणारा नेता म्हणून राज यांचे नवे रूप पुढे करण्यात भाजपाला वेगळा आनंद मिळत असेल. पण नरेंद्र मोदी देशभर हिंदूंचे नेता आणि हिंदुत्वाची नवी ओळख म्हणून प्रस्थापित झालेले असताना दिवसेंदिवस तशी प्रतिमा वृद्धिंगत करत उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे त्याच मुशीतले नेतृत्व प्रस्थापित होत असताना महाराष्ट्रात भाजपाची ही वेगळीच अपरिहार्यताच दिसून येत आहे.

हा एकप्रकारे भाजपाचा राज्य पातळीवरचा पराभवच आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण हा पक्ष राज ठाकरे यांच्या या प्रतिमेआडून दुय्यम भूमिकेत जात आहे. आता हिंदुत्वाचे रक्षणकर्ते आम्हीच ही त्यांची भाषा भोंगे आणि भगवी शाल यापुढे तितकी कणखर वाटणार नाही. शिवसेनेला खरे आव्हान द्यायचे असेल तर दुसरे ठाकरेच हवेत हे ही या पक्षाने मान्य केल्यासारखे आहे. विशेष म्हणजे राज यांनी स्वतः मनसेच्या स्थापनेनंतर आपली अशी प्रतिमा उभी करण्याचा मनोदय कधी व्यक्त केलेला दिसला नव्हता. आपण जे काही करतोय ते महाराष्ट्र आणि मराठीसाठी ही त्यांची व्यापक भूमिका होती.

शिवसेना नेतृत्वाखालील सरकार अडचणीत यावे आणि ते जावे असे वातावरण तयार झालेल्या काही गोष्टी आजवर ज्या घडल्या त्याचे नायक कधी पत्रलेखक पोलीस अधिकारी परमबीर सिंग होते, कधी रश्मी शुक्ला यांचा पोलीस बदल्यांबाबतचा अहवाल होता, तर कधी एसटीच्या संपातील अघोषित नायक गुणरत्न सदावर्ते, कधी मातोश्री येथे हनुमान चालिसा पठण करणारे राणा पतीपत्नी होते. सरकारला बेजार करू शकतील म्हणून नारायण राणे व त्यांची मुले आणि गोपीचंद पडळकर हे ही आहेतच. यातच आता राज ठाकरे यांच्या शिडात हवा भरण्याचे काम सुरू झाले आहे. या आडून राजकीय असहाय्यता दर्शविणारी भाजपाची प्रतिमा राज्याच्या सत्तेसाठी किती झळाळून निघते हे महाराष्ट्राचा सुज्ञ मतदार ठरवेलच

Updated : 4 May 2022 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top