Home > मॅक्स ब्लॉग्ज > मुंबईचं योगदान काय?

मुंबईचं योगदान काय?

मुंबईचं योगदान काय?
X

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी मुंबई जास्त टॅक्स भरते यात तुमचं योगदान काय? असा सवाल विचारला आहे. आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटरचं मुख्यालय गुजरात मध्ये नेण्याचं पाठक आणि राज्यातल्या भाजपाने अधिकृतरित्या समर्थन केलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर घटनाक्रम सांगून त्यांच्या कार्यकाळाच्या आधी का झालं नाही असा सवाल विचारला आहे. एकूणच काँग्रेस दिल्लीसमोर झुकायची भाजपा गुजरात समोर झुकतेय अशी स्थिती पाहायला मिळतेय. या सर्वांना महाराष्ट्र धर्म सांगण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आकडेवारीच्या जास्त खोलात मी जाणार नाही, उगीच क्रोनॉलॉजी ही सांगणार नाही. पण विश्वास पाठक यांच्या सह भारतीय जनता पक्षाचा योगदानाच्या प्रश्नाबद्दल मी जाहीर निषेध जरूर करणार आहे. देशभरातील उद्योगधंद्यांचं कॉर्पोरेट ऑफिसेस मुंबईत आहेत म्हणून इथे टॅक्स भरला जातो, त्यात तुमचं योगदान काय असा सवाल पाठक यांनी केला आहे. ते वित्तीय क्षेत्राचे जाणकार आहेत. त्यामुळे एखादी कंपनी, उद्योग एखाद्या ठिकाणी का जातो याची माहिती त्यांना असेलच. पूर्वी दळणवळणाची साधनं, बंदर, कुशल कामगारांची उपलब्धता इ इ अनेक कारणावरून मुंबईला औद्योगिक शहराचा दर्जा मिळत गेला. पण इतकं सगळं असूनही तुम्ही आर्थिक राजधानी होऊ शकता असं नाही. गुजरात, कोलकाता, दक्षिणेत ही अनेक बंदरे होती-आहेत. पण त्यांना आर्थिक राजधानी चा दर्जा का मिळवता आला नाही. कोलकाता तर काळ्या पैशाचा व्यवहाराचं केंद्रच होतं. कोलकाता पॅटर्न हा अभ्यासाचा विषय आहेच, तिथे तर चहावाल्याच्या नावानेही शेकडो कंपन्या असायच्या.

मुंबईत उद्योगधंद्यांना स्थैर्य, सुरक्षितता आणि वर्क कल्चर मिळालं. सब हो जाएगा आणि चलता है या मानसिकतेतील मुंबईने अहोरात्र या उद्योगांची सेवा केली. या शहरात कारखानदारीही होती. तुम्ही मुंबईत येण्याआधी इथला कापड उद्योग विदर्भातील कापसाला बाजारपेठ मिळवून देत होता. गुजरात्यांना आर्थिक व्यवहारांसाठी मुंबई सेफ वाटत होती, इथे शर्टाच्या खिशात लाखों रूपयांचे हिरे सुरक्षितपणे नेता येतात. मुंबई २४ तास झोपत नाही. अदानींची वीज येण्याआधी ही मुंबईत २४ तास वीज होती. तुम्ही उर्जा क्षेत्रात काम केलंय त्यामुळे तुम्हाला माहित असेलच की, आयलँडींग मुळे इथला वीज प्रवाह खंडीत होत नाही. इथल्या श्रमशक्तीने जात-धर्म-प्रांत न पाहता काम केलं, हे वर्क कल्चर तुम्हाला जगात कुठेच मिळणार नाही. आजही ऑफिसचं काम आहे, म्हणून कामाच्या वेळेनंतर ही लोक काम करत असतात. कामाला नकार हा इथल्या हवेतच नाही.

मुंबईची खूप वैशिष्ट्य आहेत, त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी अनेकांनी आपली जवानी या मातीला दिलीय. मुंबईला पळवण्याचे खूप प्रयत्न झाले, पण ते यशस्वी झाले नाहीत. हे मुंबईचं माहात्म्य आहे. बाकी आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर गुजरात मध्ये जाण्याने काही विशेष होईल असं मला वाटत नाही. या आधी हिरा बाजार नेण्याचा प्रयत्न झालाच होता. त्याचं काय झालं सर्वांना माहीत आहे. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे म्हणून IFSC ला मान्यता मिळवून घेतलेली आहे.

नरेंद्र मोदींना हवं होतं म्हणून भाजपा सरकारने आपला क्लेम सोडलेला दिसतोय. देवेंद्र फडणवीस मजबूत आणि सर्वशक्तिमान मुख्यमंत्री होते, त्यांनी या विषयावर मोदींशी संघर्ष केल्याच्या बातम्या कधी ऐकल्या नाहीत. ज्या वेगाने त्यांनी अनेक प्रोजेक्ट नागपुरात नेले ते पाहता हा प्रोजेक्ट ही ते खेचून आणू शकले असते. त्यांच्या या गुणावर तर माझा ठाम विश्वास आहे.

एकूणच बिल्डींग तयार आहे म्हणून फासनान्स सेंटर गुजरातला गेलेलं आहे, अशातला भाग नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच गुजरातला झुकते माप दिलेलं आहे. त्यांच्या बरोबर पंगा कसा घ्यायचा या एका भावनेने हे सेंटर गुजरात मध्ये गेलेलं आहे. यात तुमचं योगदान मोठं आहे. खरं तर हा महाराष्ट्र द्रोह आहे.

Updated : 3 May 2020 4:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top