Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > ...देवकीनंदन गोपाळा !

...देवकीनंदन गोपाळा !

"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असा क्रांतिकारक मंत्र सांगत मूर्तिपूजा, अंधश्रद्धा, सावकारी कर्ज, नशापाणी याविरुद्ध जनजागरण करणारे महाराष्ट्राचे आधुनिक संत गाडगे महाराज यांचा आज जन्मदिन. त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली आहे ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी ...

...देवकीनंदन गोपाळा !
X

विदर्भातील अंजनगावात १८७६ साली जन्मलेले डेबुजी झिगराजी जानोरकर पुढे संत गाडगे महाराज झाले. त्यासाठी त्यांनी कोणतेही चमत्कार केले नाहीत. उलट चमत्कारांवर विश्वास ठेवू नका, असेच ते सांगत राहिले.

गाडगे बाबांचा वेष बावळा. चिंध्या शिवून केलेले कपडे, वाढलेल्या दाढीची खुरटे, डोक्यावर अर्ध्या फुटक्या मडक्याची टोपी, हातात झाडू, अशा अवतारात गाडगे बाबा हयातभर गावागावात फिरत राहिले, लोकांना ग्राम स्वच्छतेचे महत्व पटवत राहिले.

सकाळी गावाची सफाई व संध्याकाळी झाडाच्या पारावर प्रवचन अशी त्यांची दिनचर्या असे. 'गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा' असे गात गात ते रसाळ वाणीत प्रवचन करीत. नशाबंदी, हुंडाबंदी, अंधश्रद्धा विरोध, शिक्षणाचा प्रसार अशा विषयांवरील त्यांची प्रवचने ऐकण्यास आसपासच्या गावांतूनही लोक प्रचंड गर्दी करत.

प्रवचनानंतर लोक त्यांना पैसे देत. काही श्रीमंत मोठाल्या देणग्याही देत. हा सर्व निधी बाबांनी सार्वजनिक कामासाठीच वापरला. गावागावात व छोट्या-मोठ्या शहरांत त्यांनी धर्मशाळा बांधल्या, दवाखाने, व्यसन मुक्ती केंद्रे उभारली व शाळाही काढल्या.

Source: Google

महाराष्ट्रातील संतपरंपरेचे वर्णन 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस' असे केले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - 'या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली', हेच खरे.

'महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ', असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले.

देऊळातील देवाला न मानणारा व तरीही संतपदाला पोहोचलेला हा महात्मा कायमचा निघून गेला.

- भारतकुमार राऊत

Updated : 2021-02-23T09:47:30+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top