Bihar Election 2025 : बिहारच्या भूमीत रुजतेय मराठी स्वप्न
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीतल्या एका तरूणानं गौतम बुद्धाच्या भूमीत कर्तृत्व सिद्ध केलंय. त्याच कर्तृत्वाच्या बळावर त्यानं राजकारणात नशीब अजमावायचं ठरवलंय. ज्या भूमीनं आपल्याला ओळख दिली, त्या भूमीतल्या लोकांचं जीवनमान उंचावण्याचं, त्यांच्या जगण्यामध्ये परिवर्तन आणण्याचं स्वप्नं बाळगणाऱ्या शिवदीप लांडे यांचा एक नवा प्रवास सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे
X
Bihar बिहार विधानसभा निवडणुकीच्या दौ-यावर निघताना एक गोष्ट ठरवली होती. जिथं निश्चित जायचं आणि परिस्थिती पाहायची असं एक ठिकाण निश्चित केलं होतं. ते म्हणजे जमालपूर मतदारसंघ. मुंगेर जिल्ह्यातला मुंगेर शहरालगतचा हा मतदारसंघ. तिथं जाण्याचं कारणही तसं खास होतं. म्हणजे बिहारच्या निवडणुकीच्या दृष्टिनं लक्षवेधी, चुरशीची किंवा नाट्यमय अशी काही निवडणूक नव्हती. तरीसुद्धा तिथं जायचं ठरवलं होतं. तसं बिहारच्या माध्यमांचंही त्या मतदारसंघाकडं लक्ष होतं. त्याचं कारण तिथून निवडणूक लढवत होते Shivdeep Lande शिवदीप लांडे. आयपीएस अधिकारी म्हणून सिंघम स्टाईल केलेल्या कामामुळं बिहारमध्येच नव्हे, तर देशभर त्यांना लोकप्रियता मिळाली होती. जिथं नियुक्ती झाली, तिथल्या गुन्हेगारीचं कंबरडं मोडण्याचं काम त्यांनी केलं. सत्ताधा-यांचा हस्तक्षेप नाकारला त्यामुळं सतत गैरसोयींच्या बदल्यांनाही सामोरं जावं लागलं. बिहारनं ओळख दिली, जिथं काम केलं तिथल्या लोकांनी प्रेम दिलं. त्या प्रेमातून उतराई होण्याच्या उद्देशानं त्यांनी अधिक व्यापक मैदानात उडी मारायचं ठरवलं. हे मैदान होतं राजकारणाचं.
आयपीएस IPS शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते राजकारणाच्या मैदानात उतरले. निवडणुकीच्या काही महिने आधी त्यांनी हा निर्णय घेतला. निवडणूक लढण्यासाठी त्यांना अनेक पक्षांकडून ऑफर होती. स्वच्छ प्रतिमा, पोलिस सेवेत असताना केलेलं जबरदस्त काम आणि सर्व थरांतील लोकप्रियता यामुळं त्यांच्या प्रतिमेचा आपल्याला फायदा होईल, असं अनेकांना वाटत होतं. प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष हा नवा पक्ष. राजद आणि जदयू या दोन्ही स्थानिक पक्षांपेक्षा वेगळा. शिक्षण, बेरोजगारी वगैरे मुद्द्यांची चर्चा करणारा. त्या पक्षाकडून शिवदीप लांडे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढं करण्याची तयारी होती. पण शिवदीप लांडे यांना कुणाच्या हितसंबंधांच्या राजकारणात अडकायचं नव्हतं. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला – हिंद सेना.
हिंद सेना HindSena या पक्षाकडून बिहारमधल्या किमान ७५ जागा लढवण्याचा त्यांचा विचार होता. परंतु निवडणुकीच्या तोंडावर ज्या काही घडामोडी घडतात त्यामागं दूरचं नियोजन असतं. शिवदीप लांडे यांची लोकप्रियता, त्यांचा पक्ष, त्यांना शहरी भागात आणि विशेषतः मध्यमवर्गामध्ये असलेली मान्यता याचा फटका भाजपलाच बसणार होता. अनेक मतदारसंघांमध्ये केवळ दोन ते अडीच हजारांच्या फरकाने उमेदवार निवडून आले होते. अशावेळी आपले अनेक उमेदवार दहा हजारांच्या पुढे जाऊ शकतात, याची शिवदीप लांडे यांना खात्री होती. परंतु अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये हा नवा वोटकटावू नको म्हणून त्यांच्या पक्षाला नोंदणी मिळणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. तांत्रिक त्रुटी दाखवत त्यांच्या पक्षाची नोंदणी रखडवण्यात आली. शिवदीप यांच्यानंतर ब-याच दिवसांनी स्थापन झालेल्या तेजप्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दल आणि ओमप्रकाश गुप्ता यांच्या इंडियन इनक्ल्यूजिव्ह पार्टी या दोन पक्षांना मान्यता देण्यात आली. शिवदीप लांडे यांच्या पक्षाला मात्र नोंदणी मिळाली नाही. त्यामुळं त्यांनी उमेदवार उभे केले नाहीत. एक चिन्ह नसेल तर उगाच शक्ती वाया घालवण्यात अर्थ नाही, असा व्यावहारिक विचार त्यांनी केला. मात्र नोकरीचा राजीनामा देऊन आपण नवं पाऊल उचललंय तर थांबून चालणार नाही, म्हणून त्यांनी स्वतः लढण्याचा निर्णय़ घेतला. त्यासाठी दोन मतदारसंघ निवडले. अररिया आणि जमालपूर. दोन्ही ठिकाणी त्यांनी पोलीस अधिक्षक म्हणून काम केलं होतं आणि तिथलं तिथलं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला होता.
जमालपूरची नियुक्ती तर आव्हानात्मक होती.
मुंगेरचे तत्कालीन पोलीस अधिक्षक के. सी. सुरेंद्रबाबू यांच्यासह सात पोलीस कर्मचा-यांची २००५ मध्ये नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. (काही आठवड्यांपूर्वीच या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.) एसपींच्या हत्येनंतर पोलिसांचा आत्मविश्वास खचला होता. लोक भयभीत झाले होते. अशावेळी मुंगेरला एसपी म्हणून शिवदीप लांडे यांची नियुक्ती झाली. त्यांनी सूत्रे घेतली आणि अक्षरशः तांडव केले. मुंगेर-जमालपूर म्हणजे आपल्याकडच्या सांगली-मिरजसारखी जुळी शहरे. त्यांनी इथली गुन्हेगारी मोडून काढली. नक्षलवादावर नियंत्रण मिळवले. लोकांचा विश्वास संपादन केला. ख-या अर्थानं त्यांची पोलीस सेवेतील कारकीर्द झळाळून निघाली ती मुंगेरमध्ये. याच मुंगेर जिल्ह्यातल्या जमालपूर मतदार संघातून शिवदीप लांडे लढताहेत. त्याच्याविरोधात एनडीएकडून नीतिश कुमार यांच्या जेडीयूचा उमेदवार आहे. तर इंडिया आघाडीनं ही जागा इंडियन इन्क्ल्यूजिव्ह पार्टीला दिलीय. विणकर समाजाचे नेते ओपी गुप्ता यांनी काही आठवड्यांपूर्वी स्थापन केलेल्या या पक्षाला महागठबंधनमध्ये घेऊन त्यांना तीन जागा देण्यात आल्या आहेत, त्यातली एक जागा जमालपूरची आहे. बराचसा शहरी भाग आहे, तसाच ग्रामीण आणि दुर्गम भागही आहे.
जमालपूरमध्ये पदयात्रा काढून शिवदीप लांडे लोकांना भेटत होते. जमालपूरमध्ये पोहोचल्यावर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा फोन लागत नव्हता. त्यांच्या सोबतचे लोक होते ते महाराष्ट्रातले. त्यातला एकजण म्हणाला, आमची गाडी साहेबांच्या गाडीच्या मागं आहे, पण कुठल्या भागात आहे ते माहीत नाही. याचवेळी पावसाची रिपरिपही सुरू होती. त्यामुळं वैताग आला होता. शेवटी जमालपूरमधलं त्यांचं कार्यालय हुडकून काढलं. तिथं त्यांच्या पत्नी डॉ. ममता लांडे भेटल्या. माजी मंत्री आणि आमदार विजय शिवतारे यांच्या त्या कन्या. निवडणुकीचं कार्यालयीन स्वरुपाच्या कामाची जबाबदारी त्यांनी घेतलीय. हिंदी-मराठी वादाची भीती होती. त्यामुळंच त्या स्वतः फारशा मैदानात नव्हत्या. दरम्यानच्या काळात शिवदीप यांनी कुठल्या मराठी माध्यमाला मुलाखतही देणं कटाक्षानं टाळलं. कारण त्याचा आधार घेऊन विरोधी प्रचार केला जाण्याची भीती होती. डॉ. ममता लांडे यांच्याशी गप्पा मारत असतानाच थोड्या वेळात अचानक डॉ. शिवदीप लांडेही कार्यालयात आले. पावसामुळं प्रचारफेरी जरा आटोपती घ्यावी लागल्यामुळं ते आले. त्यामुळं आमची भेट झाली. ते जेव्हा बिहारचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी होते, तेव्हा आमची भेट झाली होती. ती त्यांच्या लक्षात होती. गडबड होतीच, तरी त्यांनी वेळ काढून गप्पा मारल्या.
आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की, अशा प्रकारचा कोणताही उमेदवार बढाया मारत असतो. फिक्स सीट आहे, असा दावा करीत असतो. आपल्याला कसा सर्व थरांतून प्रचंड पाठिंबा मिळतोय, हे वाढवून सांगत असतो. शिवदीप लांडे यांच्याही डोक्यात हवा गेली असणार आणि तेही असंच काही सांगतील, असं वाटत होतं. पण त्यांनी अपेक्षाभंग केला. त्यांचे पाय जमिनीवर होते. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होती. लोकांचा प्रतिसाद मिळतोय, वातावरण चांगलं आहे, आशावादी आहे असं म्हणत होते. मतदारसंघातल्या जातीपातीच्या गणितांमुळं काय होईल, हे सांगता येत नाही, इतके प्राक्टिकल होते. जमालपूरमध्ये मतदान पहिल्या टप्प्यात होतं. दुस-या टप्प्यात अररियामध्ये मतदान होतं. तो मतदारसंघ तर ८० टक्के मुस्लिम मतदार असलेला. तरीही तिथं केलेल्या कामाच्या बळावर तिथून ते उभे राहिले होते.
आपण कुठे उभे आहोत आणि नेमकी परिस्थिती काय आहे, याचं पक्कं भान असलेला उमेदवार मी पहिल्यांदाच बघत होतो.
मात्र शिवदीप लांडे यांनी हे पाऊल अगदी जाणीवपूर्वक उचललंय. एक आयजी चार-पाच जिल्ह्यांचा बॉस असतो. तिथं तो आपल्याला अपेक्षित परिवर्तन घडवून आणू शकतो. तरीही एका तालुक्याचं प्रतिनिधित्व असलेल्या निवडणुकीच्या मैदानात का उतरलाय, असं विचारलं. तर म्हणाले, मी विधानसभेत जाईन तेव्हा तिथं संपूर्ण राज्याच्या मंचावर असेन. एका मतदारसंघापुरता नसेन.
या निवडणुकीत काही गोष्टी जुळून आल्या नाहीत. पण निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाला मान्यता मिळेल. त्यानंतर त्यांचा खऱा प्रवास सुरू होईल. त्याचं लक्ष्य आहे ते २०३०ची विधानसभा निवडणूक. आधीही तेच लक्ष्य होतं. ज्या राज्यानं आपल्याला प्रेम दिलं, ओळख दिली त्या मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी हे धाडसी पाऊल उचललंय. यामागं भाबडेपणा नाही. विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. त्यासाठी आयपीएसची नोकरी सोडलीय. पाच वर्षे काम करायचं आणि २०३०च्या निवडणुकीत ताकदीनं उतरायचं, असा त्यांचा निर्धार आहे. तोपर्यंत पक्षसंघटना बांधणीसाठी वेळही मिळेल. २०३०च्या निवडणुकीत हिंद सेना ताकदीनं उतरेल. आम्हाला किती जागा मिळतील, हे आता सांगणार नाही पण २०३०चा बिहारचा मुख्यमंत्री ठरवण्याएवढी राजकीय ताकद निश्चित निर्माण करू, असा त्यांना विश्वास आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीतल्या एका तरूणानं गौतम बुद्धाच्या भूमीत कर्तृत्व सिद्ध केलंय. त्याच कर्तृत्वाच्या बळावर त्यानं राजकारणात नशीब अजमावायचं ठरवलंय. ज्या भूमीनं आपल्याला ओळख दिली, त्या भूमीतल्या लोकांचं जीवनमान उंचावण्याचं, त्यांच्या जगण्यामध्ये परिवर्तन आणण्याचं स्वप्नं बाळगून शिवदीप लांडे यांनी एक नवा प्रवास सुरू केला आहे. आताच्या निवडणुकीत ते निवडून येतील किंवा नाहीही. तेही त्याबाबत ठाम दावा करीत नाहीत. पण पाच वर्षांनंतरच्या राजकारणा बद्दल ते आत्मविश्वासानं बोलतात. स्वप्नवत असलं तरी ते स्वप्नं साकार करण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यासाठी कष्टाची तयारी आहे.
विजय चोरमारे
ज्येष्ठ पत्रकार
(साभार - सदर पोस्ट विजय चोरमारे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






