Home > मॅक्स ब्लॉग्ज > महाराष्ट्रातील आजवरचे मोठे बंड

महाराष्ट्रातील आजवरचे मोठे बंड

महाराष्ट्रातील आजवरचे मोठे बंड
X

पुलोदचा प्रयोग – १९७८

१९५६ ला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला... तेव्हापासून १९७८ पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसची एकहाती सत्ता होती...मात्र, अचानक १९७८ मध्ये महाराष्ट्रानं पहिल्यांदाच राजकीय बंडाचा प्रयोग बघितला तो पुलोदच्या माध्यमातून...म्हणजे आज अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या बंडाची चर्चा अधिक होतांना दिसतेय...मात्र, बंड करणाऱ्या नेत्यांचं पुढे काय झालं...याविषयी फारशी चर्चा होत नाही...त्यामुळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या राजकीय बंडांचा इतिहास पाहणार आहोत...

१९७५ साली देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली...त्यानंतर १९७७ मध्ये आणीबाणी संपुष्टात आली. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदाचं रूपांतर इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसमध्ये झालं...त्यावेळी शरद पवार हे रेड्डी काँग्रेससोबत होते...तर शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा महाराष्ट्र समाजवादी पक्ष स्थापन केला...त्यानंतर १९७८ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या...त्यावेळी सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या त्या जनता पक्षानं...त्यांचे तब्बल ९९ आमदार निवडून आले होते...तर इंदिरा काँग्रेसचे ६५ आणि रेड्डी काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते...त्यामुळं रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीपदी आणि इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले...संयुक्त महाराष्ट्रातील हे पहिलं आघाडी सरकार म्हणून अस्तित्वात आलं...या सरकारमध्ये शरद पवार हे उद्योगमंत्री होते...काही दिवसानंतरच या दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले, दोन्ही बाजूंनी परस्परांवर टीका सुरू झाली...या सर्व प्रकाराला वसंतदादा कंटाळले होते...विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण यांना देखील आघाडीचा हा प्रयोग मनापासून पटलेला नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात...त्यातूनच मग शरद पवारांच्या माध्यमातून वसंतदादा आणि यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. आणि पवारांनी ३५ आमदारांच्या पाठबळावर पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) चा प्रयोग करून महाराष्ट्रातील सर्वात तरूण म्हणजे वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचा पराक्रम केला...त्यानंतर जवळपास दोन वर्षे पुलोदचं सरकार चाललं...त्यानंतर पुढची जवळपास ६ वर्षे शरद पवार यांना विरोधी पक्षाच्या बाकावर बसावं लागलं होतं... ७ डिसेंबर १९८६ मध्ये राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली शरद पवार हे पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले...तेव्हा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते...मात्र, त्यांच्याविरोधातील नाराजी ही शरद पवारांच्या पथ्यावर पडली... त्याचं झालं असं की चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार निवडण्याचं कामंही काँग्रेसनं वसंतदादांवरच सोपवलं होतं...ज्या शरद पवारांनी 1978 साली वसंतदादांचं सरकार पाडलं होतं. त्याच वसंतदादांनी शरद पवारांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव सुचवलं होतं, ही आठवण खुद्द पवारच मोठ्या कौतुकानं सांगतात...

शिवसेनेतलं पहिलं मोठ बंड – १९९१

१९९१ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वातील सरकार होतं...महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि महात्मा पुले यांच्या विषयी अवमानकारक लिखाणाच्या विरोधात दुखावल्या गेल्यामुळं भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत ५४ पैकी १८ आमदारांसह बंड केलं...शिवसेनेच्या कारकिर्दीतलं हे पहिलंच मोठं बंड होतं...भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना महसुलमंत्री करण्यात आलं...त्यांच्यासोबत आलेल्या १८ आमदारांपैकी ६ आमदार शिवसेनेत परतले तर १२ आमदार काँग्रेसमध्येच राहिले...पुढे १९९९ मध्ये पवारांनीच काँग्रेसमध्ये बंड केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्यावेळी भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले...

गणेश नाईक, सुरेश नवले, गुलाबराव गावंडेंचं बंड – १९९८

नवी मुंबईतील गणेश नाईक, बीडमधील प्रा. सुरेश नवले आणि अकोल्याचे गुलाबराव गावंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याविरोधात बंड पुकारून शिवसेना सोडली होती...त्यानंतर या तिघांनीही नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला...मात्र, त्यात ते यशस्वी ठरले नाहीत...नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर सुरेश नवलेंनी राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाणं पसंत केलं...

नारायण राणेंचं बंड – २००५

शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून नारायण राणेंना शिवसेनेनं संधी दिली. अनेक वर्ष काम केल्यानंतर राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला...मात्र, महसुल, उद्योग यासारखी खाती देऊनही तिथं राणे फारसे रमले नाहीत... त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष त्यांनी स्थापन केला...मात्र, अचानक त्यांनी २०१९ मध्ये तो पक्षच भाजपमध्ये विलीन करून टाकला...नारायण राणेंनी विजय वडेट्टीवार, माणिकराव कोकाटेंसह एकूण 10 समर्थक आमदारांसोबत काँग्रेसचा ‘हात’ पकडला होता.

राज ठाकरेंचं बंड – २००६

२००५ सालापासून शिवसेनेत नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले...त्यात स्वतःला त्या पदासाठीचे दावेदार म्हणून राज ठाकरे पाहू लागले...मात्र, अचानक उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची सूत्रं गेली...त्यामुळं दुखावलेल्या राज यांनी पक्षातल्या निर्णयप्रक्रियेतूनच स्वतःला दूर ठेवायला सुरूवात केली...या नाराजीतूनच त्यांनी जानेवारी २००६ मध्ये शिवसेनेतील आपल्या सर्व पदांचा त्याग केला...आणि ९ मार्च २००६ रोजी मनसे या नव्या पक्षाची स्थापना केली...

एकनाथ शिंदेंचं बंड – २०२२

महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापनेला विरोध करत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह केलेलं बंड हे शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड ठरलं...पुढे त्यांनी न्यायालयीन आणि प्रशासकीय संघर्ष करून शिवसेनेचाच ताबा घेतला...शिंदे यांचं बंड यशस्वी ठरलं कारण त्यांना भाजपनं थेट मुख्यमंत्रीपदाची संधी दिली...

अजित पवारांचं बंड – २०२३

एकनाथ शिंदे यांच्या बंडांची आग शांत होण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकीय बंडात आणखी एक भर पडली ती अजित पवार यांच्या रूपानं...२ जुलै २०२३ रोजी अजित पवार हे राष्ट्रवादीतील ३० आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले...त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं...शिवाय त्यांच्या ९ समर्थक आमदारांना मंत्रिपदंही मिळाली...

तर हा होता महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षवेधी बंडांचा इतिहास...अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रच्या युट्युब, फेसबुक, ट्विटर अकाऊंटला लाईक, शेअऱ आणि कमेंट करायला विसरू नका... पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह... तूर्तास धन्यवाद ...


Updated : 4 July 2023 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top