Home > मॅक्स ब्लॉग्ज > भरत गोगावले तुम्ही तुमची बुरसटलेली मानसिकता दाखवलीच...

भरत गोगावले तुम्ही तुमची बुरसटलेली मानसिकता दाखवलीच...

भरत गोगावले तुम्ही तुमची बुरसटलेली मानसिकता दाखवलीच...
X

महिला आणि पुरुष यांच्यात फरक असतोच म्हणून अदिती तटकरे यांच्या पेक्षा आपण चांगले काम करू शकतो. असे बुरसटलेल्या विचारांचे विधान भरत गोगावले यांनी केले. भरत गोगावले काय अशी मानसिकता अनेक राजकीय नेत्यांची आहे. राज्याचे नवे उपमुख्यमंत्री पण यात आहेत. पण वारंवार महिलांना कमी लेखणाऱ्या या नेत्यांना आता महिलांनी धडा शिकवला पाहिजे. महिलांबाबत राजकीय नेत्यांची मानसिकता काय भयंकर आहे याचाच विचार करायला लावणारा अजिंक्य आडके यांचा हा लेख नक्की वाचा...

सध्याच्या राजकीय घडामोडीत एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात प्रथमच एका महिला आमदाराला मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. आमदार अदिती तटकरे यांना महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधील गट सत्तेत सहभागी झाले आणि शिवसेनेतील काही आमदार नाराज झाले. रायगड जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांना मंत्रीपदाची असलेली अपेक्षा पूर्ण झाली नाही. म्हणून मग त्यांनी अदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधताना आपण तटकरे यांच्यापेक्षा चांगले काम करू शकतो असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात त्यांनी केलेली तुलना त्यांची पुरुषी मानसिकता दाखवून गेली.

महिला आणि पुरुष यांच्यात फरक असतोच म्हणून अदिती तटकरे यांच्या पेक्षा आपण चांगले काम करू शकतो. असे बुरसटलेल्या विचारांचे विधान भरत गोगावले यांनी केले. वास्तविक खर तर प्रशासकीय कौशल्य आणि जनतेसाठी काम करण्याची ईच्छा शक्ती ज्या कुणाकडे असेल तो चांगले काम करू शकतो. यात महिला पुरुष असा भेद करण्याची आवश्यकता नाही, अशी साधी गोष्ट गोगावले यांना कळू नये असा प्रश्न निर्माण होतो.

मात्र कित्येक पिढ्यांपासून समाजात महिलांविषयी असणारा विचार हा आजही अनेक पुरुषांना महिला या पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात चांगले काम करू शकतात हेच स्वीकार करू देत नाहीत. भरत गोगावले यांचे मत हे अनेक पुरुषी मानसिकता असणाऱ्या नेत्यांच्या मनातील खदखद बाहेर काढणारे आहे.

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा मोठा ठसा उमटविला आहे. आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने राजकीय जबाबदारी हाताळली आहे. यासंबंधी अनेक मोठे उदाहरणे असताना देखील नेत्यांकडून केली जाणारी विधाने ही अज्ञानातून नव्हे तर पुरुषी अहंकारातून येतात हे आपण समजून घेतले पाहिजे.

तामिळनाडूमध्ये जयललीता यांनी, उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांनी तर बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता प्राप्त करून वर्षानुवर्ष त्या राज्याच्या राजकारणात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशात १० वर्ष युपीएचे सरकार चालले आहे, हे अगदी नजीकच्या काळातील उदाहरणे आहेत. त्याहीपूर्वी इंदिरा गांधी यांनी एकहाती देशावर निर्माण केलेले वर्चस्व संपूर्ण देशाला माहीत आहे.

महिलांनी आपल्या कर्तृत्वाने राज्य आणि देश एकहाती चालवण्याचे एवढे मोठे उदाहरणे असताना महिलांकडून राजकारण होणार नाही किंवा त्यांना प्रशासन चालवणे जमणार नाही असे म्हणणे म्हणजे पुरुषी अहंकाराला या गोष्टी सहन होत नाहीत हेच दाखवून देणाऱ्या आहेत.

बर हे पहिल्यांदा घडले आहे, अशातला भाग नाही राजकीय नेते सातत्याने महिलांना कमी लेखण्याची चूक नेहमी करत असतात. नुकतेच पार पडलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवार यांनी एका प्रचारसभेत नारायण राणे यांना एका बाईने पाडले असे विधान केले होते. राज्याचे अत्यंत जबाबदार नेते म्हणून ओळख असणाऱ्या अजित पवार यांच्याकडून देखील असे वक्तव्य होत असेल तर काय बोलावे हा प्रश्न आहे.

आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही मर्द आहोत, हे तर सर्रास वापरले जाणारे वाक्य आहेत. यातून राजकीय नेत्यांचा पुरुषी अहंकारा तेवढा वेळोवेळी दिसून येत असतो. महिला कमी आहेत, या समजाला छेद देणारे अनेक मोठे उदाहरणे असताना देखील परत परत असे वक्तव्य केले जाणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहेत हा विचार प्रत्येक राजकीय नेत्याने करने आवश्यक आहे.

Updated : 17 July 2023 10:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top