Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाषा वाद : Metalinguistic Ability का गरजेची ?

भाषा वाद : Metalinguistic Ability का गरजेची ?

मराठी-हिंदी भाषेच्या वादात अर्णव खैरे याने केलेली आत्महत्या… भाषेच्या राजकारणाचे लोण तुमच्याही जिवावर बेतू शकते त्यामुळे सावधगिरी बाळगत मानसिक क्षमता कशी वाढवावी? तसेच भाषेच्या अट्टाहासाचे फायदे -तोटे समजून घ्या सायकॉलोजिस्ट डॉ. प्रदीप पाटील यांच्याकडून

भाषा वाद : Metalinguistic Ability का गरजेची ?
X

मातृभूमी ही संकल्पना मांडणाऱ्या सावरकरांच्या मातृभूमीत अनेक राष्ट्रे दडलेली आहेत! महाराष्ट्र हे त्यातले एक राष्ट्र. आणि या राष्ट्रामध्ये मातृभाषा मातृभूमीत बोलली जाणे हे स्वाभाविक आहे. पण राजकारणापोटी जेव्हा 'मातृभूमी' ही संकल्पना घेऊन "हिंदू भाषा" नावाचे राजकारण केले जाते तेव्हा द्वेष, तिरस्कार आणि अत्याचार यांचा जन्म होतो. सावरकरांची ही सामाजिक विद्वेष निर्माण करणारी मोठी देणगी समजायला हरकत नाही. आणि या देणगीतून मातृभाषेचे राजकारण उदयाला न आल्यास नवलच.

राष्ट्रभाषा आणि मातृभाषा किंवा राज्यभाषा या दोन्ही खरे तर देशाला एकसंघ बनवण्यात हातभार लावणाऱ्या असायला हव्यात. पण राजकीय नेते कुटीलपणे याचा वापर करतात. ज्या सत्ताधाऱ्यांनी आता मातृभाषा आणि आत्महत्या याचे राजकारण चालवले आहे त्यांचे बौद्धिक पिता हेच याला जन्म देऊन मोकळे झालेले आहेत. मुसलमान आणि त्यांची उर्दू भाषा ही मातृभाषा आहे असे चुकीचे गणित मांडणारे काही महाभाग आहेत. आणि यातूनच चुकीचे राजकारण तयार करणारे देखील महामहाभाग आहेत!

१९५३ मध्ये 'स्टेट रियोऑर्गनायझेशन कमिटी' स्थापन करण्यात आली. त्या कमिटीने भाषावार प्रांतरचना करण्यात यावी अशी शिफारस केलेली होती. मात्र केवळ भाषाच त्यामध्ये महत्त्वाची मानावी असे नव्हते. जेव्हा हिंदुत्ववादी राजकारण सुरू झाले तेव्हा हा देश एका भाषेत बांधला जावा अशी मनीषा व्यक्त केली जाऊ लागली. त्याचे कारण हिंदी आणि इतर राज्यभाषा यांच्यामध्ये सातत्याने विरोध आणि राजकारण होऊ लागले. राज्यभाषा वापरून राज्य ताब्यात ठेवणे हे राजकारण सुरू झाले व चालू आहे. संपूर्ण देश एका भाषेत बांधणे ज्यात संस्कृत ही देशभाषा व्हावी यासाठी देखील राजकारण चालू आहे. तामिळी, तेलुगु, मराठी, वगैरे गैर हिंदी भाषिक लोकांवर हिंदी लागणे हे जसे अव्यवहारी आहे तसेच हिंदी भाषा सक्तीचे करणे हे देखील अव्यवहार्य आहे.

सामान्य माणूस भाषेमुळे कुठे अडचणीत पडत नाही पण सामान्य माणसाला भाषेच्या राजकारणात ढकलून देणे हे राजकारणाचे काम असते जे सध्या घडते आहे. जे 'धर्मवाद' करून समाजात फूट पाडतात, हिंदू-मुसलमान नावाचे राजकारण करतात तेव्हा त्यांना देश फुटेल याची भीती वाटत नाही. पण भाषा हा विषय आला तर मात्र देश खतरे मे आहे असे म्हणत हे जागे होतात. जे भाषेचे राजकारण करतात त्यांना नाकारणे गरजेचे आहे.

प्रत्येक राज्याची मातृभाषा असते. ती रोजच्या व्यवहारात सर्वांनी सहजपणे वापरायला कोणाची काहीही हरकत असायचं कारण नाही. मात्र दुसऱ्या भाषेचे लोक त्या प्रांतात आले असतील तर ते परके समजण्याचं कारण नाही. ते भारतीय आहेत असे समजून भाषिक अडथळे व्यवहार करताना दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हा उपाय करायचा सोडून निव्वळ राजकारण करणे एवढेच चालू आहे.

खरे तर विविधतेत एकता निर्माण करायची असेल तर भाषेबद्दल मृदुता व सहनशीलता ही प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे हा त्याच्या वरचा उपाय आहे. सहनशीलता जेव्हा संपते तेव्हा दुःख, राग, भीती या भावना मोठ्या प्रमाणावर दाटून येतात. अशावेळी आत्महत्या करण्याचा विचार मनात न झाल्यास नवलच.

नुकत्याच घडलेल्या रेल्वेतील एका प्रसंगातून हे समोर आले आहे. जेव्हा सक्ती, अत्याचार, अन्याय या गोष्टींना सामोरे जावे लागते तेव्हा प्रत्येकाने या गोष्टी हाताळण्याची मानसिकता शिकणे गरजेचे असते. असे शिकविण्याची यंत्रणा समाजामध्ये नाही. शासनाला त्याचे महत्त्व वाटत नाही. अशावेळी कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये आपण आपली मानसिकता ढळू न देणे यासाठी काय करायला हवे हे सामान्य माणसाला कळत नाही. मनाची ही अक्षमता दूर करणे हा त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी सामान्य लोकांना मानसिक आरोग्य आधार देणे गरजेचे आहे.

हजारो वर्षे आजूबाजूची परिस्थिती ही विषमच राहिलेली आहे. ही परिस्थिती बदलणे किंवा बदलेल याची वाट बघणे हे आता आवाक्याबाहेर गेलेले आहे. परिस्थिती बदलत नसते. अशावेळी परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता विकसित करायची असते. आणि या क्षमतेचा विचार राजकारणी करत नाहीत.

बहुसंख्यांक आहोत म्हणून बहुसंख्यांकांचे राष्ट्र व्हायला हवे ही मानसिकता रुजविण्याचे काम सध्या सुरू आहे. ही मानसिकता असहनशीलता निर्माण करते. त्यातून हिंसा आणि दहशतवाद यांचा जन्म होतो. नोकरी, शिक्षण आणि सामाजिक संधी यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. आणि सामाजिक अस्थिरता निर्माण होते. जी आज सगळीकडे दिसत आहे. या देशात आम्ही बहुसंख्यांक आहोत म्हणून आमचा धर्म इथे आम्ही सर्वांना पाळायला लावू, त्याला संस्कृती असे गोंडस नाव देऊ असे म्हणणारे जितके दोषी आहेत तितकेच अमुक भाषेचे लोकच या देशात राहतील किंवा राज्यात राहतील हे म्हणणे देखील दोषी ठरते. पण ही मानसिकता रुजवण्याचे काम सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी बेमालूनपणे केलेले आहे. त्याचीच फळे आता जिकडे तिकडे दिसू लागलेली आहेत.

अनेक भाषा शिकल्यामुळे त्याचे फायदे प्रत्येक व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणावर होतात. ज्याला Cognitive Advantage कॉग्निटीव्ह एडवांटेज म्हणतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त भाषा अवगत केल्या तर समस्या सोडवणुकीची तंत्रे मोठ्या प्रमाणावर विकसित होतात. शिवाय आपले भान व अवधान हे टोकदार बनते. एका कामातून दुसऱ्या कामाकडे वळताना अजिबात विचलित न होणे हे कौशल्य विकसित होते. गोष्टी लक्षात ठेवणे किंवा स्मृती ही खूप चांगल्या पद्धतीने शाबूत राहते. या सर्व गोष्टींना मेटालिंग्विस्टिक ॲबिलिटी Metalinguistic Ability म्हणतात. विशेष म्हणजे विविध संस्कृतींबद्दलची समज अनेक भाषा शिकल्याने खूप चांगल्या पद्धतीने वाढत जाते. ज्यातून सद्भाव आणि सहकार्य याची निर्मिती होते. भाषा न समजल्याने निर्माण होणारी चिंता किंवा काळजी नष्ट होते. संवाद साधण्यामध्ये सहजता येते. खरे तर भाषेला विरोध करण्याऐवजी भाषा अवगत करणे ही गोष्ट आपल्या फायद्याची आहे हे लक्षात ठेवून जर आपण बहुभाषिक कला अवगत केली तर राजकारणी जवळ देखील फिरकणार नाहीत हे लक्षात येईल.

डॉ.‌प्रदीप पाटील

Updated : 25 Nov 2025 1:04 PM IST
Next Story
Share it
Top