Home > मॅक्स ब्लॉग्ज > Hospital bed scam: तेजस्वी सुर्याने खरंच माफी मागितली का?

Hospital bed scam: तेजस्वी सुर्याने खरंच माफी मागितली का?

बँगलोरमध्ये झालेल्या कोव्हिड बेड स्कॅमचं काय झालं? भाजप खासदार तेजस्वी सुर्या आणि या घोटाळ्याचा संबंध काय? नेमका हा घोटाळा काय होता आणि त्या दरम्यान नक्की काय काय झाले, जाणून घेऊया सौरभ सावंत यांच्याकडून

Hospital bed scam: तेजस्वी सुर्याने खरंच माफी मागितली का?
X

करोनाच्या दुसर्‍या लाटेत कर्नाटकाचाही बँड वाजला होता. विशेषतः बँगलोरचा. लोकांना औषधं मिळत नव्हती, ऑक्सिजन मिळत नव्हते. दवाखान्यात बेड मिळवण्यासाठीसुद्धा लोकांची मारामार सुरू होती. दवाखान्यात बेड बूक करण्यासाठी जे पोर्टल बनवले होते, त्यावर बेड्स नेहमी फुल दिसायचे. हळूहळू लोकांच्या तक्रारीमुळे कळायला लागले, की वेबसाईटवर बुक दिसणारे हे बेड्स कोणीतरी अतिशय महाग दरात इतरांना विकत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला बेड्स मिळत नाहीयेत.

अशा वेळी काही ऑनलाईन न्यूज वेबसाईट्सनी कर्नाटक सरकारवर आणि गायब असलेल्या दक्षिण बॅंगलोरचे भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावर टीका करायला सुरूवात केली होती. तरुण-तडफदार तेजस्वी सूर्या यांना सोशल मीडियावर 'छोटा मोदी' या नावानेही ओळखले जाते. भाषणं फार सुंदर देतात ते!

तर आपल्यावर टीका होत आहे, हे पाहून तेजस्वी सूर्या यांनी मैदानात उतरायचे ठरवले आणि त्यांनी याची सुरूवात बेड स्कॅमवर बोलण्यापासून केली. पण त्यांच्या दुर्दैवाने कर्नाटकात तर भाजपाचेच सरकार आहे. २८ पैकी २५ खासदारही भाजपाचेच आहेत. इतकेच कशाला, बँगलोर महानगरपालिकेतही भाजपाचीच सत्ता आहे. मग या बेड घोटाळ्यासाठी कोणाला जबाबदार ठरवायचे? इथून पुढेच तर खरी गंमत आहे.

४ मे रोजी तेजस्वी सूर्या यांनी काही आमदारांना सोबत घेऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात सांगितले, की त्यांच्या टीमने पूर्ण चौकशी केली असता त्यांना आढळून आले आहे, की हेल्पलाईनचे कर्मचारी, दवाखाने आणि महानगरपालिकेचे काही कर्मचारी, यांचे नेक्सस सुरू आहे. हे तिघे मिळून बेड्सची कृत्रीम टंचाई निर्माण करत आहेत, जेणेकरून ते बेड पैसे घेऊन इतरांना देता यावेत, असेही तेजस्वी सूर्या यांनी सांगितले.

या प्रेस कॉन्फरन्समुळे भाजपाचीच बदनामी होत आहे. हे लक्षात आल्यामुळेच कदाचित त्यांनी आपला अ‍ॅक्शन प्लॅन बदलला. प्रेस कॉन्फरन्सनंतर बँगलोरमध्ये सोशल मीडियावर मेसेजेस व्हायरल व्हायला लागले, की महानगरपालिकेत काम करणार्‍या मुस्लिमांमुळेच बँगलोरवासियांना मरावे लागत आहे. हे आतंकवादी आहेत. यांच्यामुळे हिंदूंना बेड मिळत नाहीयेत. वगैरे वगैरे

टायमिंग किती जबरदस्त होती, बघा... प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी, म्हणजे ५ मे ला, मेसेजेस व्हायरल झाल्यानंतर, तेजस्वी सूर्या यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आणि आमदारांसोबत महानगरपालिकेच्या वॉर रूमवर 'रेड' टाकली आणि तिथल्या अधिकार्‍यांसोबत तावातावाने भांडायला लागले.

वॉर रूममध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणार्‍या १६ जणांची यादी त्यांनी सादर केली. विशेष म्हणजे हे सोळाही जण मुस्लीम होते.

मुळात वॉर रूममध्ये एकूण २०५ जण काम करत असताना त्यांनी त्यातली मुस्लीम नावं शोधूनच यादी का बनवली असेल, हे कळायला आपण काही शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही.

तिथल्या अधिकार्‍यांना मुस्लीम व्हालंटीअर्सची यादी दाखवत असतानाच त्यांच्या सोबतच्या आमदारांनी मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरायला सुरू केली.

हा काय मदरसा आहे का? १६ मुस्लिमांना कामावर घ्यायला ही काय हज कमिटी आहे का? वगैरे वगैरे...

पोलिसांनी सुरूवातीला कसलीही चौकशी न करता त्या १६ जणांना दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये ठेवले.

जेव्हा पूर्ण चौकशी केली, तेव्हा त्या १६ जणांविरोधात पोलिसांना कसलेही पुरावे आढळले नाही. १६ पैकी १५ जण तर त्या बेड अलोकेशन टीमशी संबंधीतही नव्हते.

पण तोपर्यंत त्यांची नाहक बदनामी झाली होती. त्यांचे नाव, नंबर सगळीकडे पसरले होते. त्यांच्यावर आंतकवादी असण्याचा शिक्काही मारण्यात आला होता सोशल मीडियातून. शिवाय महानगरपालिकेने त्यांना कामावरूनही काढून टाकले.

दरम्यान बँगलोर आणि कर्नाटकाच्या सजग नागरिकांनी सोशल मीडियातून तेजस्वी सूर्यावर टीकेची झोड उठवली होती. स्वतः नागरिकांसाठी काही न करता जे करत आहेत, त्यांच्यावर खोटे आरोप लावल्यामुळे सुज्ञ जनताही चिडली होती. या टीकाकारांपैकी काही जण तर भाजपाचे समर्थकसुद्धा होते. जनमत आपल्या विरोधात जात आहे, हे लक्षात आल्यावर तेजस्वी सूर्या यांनी ७ तारखेला गुपचूप वॉर रूममध्ये जाऊन तिथल्या स्वयंसेवकांची माफी मागितली.

माफी मागताना त्यांनी सांगितले, की त्या १६ जणांचे फोन नंबर लीक करण्याचा माझा उद्देश नव्हता. मला जी लिस्ट देण्यात आली, ती फक्त मी वाचवून दाखवली. माझा त्यामागे काही वाईट हेतू नव्हता. गुपचूप माफी मागून आल्याची जेव्हा मोठी बातमी झाली, तेव्हा आपल्या समर्थकांमध्ये आपली इमेज जपून ठेवण्यासाठी तेजस्वी सूर्या यांनी सांगितले, की मी माफी मागितलीच नाही. माफी मागण्यासारखे मी काहीच केले नाही.

तेजस्वी सूर्या यांनी अजून एक मोठी चूक ११ मे रोजी केली. आपण मोदीजींपेक्षा जास्त शिकलेले आहोत, जास्त हुशार आहोत असे कदाचित त्यांना वाटले असेल. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे ठरवले. ही लिस्ट कोणी बनवली होती? का बनवली होती? तुमच्या सोबतच्या आमदारांनी मुस्लिमांबद्दल जी भाषा वापरली, त्याबद्दल तुमचे काय मत आहे? पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून त्या १६ जणांना पोलीस स्टेशनला नेले होते? अशा प्रश्नांची उत्तरं तेजस्वी सूर्या अर्थातच देऊ शकले नाहीत.

उलट त्यांनी पत्रकारांवरच अजेंडा चालवत असल्याचे आरोप लावले. आता या स्टोरीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट बघू... बँगलोर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने काल बाबू नावाच्या एका व्यक्तीला या केसमध्ये अटक केली आहे. आलेल्या बातम्यांनुसार हाच माणूस या बेड घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार आहे.

तुम्हाला प्रश्न पडला असेल, की यात ट्विस्ट काय आहे? तर ट्विस्ट हा आहे, की त्या दिवशी वॉर रूममध्ये 'रेड' टाकताना तेजस्वी सूर्या यांच्यासोबत असलेल्या आमदारांपैकी, एका आमदाराचा चक्क पर्सनल असिस्टंट आहे म्हणे हा बाबू. आणि त्या दिवशी हा ही वॉर रूममध्ये उपस्थित होता, भांडायला... क्राईम ब्रँचने बाबूसहित एकूण ६ जणांना आत्तापर्यंत या केसमध्ये अटक केली आहे. तेजस्वी सूर्या यांच्या दुर्दैवाने या सहापैकी एकही जण मुस्लीम नाहीये.

Updated : 27 May 2021 4:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top