Home > मॅक्स ब्लॉग्ज > Balasaheb Thackeray : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...

Balasaheb Thackeray : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक आठवणींचे किस्से सांगताहेत वसुंधरा काशीकर...

Balasaheb Thackeray : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...
X

बबनरावांच्या डोळ्यात आज खून सवार झालं होतं.... अमरावतीला शिवसेनेची साहेबांची सभा आणि बबनराव इकडे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस चालवत होते. साहेबांच्या सभेला जायचं आहे. वेळ जवळ येत चालली आहे. आपण या नोकरीमुळे वेळेवर पोहोचू शकत नाही. बबनरावांची अस्वस्थता, व्याकूळता आणि बैचेनी शिगेला पोहोचली होती. अचानक बबनरावांनी निर्णय घेतला. अख्खी बसच्या बस ताबडतोब फिरवली आणि बस अमरावतीकडे धावू लागली. ती थेट सर्व प्रवाशी घेऊन अमरावतीच्या सायन्सस्कोर मैदानात. प्रवाशी थिजलेले... चकित...ओळखीचे लोक अत्यानंदाने बबनराव आले बबनराव आले म्हणून चित्कारतात... बबनरावांच्या चेहऱ्यावर अतीव समाधान... बाळासाहेबांचं भाषण कानात प्राण ऐकून बबनराव ऐकतात आणि मग बस तीन-चार उशीरा (फक्त) ज्या गावाला जायचं तिथे पोहोचते. (यात कुठेही अतिशयोक्ती नाही. ही सत्य घटना आहे)

त्याचा परिणाम स्वाभाविकपणे बबनराव सस्पेंड होण्यात होतो. बबनरावांना हे सस्पेंड होणं अन्यायकारक वाटतं... मग माझे वडिल आणि बबनराव ही वरात सरांना ( मनोहर जोशी) भेटायला मुंबईत जाते. बबनराव माझ्या वडिलांचे मित्र. शिवाय बबनरावांना कुठल्या तरी सूतगिरणीचं संचालकपद ही हवं असतं. या सर्व प्रकारात विदर्भातला एक दाढीधारी भाजपचा नेता आपल्या विरोधात कट करतो आहे ही बबनरावांची खात्री असते.

बाबा आणि बबनराव मंत्रालयाकडे कारने जात असताना जबरदस्त गरमागरम डिस्कशन सुरू असतं... सर्व प्रवाश्यांना मुक्कामाच्या ठिकाणी न नेता सभेच्या ठिकाणी काही तासांकरता नेले आणि काही तास उशीर झाला तर सस्पेंड करायचं. तो दाढेल त्यानेच हा कट केला असणार... वगैरे वगैरे मराठी भाषेचे अलंकार म्हणजे शिव्या त्यांचा मनमुक्त वापर करत संवाद सुरू असतो. तेवढ्यात रिक्षाचालक काहीतरी विचारतो...नेमकं कुठे जायचे आहे वगैरे... कुठे वळवू असे... त्यावर बबनराव एक कचकचून भकारांत शिवी देऊन घाल समुद्रात असं उत्तर देतात.

कालांतराने बबनरावांचं सस्पेंशन रद्द होतं. बबनराव सेवेत रुजू होतात. त्यानंतरही ते तीन-चार वेळा शिवसेनेच्या सभास्थानी थेट बस नेणे हा प्रकार करतातच.

बाळासाहेब ठाकरेंनी १९६६ साली स्थापन केलेल्या शिवसेनेत असे अनेक कॅरेक्टर होते. ज्यांनी बाळासाहेबांवर अफाट प्रेम केलं. बाळासाहेबांच्या एका हाकेवर ज्यांची जीव दयायची तयारी होती.

मला अजूनही बाळासाहेबांच्या भाषणाची सुरूवात आठवते.... सायन्सस्कोर मैदान...२ लाख लोक... संध्याकाळी साडे-सात वाजले आहेत... मैदानात लाईट लागले आहेत...बाळासाहेबांचं आगमन होतं....लोकांमध्ये उन्मादी उत्साह...जय भवानी...जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो....

बाळासाहेब गळ्यात रुद्राक्षांची माळ, भगवी शॉल, तो चष्मा...ते तरतरीत नाक....छोटेखानी पण कडक शरीरयष्टी आणि आवाज....

आणि आवाज घुमतो.....

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातानों..... टाळ्या....काँग्रेसला गाडायचा निर्णय घेतलात... हात वर करुन सांगा”….प्रचंड टाळ्या....शिट्टया आणि लाखो हात आकाशाकडे वर होतात...

मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी... मुंबई आणि महाराष्ट्रात परप्रांतियांचे नोकरी-व्यवसायातले वर्चस्व हटवण्यासाठी.... लुंगी हटाव-पुंगी बजाव असे नारे देत शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना—म्हणजे शिवाजी महाराजांची सेना... असा त्या नावामागे अर्थ होता. स्थापन झाल्यावर केवळ दोनच वर्षात १९६८ साली मुंबई महानगर पालिका निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षासोबत युती करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेत पहिल्याच फटक्यात ४२ नगरसेवक निवडून आणले. काँग्रेसच्या पाठिंब्यानं मुंबईतली डावी कामगार चळवळ शिवसेनेनं मोडून काढली.

१९७० ला कामगार नेते कृष्णा देसाईंच्या थरारक हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कृष्णा देसाईंच्या पत्नींचा पराभव करत शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत निवडून गेला. खरं तर कॉम्रेड कृष्णा देसाईंच्या पत्नीला १३ पक्षांनी पाठिंबा दिला होता तरीही वामनराव महाडिक हे शिवसेनेचे उमेदवार १६७९ मतांच्या फरकानं निवडून आले.

देशाशी गद्दारी करणाऱ्या सगळ्यांना आम्ही नेस्तनाबूत करु. कम्युनिस्टांविरोधात आम्ही ठोकशाहीची भाषा वापरू कारण त्यांना लोकशाही कळत नाही असं भाषण विजयाच्या शिवाजी पार्कातल्या सभेत बाळासाहेबांनी केलं होतं.

शिवसेनेचे विधानसभेत गेलेले हे पहिले आमदार वामनराव महाडिक हे महापालिकेत क्लर्क होते. त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती... शिवसेनेचं वैशिष्टय हे की शिवसेनेने चेहरा नसलेले लोक मोठे केले. १९९० साली मंडल आलं होतं. मराठेतर ओबीसी समाजाच्या राजकीय महत्वाकांक्षा जागृत होऊ लागल्या होत्या. मराठा समाजातल्याही निम्न आर्थिक स्तरात असंतुष्टता होती. असंतोष होता. हा असंतोष हेरून अतिशय साध्या साध्या लोकांना शिवसेनेनं तिकीट दिलं. औरंगाबादचे चंद्रकांत खैरे हे बुरूड समाजाचे, ज्याची मतं ८००-१००० असतील. त्यांना तिकीट मिळाले. विदर्भातले काही आमदार तर छोटयाशा हॉटेलात भजी तळण्याचं काम करत होते. त्यांना शिवसेनेने तिकिट दिले. आणि या लोकांना मोठे केले. शिवसेनेच्या महिला आघाडीने कौटुंबिक समस्या स्वयंपाकघरात जाऊन सोडवल्या.

बाळासाहेब हे अद्भूत आणि अफाट व्यक्तिमत्व होतं... कलाकारांची पारख आणि प्रचंड गुणग्राहकता ही त्यांची वैशिष्ट्य... स्वत: व्यंगचित्रकार असल्याने असेल पण कलाकाराचं मन त्यांना समजायचं...

सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या मागणीवरुन त्यांना सुरक्षारक्षक बाळासाहेबांनी पुरवला होता... खरं तर भट साहेबांच्या जीवाला कसला आलाय धोका. पण बाळासाहेबांनी त्यांचा तो हट्ट पुरवला... भट साहेब निवडणूक आली की मतदारसंघाची जबाबदारी स्वत: मागून घेत... बाळासाहेब मग तिथल्या नेत्याला सांगून त्यांची ती मतदारसंघाची जबाबदारी त्याला पार पाडायला सांगत. आता ती जबाबदारी काय असू शकते हे मी सांगण्याची गरज नाही. बाळासाहेबांनी कलाकाराच्या कोटयातून भट साहेबांना घरही देऊ केले होते. ते भट साहेबांनी नाकारले...पण सुरेश भट, लता मंगेशकर या लोकांवर बाळासाहेबांनी प्रेम केलं. कलाकाराचं हे मूलपण समजून घेणं आणि ते जपणं हे बाळासाहेबांचं मोठेपण... गुळमुळीत भूमिका बाळासाहेबांनी कधी घेतल्या नाही. १९८७ ला जाहीरपणे गर्व से कहो हम हिंदू हैं हा नारा त्यांनी दिला...निवडणूक आयोगाने यासाठी त्याचा मतदानाचा अधिकार सह वर्षांसाठी स्थगित केला होता...

मला आठवतं रुबरु नावाच्या एका टिव्ही शोमध्ये हाँ मैं दारू पिता हूँ असं त्यांनी अनअपॉलिजिटिकली सांगितलं होतं. आज ते काही वाटत नाही पण त्यावेळी १९९० च्या दशकात स्क्रिनवर सांगणं मोठं धाडसाचं होतं. किंवा जाहिरपणे बाबरी मशीद तोडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे हे म्हणणंही.. थेट लोकांशी संवाद साधणारं बाळासाहेबांचं वक्तृत्व... अत्यंत अनौपचारिक अनोखी शैली... महाराष्ट्रात लाखांच्या संख्येनं सभेला गर्दी जमवू शकणारे मोजकेच नेते होते त्यामधले बाळासाहेब हे प्रथम क्रमाकांचे नेते... कोणत्याही राज्याच्या सरकारची आणि पोलिसांची बाळासाहेबांना अटक करण्याची ताकद नव्हती. कारण त्यानंतर काय परिणाम होईल हे सरकारला चांगलं ठावूक होतं.

महाराष्ट्रानं ज्या दोन लोकांवर निर्विवाद प्रेम केलं ती दोन माणसं म्हणजे आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे.... आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन म्हणून बाबांचे शिवसैनिक मित्र बबनराव आठवले... वडिल आठवले... आणि बाळासाहेबांचं वक्तृत्व-कर्तृत्व आणि नेतृत्व आठवलं....श्रद्धांजली...

वसुंधरा काशीकर

(लेखक, निवेदक, मुलाखतकार, स्वतंत्र पत्रकार, भाषा सल्लागार )

(साभार -सदर पोस्ट वसुंधरा काशीकर यांच्या फेसबुक भिंतीहून घेतली आहे)

Updated : 18 Nov 2025 6:13 AM IST
author-thhumb

वसुंधरा काशीकर

लेखक, निवेदक, मुलाखतकार, स्वतंत्र पत्रकार, भाषा सल्लागार


Next Story
Share it
Top