Balasaheb Thackeray Birth Centenary : 'बाळ ठाकरे' उल्लेख केल्यावर रागावलेले शिवसेनाप्रमुख !
लहानपणी शिवसेनेचं आकर्षण, गल्लीबोळ्यात केलेलं काम, क्रिएटिव्ह कामाचे साक्षीदार ते शिवसेनेचे राजकारण... मराठी माणसाला नेमकं काय मिळवून दिलं? तसेच बाळ ठाकरे उल्लेख केल्यानं रागावलेले बाळासाहेब... काय आहे तो किस्सा सांगताहेत चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे
X
Shiv Sena Founder Balasaheb Thackeray Birth Centenary आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. पत्रकारितेच्या करियरमध्ये एक दोनदा प्रत्यक्षात बाळासाहेबांना भेटण्याचा योग आला. मीडियाचं जबरदस्त जाण असलेला हा महाराष्ट्राचा महानेता होता. आहे. जेव्हा बाळासाहेंबांचा उल्लेख होतो तेव्हा रघुनंदन धर सर आठवतात. माझे पहिले संपादक. एकदम बिन्धास्त संपादक आणि त्यांचा बाळासाहेंबासोबतचा थेट संघर्ष आठवतो.
साल 1999. तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीची सत्ता होती. 1998 च्या डिसेंबर महिन्यात आम्ही 'इन टाईम' या केबल नेटवर्कवर शहरातलं पहिलं मराठी बातम्यांचं बुलेटिन सुरु केलं होतं. त्यात नावाच्या पट्टीत 'बाळ ठाकरे, शिवसेनाप्रमुख' असं लिहिलं जायचं आणि एंकर किंवा व्हॉईस ओव्हरमध्ये ही 'बाळ ठाकरे' असाच उल्लेख असायचा. तेव्हा मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं, नारायण राणे नवे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हाचे आमचे सिनियर रिपोर्टर मंदार परब यांनी बाळासाहेबांना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. प्रश्न थोडा तिरकस असावा, यावर थेट उत्तर न देता बाळासाहेब म्हणाले "तुमची ती निवेदक, तुंगारे बाई, माझ्या बरोबर गोट्या खेळायची ना? एव्हढंच." त्यांना बाळासाहेब ऐकण्याची सवय होती. आम्ही बाळ ठाकरे म्हणायचो आणि लिहायचो. याचा त्यांना तेव्हा कदाचित राग आला असावा.
मंदार परब यांनी घडलेला प्रकार संपादक रघुनंदन धर यांना सांगितला. त्यानंतर बुलेटिनमध्ये त्यांचा उल्लेख फक्त 'शिवसेनाप्रुख' असाच करायचा. असं फर्मान आलं. शिवसेनेची त्यावेळची काम करण्याची पद्धत पाहता हे अंगाशी येईल असं वाटलं होतं. पण तेव्हा धर सरांनी म्हटलेलं एक वाक्य नेमकं लक्षात राहिलं. "ते सत्तेत आहेत त्यामुळं आता काय ते तोडफोड करणार नाहीत." झालं ही तसंच. त्यानंतर धर सर पुढचे एक वर्ष संपादक होते. तोवर बुलेटिनमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख फक्त शिवसेनाप्रमुख असाच व्हायचा. या दरम्यान मंदार परब बाळासाहेबांना अनेकदा भेटले. त्यांनी या संदर्भात पुन्हा कधीच विचारलं नाही.
लहानपणी मला शिवसेनेचं भारी आकर्षण होतं. एक तर मी सुंदर कमला नगर या झोपडपट्टीमध्ये वाढल्यानं तिथली परिस्थिती शिवसेनेला पुरक होती. गटर, मीटर, पाणी आणि वडापाव या भोवती शिवसेनेचं राजकारण चालायचं. १९९२ च्या दंगलीत आम्हाला पेट्रोल बॉम्बची रसद शिवसैनिकांनी पुरवली होती. पण आमच्या सुंदर कमला नगरमध्ये धारावी सारखी दंगल झालीच नाही. आम्हाला शिवसैनिकांनी स्वरक्षणासाठी पूर्ण तयार केलं होतं. त्यानंतरच्या निवडणुकीत आम्ही लहान मुलांनी शिवसेनेचं काम केलं होतं. त्याचं प्रसिध्दी पत्रकं वाटणं, शिवसेनेच्या शाखेत बसणं अगदी भारी वाटायचं. शिवसेनेचा एकूण प्रचार हा क्रिएटिव्ह असायचा.
राजीव गांधी विन चच्ढा
३६ कोटीचा खणला खड्डा
त्यात बसले सत्ताधारी
शिवसेना नवं राज्य उभारी
असली भन्नाट स्लोगन असलेली भित्तीपत्रं आम्ही स्वत: चिटकवली आहेत. मिथुन, अनिल कपूर हे भाजपासाठी व्हिडिओ गाण्यांवर नाचायचे. शिवसैनिक घराघरांत जायचे. लोकांना समजवायचे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना या शिवसैनिंकाची गरज पडलेली असायचीच. सहाजिकच मतं शिवसेनेलाच पडायची. सर्वत्र पसरलेल्या शाखा आणि तिथले शिवसैनिक हे पक्षाची जान होती. ते समांतर सत्ताच चालवायचे. शिवसेनेच्या शाखेतून युतीचा प्रचार चालायचा. त्यामुळं चांगला फायदा झाला. युतीची सत्ताही आली.
शिवसेनेला वसंत सेना असं म्हटलं जायचं. मुंबईतल्या कम्युनिस्टांना पर्याय उभा करण्यासाठी शिवसेनाला खतपाणी घातलं गेलं असं म्हटलं जायचं. कम्युनिस्टांचा बिमोड करताना बाळासाहेबांनी डाव्यांचीच रणनिती वापरली. नाक्यानाक्यावर शिवेसेनेची शाखा आणि तिथं सामना पेपर. पेपर वाचण्याची सवय या शिवसेना शाखेत लागली. नवाकाळ आणि सामना जास्त वाचले जाणारे पेपर होते.
एका वडापावावर दसरा मेळाव्यात शिवsssssसेनाssss अशी आरोळी देणाऱ्यां कट्टर शिवसैनिकांमुळं शिवसेना घराघरात पोचली, वाढली. बाळासाहेब मराठी माणसाचे दैवत झाले. मराठी माणसाची आयडेंटिटी शिवसेना झाली. हे श्रेय बाळासाहेबांचं.
पुढे देशाच्या भटकंतीवर असताना पंजाब, हरियाणा आणि युपीतही शिवसैनिक भेटले. महाराष्ट्रातून आलोय समजल्यावर मेहमान नवाझी पण झाली.
काही वर्षांपूर्वी मी दिल्लीत असताना मराठी माणूस म्हणून भरपूर मान मिळाला त्याचं थोडं बहुत श्रेय बाळासाहेबांना द्यायला हरकत नाही. लोक घाबरुन राहायचे. तिथले आमचे संपादक संजय ब्रागटा नेहमी गमती म्हणायचे
"क्या भाई मराठी माणूस आज क्या है? क्या हंगामा किया है?"
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।
ही आग प्रत्येक मराठी माणसांमध्ये धगधगत ठेवण्याचं श्रेय बाळासाहेबांना द्यावंच लागेल.
जय महाराष्ट्र!!!!






