Home > मॅक्स ब्लॉग्ज > बागेश्वर धामच्या बाबाचे बोल आणि चमत्कारांचे झोल :अ‍ॅड. विवेक ठाकरे

बागेश्वर धामच्या बाबाचे बोल आणि चमत्कारांचे झोल :अ‍ॅड. विवेक ठाकरे

गेले काही दिवस बागेश्वर धामचा धीरेंद्र बाबा भलताच चर्चेत आला आहे. देशभरातील बुवा- बाबांवर संक्रांत आली असताना हा नवीन बाबा मात्र प्रसिध्दीच्या झोतात आहे. त्याला कारणही तसेच आहे. महाराष्ट्रातील अंधश्रध्दा निर्मूलन समितीने या बाबाच्या चमत्कारांना आव्हान दिल्यानंतर माध्यमांनी बाबाला उचलून धरले आहे. त्यामुळे सिद्धपुरुष (की प्रसिद्धपुरुष) धीरेंद्र बाबाच्या बागेश्वर धामची, तेथील प्रवेशाची आणि चमत्कारांची चिकित्सा केली आहे,अ‍ॅड. विवेक ठाकरे यांनी...

बागेश्वर धामच्या बाबाचे बोल आणि चमत्कारांचे झोल :अ‍ॅड. विवेक ठाकरे
X

बाबाचाच जयजयकार करणाऱ्या एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार बागेश्वर धाममध्ये प्रवेश कसा मिळतो ? प्रवचनामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकाला टोकन दिले जाते. भक्तांना हे टोकन विशिष्ट तारखेला बागेश्वर धामच्या पेटीत टाकावं लागतं. या टोकनसह भक्तांना एक फॉर्म भरुन द्यावा लागतो. फॉर्ममध्ये आपलं नाव, वडिलांचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहावा लागतो. ज्या व्यक्तीचा नंबर लागतो, त्याला बागेश्वर धामकडून संपर्क केला जातो आणि उपस्थित राहण्याची तारीख दिली जाते व त्याने त्याच दिवशी बागेश्वर धाममध्ये हजेरी लावावी लागते. हजेरी लावण्याआधी भक्तांना तीनपैकी एका रंगाच्या कपड्यामध्ये नारळ बांधून टाकावा लागतो. सामान्य भक्तांनी लाल रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा. जर विवाहप्रश्नी समस्या असतील तर पिवळ्या रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा आणि भूतबाधा झाली असेल, तर काळ्या रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा.

उपस्थितांपैकी मोजक्या भक्तांनाच मंचावर येऊन समस्या मांडण्याची संधी मिळते. बागेश्वर धामचे लोक अशा भक्तांना फोनवरुन संपर्क साधतात आणि त्यांनाच मंचावर उपस्थित राहण्याची मुभा मिळते

बागेश्वर धाममधील पद्धत काय?

धीरेंद्र शास्त्री हे समस्या घेऊन आलेल्या लोकांना मंचावर बोलवतात. त्यांची समस्या काय आहे, हे एका कागदावर लिहून दाखवायचं आणि त्या समस्येवर उपायही सांगायचा. हे महाराज लोकांच्या अंगातली भुतंही उतरवतात, असा दावा केला जातो. मध्येच मंचावरुन उतरायचं आणि अंगात संचारलेल्या लोकांपर्यंत जायचं आणि त्यानंतर भूतबाधा झालेल्यांना मंचापर्यंत बोलवायचं, अशी त्यांची पद्धत.

वरील माहिती या प्रतिष्ठित वृत्तवाहिनीने दिली आहे. तसेच या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराच्या भावाचे नाव आणि या भावाने नुकताच गृहप्रवेश केल्याची अद्भुत माहितीही या बाबाने दिली. या चमत्कारावर प्रभावित होऊन या पत्रकाराने बाबाचा प्रचंड जयजयकार केला.

आता इथे एक प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो की जर हे प्रतिष्ठित वाहिनीचे दिग्गज पत्रकार जर तीन दिवस बाबाच्या धाममध्ये बातमीनिमित्त घरना धरून असतील तर त्यांच्या भावाची, कुटुंबातील सदस्यांची माहिती काढणे काय कठीण आहे? तो चमत्कार कसा होऊ शकतो? हे या दिग्गज पत्रकार बंधूंना कळू नये हाही एक चमत्कारच आहे. मीडियाला बाबाचा चमत्कारच दाखवायचा होता तर 2-3 अनोळखी व्यक्ती उभ्या करून बाबाच्या चमत्कारांची मीडिया ट्रायल घ्यायला पाहिजे होती.

मुद्दा दुसरा की बागेश्वर धाममधील कार्यपद्धतीनुसार या धाममध्ये कोण भक्त येणार, त्याला काय समस्या आहे ही माहिती भक्ताने आधीच धामकडे सुपूर्त केलेली असते. त्या भक्ताला कधी बोलवायचे हेही धामकडूनच ठरवले जाते. मग आजच्या सोशल मीडियाच्या युगात, मोबाईल व तंत्रज्ञानाच्या युगात आणि गावा - गावात बाबाचे भक्त सर्वदूर पसरले असताना समस्या घेऊन येणाऱ्या नव्या वा जुन्या भक्ताला काय समस्या असू शकते याची व त्याच्या कुटुंबाची अधिकची माहिती काढणे कठीण राहिले नाही. तसेच त्याला ओळखणेही कठीण नाही. शेवटी कोणाची समस्या जाणून घ्यायची हे धामच्या आणि दिव्यपुरुष असणाऱ्या

धीरेंद्र बाबाच्याच हातात असते. त्यामुळे कोण माणूस उभा करायचा, काय चमत्कार दाखवायचा आणि काय नमस्कार मिळवायचा हेही बाबाच्याच हातात.. यामुळेच आजच्या सोशल मीडियाच्या काळात बाबाचे मार्केटिंग अधिक सोपे झाले आहे.

असे चमत्कार पूर्वी गावागावात येणारे भगवे वस्त्रधारी बाबा व नंदीवाले दाखवत होते. कुणाचे लग्न झालेय - नाही झालेय, घरात कोण लहान - कोण मोठा, कोण किती दानी, कोणाला पैसा टिकतो - नाही टिकतो, त्याची कारणे काय ही सारी माहिती हे बाबा व नंदीवाले देत असत व ती लोकांना पटतही असे. हा सारा खेळ मानसिकतेचा, फेस रिडींगचा, थोडा अभ्यासाचा, गावातूनच कुणाकडून तरी माहिती घेण्याचा व परिस्थितीचा असतो. लोक त्याला सहज भुलत असत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात या आधुनिक धीरेंद्र बाबासाठी ही गोष्ट अधिक सोपी झालीय व मार्केटिंगच्या जमान्यात या बाबाला अधिकची प्रसिद्धी मिळालीय इतकेच.

या बाबाला खरेच लोकांच्या समस्या समजून सोडवायच्या असतील व जनतेची सेवा करायची असेल तर त्यांनी कोणत्याही अटी-शर्थींशिवाय प्रत्येक भक्ताला धाममध्ये प्रवेश दिला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या समस्या समजून सोडवल्या पाहिजेत. तसेच खऱ्या अर्थाने देशाच्या विविध समस्या सोडवल्या पाहिजेत. पाकिस्तान - चीनसारख्या देशांना आपले दिव्य चमत्कार दाखवले पाहिजेत आणि आपले सीमाप्रश्न सोडवले पाहिजेत. तरच बाबांच्या चमत्कारांना खरा अर्थ प्राप्त होईल.

सिद्धीची प्रसिद्धी वाटणाऱ्या माध्यमांनीही बाबाच्या चमत्कारांची चिकित्सा करायला पाहिजे होती. मात्र आज प्रश्न विचारणे विसरून गेलेल्या माध्यमांनी बुवाबाजीवर प्रश्न उपस्थित करावेत अशी अपेक्षाच राहिली नाही. उलट पत्रकारच बाबासमोर हात जोडून जयजयकार करू लागले आहेत. शेकडो वर्षांपासून हिंदू धर्माची चिकित्सा होत आलेली आहे. त्यामुळे हिंदू धर्म जगात श्रेष्ठ आहे. मात्र आता हिंदू धर्माची चिकित्सा करायला गेल्यावर काहींचा सनातन धर्म जागा होतो आणि बाकीच्या धर्मावर प्रश्न का विचारला जात नाही याची विचारणा सुरू होते. बाकीच्या धर्मात बुवाबाजीच्या नावाखाली काही विकृत प्रकार सुरू असतील तर आताच्या जाज्वल्य हिंदुत्ववादी सरकारने त्यावर तात्काळ कायद्याचा बडगा उभारावा. मात्र कुठल्याही धर्मातील गोरगरीबांना नाडून आपले आश्रम भरणाऱ्या बुवाबाजीला थारा देऊ नये हीच अपेक्षा... !! बाकी बाबा येत रहातील.. जात रहातील... कारण तो सगळ्यात फायद्याचा धंदा आहे...!!

Updated : 24 Jan 2023 1:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top