Home > मॅक्स ब्लॉग्ज > ॲलोपॅथी विरुद्ध आर्युवेद... बाबा रामदेव यांचे २५ प्रश्न

ॲलोपॅथी विरुद्ध आर्युवेद... बाबा रामदेव यांचे २५ प्रश्न

ॲलोपॅथी विरुद्ध आर्युवेद... रामदेव बाबांनी ॲलोपॅथी आणि फार्मा इंडस्ट्रीला विचारलेले 25 प्रश्न तुम्हाला माहिती आहे का? रामदेव बाबांच्या प्रश्नांत काही तथ्य आहे का? सुरुवातीच्या काळात फक्त योगा करा असं सांगणारे रामदेव बाबा औषधं घ्यायचे का सांगू लागले? रामदेव बाबांचे प्रश्न आणि एकूण भूमिकेचा डॉ. नितीन पाटणकर यांनी घेतलेल्या समाचार...

ॲलोपॅथी विरुद्ध आर्युवेद... बाबा रामदेव यांचे २५ प्रश्न
X

बाबा रामदेव यांनी ॲलोपॅथी आणि फार्मा इंडस्ट्री यांना २५ प्रश्न विचारले आहेत. यातील बरेचसे प्रश्न हे जीवनशैलीजन्य रोगांवर कायमस्वरूपी किंवा रोग पूर्ण बरे करणारे उपाय आहेत का? अशा धर्तीवर आहेत.

१) उच्च रक्तदाब, मधुमेह, यकृताचे आजार यावर 'परमनेंट सोल्यूशन' काय असा प्रश्न आहे. पुढे म्हणतात की ॲलोपॅथीने टीबी आणि देवी हे रोग बरे करणारे उपाय शोधले. (इथेच ॲलोपॅथी डॅाक्टरांच्या हुशारीचं पितळ उघडं पडतं. त्यांना माहीतचं नाही की त्यांच्याकडे या रोगांना बरे करणारे उपचार आहेत ते. त्यांना वाटतं की टीबी ने आता XDR रूप धारण केलं आहे आणि त्यावर उपाय नाही. त्यांना वाटतयं की देवीचे विषाणू हे लसीकरण आणि जरा वेगळ्या प्रकारची जीवनशैली (विषाणूंची) म्हणून या मुळे देवीचे उच्चाटन झाले. हे बाबा रामदेवांनी सांगितल्यानंतर यांना, 'हे आम्हाला माहीत होते' हे सांगता येणार नाही. 'आपलीच मोरी, मुतायची चोरी' अशी अवस्था केली बाबांनी). पुढे बाबा म्हणतात, २०० वर्ष होऊन गेली ॲलोपॅथी जन्माला येऊन. आतातरी जीवनशैलीजन्य आजारांवर औषध शोधता आलं पाहिजे होतं.

आता रामदेव बाबा हे योगासनं करतात, त्यामुळे ते सतत चिरतरूण असतात. त्यांच्या लक्षात येत नाही की योग आणि आयुर्वेद यांचा जन्म होऊन हजारो वर्ष झाली आहेत. अशी औषधे असण्याची शक्यता फार्मा कंपन्या किंवा ॲलोपॅथी पेक्षा जास्त योगशास्त्रात किंवा आयुर्वेदात असायला हवी.

२) नंतरचे विविध प्रश्न, विविध रोगांवर, रोग बरे करण्यासाठी; तुमच्याकडे काय उपाय आहेत ते सांगा अशा प्रकारचे आहेत. त्या मध्ये डोळ्याचा चष्मा घालवणे, वंध्यत्व, तणावमुक्ती, चिरतारुण्य अशा अनेकविविध गोष्टींसाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का हे विचारण्यात खर्च केले आहेत.

जसे काही या सगळ्यांसाठी आयुर्वेदात, योगात उपचार आहेत असे म्हणायचे आहे का बाबांना? आमच्याकडे हमखास उपचार आहेत हे रामदेवबाबा सांगतात सगळीकडे. असले काही दावे केले आणि ते फसले तर यांना कुणी कोर्टात खेचू शकत नाही. यांना उपचार करण्याचे प्रमाणपत्र नसल्याने, असे उपचार घेणारा गुन्हेगार ठरतो.

३) विसावा प्रश्न फारच विद्वत्तापूर्ण आहे, हिंस्त्र क्रूर हैवानाला माणूस बनविणारे औषध ॲलोपॅथीमध्ये आहे का? या प्रश्नाला रामदेवबाबांकडे, 'हो आहे, असे उत्तर असेल; तर बाबा आणि त्यांचे गण यांना भारतभरातील तुरुंगात, हैवानिल नावाने गोळ्या बनविण्याचे कंत्राट द्यायला हवे. गेला बाजार, आयसिस सारख्या संघटनांचा मुकाबला करण्यासाठी हैवानिल, हिंस्त्रानिल, क्रूरनिल नावाच्या गोळ्या द्यायला हव्यात. म्हणजे जगभरातील सैनिक या गोळ्या वापरतील.

४) प्रश्न बावीस अजूनच गंमत. ॲलोपॅथी, आयुर्वेद यांच्यामधील भांडणे थांबविण्याचे औषध आहे का ?

५) पंचवीसावा प्रश्न तर मूलाधारगामी आहे. बाबा म्हणतात, ॲलोपॅथी सर्वशक्तिमान आहे तर मग ॲलोपॅथीचे डॅाक्टर आजारी पडताच कामा नयेत. याचा अर्थ सर्व योगशिक्षक आणि आर्युवेदिक डॅाक्टर यांच्याकडे निरामय जीवनाचे सार असायला हवे.

माझा रामदेव बाबांना प्रश्न आहे. तुमचे अगदी सुरवातीचे व्हिडिओ बघितले आहेत. त्यात तुम्ही, 'मॅां कपालभाती' असा उल्लेख करून कार्यक्रम करायचा. त्या वेळेस कपालभातीचा सराव केल्यास औषध सोडा, जडीबूटीही लागणार नाही असे म्हणायचात. मग तुम्हाला आयुर्वेदिक पावडरी आणि काढे द्यावेत असे कधीपासून वाटू लागले? तिथून सुरू होऊन औषध कंपनी का काढलीत?

तुमचा आयुर्वेदाचा संबंध काय ?

तुम्ही औषध सुचवतां त्या ऐवजी प्रिसक्राईब करून कायदेशीर जबाबदारी का घेत नाही. ॲलोपॅथी वापरून बरे न झालेले अनेक लोग, आपले दावे ऐकून आपले उपचार घेतील. त्यातल्या काही जणांना फायदा होणारही नाही. त्यांना आपल्याकडे कॅांपेन्सेशन मागू द्या की.

तिसऱ्या लाटेपूर्वी, योगोपचार कोविड सेंटर, आयुर्वेदोपचार कोविड सेंटर अशी अनेक केंद्र उभारा. स्वत:चे ICU उभारा. तिथे वेंटिलेटर्स ठेवा. ऑक्सिजन तर तुम्हाला लागणार नाहीच. कुठचेही उपकरण ही काही एका पॅथीची मक्तेदारी नाही. जे बोलता ते करून दाखवा. End to End सोल्यूशन द्या.

कोविड सोडा, इतक्या शतकात, सर्वजण प्रथम आयुर्वेद वापरू, गरज पडली तरच ॲलोपॅथी वापरू, शक्यतोवर योगोपचार करू. असे मानणारा मोठा वर्ग तयार करता आला नाही तुम्हाला.

यांचे खापर, मोघल, इंग्रज वगैरेंवर फोडू नका.

सतत, आमच्याकडे ॲलोपॅथीपेक्षा छान आणि सेफ काहीतरी आहे असं सांगत लोकांना भुलवत ठेवायचा उद्योग करणारी माणसे म्हणजे रामदेवबाबांसारखे बाबा लोक. मूल हुशार निपजलं तर माझ्यावर गेलं आणि बथ्थड निपजलं तर जोडिदारावर गेलं हे सांगणाऱ्या नवरा किंवा बायको सारखे आयुर्वेदिक बाबा आणि योगबाबा वागतात.

अनेक वर्षांपासून आपल्या शास्त्राबद्दल विश्वास निर्माण केला ॲलोपॅथीने. नवे प्रयोग करताना अनेकांना त्रास झाला, प्राणही गेले असतील,पण त्याची जबाबदारी कधी टाळली नाही ॲलोपॅथीने. सतत नवे प्रॅाब्लेम घेऊन लोक आले की त्यावर नवीन उपाय शोधण्यात कमीपणा मानला नाही ॲलोपॅथीने. नवीन नवीन शास्त्रशाखांची मदत घेतली, म्हणून शस्त्रक्रिया आणि इतर निदान आणि उपचार पद्धतीत अद्ययावत राहिली ॲलोपॅथी. आपल्या चुका कबूल केल्या तरच त्या सुधारतां येतात.

रुग्णाला पॅथीशी देणंघेणं नसतं. तो जमेल त्या मार्गाने बरं व्हायचा, जीव वाचवायचा प्रयत्न करणारच. मग तो नवस, अंगारा, पूजा, जप, तप, होमिओ, आयुर्वेद, ॲलोपॅथी कसलेही उपचार करून घ्यायला तयार असतो.

जबाबदारी ही उपचार सुचविणाऱ्याची आहे. आराम पडणे, रोग नियंत्रणात राहणे किंवा बरा होणे हे, त्या पॅथीचा आवाका आणि पॅथीवरील विश्वासावर देखील अवलंबून असते.

सध्याच्या कठीण काळात, उपचारांच्या विश्वासार्हतेला तडा जाऊन देता कमा नये. रामदेवबाबांना हे कधीच कळणार नाही. दुसऱ्याला कमी लेखून आपला धंदा वाढविणे हेच त्यांचे इप्सित असावे. अनेक योगशिक्षक आणि आर्युवेदिक वैद्य हेच करीत आहेत. त्यांना विनंती, तुमचा रामदेवबाबा होऊन देऊ नका.

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् |

येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत् ||

आणि आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला। झाली तयास तदनंतर भूतबाधा। चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा।। असे नको व्हायला.

डॉ. नितीन पाटणकर

Updated : 31 May 2021 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top