Home > मॅक्स ब्लॉग्ज > सध्याचे वातावरण आणि निरीश्वर विचार : मुग्धा कर्णिक

सध्याचे वातावरण आणि निरीश्वर विचार : मुग्धा कर्णिक

पुणे येथील नास्तिक मेळावा हिंदुत्ववादी संघटना आणि पुणे पोलिसांच्या संगनमत व बेकायदेशीर दडपशाहीला बळी पडल्याने ऑनलाईन भाषण आणि चर्चासत्र ठेवले होते, सध्याचे वातावरण आणि निरीश्वर विचारांवर मंथन केलं आहे मुग्धा कर्णिक यांनी...

सध्याचे वातावरण आणि निरीश्वर विचार : मुग्धा कर्णिक
X

माझा अत्यंत आवडता विज्ञानकथा लेखक आय़झॅक आसिमॉव यांच्या दोन अवतरणांनी सुरुवात करतेय. एकात तो म्हणतो- "When Stupidity, is considered Patriotism, it is unsafe to be intelligent."

"जेव्हा मठ्ठपणा म्हणजेच देशभक्ती असं समजलं जातं तेव्हा बुद्धीमत्तेचा वापर करणं असुरक्षित असतं." दुसरं त्याचं वाक्य जे त्याच्या फाउंडेशन या कादंबरी मालिकेतील एका नायकाच्या तोंडी आहे ते तर अजरामर आहे- "Violence is the last refuge of the incompetent." "निर्बुद्ध अकुशल लोकांना हिंसा हाच अखेरचा आसरा असतो."

आपण भारतीय निरीश्वरवादी सध्या ज्या वातावरणात जगतो आहोत त्या वातावरणात बुद्धीचा पराभव सातत्याने होतो आहे हे आपण पाहातोच आहोत. राजकीय पक्षांच्या यशापयशाबद्दल हे बोलत नाही. हे आहे, रोजच्या जगण्यातल्या अनुभवांबद्दल. पक्षीय राजकारणापासून दूर असलेल्या आणि निरीश्वरवादी, विवेकी भूमिका घेणाऱ्या भारतीय व्यक्तींनाही आजकाल पंधराव्या किंवा सतराव्या शतकात युरोपात जी वागणूक मिळत होती तशी वागणूक सोशल मिडियावर मिळत चालली आहे. तथाकथित प्राचीन परंपरांचा धर्मपालनाच्या नावाखाली बिनडोकपणे उत्सव करण्यावर टीका केली की लगेच या मागास विचारांच्या झुंडी अंगावर धावून येतात. एकमेकांच्या आधाराने हिंसक शिवीगाळ करतात. कुणी नास्तिक म्हणून रोखठोक बोलले- नव्हे नास्तिक नुसते एकत्र आले तरी भयग्रस्त होऊन शिव्यांचे दळण दळू लागतात हे तर आपण सातत्याने पाहातो आहोत.

भारतीय समाजात नास्तिक म्हणजे वेदप्रामाण्य नाकारणारे तत्त्वज्ञान होते तसेच ईश्वर आहे की नाही ही शंका खुलेपणाने व्यक्त करणारी नासदीय सुक्तासारखी सूक्तेही रचली गेली होती. पण संस्कृतीचा झेंडा आपणच काय तो सांभाळतो असे ज्या अविवेकी लोकांना वाटते त्यांना या कशाशी देणेघेणे नाहीच.

देव मानत नाही म्हणजेच देशद्रोही, अमुक एक गीत म्हणत नाही म्हणजे देशद्रोही इथून सुरुवात केल्यानंतर आमची धर्मसंघटना जो देव मानते तो देव मानत नाही, आमची पक्षसंघटना ज्या नेत्याला देव मानते त्याला जे देव मानत नाहीत ते म्हणजे देशद्रोही इथपर्यंत येऊन ठेपले आहे.

आजवर केवळ काही मुस्लिम देशांत देव न मानणाऱ्या व्यक्तींना देहदंडाची शिक्षा होती. पण आता वहाबी- कट्टरातला कट्टर इस्लाम मानणाऱ्या पंथासारखा पंथ हिंदू धर्मातही हेतूपुरस्सर रुजवला जात आहे. युनायटेड नेशन्समधल्या १९३ देशांपैकी बऱ्याचशा देशांत ईशनिंदा हा गंभीर गुन्हा ठरवण्यात येतो. त्यात सर्वाधिक भरणा मुस्लिमबहुल किंवा मुस्लिम राष्ट्रांचा आहे.

भारतीय संस्कृतीचा सर्वात उच्च प्रतीच्या अभिमानाचा विषय होता, वैचारिक मोकळीक. आणि यातून देशाची सांस्कृतिक, वैचारिक प्रगतीच झाली. अपप्रचार प्रभावी असला तरीही सत्य बदलत नाही- वैचारिक प्रगती अवश्य झाली. आज हा अभिमानबिंदूच पुसून टाकण्याचा प्रयत्न राजरोस होतो आहे.

इस्लाम हा राज्यधर्म म्हणून स्वीकारलेल्या मध्यपूर्वेतील देशांत ज्या प्रकारे गेल्या शतकापासून वहाबीवादाचा कट्टर इस्लाम अशिक्षित जनतेला प्रभावित करण्यासाठी वापरला गेला त्याच प्रमाणे सध्याच्या भारतातील वातावरणात अर्धशिक्षित बहुसंख्य हिंदू जनतेला कट्टरतावादाकडे ढकलण्यात येत आहे हे सत्य निरीश्वरवाद्यांच्या विवेकी डोळ्यांना दिसते आहे. वहाबींचा प्रभाव वाढू नये म्हणून तेथील राज्यकर्त्यांनी स्वतःच कट्टरता स्वीकारली आणि जनतेने ती शिरावर घेतली. आजच्या वातावरणात भारतात लोकशाही तत्त्वांचा प्रभाव वाढू नये, आपली कालबाह्य धार्मिकता सत्तेत रहावी म्हणून येथील केंद्रीय राज्यकर्ते आक्रमक धार्मिक कट्टरतेचा प्रभाव वाढवत आहेत.

इथे मला सावध करावेसे वाटते ते भारतीय दंड संहितेच्या अनुच्छेद २९५(अ) बद्दल.

रंगीला रसूल नावाची कादंबरी आर्य समाजिस्ट लेखकाने लिहिली आणि पैगंबराचा अवमान केला- ही घटना स्वातंत्र्यपूर्व काळात घडून गेली. पण धार्मिक भावना दुखवण्यासंदर्भात काहीही कायदा नव्हता त्यामुळे लेखक-प्रकाशकावर काहीही दंडात्मक कारवाई होऊ शकली नाही. मग ब्रिटिशांनी धार्मिक भावना दुखवणारांवर कारवाई केली जाऊ शकेल असा कायदा १९२७मध्ये केला. नंतर याचा दुरुपयोग होऊन धर्मावर योग्य टीका करणेही दुरापास्त होईल या विचाराने त्यात काही शब्द बदलले. तो अनुच्छेद असा आहे-

Section 295(A) of the Indian Penal Code (IPC) enacted in 1927 says:

Whoever, with deliberate and malicious intention of outraging the religious feelings of any class of [citizens of India], [by words, either spoken or written, or by signs or by visible representations or otherwise], insults or attempts to insult the religion or the religious beliefs of that class, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to [three years], or with fine, or with both.

यातील विथ डेलिबरेट अँड मालिशिअस इन्टेन्शन हे शब्द सुधारकांना धर्मातील चुकीच्या रूढींवर टीका करणे शक्य व्हावे म्हणून नंतर घातले गेले. पण तरीही केवळ तक्रारी, केसेस टाकून सुधारकांना त्रास देणे हे आजतागायत सुरू आहे. आणि सध्या तर धर्मावर टीका करणाऱ्या सर्वांना सोशल मिडियावर ट्रोल करणारे लोक तुमच्यावर केस करू, खेटे घालायला लावू वगैरे धमक्या देतच आहेत.

पण या ट्रोलिंग पलिकडे जाऊन आपणा सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना एक गुण चिकटवला जातो. की ते स्वतःला फार शहाणे समजतात. प्रथम माझ्या वाटणीला ही कमेंट आली तेव्हा मी सांगितलं होतं- खरंय मी स्वतःला शहाणी समजते कारण आप्तमित्रांचा राग सहन करून सत्य काय ते शोधायचा मी स्वतः प्रयत्न करते. कुणीतरी सांगत आलंय की देव असतो, संत असोत की प्रेषित, किंवा त्याच्यामुळे सारं चराचर चालतं वगैरे गोडगोड गाणीबिणी असतात म्हणून देव मानणार नाही. मला पुरावा हवा- तो मागणंच शहाणपणाचं आहे. म्हणून मी स्वतःला शहाणी समजते. तुम्ही वेडी, अतीशहाणी ठरवल्यामुळे त्या शहाणीवेत काहीही फरक पडत नाही. ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची. तेव्हा नाकं वाकडी झाली. पण सोशल मिडिया नसल्यामुळे ट्रोलिंग झालं नाही.

आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत सोशल मिडियाचा सहभाग खूप मोठा झाला आहे. शहाण्यांना वेडं ठरवण्याच्या, वेड्यांना साक्षात्कारी ठरवण्याच्या आणि असत्याला सत्य ठरवण्याच्या प्रचंड फॅक्टऱ्या निघाल्या आहेत. आणि तरीही आपण सारे- बरेचसे- निरीश्वरवादी, नास्तिक ठामपणे आपल्या मतावर अटल रहातो.

काहीजण जरा मवाळ भूमिका घेतात. आपला ईश्वराची कल्पना, धर्माची कल्पना, धार्मिक संस्कारांच्या कल्पना यांवर विश्वास नाही हे लपवून ठेवत रहातात. याचे कारण समजण्यासारखे आहे. आपण पुन्हा एकदा मी सुरुवातीला वापरलेल्या आसिमॉवच्या उद्धृताकडे येतो- "जेव्हा मठ्ठपणा म्हणजेच देशभक्ती असं समजलं जातं तेव्हा बुद्धीमत्तेचा वापर करणं असुरक्षित असतं." काहीजण असुरक्षितता झेलू शकतात, काहीजण परिस्थितीमुळे किंवा परिस्थितीतून घडलेल्या स्वभावामुळे नाही झेलू शकत. घरच्यांशी पंगा घेणं- तेही श्रद्धा-परंपरांच्या विषयावरून तर फारच अवघड. भावना दुखवून, रडारड होण्याची, आरडाओरड होण्याची भीती, घरातली शांती नष्ट होण्याची भीती दूर होणे जवळपास दुरापास्तच.

लहानपणापासून सर्वांना धार्मिक, देवभक्त ही विशेषणे म्हणजे काहीतरी थोर असे घरातून, शाळेतून गिरवायला लावलेले असते. धर्म म्हणजेच सत् असे समीकरण बळेच केलेले असते. मी अधार्मिक आहे असं म्हणायला जीभ अडखळते. मी देव मानत नाही हे हळू आवाजात सांगण्याची सक्तीच झाली आहे. आपण एकत्र येतो, कुणाची तरी भाषणे ऐकतो, आपसात विचारविनिमय करतो हे सुद्धा खपत नाही हे पाहिलेय तुम्ही.

अगदी स्वतः निरीश्वरवादी असणारेही अचानक ढुढ्ढाचार्य बनून कशाला हवा नास्तिक मेळावा, काय नवा धर्म स्थापन करताय का असले पोकळ प्रश्न विचारत 'लेखपाडन' कर्मकांड करतात. त्यांची री ओढणारे अनेकजण स्वतः देवावर कसलीही चिकित्सा न करता भक्ती ठेवणारे लोक असतात. पण आपली री बरेच लोक ओढतायत हे गोड वाटत असावं.

पहा, इथे तुम्ही नास्तिक नसलेल्यांनी येऊ नये असं स्पष्ट सांगितलंय. कारण आ बैल मुझे मार करणाऱ्या आस्तिकांना भलतीकडं शिंग लागायची शक्यताच नको. येऊ नका. आपल्या नाजूक कमसिन नादान भोळ्या भावना दुखवून घेऊ नका. आम्ही कुणाचं धर्मांतर करायला बसलेलो नाही. विवेकाचा आणि त्यातूनच जन्म घेणाऱ्या निरीश्वरवादाचा सर्वात महत्त्वाचा पैलू हा आहे की तिथवर ज्याचं त्यालाच पोहोचावं लागतं. पण आपल्यात कुणी अधिक वाचतं, कुणी कमी, कुणी अधिक तर्कनिष्ठ असते, कुणी धारदार असतं, कुणी सौम्य पण नेमकं असतं. आपण एकत्र येतो ते तार्किक विचारांचे वेगवेगळे पदर गोळीबंदपणे समजावेत म्हणून.

आता कुणी विचारेल- कशाला समजायला हवं. तुमची तुम्हालाच वाट शोधायची आहे ना- मग मेळावे कशाला. त्यांना उलट उत्तर देऊ- आमची वाट शोधताना आम्ही मेळावे घेतो, एकमेकांना भेटतो कारण तुमच्या विचार करणे नाकारणाऱ्या झुंडींच्या दुनियेत हेच एक आम्हाला शक्तीदायक वाटते.

विचार करणे नाकारणाऱ्या झुंडी या आजच्या माझ्या विषयाच्या केंद्रस्थानी आहेत. यात विचार करता येत असूनही आत्मविश्वास नसल्यामुळे गटाराच्या प्रवाहात हातपाय मारून बाहेर येण्याचा प्रयत्न न करणारेही असतात. परिसर ओळखीचा आहे, सोबत डुबक्या मारणारे परिचित आहेत- आपणच कशाला विरुद्ध जा असा विचार करून हतप्रभ होणारे सर्वात दुःखद, करुणाजनक वाटतात मला.

सगळेच स्थापित, प्रस्थापित, संघटित धर्म कालबाह्य झाले आहेत. नैतिकतेसाठी धर्माची गरज नसून व्यक्तिगत नीतीमत्तेची गरज आहे हे पटलेले अनेकजण आहेत हे आपल्याला मनोमन माहीत आहे. अनेकांचा देवावरचा विश्वासही जातीय अस्मितेसारखाच असतो, आणि धर्माची सांगड निदान भारताततरी जातीय अस्मितेशीच असते. पटत नसलं तरीही वळण पडलेलं बदलायची हिंमत होत नाही किंवा हिंमत नसतेच.

अशा निर्बुद्ध श्रद्धेच्या वातावरणात आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे. खरे तर विज्ञान-तंत्रज्ञानाची आणि भौतिक प्रगती वेगाने होत असताना वैचारिक कष्ट घेण्याची अधिक गरज असते.

ज्या काळात जगण्याचीच फारशी शाश्वती नव्हती, अन्न, आरोग्य या साऱ्याचीच वानवा होती त्या काळात असुरक्षित वाटणाऱ्या माणसांनी देवाची कल्पना केली, आधार शोधला. त्या पाठोपाठ त्या त्या प्रदेशात अनुकूल वाटणारे समाजनियम केले गेले. देवाची कल्पना करणारे मानव काही आधार शोधत होते. पण त्यांच्या विकलतेचा आधार घेऊन नंतर धर्मसत्ता आणि राज्यसत्ता फोफावल्या. पण अजूनही त्या असुरक्षिततेच्या काळात जन्माला आलेली देवाची कल्पना काही मानगुटीवरून उतरत नाही. ती समाजाच्या मानगुटीवरून उतरण्यासाठी आपल्याला जमेल तेव्हा जमेल त्यांच्याशी बोलत राहिले पाहिजे. घरात, दारात येणाऱ्या कुणालाही त्यांच्या श्रद्धा का चूक आहेत हे संथपणे समजावत राहिले पाहिजे.

यातील युक्तीवादांत आपला पराभव होतो- याचं कारण आपले मुद्दे ठिसूळ असतात असे नाही. तर ऐकणारे लोक कान बंद करून असतात. आयुष्याची इतकी वर्षे ज्या श्रद्धा सांभाळल्या त्या श्रद्धा निरर्थक होत्या हा फार मोठा धक्का असू शकतो. अशा भयंकर धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठीच तर तर्कहीन श्रद्धांचा आधार घेतला जात असतो.

आजच्या वातावरणात देवाची कल्पना, कल्पनेतल्या देवाचे तथाकथित प्रेषित- त्यांच्या दंतकथा, कल्पनेतल्या देवांचे गब्बर दलाल, त्यांची पीठे- चर्चची पॅपसी, मंदिरांचे पुरोहित-आचार्य, स्वामी, मशीदींचे मुल्ला-इमाम आणि त्यांच्या मागून जाणारी भक्त नावाची कडवी जमात यांच्या प्रभावासमोर विवेक विचाराचे तेज दाखवणे अवघड असेल पण अशक्य नाही.

साधनांची कमतरता सातत्याने भासत असताना साधने काबीज करण्याची स्पर्धा सतत चालते आणि त्यामुळे मानवी समाज हा सतत संघर्षाच्या पवित्र्यात असतो हे सत्य एकदा समजून घेतले की साऱ्या घडामोडींचा अर्थ लावणे सोपे होते.

कोणत्याही सामाजिक राजकीय विचारप्रणालीला राज्यसत्ताच नव्हे तर वैचारिक सत्ताही हवी असेल तर अनुयायी वाढावे लागतात. अनुयायी हे साधन होतात. आणि मग हे साधन वाढवण्यासाठी संघर्ष सुरू रहातो. जे राजकीय पक्षांचे तेच राजकीय विचारांचेही. आणि म्हणून तेच निरीश्वरवादी, धर्मकालबाह्यतावादी, विवेकवादी विचारांचेही होणार. आपला विचार वैचारिक क्षेत्रात मजबूत व्हावा अशी नुसतीच आशा करून, आणि तसे होत नाही यावर गळे काढून हाती काहीच लागणार नाही.

सध्याच्या वातावरणात जे अविवेकाचा असत्याचा प्रचार निर्लज्जपणे करत आहेत त्या सर्व राजकीय वर्तुळातील नेते, अनुयायी आणि असत्यप्रिय अशा जनतेलाही आपल्याला शब्दांनी तीव्र विरोध करायचा आहे.

कशाला कुणाच्या श्रद्धा दुखवायच्या हा साजूकपणा परवडायचे दिवस राहिलेले नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची. देवकेंद्री सण असोत की उपासासारखी व्रतं- रोझे, उपवास सारं यात आलं- त्यात आपण नावापुरतेही सहभागी होऊ नये. घरच्यांच्या समाधानासाठी करावं लागतं हे वरवर पटण्यासारखं कारण- कठोरपणे तपासून पहा. तुमच्या समाधानासाठी ते एखादं कर्मकांड बंद करतात का पहा. की केवळ तुम्हीच दर वेळी नास्तिक म्हणून आणि एकटे पडता म्हणून पडतं घेता? विचार करा आणि करायला लावा. असले प्रसंग चिकित्सेसाठी घुसळणीसाठी बिनदिक्कत वापरायला लागा.

प्रत्येक कर्मकांडं किंवा सण या मागे काही ना काही कथाकहाण्या असतात. ख्रिश्चॅनिटीतही असतात, हिंदू धर्मातही असतात- सर्वच संघटित धर्मांत असतात. त्या माहीत करून घ्या. दंतकथांचा- मायथॉलॉजीचा परिचय करून घ्या. अनेकदा या आस्तिक लोकांना यातलं काहीही माहीत नसतं. ते तुम्हाला माहीत असलं आणि त्यातले कच्चे मुद्दे, चुकीची तत्त्वं तुम्हाला कळली की त्यावर तुम्ही धडाडू शकता. गप्प रहाणं, जाऊ दे आता यांना काय समजावणार म्हणून सोडून देणं हा आपला नाकर्तेपणा आहे. प्रसंगी शिव्या खाऊन, ट्रोलिंग सहन करून, घरच्यांचा रुसवा पत्करून जे आहे ते मांडणे, फोल रूढींवर, नसलेल्या देवाच्या बेगडी कल्पनेवर आघात करत रहाणे हे आपले कर्तव्य आहे. दहा दणके घालाल तेव्हा कुठेतरी एकादा तडा जाईल, पाणी झिरपेल. किंवा कदाचित् दगडाखालचा झरा फुटून बाहेरही निघेल.

अनेक निरीश्वरवादी, विवेकवादी हे कर्तव्य निभावण्याचे टाळतात. हा थोडक्यात भ्याडपणा आहे. जोवर आपण आपल्या निकटच्या परिसरात झाडलोट करत नाही तोवर जागतिक प्रदूषणाबद्दल बोलून उपयोग नाही- हे अगदी तसंच आहे.या भूमीत एका दंतकथेतील पात्राच्या- रामाच्या मंदिराच्या प्रश्नावरून रण पेटते. हजारो कोटींचे भ्रष्ट संकलन होऊन एक दुही माजवणारा गट बलाढ्य होतो हे निरीश्वरवादाचे अपयश आहे म्हणतात. जे फॅशिस्ट राजकारणाचे यश आहे ते विवेकवादी माणसांचे अपयश असतेच एका अर्थी. पण आपण याकडे देशाच्या बौद्धिक उत्क्रांतीतील एक टप्पा म्हणून पाहिलं पाहिजे. उत्क्रांतीच्या प्रवासात कधीकधी अवक्रांतीही होते.

या देशातील धर्म काही विशिष्ट देवांना प्राधान्य देणारा आहे असा एक अपप्रचार यशस्वीपणे सध्या राज्यकर्ता बनलेला एकचालकानुवर्ती रा.स्व.संघ करीत आहे. भारतातला मूळ धर्म खरेतर कोणत्याच नावाचा नव्हता. एकाही वेदात या आचारधर्माला हिंदू हे नाव दिलेले नाही. आणि वेदांच्या आधी किमान तीसचाळीस हजार वर्षे आधीपासून सध्या ज्या भूखंडाला भारत म्हणतात त्या भूखंडावर मानव वसत होता. अश्मयुगीन मानववस्तीही इथे होती, खडकांवर चित्रे काढणाऱ्या शिकार करून जागणाऱ्या मानवी टोळ्याही इथे होत्या, इथेच हडप्पा संस्कृती नांदली. मग अचानक एकच धर्म आणि त्याचा अमका सॉल्लिड पॉप्युलर देव ज्याला कोट्यवधी रुपये शरयूच्या पाण्यात घालवून मंदिर बांधायलाच हवे हे कुठून आले?

प्रा. डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांनी त्यांच्या गॉड डिल्यूजन या पुस्तकात दिलेलं आणि मला नेहमीच फार भावणारं एक उदाहरण मी इथे पुन्हा एकदा देऊ इच्छिते. उत्क्रांती सिद्धांतातील एक उदाहरण आहे. पतंग म्हणजे मॉथ्स हे गेली अनेक सहस्रके चंद्राच्या प्रकाशात, चंद्राची दिशा पकडून रात्री प्रवास करत. पण माणसाला अग्नीचा वापर करता यायला लागल्यापासून, मानवाने लावलेले जळते दिवे, मेणबत्त्या आल्यानंतर त्यांना हा नवा प्रकाशाचा स्रोत आपल्यासाठी घातक आहे हे कळत नाही आणि ते थेट त्यांच्या दिशेने उडून त्यावर आदळून जळून जातात. देवाधर्माच्या कल्पनांबाबत माणसांचे काहीसे असेच होते आहे.

धर्माचे फायदे प्राचीन इतिहासपूर्व काळातील किंवा प्राचीन इतिहासातील माणसांना थोडेफार होत असतील. जग विचार करून जो ताणतणाव सोसावा लागतो त्यापासून मुक्ती मिळत असेल. तेव्हा या दृष्टीने लोक धर्माकडे आकर्षिले जात असतील. धर्माचे फायदे प्राचीन इतिहासपूर्व काळातील किंवा प्राचीन इतिहासातील माणसांना थोडेफार होत असतील. विचार करून जो ताणतणाव सोसावा लागतो त्यापासून मुक्ती मिळत असेल. तेव्हा या दृष्टीने लोक धर्माकडे आकर्षिले जात असतील. आजच्या वातावरणातही लोक असुरक्षित वाटल्यामुळे अध्यात्माकडे तसेच देवाधर्माकडे वळतात असे समाजशास्त्रे म्हणतात. त्यात तथ्यही आहेच. पण असुरक्षित वाटल्यानंतर सुरक्षिततेकडे जाण्याऐवजी जळत्या ज्वाळेकडेच चुकून झेपावणाऱ्या पतंगांसारखीच भाविक माणसांची गत होते आहे. नव्या भारतातील भक्तांचीही तीच गत होते आहे.

देशातील आताचे वातावरण, सध्याची परिस्थिती काही चिरकाल टिकणारी नाही. दीर्घकाल टिकेलही पण चिरकाल तर नाहीच. Nothing lasts forever. त्यामुळे सध्याची परिस्थिती हा अगदी विवेकवादाचा पराभव जरी मानला तरीही- असले पराभव तर गेली काही शतके विज्ञानवादी, विवेकी लोक पचवत आले आहेत. आणि ते पचवून जगाला विचार आणि कृतीने पुढे नेत आले आहेत.आता प्रश्न आहे तो आत्ता आणि इथे आपण विवेकवादी, निरीश्वरवादी लोकांनी काय करायला पाहिजे.

एक म्हणजे वैचारिक संघर्ष,

दोन म्हणजे वैचारिक संघर्ष.

आणि तीन म्हणजेही वैचारिक संघर्ष.

देव नाही कारण ती सृष्टीसंबंधी अनभिज्ञ असलेल्या प्राचीन मानवांनी स्वतःला सावरण्यासाठी रचलेली कल्पना आहे. आणि ती कालबाह्य झाली आहे. अशी कल्पना करण्याची आता गरज उरली नाही. स्वतःच्या भीतीवर मात करण्यासाठी काल्पनिक काहीतरी उभे करण्याऐवजी ठोस काहीतरी करा. एंक्झायटी होते? मनोविकार तज्ज्ञांची, मानसशास्त्रज्ञांची भेट घ्या. पॅनिक ऍटॅक येतो- कृतीत गुंतवून घ्या. कुठलातरी शिर्डी नाहीतरी प्रशांती नीलयमचा बाबा न शोधता मानसिक रोगांसंबंधी वाचा. आश्रमांत भर्ती होऊन मनःशांती शोधायची आणि कुठल्यातरी मृतप्राय लबाडाचा सुगंधी शेंबूड हुंगायचा वगैरे गोष्टी करण्यापेक्षा गरज असलेल्या लहान मुलामुलींना शिकायला मदत करा या साध्या गोष्टी आहेत- त्या लोकांना सुचत नसतील तर आपण त्यांना सांगितल्या पाहिजेत. हे कष्ट घ्यावे लागतील. वेळ घालवावा लागेल. लिहावे लागेल, बोलावे लागेल, समजावून सांगत रहावे लागेल. डोक्याला ताप करून घ्यावा लागेल.

ही लहान मुले किंवा बालबुद्धी तरूणही- प्रतिकांच्या झगमगाटाने दिपून जातात. त्यातल्या सोहळ्याच्या वातावरणाची भूल त्यांना पडते. झेंडे नाचवत रस्त्याने मिरवणूक काढायला मज्जा वाटते. मग तो नाचवला जाणारा झेंडा कुणीतरी लबाडाने हातात दिलेला असला तरीही ती तो नाचवत रहातात. बिल्ले लावतात, टीशर्ट्स घालतात, ढोल वाजवतात, अनवाणी चालत जातात, रस्त्यांवर लोळून कुणा मेलेल्या बाबाचे नाव लिहितात, पालख्या वाहतात, वारीलाही जातात.

आपण यातील मूर्खपणाबद्दल बोलले पाहिजे. समजावून सांगितले पाहिजे. आणि केवळ परंपरा टिकवायची म्हणून वारी ते दीपप्रज्ज्वलनसारख्या अगदीच उद्दिष्टहीन गोष्टींचा बडिवार माजवणारांवर टीका करत राहिले पाहिजे. कारण अखेर ही प्रतीके ज्ञान नसलेल्यांना लोभस वाटली तरीही देवधर्माच्या 'बुद्धीबंद' योजनेचाच भाग असतात. प्रतिकांचे निमित्त करून देवधर्माचे खरे रूप दाखवणे शक्य असते.

धार्मिक प्रतिके, स्थळे, चिन्हे, मंत्र-स्तोत्रे, रंग आणि धार्मिक-सांस्कृतिक अस्मिता राजकीय उद्योग करणारे संघ आणि पक्ष वापरून घेतात- त्यात धर्माचा किंवा अध्यात्माचा काडीचाही भाग नसतो, केवळ सामान्य नागरिकांना आपल्या राजकीय उद्दिष्टांच्या कार्यक्रमाकडे हाकत नेणे एवढाच भाग असतो. गणपती येण्याआधी पाहिले असेल कित्येक तरुण मुलेमुली झेंड्यांच्या उंचउंच काठ्या नाचवण्याची आणि ढोल वाजवण्याची प्रॅक्टिस अनेक दिवसांपासून करतात. मग ढोल वाजवणाऱ्या मुलामुलींचा ताफा मिरवणुकांनी निघतो. ही केवळ एन्जॉयमेंट आहे असे एक कारण पुढे केले जाते. पण त्या ताफ्यांना पुरस्कृत करणारे, तीर्थयात्रा पुरस्कृत करून आपला हरामाचा पैसा त्यात खरचणारे मागचे लोक हे बहुधा राजकारणी असतात. धर्माच्या, देवाच्या नावाने त्यांना सामान्यांची बुद्धी अंकित करायची असते. त्यांची विचारशक्ती कुंठित करायची असते.

महाराष्ट्राचा लाडका देव कानडा विठ्ठल- याच्या संतपरंपरेतून सुरू झालेल्या वारीचे प्रयोजन संपले आहे. तेव्हाची गरज होती बहुजनसमाजाने भटाविना देवाच्या दिलाशापर्यंत पोहोचून त्यांच्या दलाली रोलला आव्हान देण्याची. ती पूर्ण झाली केव्हाच. संतांच्या काळात वाहने आणि गाड्याघोडे सामान्यांना वापरण्याची सोयच नव्हती. त्यामुळे वारी चालत करणे हाच एक पर्याय होता. तेव्हा रस्तेही मातीचे असत- वाटा असत त्या. पंढरीची वाट होती- हायवे नव्हे... झाडेझुडे आजच्यापेक्षा अधिक होती. आणि तरीही टीव्हीवर फोटू येत नसल्यामुळे कमीच लोक वारी करत. आज हे सारे बदलले आहे. वाहने आहेत, परवडत आहेत, पायात चपला आल्या आहेत कशाला अनवाणी जायचं चालत? रस्ते डांबरी झालेत, वाहनांची येजा वाढून अपघातांचा धोका वाढलाय आणि रस्त्यावरची सावलीही कमी झाली आहे तरीही का जायचं चालत? परतीचा प्रवास वाहनांनी करतातच. पण वारी मात्र पायीच. दिवसचे दिवस घालवत...

पण परंपरेच्या निरागस वाटणाऱ्या नावाखाली अनेक फिल्ममेकर्स फोटोग्राफर्स वॉव वॉव ग्रेट म्हणत या मानवी ऊर्जेच्या संपूर्ण अपव्ययाचे उदात्तीकरण करतात आणि आपापल्या व्यवसायात मायलेज वाढवून घेतात. हंगामी कवी, चित्रकार वगैरे मंडळीही यात सहभागी असतात.

विठू मायलेज तू मायलेज माझे

मायलेज मोठे विठ्ठलाचे

विठ्ठलाsss मायलेज राखाsss.

संतांची अभंगवाणी सुंदर चाली दिल्यानंतर कानाला गोडच वाटते- पण मुळातच ती सारी भक्ती कविता त्या काळाचा आरसा होती. उत्तम दर्जाची नीतीतत्त्वेही सांगितली गेली त्यातून. देवापुढे सारे समान हा एक मानवतावादी संदेश त्यातून गेला- पण आता ही समानता देशाच्या संविधानानेच दिली आहे. पण उत्सव सुरू रहायला हवा, दुकाने चालायला हवीत, वेळाचं करायचं तरी काय- जाऊ दे की वाया. आपल्याला कामं करताना वेळ पुरत नाही. याच मेळाव्यात बोलणार होते ते प्राध्यापक शरद मिळालेला प्रत्येक क्षण कारणी लावून, पाठबळाची वानवा असताना ज्ञानाची वारी करत होते. इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही शब्दकोष आत्मसात् केल्यानंतर तत्त्वज्ञानाच्या महासागराला लांघून जाण्याचा त्यांचा प्रवास अजूनही सुरू आहे- गेला होता का हो वारीला प्रा. डॉ. शरद बाविस्कर? नाही काढला वेळ?... देवाच्या मनुष्यकृत मूर्तींजवळ मिळणारी पॉझिटिव ऊर्जा नाही घेतली तुम्ही कधी? तरीही एवढा पल्ला गाठलात?... उत्तराची गरजच नाही.

त्यामुळे हे सारे वरवरचे मज्जामज्जा उत्सव वाटत असले तरीही त्यांचे खरे स्वरूप आपण त्यांना जाणवून द्यायला हवे. शंभरांना सांगितले तर दहाजण तरी त्यावर विचार करू लागतील. या साठी आपण जास्तीत जास्त जणांनी आपण लोकप्रिय राहाणार नाही की काय याचा विचार बाजूला ठेवून कटु सत्य मांडले पाहिजे. प्रतिकांचा बडीवार म्हणजे धर्माची चाल खेळणारे राजकारणी हे समीकरणच आहे.

दोन हजार किंवा चौदाशे वर्षांपूर्वी संस्थापित झालेले धर्म काय किंवा तीन हजार वर्षांपासून विकसित होत गेलेले धर्म काय, त्यातले देव काय आणि देवाचे पुत्र काय- या सर्वच धर्मांच्या आणि त्यातल्या देव कल्पनांच्या मर्यादा आहेत हे मान्य करण्यासाठी धैर्य दाखवले पाहिजेच. ते ठायीठायी दाखवावे लागेल. अभ्यास वाढवावा लागेल. आपली माहिती अचूक असली पाहिजे याचे भान सतत ठेवावे लागेल. आणि हे आपण सारे नास्तिक करू शकतो. करावे लागेल.

हे करण्यासाठी आपल्याला एकच नैतिक आधार पुरेसा आहे की विवेकबुद्धी जागी ठेवून आपण जेव्हा काहीही करतो तेव्हा ते सत्य असते, त्यातून कुणाचेही कसलेही नुकसान होत नसते. नैतिक कारणे पुढे करून कुणीही अनैतिक काम करू शकत नाही- हे विवेकविचाराचे केंद्रीय सूत्र आहे.

देवाधर्माच्या चौथऱ्यावर स्थापन केलेली नैतिकता- पापपुण्य, स्वर्गातले बक्षीस, नरकातली शिक्षा यावर आधारलेली नैतिकता ही फार वेळा ठिसूळ असते. त्या नैतिकतेच्या आधारे जगणारी माणसं या चौथऱ्याच्या नावाखाली कत्तली करायला मागेपुढे पाहात नाहीत, अपशब्द- अपकृत्यं ही फार छोटी गोष्ट झाली. क्रौर्याचा नंगा नाच- हत्या-बलात्कार- बालहत्या- बालबलात्कार सारेच त्यांच्या नैतिकतेच्या चौकटीत बसवता येते. कुणी दुष्कृत्यांनंतर जन्नतमधल्या हूरच्या आमिषांच्या लालचीने स्वतःला पापमुक्त समजतात, कुणी धर्मरक्षणासाठी मारण्यानेमरण्याने हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् जित्वा भोक्ष्यसे महिम् चा आधार घेऊन स्वतःला दोषमुक्त करतात. देवळात परधर्मीय बालिकेवर बलात्कार करून खून करणारांना तर खुद्द देवीनेच अभय दिलेले असते म्हणे. घराघरात चालणारी बारीकसारीक दुष्कृत्ये मग ती एखाद्या मरियमवर आघात करणारी असोत की शारदाला जाळून टाकणारी असोत, की स्वतःच्या मुलीला पुरेसे अन्न न देता मुलाला चांगलेचुंगले खाऊ घालणारी आईआजी असो, मुलामुलींना स्वतःची निवड करणे नाकारून त्यांच्या आय़ुष्याची सूत्रे स्वतःच्याच हातून खेळवण्याचे प्रयास करणारे पालक असोत- साऱ्यांचे मूळ घरातील देवधर्मांच्या परंपरापालनातून पसरलेले असते.

विवेकवादी, निरीश्वरवादी अशा आपणा सर्वांचे काम याची जाणीव करून देत रहाणे आहे. समाजातल्या अनेक दुष्टाव्याचे मूळ देवधर्म आहेत हे लोकांना सहजी कळणार नाही. ते पचणे तर अधिक कठीण.

बहुसंख्येचा विवेक ही एक गोष्ट अजूनतरी अशक्य आहे. आर्थर कोस्लरने त्याच्या डार्कनेस ऍट नून या कादंबरीत एक संकल्पना मांडलीय- रिलेटिव इमॅच्युरिटी ऑफ द मासेस. म्हणजे विवेकाधारित विचार पुढे जातो तसतसे जनसामान्य त्या मागोमाग पुढे येतात. पण तरीही ते नेहमीच तुलनेने वैचारिक प्रगती कमी साध्य करू शकतात. आणि या सापेक्ष अप्रगल्भतेचा फायदा हितसंबंध गुंतलेले वर्ग, वर्ण, सत्ताधारी उचलत असतात. त्यांचा विवेक अप्रगल्भ रहावा, ते जुन्याच कालबाह्य कल्पनांना चिकटून रहावेत यातच या वर्ग-वर्ण वर्चस्वाचे हित असते. त्यामुळे या बहुसंख्येच्या वैचारिक मागासपणाला टिकवण्याचे हरप्रकारे प्रयत्न केले जातात.

आज आपण पाहातो आहोत- अगदी शोषणफ्रेंडली हिंदू धर्माचे गौरवीकरण चालू आहे. मंदिर बांधण्याचा कार्यक्रम म्हणजे सारे काही नव्हे. भूछत्री मठांतून, आश्रमांतून, मेळ्यांमधून कालबाह्य धर्म आणि त्याची कर्मकांडे रुजवली जात आहेत.

आणि वर युक्तीवाद असा असतो, की इतक्या बहुसंख्य लोकांचा विश्वास आहे तर तुमचा विरोध कशासाठी. तुम्ही नास्तिक असूच कसे शकता... तुम्ही नास्तिक एकमेकांना का भेटता... यांना गलिच्छ कुंभमेळा भावतो. पण विचार करणारी तीनशेसाडेतीनशे टाळकी एकत्र आली तर यांना केवढा भयगंड उत्पन्न होतो आपण पाहिलं असेल. अर्थात आपण दुर्लक्ष करू- पण हे साक्षात देव पाठीशी असलेले लोक आपल्यासारख्या सत्ताहीन मूठभरांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. पेटून उठतात- पेटवतात- शिव्या घालतात, त्रास देण्याचे सर्व प्रयत्न करतात. त्यांच्या देवकल्पनेपेक्षा प्रभावी अशी तेजस्वी विवेकनिष्ठा आमच्या मेंदूत आहे हे कदाचित् त्यांना माहीत असेल.

बहुसंख्या मानते म्हणून अमुक हे सत्य असू शकत नाही याची जाणीव असलेले आपण अल्पसंख्य लोक आहोत. तरीही पुढल्या काळातील जगासाठी देव आणि धर्म कालबाह्य आहेत, आणि चांगले वाईट, सत् असत् ठरवण्याची क्षमता केवळ निर्भय मानवी बुद्धीत आहे हे आपल्याला सांगत रहावेच लागेल.

सत्य न जाणून घेता कशावरही विश्वास म्हणजेच श्रध्दा- भले स्वतःच्या मानसिक आधारासाठी बाळगलेली असली तरीही त्याला आंधळेपणाच हे मान्य असलेले निरीश्वर विचाराचे लोक जगभर विविध संस्कृतींमध्ये, आपापल्या जन्मदत्त धर्मांच्या कोठड्या नाकारून आज यशस्वीपणे जगू शकतात हाच एक मोठा पल्ला आपल्या जगाने गाठला आहे असे म्हणता येईल.

आपापल्या सांस्कृतिक अवकाशात असलेल्या सर्व गोष्टी जाणून घेणे, त्यांची सत्यता पडताळण्याचा सतत प्रयत्न करणे हा एक ज्ञानार्जनाचा भाग आहे. निरीश्वर विचाराच्या व्यक्तींना हे ज्ञानार्जन करणे अधिकच आवश्यक भासते. आणखी एक- ज्यांना आपले ग्रह, पूर्वग्रह हेच योग्य वाटतात, विशेषतः ते वर्चस्वाच्या भ्रमांनी ग्रासलेले असतात ते हेकट लोक सोडून द्यावेत. जे ऐकू शकतात, ज्यांची मने अद्याप खुली आहेत त्या लहान मुलांना, तरुण मुलांना विवेक विचार शिकवण्यासाठीच आपला वेळ घालवावा लागेल. काही निरीश्वरवादी म्हणवणारे धर्मवादी लोक तुम्ही पाहिले असणारच. ही कॅटेगरीसुद्धा अजिबात वेळ न घालवण्यासारखी. ज्यांचे कर्मकांड ठरले आहे, अजेंडा ठरलेला आहे अशा हिंदू-मुस्लिम-ख्रिस्ती बौद्ध-जैन-सिक्ख या कुणाही बनचुक्या लोकांवर वेळ घालवायचा नाही. कारण खरोखरच सत्याधारित जग अस्तित्वात कदाचित् अनेक शतकांनंतर येईल त्यासाठी आपल्याला हा विचार जगवत ठेवायचा आहे.

एखादा कालखंड असा येतोच प्रत्येक देशात वा प्रदेशात- की जनता अविवेकाच्या मागे जाते. स्वतःचा नाश ओढवून घेते. पण म्हटलं तसं- नथिंग इज फॉरेवर एक्सेप्ट चेंज. परिवर्तनाची शक्यताच तेवढी शाश्वत असते. बाकी काही नाही. त्यामुळे अविवेकाचा हा काळ एक पासिंग फेज आहे...

हजारो लाखोंनी मान्य केलेलं असलं तरीही असत्य हे असत्यच रहातं. सत्य शांतपणे स्वतःचं अस्तित्व राखत रहातं. कधीतरी अनेक शतकांनंतर किंवा सहस्रकांनंतरचे मानव या दोन सहस्रकांतील देवधर्माच्या प्रादुर्भावाबद्दल आश्चर्य व्यक्त करतील. इतक्या वेडगळ आणि विनाशकारी कल्पना बाळगणारे आपले पूर्वज होते हा इतिहास पाहातील आणि यातच काही पूर्वज बाकीच्या सर्वांच्या विरोधात केवळ सत्याचा, विवेकाचा आणि या ग्रहावरील मानवजातीसहित जीवसृष्टीच्याही कल्याणाचा विचार करत होते हे पाहून सुखावतील.

बस्स, पुस्तकं- डिजिटल पुस्तकं, ऑडिओ पुस्तकं, सायबर अवकाशात टिकून रहायला हवीत. कागदावरची पुस्तकं जाळणं कुणाही मठ्ठ अधिकारशहाच्या सैन्याला जमतं.जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक प्रसिद्ध उद्धृत आहे.

"The reasonable man adapts himself to the world: the unreasonable one persists in trying to adapt the world to himself. Therefore, all progress depends on the unreasonable man."

"व्यवहारी माणसं जगाच्या मतांशी जुळवून घेतात, अव्यवहारी माणसं स्वतःच्या मताशी जगाचं मत जुळवण्याचा प्रयत्न करत रहातात. आणि म्हणूनच, जगाची सारी प्रगती या अव्यवहारी माणसांवर अवलंबून असते."

२०१२ मध्ये नास्तिक प्रजासत्ताक – अथीस्ट रिपब्लिक या ब्लॉगची सुरुवात झाली होती. कॅनडातून सुरू होऊन जगभर पोहोचलेल्या या विचारमंचाने स्वतःची ओळख फार नेमक्या शब्दांत करून दिली आहे.

"हे आहे नास्तिक प्रजासत्ताक. आम्ही स्वतःची ओळख अशीच करून देण्यास घाबरत नाही. आम्ही नास्तिक आहोत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही जे काही करतो आणि ज्या वर आमचा विश्वास नाही त्याबद्दल कुणाचीही क्षमायाचना करण्याची गरजच नाही. द्वेषापासून स्वसंरक्षण करण्यासाठी आम्ही लपून रहाणार नाही किंवा स्वतःचे नाव बदलणार नाही. आणि एकत्र आलो म्हणून आम्हाला दूषणे देतील याची भीती बाळगून आम्ही एकेकटेही रहाणार नाही. क्रौर्य आणि अन्याय यांचे मूक साक्षीदार होणे नाकारतो आम्ही, कारण आम्ही काही केवळ नास्तिक नाही, तर आम्ही इतर माणसांबद्दल सहानुभूती असलेले, चिंता वाहाणारे नास्तिक आहोत."

थोडक्यात, आपण विवेकवादी निरीश्वरवादी आहोत म्हणजेच अव्यवहारी लोक आहोत. खूप काम करू या. जगाचं मत बदलण्याचे लहानमोठे प्रयत्न सातत्याने करत राहू या.

निरीश्वरवादी विचारांचा अंतिम विजय होणारच आहे- आपण असू वा नसू.

सर्व वाचक-श्रोत्यांचे मनापासून आभार.

-मुग्धा कर्णिक

Updated : 10 April 2022 11:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top