Home > मॅक्स ब्लॉग्ज > नास्तिकता कर्मकांडांच्या विरोधात

नास्तिकता कर्मकांडांच्या विरोधात

बुद्धीला आव्हान देणाऱ्या अशा सखोल, रोमांचकारक विषयाला एका संकल्पनेत, एखाद्या धार्मिक स्वरूपाच्या ग्रंथात किंवा एका मंदिरात बंदिस्त करून टाकणं त्यांना मुळातच मान्य आहे. (दुसऱ्या बाजूने नास्तिकताही बंदिस्तपणाकडे जाण्याची शक्यता आहे यांसदर्भात उत्पल व बा यांचा सविस्तर लेख...

नास्तिकता कर्मकांडांच्या विरोधात
X

अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे संघ-भाजप, त्यांचा अजस्त्र मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वत्र वातावरणनिर्मिती होणार (सुरु झालीच आहे), लोकांना त्यात सामील करून घेतलं जाणार, अनेक लोक उत्स्फूर्तपणेही सामील होणार हे उघडच आहे. माझ्यासारख्या अज्ञेयवाद्याने (जो नास्तिकतेकडे झुकलेला आहे) अशा वेळी काय बोलावं, काही बोलावं का हा प्रश्नच आहे. कारण काही बोललं तर जुन्या भावना नव्याने दुखावल्या जाण्याचा संभव आहे. पण जे लोक मला इथे आणि व्यक्तिशः ओळखतात ते हे नक्कीच मान्य करतील की मी माणसं तोडण्याच्या विरुद्ध आहे. मी स्वतः अज्ञेयवादी/नास्तिक काहीही असलो तरी आस्तिकांबाबत माझ्या मनात कटुता नाही. आश्चर्य जरूर आहे, क्वचित वैतागही आहे; पण कटुता नाही. मला त्यांचं मानस समजलं नाही, त्यांना जशी अनुभूती येते तशी मला आली नाही तरी त्या अनुभूतीचा धिक्कार करावा असं मला कधी वाटलेलं नाही, वाटत नाही. ईश्वराविषयीची त्यांची श्रद्धा, त्यांची अनुभूती ही काहीशी 'बंदिस्त' आहे; ती मुक्त केली तर कदाचित ईश्वर या संकल्पनेलाही मुक्त करता येईल असं मला जरूर वाटतं. तसा संवाद करण्याचा माझा प्रयत्न असतो. (श्रद्धा-धार्मिकता या विषयावरील मागील लेखांवरून हे वाचकांच्या लक्षात आलं असेल. त्या दरम्यान कधी कुणी दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मी दिलगीर आहे).

माणसं जोडली जाणं - तोडली जाणं यावर जास्त बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आजच नव्हे तर कायमच हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आलेला आहे. आज त्याचं प्रमाण वाढलं आहे आणि एखाद्या जरी मुद्द्यावर मतभेद असतील तर माणसं तोडली जाण्याचं प्रमाण लक्षणीय आहे असं दिसतं. उदारमतवादी बुद्धीमंत उद्धट, अहंमन्य वागतात, सर्वसामान्य लोक त्यामुळे त्यांच्यापासून तुटतात; इतकंच नव्हे तर त्यांच्या मनात उदारमतवादी बुद्धीमंतांबाबत अढी उत्पन्न होते; हे लोक बुद्धीमंत नव्हेतच असं ते मानू लागतात. एका बाजूला हे चित्र आहे तर तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोक आपलं आकलन वाढवण्याचा प्रयत्न करत नाहीत, भावनांना हात घालणाऱ्या आवाहनांना सहज बळी पडतात हे चित्र दिसतं. हा एक गदारोळ असल्यासारखा आहे आणि त्यातून वाट काढत पुढे जावं लागतं हे खरं आहे.

या गदारोळात माझा एक दृढ विश्वास असा आहे की मनुष्याच्या विवेकाला आवाहन करून किती उपयोग होईल हे सांगता येत नसलं तरी निदान सोशल डिस्कोर्समध्ये तरी त्यापेक्षा अधिक चांगला उपाय नाही. आजच्या सामाजिक विभागणीत जिथे हिंदुत्ववादी राजकारणाने अनेक कट्टर हिंदुत्ववादी नागरिक तयार केले आहेत, त्यांना द्वेषप्रवृत्तही केलं आहे तिथेच दुसऱ्या बाजूने केंद्र सरकारविरोधातील रोषही वाढतो आहे हेही दिसतं आहे. हे सरकार गेलं पाहिजे या मताचा मी आहेच; त्यासाठी मी स्वतःदेखील माझा सहभाग नोंदवतो आहे; पण हे करत असताना या सरकारला समर्थन देणारे जे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत माझं म्हणणं पोचत राहावं असंही माझं कन्व्हिक्शन आहे. कारण मोहन भागवत - नरेंद्र मोदी - अमित शहा यांच्यात आणि या नागरिकांमध्ये मी एकशे दहा टक्के फरक करतो. हे तिघे हिंदुत्ववादी राजकारणी आहेत आणि नागरिक हे हिंदुत्ववादी असण्याआधी या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे ते आणि मी एकाच नावेतले प्रवासी आहोत.या पार्श्वभूमीवर मला वाचकांसमोर, विशेषतः हिंदुत्ववादी विचारांच्या वाचकांसमोर, काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

मी ज्या घरात वाढलो तिथे मुळातच देवा-धर्माचं फार प्रस्थ नसल्याने माझा प्रवास अजिबातच अवघड नव्हता. माझे काही मित्र त्याबाबत झगडा करून उभे राहिले आहेत आणि त्यांचं मला फार कौतुक वाटतं. पण मी देवा-धर्माचं करणारा नसलो तरी मनुष्य आहे आणि एखादा भाविक जसा मानवी भावभावनांनी युक्त असतो तसाच मीही आहे. मी देवाच्या मूर्तीपुढे हात जोडत नाही याचा अर्थ मला दुःख होत नाही असा नाही. सत्यनारायण, वास्तुशांत, गणपती, लग्न-मुंज इ. कार्यक्रमांना मी लहानपणी जात असे तेव्हा माझ्या मनात 'एलियनेट' झाल्याची (जे चालू आहे त्याच्यापासून तुटल्याची) भावना नव्हती. पण जसजसा माझा विचार वाढू लागला, वाचन वाढू लागलं तसतसं मला जाणवू लागलं की आता आपण या कर्मकांडात अजिबातच रमत नाही - म्हणजे मी स्वतः ते कर्मकांड करत नव्हतोच; पण तिथे हजर असायचो. पण आता मला तिथे हजर असण्यातही रस वाटेनासा झाला. दुसरं म्हणजे 'मलाही काही सांगायचं आहे' ही भावना मनात मूळ धरू लागली होती. माझ्याकडे माझ्याही अनुभूतींचा, विचारांचा, थोड्याफार ज्ञानाचा साठा तयार होत होता. मी लिहून काही मांडत होतो. पण माझ्या लक्षात आलं की ते ऐकण्यात माझ्या आसपासच्या, नात्यातल्या कुणाला फारसा रस नाही. माझीही अनुभूती समजून घ्यावी असं कुणाला वाटत नाही. मी सर्व कौटुंबिक/धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावं असं सर्वांना वाटे आणि ते वाटणं मनापासूनचंच होतं, पण माझ्याकडून काही पुस्तकं न्यावीत, आपल्या श्रद्धांपेक्षा, पठडीतील विचारांपेक्षा वेगळा विचार समजून घ्यावा असं मात्र कुणाला कधी वाटलं नाही.

मला इथे एक मुख्य फरक लक्षात येऊ लागला. तो असा की आस्तिक-नास्तिक हा काही माणसा-माणसातला मूलभूत फरक नाही. फरक असलाच तर तो हा आहे की काहीजण नवीन काही समजून घेण्याचा प्रयत्न करतात, विचारांच्या कोलाहलात (हा शब्द मी सकारात्मक अर्थाने वापरला आहे) प्रवेश करतात, त्यांना ते अगत्याचं वाटतं; तर काहींना हा वैचारिक कोलाहल नको असतो. वास्तविक हा कोलाहल अतिशय समृद्ध करणारा आहे, रंजकही आहे, आपल्या मनाला व्यायाम घडवणारा आहे. पण माणसाचं - किंबहुना सजीवांचं अस्तित्व - या एका अतिशय मोठ्या, आपल्या बुद्धीला आव्हान देणाऱ्या अशा सखोल, रोमांचकारक विषयाला एका संकल्पनेत, एखाद्या धार्मिक स्वरूपाच्या ग्रंथात किंवा एका मंदिरात बंदिस्त करून टाकणं त्यांना मुळातच मान्य आहे. (दुसऱ्या बाजूने नास्तिकताही बंदिस्तपणाकडे जाण्याची शक्यता आहे. नास्तिकता मुळात प्रतीकं, कर्मकांडं यांच्या विरोधात असल्याने ती त्या मार्गाने जाणार नाही; पण कट्टरतेचे वेगळे आविष्कार सादर करूच शकेल).

जेव्हा या दोन वृत्तींमधील संघर्ष टोकाला जातो, तो 'निरोगी' राहत नाही तेव्हा तो शुद्ध वैचारिक न राहता हळूहळू राजकीय होतो. पुढे जेव्हा संघ-भाजपसारख्या संघटना/पक्ष रामाला थेट राजकीय आखाड्यात उतरवतात तेव्हा ते धार्मिकांना, श्रद्धाळू लोकांना लक्ष्य करून त्यांना आपल्याकडे उचलून घेतात आणि मुळातल्या वैचारिक संघर्षाला स्पष्टपणे राजकीय रूप देतात. आता राम हा केवळ व्यक्तिगत श्रद्धेचा विषय राहत नाही. तो जणू राष्ट्रीय कर्तव्याचा विषय होतो. राम हा ईश्वरी अवतार न राहता राजकीय ढाल (आणि तलवारही) होतो. आणि मुळात आधी जे नागरिक सश्रद्ध आणि सहिष्णू होते ते अतिसश्रद्ध आणि कट्टर होतात.

आता रामाला असं आखाड्यात उतरवण्याचं समर्थन केलं जातंच. हिंदू अस्मिता जागी करणं हा त्यातला मुख्य मुद्दा. अनेक सश्रद्ध हिंदूंना तो मान्य होतो. आणि मला जे आवाहन करायचं आहे ते याच बिंदूपाशी थांबून करावं असं वाटतं.

एक म्हणजे तुम्ही सश्रद्ध असलात तरी तुम्ही अविचारी नक्कीच नाही. मग तुम्हाला जनांचा, तुमचा आपला राम आणि राजकीयीकरण केलेला राम यातला फरक लक्षात येतो आहे का? मंदिराचं प्रोजेक्ट यशस्वी झालं हे तर सरळच आहे; तुमच्या मनात श्रीरामाबद्दल श्रद्धा आहे आणि त्या रामाचं मंदिर होणार यामुळे तुम्हांला होणारा आनंद समजण्यासारखा आहे. पण जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा त्या गोष्टीचा तिचा मागच्या-पुढच्या पूर्ण संदर्भांसह विचार करण तुम्हांला गरजेचं वाटतं की नाही? बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या दंगलींमध्ये सुमारे दोन एक हजार लोक गेले. त्यात हिंदूही होते. या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही राममंदिराकडे कसं बघता? मंदिर पूर्ण बांधून व्हायच्या आत प्राणप्रतिष्ठा करणं यात निवडणुकीचं राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं का? वाटत असल्यास ते योग्य आहे असं वाटतं का? एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन ती पूर्णत्वाला नेणं हे निःसंशय कौतुकास्पद आहे. पण आज एकविसाव्या शतकात, एखादं मंदिर बांधणं ही ध्यास घेऊन करण्याजोगी गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? विशेषतः इतर अनेक आघाड्यांवर देशाची स्थिती म्हणावी इतकी चांगली नसताना? ज्या गोष्टींकरता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला जोरदार विरोध होतो आहे त्यांची यादी बरीच मोठी आहे. ती समजून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? मुळात धार्मिकतेने तुमच्या मनावर एक प्रकारचं आवरण चढवलं आहे आणि त्या आवरणामुळे इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची आच तुमच्यापर्यंत कदाचित पोचत नाही आहे याची जाणीव तुम्हाला होते आहे का? पुण्यासारख्या शहरात होणारा नास्तिक मेळावा रामनवमीच्या दिवशी आयोजित केल्याने तो रद्द केला जातो हा नास्तिकांच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप आहे असं तुम्हांला वाटतं का? की सर्वानी बाय डिफॉल्ट आस्तिकच असायला हवं, त्यातही रामाचे भक्तच असायला हवं आणि त्यामुळे नास्तिकांना आपलं म्हणणं मांडायचा अधिकारच नाही असं तुम्हांला वाटतं? असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते धोकादायक आहे याची तुम्हाला जाणीव होते आहे का? गणपती उत्सवाचं पुरेसं विद्रूपीकरण झाल्यानंतर आता रामनवमीचंही होताना दिसतं. एक शांतताप्रिय, सश्रद्ध भक्त म्हणून तुम्हाला हे मान्य आहे का? हे विद्रूपीकरण गणपंती, राम या देवांचा अपमान करत नाही; पण ईश्वरी अस्तित्वावर शंका असणारा नास्तिक मात्र देवांचा अपमान करतो असं तुम्हांला खरंच वाटतं का? देव, धर्म यांच्या सततच्या चाललेल्या गजरामुळे इतर अनेक आवाज दाबले जात आहेत असं तुम्हांला वाटत नाही का?

मला वाटतं की राममंदिर बांधल्यामुळे होणाऱ्या आनंदापुढे काही विवेकी प्रश्न हवेत विरून जाऊ नयेत या हेतूने असे आणखीही काही प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रश्न विचारणं, ते स्वीकारणं, त्यावर विचार करणं हे मुक्त असल्याचं लक्षण आहे आणि आपण मुक्त आहोत की नाही हाच बहुधा अंतिम प्रश्न आहे. त्यापुढे मग आपण रामभक्त आहोत की नाही, आस्तिक आहोत की नास्तिक हे सगळेच मुद्दे दुय्यम आहेत.

Updated : 1 Jan 2024 4:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top