कलाकाऱ्यांच्या नानाविध कला...
X
कलावंताच्या सर्व अवगुणांसहित त्याला स्वीकारून त्यांच्या कलेला डोक्यावर घेणाऱ्या क्षमाशील मनांमुळेच तर महाराष्ट्रातील रसिक मायबाप प्रेक्षकांना हजारदा दंडवत घातला पाहिजे.
कोण कोणत्या व्यसनात बुडाला, कोणाच्या व्यक्तीगत आयुष्यात कोण कसं वागला, किंवा कौटुंबिक कलहामुळे कोणी किती संसार मोडले किंवा मांडले, कोणाशी तथाकथित व्यभिचारी अनैतिक संबंध ठेवले व किती प्रकरणे केली याच्या चर्चा अनेक कलाकारांबाबत चघळून झाल्या असतील, पण त्यापलिकडे जाऊन त्या थोर कलावंताची कला कायमच मोठी अद्भूत असते ! बाकी सारे कलेपुढे व्यर्थ !
अशा कलावंतांच्या कंठातून निघालेल्या स्वरांवर किंवा रंगमंचावरील, पडद्यावरील आविष्कारावर मराठी रसिकांनी जीव ओवाळूनच टाकला आहे.
त्या कलाकाराचा पहिलाच दैवी स्वर लागल्यावर अंगावर शहारा यावा, डोळ्यांच्या कडा ओल्या व्हाव्यात, किंवा रंगमंचावरचा वीज चमकावी तसा त्याचा वावर आणि झपाटून टाकणारे संवाद ऐकून अस्वस्थ व्हावे, हीच असते त्या अद्भुत कलेची अनुभूती! त्या अनुभूतीपुढे सारया तक्रारी व अवगुण व्यर्थ आणि माफ !
कलावंताच्या स्वातंत्र्याचा, मस्तीचा, मुजोरीचा बेबंद स्वैराचार होऊन अगदी अतिरेक झाल्यावर एखाद्या वेळेसच रसिकांच्या सहनशक्तीचा अंत झाल्याचे अपवादात्मक प्रसंग सोडल्यास मागच्या दीडदोनशे वर्षात मराठी रसिकांनी कलावंतांच्या अवगुणांना अनेकदा पोटात घालून त्याच्या कलेची कदरच केलीय. आणि हेच महाराष्ट्राचं खरं सांस्कृतिक वैभव आहे.
कलावंत सुद्धा माणसंच असतात. त्यानाही भाव भावना, वैयक्तिक आयुष्य, सुख दुःखं, मोह, लालसा,भोग, वासना सगळं काही असतंच. तेहि अनेकदा चुकतात. कोण चुकत नाही ?
पण रसिकांना खरा राग येतो तो कलावंतांच्या मस्तीचा, मुजोरीचा, न बदलण्याच्या हट्टाचा आणि कलाकारांच्या आपणच 'एकमेवाद्वितीय किंवा अखेरचा थोर कलावंत' असल्याच्या दाव्याचा! रसिकांना गृहीत धरून जेव्हा कलावंत मुजोरी करू लागतात, तिथे अधोगती अटळ असते.
पण त्यांच्याकडे वेगळी असते ती अद्भुत दैवी देणगी असलेली ती कला ! जी सगळ्यांना मिळते किंवा मिळवता येतेच असं नाही. या कलेमुळेच तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. त्यांच्या कलेची कदर समाजातील रसिकांनी केली नाही तर तोच त्यांचा लौकिक अर्थानं अंत ठरतो.
कलावंतांच्या मनातलं द्वंद्व समजून घेणारा जोडीदार त्याला मिळाला नाही तर त्याच्या आयुष्याची फरफट अटळ असते. मग कलानिर्मितीसाठी लागणारी शांतता, मोकळीक, प्रोत्साहन, स्फुर्ती मिळणं तर दूरच!
अशावेळी त्याला घर-संसार, नात्यांचे पाश का कलासाधना यातला महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो. मर्यादित आयुष्यात त्यानं घेतलेल्या निर्णयांवर कधी बदफैलीपणाचे आरोपही होतात, किंवा त्याला स्वार्थी ठरवलं जातं, पण कलासक्त मनातील अगतिकता, अपरिहार्यता, अंतर्विरोध फार कोणाच्या लक्षात येत नाही.
त्यातूनही समजून प्रोत्साहन देणारा, स्वतःचं वैयक्तिक आयुष्य पणाला लाऊन मागे उभा राहणारा जोडीदार कलाकाराला मिळालाच तर त्या नात्याला लेबल लावायला अनेकजण उत्सुक असतात. शिष्य का मैत्रिण का सहकारी का पत्नी का आणखी कोणी?
काय फरक पडतो या लेबलांनी? मनं जुळली तर अद्भुत कलानिर्मिती होत रहाते अन्यथा त्या नात्यांमधे सुद्धा तडे जाऊन पुन्हा कलाकारांच्या नशिबी एकाकीपण ठरलेलंच असतं !
मुळातच कलावंतांचं मन, व्यवहार आणि साधना यात मेळ बसतोच असं नाही. पण कलंदरपणा, मुशाफिरी आणि कलेची आसक्ती कलावंताकडे असावीच लागते. सर्वगुणसंपन्न आणि तथाकथित नैतिक व्यवहारसंपन्न, भावनांवर नियंत्रण असणारे कलाकार अगदीच विरळा !
मोठया आणि थोर कलाकारांच्या व्यक्तीगत आयुष्यातील हे आणि असे अंतर्विरोध काही काळानं एस. एल. भैरप्पांसारख्या थोर लेखकाच्या " मंद्र" सारख्या कादंबरीतून पुढे तरी येतात.
पण तुलनेनं लहान, पुढे न आलेल्या, प्रसिद्धि किंवा यश न मिळाल्याने निराशेच्या गर्तेत गेलेल्या अनेक कलावंतांच्या व्यथा तर त्यांच्या अंता नंतरच समाजापुढे येतात ! मराठी रंगभूमी, संगीत, गायन, अभिनय क्षेत्रात अगदी समोर संपून गेलेलया कलाकारांची उदाहरणं काही कमी नाहीत.
त्यांना अखेरच्या काळात कोणी वाचवू शकत नाहीत.. किंवा अहंकारामुळे त्यांनाच कोणाची मदत नको असते. अनेकांना वाचवण्याचे, गर्तेतून बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न भोवतालचे मित्र, सहकारी कलाकार करतातहि, पण सुंभ जळाला तरी पिळ काही जात नाही! मदतीला उपकार समजून ते झिडकारण्यातच अनेकांना धन्यता वाटते! अशावेळी कोण काय करणार? ते त्यांचे प्राक्तन म्हणून सोडून द्यावे लागते !
म्हणूनच कलावंतांच्या मनाला, व्यथांना, अंतर्विरोधाला, द्वंद्वाला, साधनेला समजून घेणं, अनेक दुर्गुण, चुका, प्रमाद, माफ करणं यातच रसिकांच्या मनाचा मोठेपण सामावलेला असतो.
कलावंताला कलेचे दैवी वरदान मिळते खरे, पण त्याला सांभाळून घेऊन कला जोपासून दाद देणारा रसिक समाज खरा मायबाप ठरतो ! तो नसेल तर कलेची कदर करणार कोण?
कलेतून मिळणारया या इतर लाभाच्या गोष्टींपेक्षा कलावंताला सर्वात महत्वाची वाटते ती ही रसिकांची दाद आणि प्रतिष्ठा, सन्मान आणि इतरांपेक्षा वेगळे असण्याची अद्भुत सुखद जाणीव !
माणुस जगतो तो प्रेमावर, आणि कलावंत जगतो तो या दाद व सन्मानाच्या जाणीवेवरच !
"आणि काशिनाथ घाणेकर" चित्रपटामुळे अशा अनेक यशस्वी-अयशस्वी कलावंतांचं स्मरण झालं इतकंच !