नॉट आऊट@60 शाहरूख खान!
करोडो लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारा शाहरूख ६० वर्षांचा झाला… अभिनेता, स्टार, सुपरस्टार, फिल्म इंडस्ट्रीचा (King) राजा आणि (Entrepreneur) उत्तम उद्योजक असणाऱ्या शाहरुख खानच्या तत्वनिष्ठ आयुष्याचा धावता प्रवास वाचा लेखक श्रीनिवास खांगटे यांच्या लेखातून….
X
शून्यातून विश्व खऱ्या अर्थानं निर्माण केलेला 'सुपरस्टार एंटरटेनर' असं आजच्यापुरते त्याच्याबतीत स्टेटमेंट करता येईल.!
कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी अथवा कलेची साहित्याची पार्श्वभूमी नसतांना मनोरंजनातून टिव्हीचा छोटा पडदा ते विश्वव्यापक मोठा पडदा हा थक्क करणारा प्रवास आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा बनणे जितके अशक्य आहे.. तितकेच शाहरूख खान Shahrukh khan पुन्हा बनणे अशक्य कोटीतील बाब आहे!
फौजी टीव्ही मालिकेत नायिकेशी भन्नाट फ्लर्ट करणारा तरुण फौजी मनमेंदूत जो घुसला तो पुन्हा केव्हा बाहेर पडलाच नाही. स्टार व्हॅल्यू सोबत अभिनयाची उत्तम जाण या कलावंताला आहे. मात्र त्याच्यातला सुपरस्टार हा त्याच्यातील कलावंतापेक्षा खूप मोठा झाला. अत्यंत चोख व्यवहारी असलेल्या शाहरुखला स्टार आणि सुपरस्टार असण्याची किंमत व्यवस्थित माहिती होती. त्यानं अत्यंत हुशारीने अभिनयाचे फार प्रयोग न करता स्वतः मधील उत्कृष्ट कलावंत ‘सुपरस्टार’ व्हायला वापरला.
या अक्कल हुशारीची किंमत आज स्वकर्तृत्वावर तब्बल बारा हजार कोटी रुपयांची अफाट संपत्ती आणि देशातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते एव्हढी आहे. त्याच्या 'व्यवहारी' असण्याचे आजकाल प्रचंड गोडवे गायले जातायत ही त्याच्या उत्तम व्यावसायिक असण्याची पावती आहे. सिनेमाचे पैसे न घेता वितरणाचे हक्क निर्मात्यांकडून विकत घेण्याची 'फायदेशीर' सुरुवात शाहरूख खान यानंच केली असल्याची दाट शक्यता आहे. त्याची संपत्ती 'बारा हजार कोटी' होण्यामागे केवळ त्याचे फिल्मी करिअरच नव्हे तर त्यानं आयपीएल क्रिकेटमध्ये सातत्यानं केलेल्या गुंतवणूकीचा मोलाचा वाटा आहे.
आम्ही कलाकार उत्तम मनोरंजन करणारं माकड आहोत असे स्पष्टपणे बोलून त्यानं कलेला महानतेच्या पातळीवरून थेट व्यवहाराच्या 'जमिनीवर' आणण्याचे काम त्यानं खूप पूर्वी केले होते. जवान चित्रपटासाठी जेव्हा त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा..मला शाहरूख खान अद्यापही अगदीच उत्तम व्यवहारी (!) असल्याची खात्री पटली..असो.
मध्यंतरी काही फ्लॉप चित्रपटांनी डगमगून न जाता वयाच्या साठीच्या घरांत या प्रचंड जिद्दी असलेल्या सुपरस्टारने पठाण Pathan आणि जवान Jawam या दोन अफाट यशस्वी चित्रपटांमधून जोरदार पुनरागमन करून मीच फिल्म इंडस्ट्रीचा 'राजा’KING असल्याची ललकारी दिली.
त्याच्यातल्या अंगभूत उद्धटपणाला अफाट बुद्धिमत्तेची आणि अचाट आत्मविश्वासाची दाट किनार आहे.पडद्यावर आणि पडद्यामागे.. कोणत्याही व्यासपीठावर तो कधीच बुजलेला नसतो. किंबहुना समोरच्यावर किंवा समोरच्या झुंडीवर यशस्वीरित्या स्वार होण्याचा तो प्रयत्न करतो. त्याचा स्मार्ट आगाऊपणा कधी लोकांना खटकतो. कधी त्याच्या कट्टर चाहत्यांना तो आवडतो देखील!
बुद्धिमत्ता, स्मार्टनेस आणि उत्कृष्ट सेन्स ऑफ ह्युमर हे गुण त्याच्या पायाशी उशाशी जणू लोळण घेतात. कपिल शर्माच्या कॉमेडी विथ कपिल शर्मा या अफाट लोकप्रिय शोमध्ये, एकदा तो आणि अभिषेक बच्चन सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. अभिषेक बच्चन याने शाहरूख खानची तारीफ सुरू केली. शाहरूख खान हे ब्लेस्ड ( ईश्वरी आशीर्वाद प्राप्त..) कलाकार आहेत असे तो बोलल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. एक सेकंदासाठी पॉझ घेऊन शाहरूख खान मिश्कीलपणे रागावून म्हणाला, सारेजण मला ब्लेस्ड म्हणतात. अरे पण माझ्या टॅलेंटला काही मार्क्स आहेत की नाही! अर्थात त्याचा आत्मविश्वास अनाठायी नसतो. त्याच्या कारकिर्दीच्या उंचीवर असताना, तिशी चाळीशीत त्यानं ज्या मुलाखती दिल्या त्यात अमिताभ बच्चन मोठे कलाकार आहेत पण, मी त्यांच्यापेक्षा काहीसा उंचीवर आहे असे बिनधास्त वक्तव्य केले होते.
किंबहुना अमिताभ बच्चन यांना फॉलो करण्याचा किंवा त्यांच्या लोकप्रियतेला ओलांडून जाण्याचा हट्टी प्रयत्न त्यानं अनेकदा केला. उदा. डॉन चित्रपट दोनवेळा केला, एकदा केबीसी होस्ट केला.
स्वतःच्या वाढदिवसाला तो अमिताभ बच्चन यांच्यासारखा बंगल्याबाहेर चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी येतो… वगैरे.
अर्थात त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांची संख्या अफाट असते हे मान्यही करायला हवे..ती त्याची पूंजी आहे. अर्थात ते बच्चन यांना ओलांडणे शक्य नाही असे जाणल्यावर त्यानं आपला स्वतंत्र ठसा उमटवण्यावर भर दिला, आणि त्यात तो कमालीचा यशस्वीही झाला.
जगातले जे जे सर्वोत्तम आहे ते ते आपल्याला मिळालेच पाहिजे हा त्याचा अट्टहास त्याला सर्व काही देऊन गेलं. याचवर्षी सुप्रसिद्ध मुलाखतकार आणि पत्रकार रजत शर्मा यांनी त्याला त्याच्या या अमिताभ यांच्याबद्दलच्या जुन्या वक्तव्याची पुन्हा आठवण करून दिली आणि तू अद्यापही तुझ्या वक्तव्याला ठाम आहेस का असे विचारले. शाहरुखने हसून उत्तर देताना ते वक्तव्य मी वेड्यासारखे केले होते. ते जवानीच्या उत्साहातले वक्तव्य होते असे खुल्या दिलाने मान्य केले!
हा शाहरूख खान परिपक्व वाटला.!
येस..शाहरुख खान एकूणच भन्नाट, आकर्षक, एंटरटेनिंग सुपरस्टार मटेरियल आहे हे नक्की.
शाहरुख खान रूढ अर्थानं चिकणा, देखणा आकर्षक व्यक्तिमत्वाचा नायक कधीच नव्हता. जे काही त्यानं मिळवलं ते त्याच्या अफाट ऊर्जेतून आणि प्रतिभेतून. त्यानं वाढत्या वयासोबतच चेहऱ्यावर स्पष्ट दिसणाऱ्या वृद्धत्वाच्या खुणा लक्षात घेऊन चित्रपटात 'तरुण' दिसण्याचा आणि हिरो(च) असण्याचा अट्टाहास सोडावा असे त्याचा चाहता म्हणून वाटते. मान वाकडी करून दोन्ही हात फैलावत चाहत्यांना येडं करण्याचा त्याचा जगप्रसिद्ध रोमँटिझम आता त्याला शोभणार नाही. नेमकं हेच सूत्र आत्ताच्या क्षणी, एकेकाळी तारुण्यात खरोखरच देखणा असलेल्या दुसरा सुपरस्टार सलमान खान यालाही लागू आहे.
श्रीनिवास खांगटे, कंटेंट, ललित लेखक, मुंबई.
माझा फेसबुक कट्टा नावाने पुस्तक प्रसिद्ध.






