Home > News Update > करोनाचं संकट थांबेलही...पण पुढे काय?

करोनाचं संकट थांबेलही...पण पुढे काय?

करोनाचं संकट थांबेलही...पण पुढे काय?
X

करोना (Corona) व्हायरसच्या संसर्गामुळे जगभर हाहा:कार माजलाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सार्वजनिक कार्यक्रम आणि चलन-वलनाच्या बाबत काही निर्बंध जाहीर केले आहेत. माध्यमांमधून नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबतच्या सुचनांचा मारा सुरु आहे. निर्बंधांच आणि काळजीबाबतच्या सुचनांच पालन करायला पाहिजेच. शिस्त म्हणून केल पाहिजे. त्याने करोनाच संकट पंधरा वीस दिवसात संपेलही, पण पुढे काय?

आज करोनाच संकट आल म्हणून नागरिक, माध्यमं, सरकार सर्वजण सक्रीय झाले आहेत, बोलायला लागले आहेत. पण नागरिकांच आरोग्य सुधारायच असेल तर सार्वजनिक आरोग्यव्यवस्था बळकट करण, पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नागरिकांना व्यक्तीगत व सार्वजनिक स्वच्छतेच भान असण याबाबत आपण भारतीय किती मागास आहोत याच काय करायच?

साध रस्त्यावर नाक शिंकरु नये, कुठेही पचापचा थुंकू नये, खोकत असताना समोरच्या व्यक्तीपासून किमान तोंड बाजूला कराव, बसमधे, सिनेमागृहात समोरच्या रांगेतील व्यक्तीच्या सरळ अंगावर जाईल या पध्दतीने खोकत राहू नये अशी काळजी काय फक्त करोना आल्यावरच घ्यायची असते काय?

स्मार्ट सिटी बनवायला निघालेल्या एकाही शहरातील मनपा प्रशासनाला आणि नागरिकांना घनकचर्याचा प्रश्न नीट सोडवता येत नाही. कुठेतरी ग्रामीण भागात कचरा फेकून तिथे कचर्याचे डोंगर उभे करायचे आणि मग तिथल्या स्थानिकांना हवा-पाण्याच्या प्रदुषणापायी नरकयातना भोगाव्या लागतात. त्यांनी मग कचर्याच्या गाड्या अडवायला सुरुवात केली की लोकप्रतिनीधींनी थातुर मातुर आश्वासन देऊन वेळ मारुन न्यायची. कचर्यापासून सोनं बनवण्याच्या पोस्ट आम्ही वाचत रहातो पण अगदी ग्रामीण भागातील कुठल्याही हाॕटेल किंवा ढाब्यापासून अर्धा किलोमीटरवर तुम्हाला त्या हॉटेलमधल शिळं अन्न, भाज्यांचे देठ, टरफल, कोंबड्यांची पिसं, हाडकं बिनधास्त रस्त्यावर फेकून दिलेले सापडतात.

मोठ्या शहरात मनपाच्या कचरा वाहतुकीच्या जुनाट ट्रक गर्दीच्या रस्त्यावरुन जाताना मागच्या भागातून कुजलेल्या कचर्यातून गळणार्या पाण्याचे शिंतोडे बाजुच्या वाहनचालकांच्या अंगावर उडवत चाललेल्या असतात. पुण्याच्या मंडईतील अथवा अन्य काही ठिकाणचा कचरा सोलापूर रस्त्याचे शेतकरी ट्रॕक्टरच्या ट्रॉलीत शिगोशिग भरुन सोलापूर हायवेने नेतात तेंव्हा त्यातील कचरा कधी रस्त्यावर तर कधी इतर वाहनचालकांच्या अंगावर सांडत सांडत तो ट्रॕक्टर चाललेला असतो. शिगोशिग भरलेला तो कचरा साध्या ताडपत्रीने सुध्दा झाकलेला नसतो. ट्रॕक्टरमधील कुजलेल्या कचर्याचा वास मागे कितीतरी लांबपर्यंत घमघमत असतो.

पण अशा टॅक्टरकडे वाहतूक पोलीसांच लक्षच नसत किंवा त्यांनी अर्थपुर्ण लक्ष दिलेल असत म्हणून ते असे बिनधास्त चाललेले असतात. मोठ्या मनपांनी आपल्या शहरातील नागरिकांचे मैलापाणी प्रक्रिया करुनच नदीत सोडणे अपेक्षित असताना आणि मनपा मैला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करत असताना असे प्रकल्प परिणामकारकतेने कधीच चालत नाहीत आणि नीट प्रक्रिया न झालेल मैलापाणी सरळ नदीत सोडून दिल जात. आणि खालच्या भागातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नसतो.

प्रत्येक राज्याच प्रदुषण नियंत्रण मंडळ असत पण कारखान्यांनी आपल सांडपाणी प्रक्रिया केल्याशिवाय नद्या नाल्यात सोडू नये यासाठी ते क्वचितच परिणामकारक ठरत. उजनी धरणाच प्रचंड प्रदुषित पाणी हे या सगळ्याच जीत जागतं उदाहरण आहे. ही व्यवस्था माणसांना भौतिक प्रगतीची प्रचंड मोठी मोठी स्वप्न दाखवतेय. माणसं त्या स्वप्नांच्या मागे ऊर फुटेस्तोवर धावताहेत पण या स्वप्नांची खरच पुर्ती व्हायची असेल तर भक्कम पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या व्यक्तीगत व सार्वजनिक व्यवहाराला कठोर शिस्त असावी लागते पण हा विषयच सार्वजनिक जीवनात चर्चिला जात नाही.

जे कुणी हे बोलु पहातात त्यांना वेडं ठरवल जात. करोनाचा विषय आज जरी विमानप्रवासाशी संबंधित लोकांपुरता असला तरी सामान्यतः संसर्गजन्य रोगांच्या साथींचा उद्रेक होतो तेंव्हा वस्तीतल्या, झोपडपट्टीतल्या आणि गावातल्या गरीबांनाच त्याचे फटके अधिक बसतात.भक्कम पायाभूत सुविधा, बळकट सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच भान असलेले नागरिक जर आपण घडवू शकलो नाहीत तर मग आज करोना आहे तर उद्या गॅस्ट्रो असु शकेल आणि परवा तिसराच कुठला तरी साथीचा आजार असेल. ही संकटं येत रहाणार. आपण किती दिवस सार्वजनिक वावरावर निर्बंध घालणार? नुसती भौतिक प्रगतीची स्वप्न पाहून चालणार नाही तर त्या भौतिक प्रगतीला शाश्वत बनविण्यासाठीची स्वयंशिस्त प्रशासन आणि नागरिक दोघांनीही पाळावी लागेल तरच ती प्रगती ठरेल नाही तर ती अधोगतीच ठरेल.

- सुभाष वारे

Updated : 14 March 2020 6:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top