Home > मॅक्स ब्लॉग्ज > नोटबंदी, आज श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे.

नोटबंदी, आज श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे.

नोटबंदी, आज श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे.
X

देशाच्या इतिहासातील सर्वांत तुघलकी निर्णय म्हणून नोटबंदीचा उल्लेख केला जातो. नकली नोटांवर नियंत्रण आणण्यापासून दहशतवाद, ड्रग्ज चा धंदा, काळा पैसा, डिजीटलायजेशन पर्यंत अनेक फायदे मोजून दाखवले गेले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जास्त मूल्यांच्या नोटा बाजारात असू नयेत म्हणून १००० रूपयांची नोट पूर्णतः बंद केली गेली आणि पाचशे रूपयांची नोट रंग-आकार बदलून पुन्हा बाजारात आणली गेली. लोकांना नोटा बदलायच्या रांगामंध्ये उभे केले गेले, संपूर्ण देशाचं सगळं मनुष्यबळ काही महिने केवळ हक्काचे पैसे बदलून घेणे आणि सरकारची दररोज बदलणारी नियमावली समजून घेणे यात गुंतली. आज या सर्वांची आठवण झाली तरीही सगळं कसं सिनेमातल्या सारखं घडून गेलं असं जाणवत राहतं.

या देशातील नवमतदार आणि उन्मादी पक्ष कार्यकर्ते यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर या काळात सर्व विरोध दाबून टाकला. लोकांच्या व्यथांची खिल्ली उडवली. नोटा हातात असल्या म्हणजे काळा पैसा असं सरळ व्याख्या करून गरीब आणि मध्यमवर्गाचा छळ केला. नोटा बदलण्यासाठी बँकांच्या रांगा म्हणजे छळ छावण्या होत्या. आज जर मला विचाराल तर देशातील लोकांना तुमचा पैसा, मत्ता सुरक्षित नाही, ती माझ्या मर्जीची अधीन आहे असा संदेश देऊन सत्ताधाऱ्यांनी दहशतीत घेतलं तो क्षण म्हणजे नोटबंदी. नोटबंदीच्या काळात जे जे सांगीतलं ते ते खोटं निघालं. जास्त मुल्याच्या नोटा बंद करायच्या होत्या, तर तसं झालं नाही. हजार ची नोट बंद करून दोन हजार ची नोट आणली, पाचशे ची नोट रंग बदलून आली. दहशतवाद संपला का? तर नाही, कारण नोटबंदी नंतर पुलवामा हल्ला झाला, इतरही प्रकरणं घडली आणि त्याच जोरावर मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले. बनावट नोटांचा धंदा बंद झाला असं सांगण्यात आलं, मात्र त्या नंतर बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. टेरर फंड बंद झाल्यामुळे बेकायदा शस्त्रे, ड्रग्ज चा धंदा संपुष्टात आला असं सांगण्यात आलं ते ही खोटं निघालं. डिजीटलायजेशन होऊन चलन हळूहळू बाद होईल असं सांगण्यात आलं, मात्र आज ही कॅश ने व्यवहार चालतात. कॅश वर विविध बंधने आली, मात्र ती सामान्य लोकांसाठी. स्वतःच्या हक्काचे पैसे वापरणे आणि घेऊन वावरणे याबाबतीत आज ही सामान्य माणसाच्या मनात साशंकता असते. मोठ्यांचे व्यवसाय मात्र आजही सुरळीत सुरू आहेत.

नोटबंदी ने जर काही ठरल्याप्रमाणे झालं असेल तर ते म्हणजे भाजपाच्या विरोधी पक्षांची आर्थिक शक्ती मोडून निघाली आहे. निवडणूक बाँड चा सगळा प्रवाह फक्त भाजपाकडे जात असल्याने देशातील इतर राजकीय पक्षांची अवस्था मरायला टेकल्यासारखी झाली आहे. भाजपाने पद्धतशीरपणे सर्व पक्षांची रसद तोडली, आणि आज देशातील सर्वांत मोठी पार्टी म्हणून आपला जम बसवून टाकला आहे.

प्रॉब्लेम ऑफ रूपी या पुस्तकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चलीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मात्र एखादा राजकारणी निश्चलीकरणाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल.

निश्चलीकरणाच्या राजकीय हत्याराने आज देशातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांना अधू करण्यात आलेले आहे. त्याचमुळे सामान्य लोकांचा आपल्यापर्यंत पोहोचलेला आवाजही बनावट आहे. दररोज बदलणारे नियम गावा-खेड्यातील लोकांपर्यंत उशीरा पोहोचले. या काळात अनेक दलालांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. आपलेच पैसे असून ही अनेकांना बँकांमधून पैसे काढला आले नाहीत, लग्न, वैद्यकीय उपचार यासांठी तारांबळ सहन करावी लागली, मानसिक त्रास सहन करावे लागले. या सर्व राष्ट्रीय ट्रॉमा ची प्रत्येक Anniversares ही वेदनादायी असणार आहे.

सामान्य लोकांची थट्टा उडवणारे टीव्ही चॅनेल्स, न्यूजपेपर्रस, सामान्य माणसाला ब्लॅक मनी वाला म्हणणं, फक्त काळ्या पैशा वाल्यांनाच त्रास होतोय असं सेट करण्यात आलेलं नॅरेटीव्ह, आणि आता फक्त पैसा गेलाय, यापुढे सोनं आणि प्रॉपर्टी पण अशी लिंक होईल अशी घालण्यात आलेली भीती यामुळे सामान्य माणून एका अनामिक भीतीत कायमचा ढकलला गेला.

आजही देश या भीतीतून बाहेर येऊ शकलेला नाही. गरीबांपर्यंत जास्तीत जास्त फायदे पोहोचतील, श्रीमंतांचा पैसा बाहेर येईल ही स्वप्न बघून ज्यांनी ज्यांनी नरेंद्र मोदींच्या या आत्मघातकी निर्णयाला सपोर्ट केला होता त्या सर्वांना आता अंबानी-अदानीच्या संपत्तीचे दर तासाला वाढणारे आकडे मोजत व्वाह मोदीजी व्वाह म्हणावं लागतंय. पार्श्वभागावर आपटल्यावर, मला नाही लागलं... मला नाही लागलं असं हसत हसत म्हणत लहान मुलं पळून जातात, निदान ती भोळी तरी असतात पण नोटबंदीत जोरदार आपटून ही दुसऱ्यांना फसवणारी भक्त टोळी ही खरं तर या देशाची गुन्हेगार आहे. नोटबंदीचा सपाटून मार खाल्यानंतर ही दुसऱ्यांना फसवण्याची ही वृत्ती खोट्या राष्ट्रवादातून आणि एका नेत्याच्या भक्तीतून आलीय, मात्र या भक्तीने देश नावाच्या संपल्पनेचा खून केला. आज श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे.

Updated : 8 Nov 2021 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top