Home > मॅक्स ब्लॉग्ज > जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली चिरडलेलं निरागस बालपण

जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली चिरडलेलं निरागस बालपण

देशभरात बालकामगार विरोधी दिन साजरा केला जातोय. बालकांच्या प्रश्नावर चर्चा केली जाते. पण निरागस बालपण चिरडलं जातय. भारतात बालकामगारांची संख्या १.०१ कोटी आहे, त्यापैकी ५.६ दशलक्ष मुले आणि ४.५ दशलक्ष मुली आहेत. हे बालपण नक्की कसं चिरडल जात हे पाहाण्यासाठी डॉ. प्रितम भि. गेडाम यांचा सविस्तर लेख वाचा..

जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली चिरडलेलं निरागस बालपण
X

(आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरुद्ध दिवस विशेष - १२ जून २०२३)

बालमजुरी हा कायदेशीर गुन्हा असून एक सामाजिक शाप आहे जो मुलांना शाळेत जाण्याचा हक्क हिरावून घेतो आणि गरिबी वाढण्यास हातभार लावतो. अनेक बालकामगार प्रतिबंधक कायदे आणि जनजागृती करूनही बालमजुरी संपत नाही. युनायटेड नेशन्सची उपकंपनी म्हणून काम करणारी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, बालमजुरीची व्याख्या अशी करते, "बालमजुरी हे असे काम आहे जे मुलांचे बालपण, त्यांची क्षमता आणि त्यांचा सन्मान हिरावून घेते आणि ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासास हानी पोहोचते. ही समस्या पुढे अनेक गंभीर सामाजिक समस्यांना प्रोत्साहन देते. बालमजुरीतून सुटका होऊन बालकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी दरवर्षी १२ जून रोजी जगभरात बालमजुरीविरुद्ध जनजागृती साठी “आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरुद्ध दिवस” साजरा केला जातो. या वर्षी यूएन द्वारे २०२३ ची थीम "सर्वांसाठी सामाजिक न्याय आणि बाल कामगार समाप्ती" अशी आहे. बालमजुरीविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे तरच या समस्येतून सुटका होईल.

माणसाच्या संपूर्ण आयुष्यातील नि:स्वार्थ आणि आनंदी काळाला बालपण म्हणतात, तेव्हा मुले ही ओल्या मातीसारखी म्हणजेच निराकार असतात. त्यांना योग्य वातावरणात चांगले शिक्षण आणि संस्कार देऊन समाजातील जबाबदार नागरिक आणि कर्तव्यदक्ष मानव बनवले जाते, जेणेकरुन मुले मोठी होऊन स्वतःचे, समाजाचे, देशाचे आणि संपूर्ण मानव जातीचे कल्याण व विकास करण्यास हातभार लावतील. लहानपणी मुलांनी घेतलेले शिक्षण त्यांना जीवन विकासाचा एक उत्कृष्ट मार्ग मोकळा करून देते. शिक्षण त्यांना परिपूर्ण बनवते आणि जीवनात सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यास प्रेरित करते, यामुळे व्यक्तीच्या विकासाबरोबर समाजाचा आणि देशाचाही विकास होतो. शिक्षण हा मानवी जीवनाचा आधार आहे, मुलांना पुस्तकांऐवजी जबाबदारीचे ओझे दिले तर ते त्यांच्या विकासापासून वंचित राहतील, त्यांचा निरागसपणा ठेचला जाईल, त्यांचे हक्क हिरावून घेतले जातील. जीवन अनमोल आहे, बालमजुरी मुळे मुलांचे भविष्य नष्ट होते. मुलांनी शाळेत जायचे असते, कामाच्या ठिकाणी नाही. बालमजुरी हा शिक्षणात मोठा अडथळा ठरतो, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आरोग्याच्या विकासातही अडथळा आणतो. निरागस बालपण वाचवण्यासाठी आपल्याला मोठी जन मोहीम राबवावी लागेल.

युनिसेफ इंडिया आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या मते, २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतात बालकामगारांची संख्या १.०१ कोटी आहे, त्यापैकी ५.६ दशलक्ष मुले आणि ४.५ दशलक्ष मुली आहेत. भारतात ४.२७ कोटींहून अधिक मुले शाळाबाह्य आहेत. भारतातील एकूण काम करणाऱ्या मुलांपैकी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे पाच राज्ये मिळून सुमारे ५५% मुले आहेत. सेव्ह द चिल्ड्रेन, २०१६ नुसार, उत्तर प्रदेशमध्ये बालकामगारांची सर्वाधिक संख्या आहे, भारतातील २०% पेक्षा जास्त बालमजूर एकट्या या राज्यातील आहेत. कैलाश सत्यार्थी फाउंडेशनच्या अहवालानुसार आणि २०११ च्या जनगणनेच्या अंदाजानुसार चालू वर्ष २०२३ मध्ये भारतात ७८ लाख बालकामगार असतील. ज्यामध्ये मुले आणि मुलींचा वाटा अनुक्रमे ५७% आणि ४३% असेल. बालमजुरी वाढवण्यात कोरोना कालावधीने विशेष योगदान दिले आहे.





जागतिक स्तरावर एकूण १५२ दशलक्ष मुले (८८ दशलक्ष मुले आणि ६४ दशलक्ष मुली) बालमजुरीत असल्याचा अंदाज आहे, जे जगभरातील सर्व दहा मुलांपैकी एक आहे. युनिसेफने म्हटले आहे की जगातील सर्वात गरीब, कमी विकसित देशांमध्ये, ५ पैकी १ पेक्षा जास्त मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. २०१२ मध्ये जागतिक स्तरावर बालकामगारांची संख्या १६८ दशलक्ष आहे. आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात अजूनही बालमजुरांची सर्वाधिक संख्या सुमारे ७८ दशलक्ष किंवा ९.३% आहे. उप-सहारा आफ्रिका हा प्रदेश असा राहिला आहे ज्यामध्ये ५९ दशलक्ष बाल मजूर आहेत, अर्थात २१% पेक्षा जास्त. जागतिक स्तरावर सर्वात जास्त बालमजूर कृषी क्षेत्रात आढळू शकतात म्हणजे ९.८ कोटी आणि सेवा क्षेत्रात ५.४ कोटी, उद्योग क्षेत्रात १.२ कोटी बालमजूर आहेत. युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड युनिसेफच्या मते, ३००,००० हून अधिक बाल सैनिकांना सशस्त्र संघर्षात भाग पाडले गेले आहे.

बालमजुरी बंद करण्याच्या लढ्यात सरकारला मदत करण्याकरिता युनिसेफ, केअर इंडिया, कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन, ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर, स्माईल फाउंडेशन, डॉन बॉस्को बालप्रफुलता, सेव्ह द चिल्ड्रन, चाइल्ड राइट अँड यू, हँड इन हँड इंडिया, बचपन बचाओ आंदोलन, तलाश असोसिएशन, इत्यादी एनजीओ काम करत आहे. हँड इन हँड इंडिया एनजीओ, ज्याने ३ लाखाहून अधिक मुलांना (माजी बालकामगार) पुन्हा शाळेत पाठवले. बालमजुरी करण्याची कोणतिही कारणे असो, पण बालमजुरी हे चुकीचे आहे, तो गुन्हा आहे. बालमजुरी निर्मूलनासाठी शासनाने विविध कायदे, धोरणे व कार्यक्रम सुरू केले आहेत, शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बालमजुरी रोखण्यासाठी सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने पेन्सिल पोर्टल तयार केले आहे. बालकामगार कुठेही दिसल्यास, पेन्सिल पोर्टलवर त्वरित लॉग इन करा आणि बालकामगार संबंधित तक्रारींसाठी ऑनलाइन तक्रार नोंदवा किंवा १०९८ हेल्पलाइन नंबरवर कॉल करा, अन्यथा आपण जवळच्या पोलीस स्टेशनशी देखील संपर्क साधू शकता. बचपन बचाओ आंदोलन या स्वयंसेवी संस्थेचे हेल्पलाइन क्रमांक १८००-१०२-७२२२ वर देखील कॉल करू शकता. आपली जाणीव एखाद्या निष्पापाचे भविष्य उज्ज्वल करू शकते.

डॉ. प्रितम भि. गेडाम

मोबाईल आणि व्हॉट्सअॅप क्र. ०८२३७४ १७०४१

[email protected]

Updated : 12 Jun 2023 3:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top