Home > मॅक्स रिपोर्ट > मुसळधार पावसामुळे वन्यजीवांचं लोकवस्तीकडे पलायन

मुसळधार पावसामुळे वन्यजीवांचं लोकवस्तीकडे पलायन

मुसळधार पावसामुळे वन्यजीवांचं लोकवस्तीकडे पलायन
X

गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांना आलेल्या महापूरामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते, पूल, मंदिर, बिल्डिंग्स, कार्यालये, घरं, इ. ठिकाणांना पूराने वेडा घातल्याचं चित्र आपण पाहतोय. कोसळणाऱ्या पावसामुळे लोकांच्या घरा-घरात पाणी शिरलं आहे. चाकरमान्यांना कामाला जाता येत नाही. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे धिम्या गतीने सुरु आहे. 26 जुलै 2005 च्या पावसाची पुर्नावृत्ती सध्या मायानगरी मुंबईत पाहायला मिळतेय. मुंबई पावसामुळे पाण्यात गेल्याचं चित्र तुम्ही माध्यमांवर पाहत असाला किंवा अनुभवत असाल. परंतु माध्यमांवर मानवी जीवनाशी निगडीत परिस्थितीचे चित्र आपण पाहतोय. या सगळ्या आपत्तीच्या काळात आपण निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या अन्य जीवांकडे पाहतचं नाही.



मुसळधार पाऊस, महापूर या सगळ्या परिस्थितीचा फटका किंवा परिणाम फक्त मानवी जीवनावर होतोय असं तुम्हाला वाटतं असेल परंतु असं नाही या पूरपरिस्थितीत लोकांचे हे हाल असतील तर जमिनीखाली राहणाऱ्या वन्यजीवांचं काय हाल होतं असतील? या पृथ्वीवर माणसा व्यतिरिक्त इतरही प्राणी राहतात. साप, कवड्या, पान दिवड, नाग, अजगर, मांजऱ्या सर्प, घार, घोरपड, सरडा आणि झाडावर असलेले पक्षी इत्यादी हे या आपत्तीच्या काळात कसे राहत असतील? याचा विचार आपण कधी केला आहे का? माध्यमांचा ओघ ही मानवी जीवनाशी निगडित असलेल्या बातम्या देण्यावर सर्वाधिक असतो.

सध्याच्या या पूरपरिस्थिती वन्यजीव लोकवस्तीकडे पलायन करू लागले आहेत. जमिनी पाण्याखाली गेल्यानं जमिनीवर सरपटणारे सर्प, जमिनीच्या होलात आश्रयासाठी राहणारे वन्यजीव... लोकवस्तीत शिरू लागले आहेत. यामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरू लागलं आहे.




बोरविलीत राहणाऱ्या मनिषा सावंत सांगतात की, सध्या पावसामुळे आमच्या सोसायटीत साप, अजगर असे वन्यजीव येत आहेत. यामुळे आमच्या मनात भितीचं वातावरण आहे. अजगर सारखा दिसणारा सर्प माझ्या दरवाज्या बाहेर होता. कसला आवाज येतोय हे पाहण्यासाठी मी दरवाजा खोलला असताना तो सर्प एका कोपऱ्याला सरपरट गेला. त्यानंतर मी सर्प मित्र यांना बोलवलं असता कळालं की हा अजगर नसून विषारी जातीचा घोणस साप आहे. त्या सर्प मित्रांनी त्या विषारी सापाला अगदी हळूवार पद्धतीने रेस्क्यू करून आमची मदत केली.

तर दुसरीकडे बोरविली पूर्व येथील संजय नगर मधील दिपक घरत सांगतात की, आमच्याकडे नदीला पूर आल्यानं आमच्या घरी अजगर आला होता. तो अजगर पाहून आमच्या वस्तीत भितीतचं वातावरण पसरलं. यावेळी अम्मा केअर फाऊंडेशनला कॉल केला असता तात्काळ सर्प मित्र आमच्याकडे येऊन त्या अजगरापासून आमची सुटका केली.

दरम्यान, मुंबईतील अम्मा केअर फाऊंडेशनचे एसीएफ पॉज सुनिष सुब्रमण्यन सांगतात की, मुसळधार पावसामुळे माणसांचं नाहीतर वन्यजीवांचं ही हाल झालेलं आहे. आमच्या संस्थेला लोकवस्तीतून फोन येत आहेत. जागोजागी पाणी भरल्यानं जखमी पशु-पक्षी, वन्यजीव, सर्प लोकवस्तीत आढळून येत आहे. आमच्या संस्थेच्या स्वयंसेवकांनी आतापर्यंत 16 सर्प आणि पशु-पक्षी रेस्क्यू केले आहेत.




(Amma Care Foundation (ACF) and Plant & Animals Welfare Society - Mumbai (PAWS-Mumbai) volunteers rescued) यामध्ये बोरिवली येथून 2 अजगर - Python (8 फूट आणि 9 फूट), बोरिवली आणि वसई येथून 2 घोणस – Russell's Viper (4 फूट आणि 3 फूट), दहिसर येथून 1 मांजऱ्या सर्प – Cat Snake (3.5 फूट), दहिसर येथून 3 नाग – Cobra (1 फूट), राम मंदिर येथून 1 धामण - Rat snake (8 फूट), वांद्रे येथून 1 झिलान - Glossy Marsh Snake (1 फूट), दहिसर येथून 1 तस्कर - Trinket Snake (2 फूट), बोरिवली आणि भांडुप येथून 2 घोरपड - Monitor Lizard (2 फूट), वांद्रे आणि भांडुप येथून 3 घार - Kite (पक्षी - Bird) एकूण 16 साप, सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांना रेस्क्यू करून त्यांना औषधोपचार करून निसर्गाच्या सानिध्यात (जंगलात) सोडलं आहे.

महानगरपालिकेच्या काऊंन्सिलर जागृती पाटील सांगतात की, रविवार 18 जुलै रोजी दरड कोसळल्यामुळे 16 वर्षीय मुलांचा मृत्यू झाला. त्याठिकाणी दरड नेमकी कशी कोसळली त्याच्या तपासणी साठी आम्ही गेलो असता त्याठिकाणी झाडावर घार पक्षी जखमी अवस्थेत सापडली. त्यानंतर मी अम्मा केअर फाऊंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर स्वयंसेवकांनी त्या घार पक्षीला तेथून घेऊन औषधोपचार केले. आता सध्या ती घार सुखरूप असल्याचं स्वयंसेवकांनी सांगितलं. नैसर्गिक आपत्तीत पशु-पक्षी यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं परंतु सर्प मित्र, प्राणी मित्र पृथ्वीतलावावरील यांनी वन्यजीवांना वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतात.

या सगळ्या वन्यजीवांचे अम्मा फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे यांच्याकडून औषधोपचार केले. यावेळी डॉ. पिंगळे सांगतात की, मुसळधार पावसाच्या तडाख्यात आलेले पक्षी-सर्प यांचे बचाव स्वयंसेवकांनी केले असून माझ्याकडे आणले असता पक्षी किरकोळ जखमी अवस्थेत होते, त्यांचे अंग थंड पडले होते. यावेळी त्यांना लाईटच्या बल्बची ऊब देऊन प्रथमोपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलं.




एकंदरित मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मानवी जीवनासह वन्यजीवांनाही या संकटाचा सामना करावा लागतोय. अम्मा केअर फाऊंडेशन आणि प्लँट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी मुंबईच्या स्वंयसेवकांनी या वन्य जीवांचे रेस्क्यू करून त्यांच्यावर औषधोपचार केल्याचं प्राणी मित्र सुनिष सुब्रमण्यन सांगतात, तसेच त्यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले आहे की, तुमच्या आसपासच्या परिसरात, घरात, लिफ्टच्या इकडे, खिडकी, इत्यादी ठिकाणी कुठेही वन्यजीव आढळले तर त्यांना मारू नका. प्राणी मित्रांना किंवा एनिमल वेल्फेअर संस्थेला संपर्क करा. जेणे करून वन्यजीवांना आणि तुम्हाला कोणतीही बाधा पोहचणार नाही. स्वंयसेवक या वन्यजीवांना रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडतील.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं फक्त तोंडाने म्हणून चालत नाही तर त्यासाठी सुनिष सुब्रमण्यन यांच्या प्रमाणे आपल्या कृतीतून देखील ते सिद्ध करुन द्यावं लागतं. सुनिष सुब्रमण्यन यांच्यासारख्या अनेक स्वंयसेवकांच्या कार्यामुळे अनेक वन्यजीवांना नवीन जीवन मिळत आहे.

Updated : 24 July 2021 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top