Home > मॅक्स ब्लॉग्ज > आता Ajit Pawar कायमचे नॉट रिचेबल झाले !

आता Ajit Pawar कायमचे नॉट रिचेबल झाले !

अजित पवार यांचा अपघात की घातपात ? वाचा युट्यूबर वैभव छाया यांचा लेख

आता Ajit Pawar कायमचे नॉट रिचेबल झाले !
X

Ajit Pawar घड्याळाची वेळ चूकलीच शेवटी. साध्या दहा मिनिटांसाठी अजित दादांचा फोन बंद राहीला.. किंवा नॉट रिचेबल झाला तर त्याच्या ब्रेकिंग न्यूज व्हायच्या. permanently unreachable आता हा नेता कायमचा नॉट रिचेबल झाला आहे. २८ जानेवारीची सकाळ अतिशय वाईट बातमी घेऊन आली. राज्याचे उपमुख्यमंत्री पद सहा वेळा भूषवणारे नामदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अतिशय दूर्दैवी निधन झाले. मनाला चटका लावून जाणारी बातमी होती. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मिडीयावर भावपूर्ण पोस्ट आणि ट्विटचा मोठा रतीब लागून गेला आहे. अजित पवारांच्या बाबतीत एक गोष्ट अशी होती की… साधा दहा मिनिटांसाठी अजित दादांचा फोन बंद राहीला.. किंवा नॉट रिचेबल झाला तर त्याच्या ब्रेकिंग न्यूज व्हायच्या. कारण, सातत्याने लोकसंपर्क ठेवणारा नेता म्हणून दादांचा लौकीक होता. आता हा नेता कायमचा नॉट रिचेबल झाला आहे. त्यांच्या राजकारणाच्या बाबतीत कितीही मतभेद असले, कितीही विरोध असला तरी ते विरोध प्रकट करण्याची वेळ आजची नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर इतका खोलवर प्रभाव टाकणारा नेता आजघडीला महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा कुणी एक्टिव नाही. त्यांचं सकाळी लवकर उठणं, निर्व्यसनी असणं, प्रत्येकाशी संवाद ठेवणं आणि स्वतःसोबत इतरांच्या वेळेचीही कदर करणं अश्या अनेक गोष्टी लोकांच्या कायम स्मरणात राहतील. अजित पवारांना नेमकं ठाऊक होतं.. त्यांचा मतदार संघ हा मराठा वोट बँकेचा आहे. त्यामुळे त्या मतदारसंघाला कुठेही धक्का लागेल असं कोणतंही काम केलं नाही. उलट ह्या मतदारसंघाची वर्चस्ववादी मानसिकता कशी गोंजारली जाईल, कशी कुरवाळली जाईल याची त्यांनी कायम काळजी घेतली. पण, हे करताना ग्रामीण राजकारणात हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाला कधी वरचढ होऊ दिलं नाही हे विशेष अधोरेखित करावं लागेल. असो..

अजित पवारांच्या मला आवडणाऱ्या दोनच गोष्टी होत्या.

पहिली म्हणजे जे पोटात आहे तेच ओठात कायम ठेवणारा राजकारणी माणूस.

आणि, दुसरी गोष्ट म्हणजे…

वेळेची नजाकत ओळखून राजकीय निर्णय घेऊन स्वतःला आणि स्वतःबरोबरच्या लोकांना सक्सेसफुली एक्सेप प्लानमध्ये आणणारा नेता. म्हणून त्यांच्यासोबत लोकांचा कायम गराडा राहीला. लोकसहभाग राहिला.

मोदींना दोन वेळा शेंडी लावून स्वतःला आणि स्वतःसोबतच्या लोकांना सेफ ठेवून, अटकेचं सत्र घालवून थेट उपमुख्यमंत्री बनून राहणारा नेता म्हणून त्यांच्या राजकीय चाणाक्षपणाच्या अपरिहार्यतेची उदाहरणे सर्वांनाच सातत्याने येत्या काळात आठवत राहतील. त्यांनी कधीच लपवलं नाही की त्यांचा स्टँड काय आहे, कसा आहे ते..

दादांच्या कामाचं मूल्यमापन करण्याची ही वेळ ही नाही. ती काही दिवसांनी नक्कीच केली जाईल. हा खरंच अपघात होता की घातपात हे ही कधीच समोर येणार नाही. याआधीही असे अनेक अपघाती मृत्यू भारतात आणि जगभरात झालेत. त्या अपघातांनंतर चौकश्या देखील झाल्यात पण त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. अगदी दोन तीन आठवड्यांपूर्वी अजित दादांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट इशारा दिला होता की, येत्या काळात राज्यात सत्ता समीकरणे बदलतील. त्या मुलाखतीला घेऊन ही बरेच तर्क वितर्क लावले जातील.. अनेक कॉन्स्पीरसी थेअरी जन्माला घातल्या जातील. वेगवेगळ्या नेत्यांवर शंकेची सुई फिरवली जाईल.. आपल्या कल्पनाशक्तीचा प्रकाश जिथवर जाईल तितक्या शक्यता आणि थेअरी येत्या काळात आपल्याला पहायला, ऐकायला आणि वाचायला मिळणार आहेत. आपण सर्वांनी किमान वेळ घेऊन व्यक्त व्हायला हवं. राज्य अजित दादांच्या जाण्याने दुःखात आहे. पवार कुटूंबियांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांनाच या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो.


(साभार - सदर पोस्ट वैभव छाया यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 28 Jan 2026 5:49 PM IST
Next Story
Share it
Top