Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना काळात अजीम प्रेमजी फाऊंडेशनची कोट्यवधी लोकांना मदत

कोरोना काळात अजीम प्रेमजी फाऊंडेशनची कोट्यवधी लोकांना मदत

कोरोनाच्या संकटकाळात सरकारच्या सोबतीने अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. यामध्ये अजीम प्रेमजी फाऊंडेशऩने केलेल्या अफाट कार्यातून कोट्यवधी लोकांना मदत झाली आहे. पण फाऊंडेशऩने या कामाची जाहिरातबाजी कधी केली नाही. गेल्या दोन वर्षात फाऊंडेशनने केलेल्या कार्याची माहिती देणारा लेख...

कोरोना काळात अजीम प्रेमजी फाऊंडेशनची कोट्यवधी लोकांना मदत
X

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाची लाट आली तेव्हापासून अजीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विप्रोने सातत्याने या संकटाशी लढण्यासाठी भारतभर आपले कार्य सुरू ठेवले आहे. या अंतर्गत सर्वसमावेशक आरोग्य सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील 100 जिल्ह्यांमधील 15 कोटी लोकांची सेवा केली आहे. यामध्ये दुर्गम भागांचा समावेश आहे. महामारीच्या काळात प्रत्यक्ष फिल्डवर सर्वेक्षण, नागरिकांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी उपक्रम आणि साधने पुरवणे यासारख्या उपक्रमांचा या सेवा कार्यात समावेश आहे. लोकांच्या आरोग्य संरक्षणासाठी 10 हजार ऑक्सिजन बेड, 1 हजार ICU बेड, दिवसाला 80 हजार लोकांची तपासणी करण्यासाठी 100 चाचणी केंद्र, रुग्णांवर उपचारांसाठीच्या सुविधा पुरवण्याचे काम फाऊंडेशनने केले आहे.

अजीम प्रेमजी फाऊंडेशन काय आहे?

अजीम प्रेमजी फाऊंडेशन ही एक सेवाभावी संस्था आहे. न्याय्य, योग्य आणि शाश्वत समाजासाठी कार्य करण्याकरीता अजीम प्रेमजी यांनी या फाऊंडेशनची निर्मिती केली आहे.

कोरोना काळात आरोग्यसेवा

एवढेच नव्हे तर गंभीर रुग्णांवर उपचार करणाऱ्या 45 सेवाभावी रुग्णालयांमध्येही वर उल्लेख केलेली उपकरणे, इतर आवश्यक वस्तू, मनुष्यबळ आणि त्यांचा खर्च देण्याचे कामही करण्यात आले आहे. मानवी सेवेच्या भावनेतून फाऊंडेशनने आतापर्यंत 27 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमधील 1 कोटी 30 लाख लोकांपर्यंत अन्न पोहोचवले आहे. एवढेच नाही तर या काळात फाऊंडेशनने शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रात सर्वाधिक फटका बसलेल्या लोकांना शेती आणि शेतीशी संबंधित कामांसाठी मदत करण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर देशातील दुष्काळग्रस्त भागांमधील लोकांना मदतीसाठी काही कल्याणकारी उपक्रमही राबवण्यात आले आहेत.

प्रत्यक्ष फिल्डवर काम


वर उल्लेख केलेले सर्व कार्य फाऊंडेशनच्या 1600 लोकांची टीम काम करत आहे. देशातील 50 जिल्ह्यांमध्ये हे काम सुरू आहे. फाऊंडेशनचे 55 हजार सदस्य आहेत. यामध्ये 800 सहकारी संस्थांचे सदस्यही आहेत. त्याचबरोबर अजीम प्रेमजी विद्यापीठाचे अडीच हजार माजी विद्यार्थी तसेच ज्यांच्यासोबत संस्था काम करते त्या सरकारी शाळांमधील शिक्षक आणि विप्रोच्या तांत्रिक विभागातील तज्ज्ञ यांच्या सहाय्याने मदत पोहोचवण्याचे कार्य केले जाते आहे.

आर्थिक बांधिलकी

कोरोना संकट काळात मदतकार्य करण्यासठी फाऊंडेशनने 1 हजार 125 कोटींचा निधी उभारला आहे. पण आता लसीकरणाच्या कामातही सहभागी व्हायचे असल्याने फाऊंडेशनने 2 हजार 125 कोटींचा निधी उभारण्याची तयारी केली आहे. याद्वारे आणखी 10 राज्यांमध्ये मदतकार्याचा विस्तार करण्याची योजना आहे. गरज पडल्यास हा निधी आणखी वाढवण्याची तयारीही फाऊंडेशनने ठेवली आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी संस्थेचा हा प्रयत्न आहे. लसीकरणाच्या कार्यात सहभागी होण्याची संस्थेची तयारी असली तरी आधीपासून सुरु असलेल्या मदतकार्यात कोणताही खंड पडणार नाही, याची खबरदारी संस्थेतर्फे घेतली जात आहे.

कोरोना काळात संस्थेने नियोजनपूर्वक तीन स्तरावर कार्य केले आहे. फ्रंटलाईन वर्कर्सना प्रशिक्षण देऊन स्क्रीनिंग, ट्रेसिंग आणि रुग्णांचे, संशयितांचे विलगीकरण याबाबत जागरुकता निर्माण करण्याचे ध्येय़ आहे. त्याचबरोबर या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट आणि इतर साधनेही पुरवण्यात आली आहेत. चाचण्यांची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. तसेच चाचण्या आणि नमुने गोळा करण्याच्या कामाचे विक्रेंद्रीकरण करण्याचे कामही केल्याने चाचण्यांची संख्या वाढली.





देशातील काही राज्यांमध्ये अप्रगत भाग जास्त आहेत, अशा छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, पुद्दूचेरी, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये संस्था प्रत्यक्ष काम करत आहे किंवा काही संस्थांच्या मदतीने काम सुरू आहे. अनेक ठिकाणी संस्थेची टीम शासकीय यंत्रणेसोबत थेट काम करत आहे. यातून संकट नेमके कसे आहे, यंत्रणेत कुठे कमतरता आहे, त्यावर काय उपाययोजना करायच्या आणि त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे काम केले जात आहे.

त्याचबरोबर 10 हजार ऑक्सिजन बेड, 1 हजार आयसीयू बेड सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी पुरवण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजन प्लान्ट, 10 हजार ऑक्सिजन कॉन्सस्ट्रेटर, 80 व्हेन्टिलेटर, 300 बायपॅप मशीनसह रुग्णांलयांमध्ये लागणारे इतरही साहित्य पुरवण्यात आले आहे.

National Centre for Biological Sciences (NCBS), बंगळुरू आणि Christian Medical College (CMC), वेल्लोर यांच्यासोबतच्या भागीदारीमुळे कोरोना संदर्भातले गंभीर मुद्दे कोणते ते समजून घेण्यास मदत झाली. यामुळे डॉक्टर आणि आऱोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता आले, याचा फायदा विशेष करुन ग्रामीण भागासाठी खूप झाला.

हे मदतकार्य सुरू ठेवत पुढील काही महिन्यात लसीकरणाच्या कार्यात उतरण्याचा संस्थेचा मानस आहे. शासन आणि इतर संस्थांसोबत लसीकरण केंद्र आणि फिरती शिबिरं आयोजित करण्याचे नियोजन आहे. देशातील 10 राज्यांमधील 85 ते 110 जिल्ह्यांमध्ये लसीकरणाच्या कामाची सुरूवात करण्याचा प्रयत्न आहे.

एकीकडे आरोग्यविषयक मदत करत असतानाच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या लोकांना तयार अन्न, कोरडे धान्य पुरवण्याचे कामही संस्था करते आहे. त्याचबरोबर देशातील ज्या भागांमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम झाला आहे, तिथे लोकांच्या रोजच्या जगण्यातील अडचणी सोडवण्यासाठी संस्थेचे कार्य सुरू आहे. हे सर्व काम सरकारी शाळांमधील शिक्षक, अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने सुरू आहे. याच प्रयत्नांमधून संस्थेने आतापर्यंत 27 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील 1 कोटी 30 लाख लोकांना मदत केली आहे. तर आतापर्यंत गरजूंना 54 कोटी जेवणाच्या किटची सोय केली आहे. गेल्या दोन महिन्यात तर संस्थेने 43 लाख लोकांपर्यंत तयार अन्न किंवा कोरडे धान्य पोहोचवले आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आणि पश्चिम बंगाल या 13 राज्यांमधील दुष्काळग्रस्त भागात संस्थेने 83 लाख 50 हजार लोकांपर्यंत मदत पोहोचोवली आहे.

Updated : 20 Jun 2021 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top