Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > स्मारकबहाद्दर शिवसेना

स्मारकबहाद्दर शिवसेना

बाळासाहेबांच्या चांदीच्या सिंहासनावर टीका झाली होती त्यानंतर त्यांनी चांदीच्या सिंहासनावर बसायचं सोडून दिलं होतं. मला वाटतं ती संवेदनशीलता त्यांच्यामध्ये होती, आणि ती संवेदनशीलता ते मरेपर्यंत जगले. आज जनतेची तिजोरी खाली करून त्यांचे पुतळे-स्मारकं बांधून बाळासाहेब आणि त्यांच्या विचारांना मारायचं कामच शिवसेना करतेय.

स्मारकबहाद्दर शिवसेना
X

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य पुतळ्याचं आज अनावरण झालं. या आधी छत्रपती शिवाजी पार्क वर बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष परवानगी देऊन स्मारक करण्यात आलं. त्यानंतर भव्य स्मारकाची टूम निघाली. कोणी सांगीतलं शिवसेना भवनाला स्मारक करा, कोणी म्हटलं मातोश्री-२ तयार होतंय अशा वेळी मातोश्री-१ ला स्मारक करणं योग्य राहिल. कोणी सांगीतलं की कोहीनूर मध्ये स्मारक करा. एकूणच कधी काळी मुंबईवर राज्य करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून बरेच जोक्स, मिम्स व्हायरल झाले आणि हा राजकीय थट्टेचा विषय बनला.

दरम्यानच्या काळात ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्या जागी स्मृतीस्थळ तयार करण्यात आलेच होते. सत्ता असल्याने मग रूग्णालय, रस्ते, बागा, अध्यासन, कुठे प्राणिसंग्रहालय यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा सपाटाच शिवसेनेने लावला. बाळासाहेबांची मैत्री ही पक्षातीत असल्याने ते गेल्यावर सगळ्यांनीच त्यांच्यावरचं वैर संपवलं आणि मोठ्या मनाने या सर्व नामकरणांना पसंती दर्शवली. भारतीय जनता पक्षानेही सत्तेच्या काळात मुंबईच्या इतिहासातील मानबिंदू असलेला महापौर निवास हा बंगला स्मारकासाठी दिला. त्यासाठी शिवसेनेच्या मागणीप्रमाणे भरीव तरतूद ही केली. या स्मारकासाठी जो ट्रस्ट तयार करण्यात आला तो जवळपास शिवसेनेचा खाजगी ट्रस्ट असल्यासारखा आहे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या शेकटो कोटींची मालमत्ता शिवसेनेला देऊन टाकण्यात आली.

प्रेम-अस्मिता म्हणून या ही गोष्टीच्या विरोधात कोणी गेलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत वैचारिक वाद असलेले डावे-उजवे-मधले सगळेच ते गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाचे-प्रेमाचे गोडवे गात राहिल्याने जिवंतपणी बाळासाहेबांना जो कडवा विरोध सहन करावा लागला तो त्यांच्या मृत्यूनंतर निवळून गेला. एखाद्या माणसाच्या कर्तृत्वाचा हा विजय म्हणावा लागेल.

हे सगळं असलं तरी या सर्व गोष्टी जनतेच्या पैशाने होतायत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सत्ता बदलली की मग अनेकांना कंठ फुटतो. मग असे विषय बाहेर येतात, मात्र आता सत्ता असतानाच शिवसेनेला आऱसा दाखवण्याची गरज आहे. स्मारकं-पुतळे आता बस्स झाले अशा प्रकारची भूमिका घेण्याची गरज आहे. राज्यात कोविड नंतर आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे, बेरोजगारी वाढतेय. उद्या कदाचित उपासमारीची वेळ येऊ शकेल. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहें असं पालुपद सगळेच मंत्री लावून बसलेयत. मग हा खडखडाट सामान्य जनतेसाठीच आहे का.. सत्ताधाऱ्यांना त्याचं काही सोयरसुतक नसावं का?

राज्याचे जाणते-अजाणते राजे सगळेच सोहळ्यांमध्ये बिझी आहेत. रोज नवनवीन सोहळे करण्याची ही वेळ आहे का? या प्रश्नांची उत्तरे देखील शोधली गेली पाहिजेत.

दरवर्षी एक स्मारक किंवा पुतळा बसवण्या एवजी दरवर्षी एक रूग्णालय सुरू करा अशा टाइपचा घिसापिटा सल्ला मी देणार नाही. आरोग्य व्यवस्था सक्षम करणं, ती योग्य रितीने चालवणं, सरकार योग्य रितीने चालवणं हे तुमचं कामच आहे. अशी अनेक कामं ताटकळत पडलीयत. बाळासाहेबांच्या चांदीच्या सिंहासनावर टीका झाली होती त्यानंतर त्यांनी चांदीच्या सिंहासनावर बसायचं सोडून दिलं होतं. मला वाटतं ती संवेदनशीलता त्यांच्यामध्ये होती, आणि ती संवेदनशीलता ते मरेपर्यंत जगले. आज जनतेची तिजोरी खाली करून त्यांचे पुतळे-स्मारकं बांधून बाळासाहेब आणि त्यांच्या विचारांना मारायचं कामच शिवसेना करतेय. 
खुद्द बाळासाहेबांनीही अशा स्मारकबहाद्दरतेचा ठाकरी भाषेत निषेध केला असता, आणि स्मारकच रद्द केलं असतं. असो, ठाकरेंना काय ठाकरी भाषेत सांगायचं. समजायचं असेल तर समजून घेतील.

- रवींद्र आंबेकर

Updated : 23 Jan 2021 5:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top