Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > Mahatma Jyotiba Phule : Gen-Z साठी हवेत नवीन ज्योतिबा !

Mahatma Jyotiba Phule : Gen-Z साठी हवेत नवीन ज्योतिबा !

का हवेत आज नवीन ज्योतिबा ? समाजाला, Gen-Z ला महात्मा फुले आणि त्यांचे कृतीशील विचार समजणे का गरजेचं ? महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख

Mahatma Jyotiba Phule : Gen-Z साठी हवेत नवीन ज्योतिबा !
X

आज हवे होते ज्योतिबा, आज हवे आहेत नवीन ज्योतिबा ; विशेषतः तरुण वर्गाला सांगायला. अभ्यासाचे महत्व सांगणारे, अभ्यासातून बुद्धी कमवण्याचे महत्व सांगणारे. इंग्रजी भाषा नक्की कशासाठी शिकायची ? आणि मराठी / प्रांतीय भाषा आणि इंग्रजी भाषा शिकणे कसे परस्परपूरक असू शकते; त्यात बुद्धिभेद करून घेऊ नका हे समजावून सांगणारे एकाच वेळी ललित साहित्य / नाटक / पोवाडा / आणि वैचारिक मांडणी केली पाहिजे. ललित, वैचारिक हे साहित्याचे वर्गीकरण गरजेचे नाही? साहित्यासाठी साहित्य नाही, तर समाजबदलासाठी साहित्य हवे हे सांगणारे.

एकच एक क्षेत्र नाही, तर एकाच वेळी अनेक क्षेत्रात तुम्ही कार्य करू शकता. एकच एक क्षेत्र निवडून आयुष्याचा लांबच लांब बोगदा करून घेऊ नका सांगणारे. “वित्ताचे” महत्व सांगणारे, पैसे मिळवण्याचे महत्व सांगणारे पैसे मिळवलेत म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचे मिंधे व्हायलाच पाहिजे असे नाही. पैसे मिळवून देखील तुम्ही त्या त्या काळातील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करू शकता. पैसे मिळवणे आणि बंड करणे यात काही द्वंद्व नाही हे सांगणारे.

इतक्या दशकानंतर देखील औद्योगिक / कॉर्पोरेट / वित्त भांडवलाने शेती, शेतकऱ्यांची आर्थिक निर्भत्सना सुरूच ठेवली आहे म्हणून आसूड उगारणारे. हे सगळे करतांना, शारीरिक तंदुरीस्ती, शरीर सौष्ठव कडे दुर्लक्ष नाही करायचे हे सांगणारे. समाजासाठी काम करतांना देखील टेचात राहणारे ; त्या त्या काळाला सुसंगत स्टाईल स्टेटमेंट देणारे. उत्पादक शेअर मार्केट आणि आजचे सट्टेबाज शेअर मार्केट यातील फरक समजावून सांगणारे.

भ्रष्ट / अपारदर्शी बांधकाम व्यवसाय / रियल इस्टेट व्यवसाय देखील कसा सचोटीने / प्रोफेशनली करायचा हे सांगणारे. नवीन विचार मांडताना, कोणीही पाठीशी नसताना, एकटेपणाचा बाऊ न करता, सावित्रीला बरोबर घेऊन, नदीच्या प्रवाहाच्या विरोधी पोहणारे. आजच्या स्वतःला लिबरेटेड म्हणवणाऱ्या मुलींना / तरुणींना, शेकडो वर्षाचा स्त्री गुलामगिरीचा इतिहास सांगणारे, स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय हे समजावून सांगणारे.

(साभार - सदर पोस्ट संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)

Updated : 28 Nov 2025 1:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top