Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > पराधीन आहे जगती पुत्र दशरथाचा !

पराधीन आहे जगती पुत्र दशरथाचा !

पराधीन आहे जगती पुत्र दशरथाचा !
X


- लीना पांढरे

अगदी लहानपणी तिसरी चौथी मध्ये असताना रामदासांच्या मनाच्या श्लोकांमधून राम पहिल्यांदा भेटला .वर्गामध्ये सगळ्यांनी मिळून "जय जय रघुवीर समर्थ " असं एका सुरात म्हणताना थरारून जायला व्हायचं . 'प्रभाते मनी राम चिंतीत जावा ' पासून करुणाष्टका मधील 'अनुदिनी अनुतापे तापलो रामराया ' ते थेट रामरक्षेपर्यंत घोकंपट्टी केली जायची ..भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र शुभम करोती बरोबर म्हटलं जायचं . थोडीशी मोठी झाल्यानंतर गदिमांच्या गीत रामायणाने भुरळ घातली होती .




आई वडील नास्तिक असल्यामुळे घरात देव्हारा नव्हता . उन्हाळ्याच्या सुट्टीत काका काकूंकडे गेले की मी रोज सकाळी अतिशय आवडीने पूजा करण्याचे काम माझ्याकडे घ्यायचे . शाळा बुडवून परस्पर सायकल मारत नदीकिनाऱ्याची मंदीरे धुंडाळणे आणि कितीतरी शांत दुपारी मंदिरांमध्ये घालवणे हा उद्योग मी केला आहे . कुठल्याही मंदिराच्या गाभाऱ्यातील फुलं कापूर उदबत्ती याच्या सुगंधाने मला कायम भुरळ घातली आहे .

शाळेमध्ये असताना आईच्या पर्समधून पैसे चोरून दहा पैशाला मिळणारी सिनेमाच्या गाण्यांची पातळ पिवळटं पुस्तकं मी खरेदी करायचे त्याच बरोबर पाच पैशाला एक असे रंगीत छोटे छोटे देवांचे फोटो पण मिळायचे .माझ्या झोपायच्या पलंगाजवळ मी अशा पाच पैसे वाल्या राम , कृष्ण , दत्त ,शंकर पार्वती , गणपती विष्णू ,लक्ष्मी , सरस्वती या सर्वांना चिकटवून ठेवलं होतं . त्यातील श्रीरामाच्या फोटोमध्ये राम सीता लक्ष्मण आणि त्यांच्या पायाशी बसलेला हनुमान असे सामूहिक चित्र होते .सारे विश्व निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचा फोटो काही मला तेव्हा मिळाला नव्हता . रात्री वाईट स्वप्न पडू नये म्हणून मी या सगळ्यांना साकडं घालून हात जोडून मग झोपी जायचे .

त्याच सुमारास आमच्या गावामध्ये संतोषी मातेचे मंदिर बांधलं गेलं आणि संतोषी मातेवरील सिनेमा तेव्हा खूप लोकप्रिय झाला होता . प्रत्येक गणिताच्या पेपरच्या आदल्या दिवशी मला संतोषी मातेची खुप आठवण यायची आणि मी तिच्या दर्शनाला जायचे मंदिराच्या मागील भिंतीवर नाणे चिकटवायचा प्रयत्न करायचा आणि ते नाणे जर एक क्षणभर चिकटले तर आपण नक्की पास होणार असे गृहीत धरायचे .त्यामुळे तुळशीची पाने खाऊन आणि संतोषी मातेचे दर्शन घेऊन मी दहावीपर्यंत गणितामध्ये पास होत आले असावे .




अकरावीत आल्यावर हिंदीच्या पाठ्यपुस्तकातून तुलसीचे रामचरितमानस आणि कबीराचे काही दोहे अभ्यासायला मिळाले .

तुलसीदासांच्या 'जन्म मे राम , मरण मे राम वाह मे राम ,आह मे राम ' अशा काव्यपंक्तीने भुरळ घातली होते .पण त्याच रामचरितमानस मधील " ढोर गंवार शूद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी ." या ओळीनी मनावर तेजाब ओतलं होतं ."राम रहीम एक है , नाम धराया दोई कहे कबीर दो नाम सुनि , भरम परो मत कोई "


हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या कबीराचे शेले विणणारा कौसल्येचा राम तेव्हां मनाला फार भावला होता .


भवभुतीच्या उत्तररामचरितम् मधील रावणाच्या तावडीतून सोडवून सीतेला अयोध्येला परत नेताना तिच्याशी रात्रभर गुजगोष्टी करणारा आणि ' फक्त रात्रच संपली गुजगोष्टी तर अजून तशाच बाकी आहेत 'असं म्हणणारा रोमँटिक राम मनाला छेडून गेला होता .तशातच ग्रेस च्या कवितेतून राघव जानकी भेटले .

"तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला

सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला "

रघुपति राघव राजाराम पतित पावन सिताराम या काव्यपंक्तीतील रघुपती पुन्हा ग्रेसच्या लताबाईंवरच्या कवितेत भेटला .


' या वाटेवर रघुपती आहे त्या वाटेवर शिळा

सांग साजणी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा'

याच अहिल्येचे , शंबूकाचे ,शबरीचे, शुर्पणखा वधाचे स्त्री सत्ता संपुष्टात आणून पुरुषसत्ताक राज्याची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या श्रीरामाचे संदर्भ कॉम्रेड शरद पाटील यांच्या धगधगत्या लेखणीतून वाचायला मिळाले तेव्हा सारे गुलाबी रंग उडून गेले.

'जेथे राघव तेथे सीता ' असं स्वतः वागणारा राम लक्ष्मणाला उर्मिलेला मागे राजमहालामध्ये सोडून बरोबर कसा घेऊन जातो हा प्रश्न पडायला मैथिलीशरण गुप्तांचं ' साकेत ' वाचावं लागलं . संशयावरून गर्भावस्थेत सीतेला रानात पाठवून देणारा शेवंतीच्या बनातील ' सीतामाई हिरकणी , राम हलक्या दिलाचा ' फार उशिरा भेटला . शूद्र असून ज्ञानप्राप्ती प्राप्त करण्याचा अपराध करणाऱ्या शंबूकाचा शिरच्छेद करणारा राम तेव्हा आमच्यापर्यंत पोहोचवलाच गेला नव्हता .




१९८७ मध्ये दूरदर्शन वरती रामानंद सागर यांच्या रामायणातील अरुण गोविल या अभिनेत्याने साकारलेल्या श्रीरामाने घरोघरी अगदी लोकांच्या मनावर खरोखर राज्य केलं होतं .

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'रिडल्स ऑफ हिंदूइझम ' या पुस्तकामुळे रामाने वालीचा केलेला वध , सीतेवर केलेला अन्याय या सर्व गोष्टी स्पष्टपणे लक्षात आल्या . हिंदूंनी आपल्याला माणूस म्हणून सन्मानाने स्वीकाराव यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला होता .धनंजय किरांच्या पुस्तकात हे सर्व विस्तृतपणे वाचल्यानंतर आयुष्यातली तीस वर्ष पंचवटी महाविद्यालयात नोकरी करून आणि रोज श्रीरामाच्या मंदिरावरून जाणं येणं घडून सुद्धा त्या मंदिरात उत्सुकता म्हणून सुद्धा प्रवेश करण्याची इच्छा राहिली नाही .

थेट वीशीपर्यंत मात्र मी पूर्ण आस्तिक होते . माझे आजी आजोबा पूर्ण नास्तिक होते .आजी माहेरची गावस्कर . शांता दुर्गा तिचं कुलदैवत . तिथल्या चोपड्यांमध्ये तिच्या घराण्यातील पूर्वजांची जंत्री लिहिलेली आहे . ती काही काळ संस्कृतची प्राध्यापिका होती . नंतर पुण्यातील नारायण पेठेतील कन्या शाळेची मुख्याध्यापिका होती . तिला कॅन्सर झाला होता. त्या काळात कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईला जावं लागायचं .असीम वेदनाने तळमळत असताना तिच्या शाळेतील सहकारी शिक्षिका तिला भेटायला घरी आल्या होत्या आणि त्या तिला विनवत होत्या की "तुम्ही "जय राम श्रीराम जय जय राम " असा जप करा .तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल ." हे ऐकल्यानंतर आणि आपल्या पत्नीवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि एरवी पूर्ण नास्तिक आणि तार्किक पद्धतीने विचार करणाऱ्या इंग्लिशचे प्राध्यापक असणाऱ्या माझ्या आजोबांनी रामनामाचा जप सुरू केला ‌तेव्हा अंथरुणाला खिळलेली माझी आजी अत्यंत संतापून म्हणाली " हा मूर्खपणा बंद करा .माझ्या वेदना आणि रामाचा जप याचा कसलाही संबंध नाही ."ही गोष्ट सांगून माझे आजोबा मला म्हणाले " तू कशी अशी घाबरट ? आपण सारे जण नास्तिक नाही का ? " तो क्षण माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा निर्वाणीचा क्षण होता . त्या दिवसानंतर सुद्धा अनेक वेळा रामायण महाभारतातल्या कथा ,उक्ती माझ्या बोलण्यामधून येतात पण त्याचा आस्तिक असण्याशी धार्मिक असण्याशी कुठलाही संबंध नाही . प्राचीन नद्यांप्रमाणे आपल्या रक्तातून सामूहिक नेणिवेतून या पुराणकथा वाहत आलेल्या असतात इतकच !





मला अजून ती सकाळ आठवते आहे .मला रोज पहाटे उठल्यानंतर शांतपणे कॉफी घेत टीव्हीवर बातम्या बघण्याची सवय होती .रोज बीबीसीच्या अर्धा तास बातम्या बघून झाल्यानंतर मी माझ्या बाळाला उठवायचे आणि मग त्याचे आवरून त्याला पाळणा घरामध्ये सोडून मग कॉलेजला जायचे . मी पहाटे साडेसहा वाजता नेहमीप्रमाणे बीबीसी च्या बातम्या लावल्या होत्या आणि मला डोळ्यासमोर बाबरी मशिदीच्या घुमटावर चढून एका बेफाम उन्मादात घुमट फोडणाऱ्या लोकांचा जथा टिव्हीच्या स्क्रीनवर दिसत होता .६डिसेंबर १९९२ रोजी घडलेली ती घटना होती .

मी तशीच आवरून कॉलेजमध्ये आले .स्टाफ रूम मध्ये कानोसा घेतला .कुठे कसली चर्चा नव्हती . मी पण या विषयावर बोलण्याचं धाडस केलं नाही .दुपारनंतर हळूहळू ती बातमी बाहेर फुटली होती .

या दुर्दैवी घटनेवर कैफी आजमी यांनी प्रभू रामचंद्रांनी हे सर्व दृश्य पाहिलं असतं तर मला दुसऱ्यांदा वनवास मिळाला आहे असं ते म्हणाले असते अशा आशयाची एक कविता केली आहे.

पाँव सरयू में अभी राम ने धोये भी न थे

कि नज़र आये वहाँ ख़ून के गहरे धब्बे

पाँव धोये बिना सरयू के किनारे से उठे

राम ये कहते हुए अपने दुआरे से उठे

रौनके जन्नत जरा भी ना आई रास मुझे ;

छह दिसंबर को मिला दूसरा बनवास मुझे .


- लीना पांढरे


Updated : 22 Jan 2024 7:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top