उद्योजक : महात्मा ज्योतीराव फुले
Entrepreneur: Mahatma Jyotirao Phule
X
आज महात्मा ज्योतीराव फुले यांचा स्मृती दिन. फुलेंना ६३ वर्षाचे आयुष्य लाभले. यात त्यांनी नवराष्ट्र उभारण्याचे क्रांतीकारक कार्य केले. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी मुलींसाठी पहिली शाळा उभारून भारतात शिक्षणक्रांतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. महिला, महार-मांग समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी एकूण १९ शाळा चालवून प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू शिक्षण ठेवला आणि हंटर कमिशन समोर साक्ष देऊन शिकण्याची धोरणात्मक मांडणी करून भारतातील तळागाळ पर्यंत शिक्षण कसे पोहचेल याची दिशा दिली. हंटर कमिशन समोर साक्ष देताना महात्मा फुले मागणी केली की, “ industrial Department should be attached to the school in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently…”
शेती आणि उद्योग प्रशिक्षण शाळेतून देऊन तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी मार्ग शिक्षण घेताना द्यावा म्हणजे नोकरी सोबत उद्योगाचा बी प्लान तयार होईल हे फुलेंनी वेळीच ओळखले होते. जी आज काळाची गरज बनली आहे. १६० वर्षा पूर्वी त्यांनी शेती आणि उद्योग यांचे शिक्षण बाल वयात द्यावे, असा द्रष्टा विचार मांडला जो वर्तमान परिस्थितीस पूरक आहे.
महात्मा फुले यांनी शिक्षण,महिला,विधवा,आंतरजातीय विवाह विधवा विवाह ,विधवा केशवपन न्हावी संप,विहीर अस्पृश्यांसाठी खुली करणे, कामगार चळवळ, बालहत्या प्रतिबंधक,एकंदरीत ब्राह्मण्यवाद विरोध या आशयाची मांडणी आपण करतो. पण महात्मा फुले एक यशस्वी उद्योजक होते ही मांडणी तरुण वर्गासमोर करणे काळाची गरज आहे. महात्मा फुले एक यशस्वी उद्योजक ही प्रेरणा तरुणांनी घेणे आवश्यक आहे.
जोतीराव फुले हे पूर्णवेळ समाज कार्य करत. पण स्वतः कमावलेल्या पैशातून हे त्यांचे वैशिष्ट्य. पुणे कमर्शियल एंड काँट्रॅक्टिंग कंपनीचे ते कार्यकारी संचालक होते. कात्रज बोगदा, खडकवासला धरणाचा कालवा, त्यांनी बांधला. त्यास दगड ,चुना पुरविण्याचे काम त्यांनी केले. शेअर मार्केटवर त्यांनी कविता लिहिल्या आणि अनेक सूचना मार्गदर्शन यातून केले.
सत्य
दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. उद्योगामध्ये सचोटी आणि साधनसुचिता फार महत्त्वाची असते, असा विचार ते आपल्या कवितेतून मांडतात.
‘सत्य उद्योगाने रोग लया जाती, प्रकृती होती बळकट!
उल्हसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ!
सदाचार सौख्य त्यांची सेवा करी, शांतता ती बरी आवडीने!
नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!
सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!
तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!
उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!
आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!
आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!
नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!
उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!
अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!
कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या गोष्टींचा ते निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असे फुले म्हणतात.
रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!
शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!
‘महापराक्रमी’ हर्षद मेहता याने बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे याचा इशारा जोतीरावांनी १६० वर्षांपूर्वी दिला होता.
शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात :
शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!
खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!
जामीन देऊन नितीने वर्तावे ! सर्वा वाचवावे अब्रूमध्ये!
शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा! जगा दाखवावा जोती म्हणे!
लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.
शेअर्स मार्केटात खप कागदाचा, नफा दलालाचा बूड धन्य !
शेअर्स कागदास पाहून रडती ! शिव्याशाप देती योजी त्यास!
शेअर्स व्यापाराचा जळो तो उद्योग ! होऊन नि:संग मूढा लुटी!
आळशाचा खरा नित्य हाच धंदा! दुरूनच वंदा जोती म्हणे!
लुटीचा कोणताही धंदा जोतीरावांच्या सत्शील वृत्तीला मानवणे शक्यच नव्हते.
त्यांचा भर सातत्याने प्रामाणिकपणे उद्योग, व्यापार आणि शेती करण्यावर असायचा, त्याचेच मोल त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतून उलगडवून दाखविले.
उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील जोतीरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघते.
महात्मा फुले यांचे वार्षिक उत्पन्न त्या वेळी टाटा समूहाच्या पेक्षा अधिक होते हे प्रा हरी नरके यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे.
शेकडो एकर आंब्याच्या बागा,फुल बागा,पुस्तक प्रकाशन,उद्योग ,वेवसाय,कंटर्क्टरशिप,सोन्या चांदी व्यापारी आदी अनेकविध उद्योग त्यांनी केले अर्थार्जन केले आणि समाज कार्य पण केले.
उद्योगपती आणि पूर्ण वेळ समाजकार्य करणारे ते पहिलेभारतीय असावेत.फुले वाडा हा परिवर्तन च्या लढ्यासाठी अर्धे शतक रसद पुरविण्याचे महत्वपूर्ण काम केल.
तरुणांनी कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांची उद्योगांचे हे अंग आज च्या परिस्थितत समजून घेणे आवश्यक आहे.स्वतःआर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होऊन मगच सामाजिक कार्य करावे अन्यथा कार्यकर्ते समाजावर ओझे होतील कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चळवळी विकतील ,झुकतील त्यामुळे कार्यकर्ते हे उच्य शिक्षित,आर्थिक स्वावलंबी असणे काळाची गरज आहे .महात्मा फुले यांचा उदोजक हा पैलू तरुणासमोर आणण्यासाठी आंबेडकरवादी मिशन तर्फे महात्मा फुले:एक उद्योजक हे एक वर्षा अभियान राबविण्यात येणार आहे.भारत हा तरुणांचा देश आहे.सरकारी नोकरीची कमी होत चालली संधी पाहता उद्योजक निर्मितीसाठी समाजातून मानशिकता तयार करण्या साठी तरुणांची मानशिकता तयार करण्या साठी वर्तमानात महात्मा फुले हेच आदर्श आहेत….






