Home > मॅक्स ब्लॉग्ज > नेदरलँड्सची प्रणिता...

नेदरलँड्सची प्रणिता...

नेदरलँड्सची प्रणिता...
X

कोरोनामुळे सध्या जगभर हाहाःकार माजला आहे. सर्व देशांची सरकारं, संस्था, वैद्यकीय यंत्रणा आपापल्या परीने कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. कोरोनाच्या झुंझित काही व्यक्तिदेखील व्यक्तिशः प्रयत्न करत आहेत. युरोप खंडातील नेदरलँड्स या सुंदर देशातील Adv. प्रणिता देशपांडे अशा काही व्यक्तींमधील एक आहे. कोरोनाचा कहर सुरू झाला आणि तेव्हापासून प्रणिता रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे अशा विविध माध्यमातून जनजागृती करत आहे. पेशाने वकील असलेल्या प्रणिताच्या कार्याचं कौतुक केलं पाहिजे.

तसं पाहिलं तर प्रणिताला नेदरलँड्सला जाऊन फार दिवस झाले नाही. मर्क्स शिपिंग कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले तिचे पती अद्वैत देशपांडे यांच्यासमवेत ती मुलगा अंश सह ३ वर्षांपूर्वीच तिथे गेली. पण अल्पावधीतच तिथल्या जन जीवनात ती एकरूप झाली. याबरोबरच ती आपल्या मातृभूमीला विसरली नाही, हे महत्वाचे.

ऍड. प्रणिता देशपांडे कुटूंबा सोबत

प्रणिता मूळ विदर्भातील अकोला येथील आहे. ती चौथीत असतानाच दुर्दैवाने वडील कॅन्सरने गेले. पण ३० जणांचं एकत्र कुटूंब असल्याने आणि आजोबा अण्णासाहेब मनभेपकर यांनी जातीनं लक्ष दिल्याने प्रणिता आणि तिची मोठी बहीण प्राजक्ता यांचं बालपण सुखात गेलं. तिचं शालेय शिक्षण आजोबांनीच सुरू केलेल्या भारत विद्यालयात झालं. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ते निकटतम सहकारी होते.

एलआरटी कॉलेजमधून उत्कृष्ट गुणांसह तिने बारावी कॉमर्स केलं. प्रणिताचं लहानपणापासूनच वकील व्हायचं स्वप्न होतं. म्हणून प्रणिता औरंगाबादला तिचे मामा दिवंगत राजेंद्र गणोरकर आणि मंगेश गणोरकर यांच्याकडे औरंगाबाद येथे आली. तिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून २००८ मध्ये बी.एस.एल., एल.एल.बी. ही पदवी तिने प्राप्त केली. शिक्षणानंतर प्रणिताने काही वर्षे आयसीआयसीआय बँक, शेअरखान, एमडी इंडिया हेल्थकेअर सर्व्हिसेस या कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले. करारनामा, कंपनी निगमन व नोंदणी, लीज करार, कन्व्हेंसिंग,विल्स, प्रतिज्ञापत्रे अशा विविध कायदेशीर बाबी ती हाताळत असे. असा तिने भारतभरातील एकाधिक कायदेशीर डोमेनमध्ये ९ वर्षांचा वकीली अनुभव मिळवला.

वकिली बरोबरच सामाजिक कार्याचा पिंड तिने जोपासला. सातारा, रांजणगाव, पैठण, चिखलठाणा, जालना, अकोला, नागपूर इत्यादी ठिकाणी आयोजित विविध कायदेशीर सहाय्य शिबिरांमध्ये तिने भाग घेतला. ज्या योगे भारतातील महिला सुरक्षा विषयी जागरूकता पसरण्यास मदत झाली. याबरोबरच हुंडाबळीवर बंदी घालण्याचे काम, मुलीच्या जन्मास पाठिंबा, बालविवाह बंदी कायदा, खेड्यांमध्ये महिलांसाठी शौचालय सुविधा आणि ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी काम केले. पुणे येथील थोर समाजसेवक सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमात तिने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जालना जिल्हा उपाध्यक्ष (महिला आघाडी) म्हणूनही तिने जबाबदारी सांभाळली होती.

त्यानंतर नेदरलँडला आल्यावरही परक्या देशात आलो, म्हणून हातपाय गाळून न बसता प्रणिता तिथेही सक्रिय झाली. प्रथम तिने डच भाषेचा ए१ हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. कारण तिला असा विश्वास आहे की नवीन भाषा शिकणे नेटवर्किंग कौशल्य वाढवते आणि शिवाय त्या देशाच्या संस्कृतीला समजणे सोपे होते. यामुळे आपल्याला इतर लोकांची मते जाणून घेणे शक्य होते. आणि त्यामुळे आजच्या जागतिक स्तरावरील संपर्कात आपली संवाद साधण्याची क्षमता वाढते.

प्रणिता फेब्रुवारी २०१८ पासून नेदरलँड्समध्ये फाउंडेशन फॉर क्रिटिकल चॉईस फॉर इंडियाची (एफसीसीआय) ट्रस्टी देखील आहे. २०२० या वर्षांपासून एफसीसीआयमध्ये "युवा व्यवहार संचालक आणि सहसचिव" म्हणून तिची पदोन्नती झाली आहे.

एफसीसीआय येथील विश्वस्त हा अनिवासी भारतीय संसाधने एकत्रित करून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात भारताला धोरणात्मक महत्त्व देण्याच्या मुद्द्यांवरील अभ्यास आणि कार्यक्रमांची सुरूवात आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक थिंक टँक आणि केंद्रबिंदू आहे. तिने एफसीसीआय द्वारा आयोजित, युरोपियन संसद, ब्रसेल्स भेटीत सहभाग घेतला. ३० जून २०१७ रोजी एफसीसीआय आयोजित ऊर्जा संक्रमण (टेक्नोलॉजी, बिझिनेस अँड पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह) या सेमिनारमध्ये तिने वक्ता म्हणून भाग घेतला.

आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग

भारतातील महिला सुरक्षा विषयक परिसंवादात २ डिसेंबर २०१८ रोजी सभापती म्हणून भाग घेतला . इंडियन डायस्पोरा कॉन्फरन्स २०१७ या कार्यक्रमाची स्वयंसेवक “एफडीसीआय आणि फिड, प्रांत उत्रेच युट्रेक्ट युनिव्हर्सिटीतर्फे दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी "भारत-युरोप दरम्यान कौशल्य गती” हे कार्य तिने पाहिले. ऑक्टोबर २०१७ पासून प्रणिता ऑफबीजेपी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करीत आहे. थॉमस रॉयटर्सने जून २०१८ मध्येबातमी दिली की, भारत महिलांसाठी सर्वात धोकादायक देश आहे. अनेक वृत्तपत्रांना चकित करणाऱ्या आणि बर्याेच जणांना नाराज करणार्याम बातम्या ठळकपणे छापल्या गेल्या.

आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग

त्यावेळी, एफसीसीआय टीमबरोबर प्रणिताने रिअलिटी चेक करण्याचे ठरविले. भारतीय डायस्पोरा संघटनेने, एफसीसीआयने २ डिसेंबर रोजी एक सार्वजनिक चर्चासत्र आयोजित केले. त्यांचे निष्कर्ष त्यांनी सादर केले. प्रेक्षकांसमवेत प्रश्नोत्तरे केली. सभापती म्हणून नेदरलँड्समधील एफसीसीआय सेमिनारमध्ये “महिलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी भारतीय कायदे” या विषयावर सादरीकरण केले.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पुस्तक भेट देताना

नेदरलँड्स मधील भारतीय दूतावासातर्फे १ जानेवारी २०१८ रोजी आयोजित संपूर्ण हिंदी कार्यक्रमात आणि नाटकात तिने सहभाग घेतला.

भारत भवन, डेन हाग येथे ३० जून २०१८ रोजी "भारतातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणाशी संबंधित कायदेशीर अडचणी आणि आव्हाने " या संदर्भात अध्यक्ष म्हणून एफसीसीआय चर्चासत्रात प्रणिताने भाग घेतला. याच दूतावासाद्वारे ३० सप्टेंबर२०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रोटे केर्क द हेग येथे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाचे औचित्य साधून गांधी मार्चमध्ये तिने स्वयंसेवक म्हणून सहभाग घेऊन अहिंसेचा संदेश देण्यात सहभाग नोंदवला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

नेदरलँड्सच्या गांधी सेंटर इंडियन दूतावासात सहा महिने परदेशी लोकांना हिंदी भाषा शिकवण्यास तिने मदत केली. प्रणिताच्या “महिला सुरक्षा आणि भारतीय कायदा” या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते ८ मार्च २०२० रोजी महिलादिनी, मंत्रालयात झाले. ही फार अभिमानाची बाब आहे. ३१ मे २०२० रोजी कोविड १९ दरम्यान एफसीसीआय आयोजित पहिल्या वेबिनारमधे ती वक्ता होती.

नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क्स रत यांच्यासमवेत एका कार्यक्रमात

नेदरलँड्समध्ये साजऱ्या होणाऱ्या भारतीय सणांच्या सांस्कृतिक, पारंपारिक मुद्द्यांविषयी आणि उत्सवांशी संबंधित तिचे लेख लोकमत टाइम्स, सकाळ, लोकशाही वार्ता, महाराष्ट दिनमान, फ्रि प्रेस जर्नल, तरूण भारत आदी भारतीय वृत्तपत्रांत तसेच नेदरलँड्सच्या वेबसाइट्स आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. प्रणिता विविध प्रकल्पांवर प्रभावीपणे काम करत आहे. स्थानिक समुदायांमध्ये डच आणि भारतीय संस्कृतीच्या सामान्य हित संबंधांना प्रोत्साहित करत आहे.

तसेच मुंबईच्या फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रासाठीस ती नियमितपणे युरोपविषयक लेखन करत आहे. भारत सरकारचे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला आहे. अपूर्वा प्रॉडक्शन, मुंबईतर्फे यावर्षी वर्ष “महिला सन्मान”, ठाणे महानगरपालिकेतर्फे उत्कर्ष महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रणिताची मोठी बहीण प्राजक्ता कुलकर्णी पतीसह अमेरिकेत टेक्सास येथे असते. तिनेही पत्रकारिता पदवी मिळवून ती पत्रकारिता करीत आहे. वडील नसतानाही एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबा यांच्या व पुढे शिक्षणानिमित्ताने औरंगाबाद येथे मामा मंगेश गणोरकर, मामी अनिता यांच्या प्रेमाबद्दल, आजोबांनी लहानपणापासून केलेल्या समाज कार्याच्या संस्कारांबद्दल प्रणिता कृतज्ञ आहे.

स्वतःच्या अनुभवांवरून प्रणिता एकत्र कुटुंब पद्धतीचा हिरीरीने पुरस्कार करते. एकत्र कुटुंबात असल्यानेच वडील नसतानाही आम्ही सुरक्षितपणे वाढलो, मोठे झालो हे ती नमूद करते. स्वभावाने हळवी असलेली प्रणिता आजी, आजोबा आणि मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघातात निधन झालेले मोठे मामा राजेंद्र गणोरकर यांना विसरू शकत नाही. प्रणिताची आई स्वतःला मुलगा नसल्याचे दुःख करत न बसता दोन्ही मुली, जावई कर्तृत्ववान आणि प्रेमळ असल्याने समाधानी आहे.

खरोखरच, परदेशात जाऊन तेथील जीवनाशी अल्पावधीतच समरस होताना आपल्या देशाचा उत्कर्ष होण्यासाठी सतत झटणारीं ऍड प्रणिता देशपांडे ही एक आदर्श होय.

  • देवेंद्र भुजबळ

+91 9869484800

(लेखक महाराष्ट्र सेवानिवृत्त माहिती संचालक आहेत)

Updated : 16 July 2020 7:30 PM GMT
Next Story
Share it
Top