Home > मॅक्स ब्लॉग्ज > देशातील कोणत्या राज्यात महिलांवर सर्वाधिक अत्याचार झाले?

देशातील कोणत्या राज्यात महिलांवर सर्वाधिक अत्याचार झाले?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या २०२१मधील यादीत ६ राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचार सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. ही राज्ये कोणती आणि या आकडेवारीचा अर्थ काय, यावर भाष्य केले आहे पुणे येथील कायद्याचे विद्यार्थी वैभव चौधरी यांनी...

देशातील कोणत्या राज्यात महिलांवर सर्वाधिक अत्याचार झाले?
X

NATIONAL CRIME RECORDS BUREAU (NCRB) ने २०२१ सालचा क्राइम रिपोर्ट पब्लिश केला आहे. त्या रिपोर्टनुसार २०२१ मध्ये महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी धक्कादायक आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात किती प्रमाणात गुन्हे घडले आहेत ते आपण पाहू. २०२१ च्या रिपोर्टनुसार देशातील सहा राज्यांमध्ये महिलांसाठी असुरक्षित वातावरण असल्याचे दिसते आहे. ही सहा राज्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१) उत्तर प्रदेश

२) राज्यस्थान

३) महाराष्ट्र

४) प. बंगाल

५) मध्य प्रदेश

६) आसाम

या सहा राज्यांमध्ये महिलांविरोधात घडणारे गुन्हे किती त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे:-

महिलांवर अत्याचार होत असलेल्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश हे देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२१ मध्ये एकूण 56083 महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत. आज आपल्या देशात महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य कोणते असेल तर ते राज्य उत्तर प्रदेश आहे. योगी राजमध्ये महिला असुरक्षित आहे ही उत्तर प्रदेशच्या जनतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. फक्त जाती धर्माचं राजकारण करून देशात सुबत्ता, शांतता व सुरक्षितता येणार नाही. आज रामाचं नाव घेऊन राज्य करणाऱ्या राज्यांमध्ये सीता असुरक्षित आहे. रामाचं नाव घेऊन राम राज्य येत नसतं तर त्यासाठी नैतिकतेने राज्य करावं लागते.

जाती धर्माचं राजकारण बाजूला सारून मानवतेचं कल्याण करेल अशा नैतिक पायावर राज्याची उभारणी करावी लागते, तेव्हा रामराज्य येईल. जनतेला स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची हमी हवी असते ती तुम्ही देऊ शकला पाहिजे. महिलांवर अत्याचार करण्याची उत्तर प्रदेशची मागील दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर आपल्या लक्षात येईल की उत्तर प्रदेशात महिलांविरोधात गुन्हे घडणारे देशातलं अग्रेसर राज्य आहे. उत्तरप्रदेश मध्ये २०१९ मध्ये एकूण ५९८५३ गुन्हे तर २०२० मध्ये ४९३८५ महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत. सलग तीन वर्षे उत्तरप्रदेशात महिलांवर सर्वाधिक अत्याचार नोंदवले गेले आहे. महिलांसाठी असुरक्षित असणारे ते पहिले राज्य आहे.

NCRB च्या रिपोर्टनुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे राज्यस्थान हे देशातील दुसरे राज्य आहे. या राज्यात २०२१ साली महिलांविरोधात एकूण ४०७३८ गुन्हे घडले. राज्यस्थानमध्ये २०१९ मध्ये ४१५५० तर २०२० मध्ये ३४५३५ इतके गुन्हे महिलांविरोधात घडले आहेत.

NCRB च्या रिपोर्टनुसार देशात महिलांवरील अत्याचार जास्त असणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य आहे. २०२१ साली महाराष्ट्रात एकूण ३९५२६ गुन्हे घडले आहेत. महिलांसाठी असुरक्षित असणारे देशातील तिसरे राज्य आहे. ही आकडेवारी फक्त रजिस्टर झालेल्या गुन्ह्यांची आहे. खरी आकडेवारी तर यापेक्षा जास्त असेल. तसे महाराष्ट्रात महिलांना कमी लेखणारी, त्यांना नावे ठेवणारी माणसं आपल्याला पावलोपावली सापडतील. आपले समाज प्रबोधनकार कीर्तन करणारे सुद्धा महिलांना त्यांच्या कीर्तनातून नावे ठेवायला मागे सरत नाहीत. महाराष्ट्रात २०२१ च्या तुलनेत २०२० मध्ये महिलांविरोधात कमी गुन्हे घडले आहेत. २०२० मध्ये महाराष्ट्रात महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांची संख्या ३१९५४ तर २०१९ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची संख्या ३७१४४ एवढी आहे.

NCRB च्या रिपोर्टनुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे पश्चिम बंगाल हे देशातील चौथे राज्य आहे. प. बंगालमध्ये २०२१ मध्ये महिलांविरोधात एकूण ३५८८४ इतके गुन्हे घडले आहेत. या राज्यात २०१९ मध्ये २९८५९ तर २०२० मध्ये ३६४३९ महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत.

NCRB च्या रिपोर्टनुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे मध्य प्रदेश हे देशातील पाचवे राज्य आहे. मध्यप्रदेश मध्ये २०२१ मध्ये ३०६७३ इतके गुन्हे महिलांविरोधात घडले आहेत. या राज्यात २०१९ साली २७५६० तर २०२० साली २५६४० इतके गुन्हे महिलांविरोधात घडले आहेत.

NCRB च्या रिपोर्टनुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे आसाम हे देशातील सहावे राज्य आहे. आसाममध्ये २०२१ मध्ये एकूण २९०४६ इतके गुन्हे घडले आहेत. मागील दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार आसाममध्ये २०२९ मध्ये ३००२५ तर २०२० मध्ये २६६३२ इतके महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत.

NCRB च्या रिपोर्टमध्ये महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे सहा राज्य सापडतात. बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा महिलांविरोधात गुन्हे घडतात पण या सहा राज्यांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत त्यांच्यात खूप अंतर आहेत. आपल्या देशाची राजधानी दिल्लीची आकडेवारी पाहिली तर ती या सहा राज्यांच्या तुलनेत खूप कमी आहे किंवा या सहा राज्यांच्या तुलनेत ती आकडेवारी त्यांच्या निम्मी आहे. दिल्लीमध्ये २०२१ मध्ये एकूण १४२७७ इतके महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत. दिल्लीची मागील दोन वर्षांची आकडेवारी सुद्धा कमी आहे. २०१९ मध्ये १३३९५ तर २०२० मध्ये १००९३ इतकी आहे. परंतु ही आकडेवारी वरील सहा राज्यांच्या तुलनेने खूप कमी आहे.

आजरोजी आपल्या देशात उत्तरप्रदेश, राज्यस्थान, महाराष्ट्र, वेस्ट बंगाल, मध्यप्रदेश, आसाम ही सहा राज्ये महिलांसाठी असुरक्षित आहेत. आणि ही सहा राज्ये नेहमी चर्चेत असणारी व महत्वाची राज्ये आहेत. या राज्यांची नावं मोठी जरी असली तरी त्यांचे लक्षणं खोटी आहेत. महत्वाच्या व आघाडीच्या राज्यांमध्ये महिला असुरक्षित आहेत ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

जिथे सुरक्षततेची हमी नाही तिथे स्वातंत्र्य असूनही ते उपभोगता येणार नाही. राज्यांचा भौतिक विकास किती झाला फक्त एवढंच पाहणं महत्वाचं नाही तर राज्यात राहणाऱ्या जनतेची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे. भौतिक विकास कमी झाला तरी जनता त्याच्याशी जुळवून घेऊ शकते पण राज्यात सुरक्षितता नसेल तर ते राज्याच्या,देशाच्या हितासाठी ठिक नाहीये. स्वातंत्र्य आणि सुरक्षितता नसेल तर भौतिक विकास करूनही आपण अपयशी आहोत. मानवजातीसाठी स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यापेक्षा सर्वोच्च दुसरं काही नाही. आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपण असा संकल्प करू की येणाऱ्या काळात आपण महिला व बालकांसाठी एका सुरक्षित राष्ट्राची निर्मिती करू.

©वैभव चौधरी

विधी विद्यार्थी

Updated : 31 Aug 2022 2:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top