Home > Top News > "जंग फिर भी बाकी हैं..."

"जंग फिर भी बाकी हैं..."

जंग फिर भी बाकी हैं...
X

बरेच दिवस झाले. व्यक्त होता येत नव्हतं. शब्द सापडत नव्हते. मनावरचा ताण आज लिहून मोकळा करण्याचा प्रयत्न करतेय. आपल्याकडे कोरोनानं पाऊल ठेवण्याच्या आधीपासून बातम्यांच्या निमीत्तानं कोरोनाबाबत काहीना काही वाचत , ऐकत , बोलत होते...नंतर सलग चार महिने कोरोनाच्या बातमीशिवाय दिवसच गेला नाही...

रुग्णांचा आकडा, डबलींग रेट, ग्रोथ रेट, डेथ रेट असे शब्द सवयीचे झाले..कोरोनाचे आज इतके रुग्ण आणि इतके मृत्यु हे सांगणं अगदी यंत्रवत झालं...तसं, सगळं काही ठिक सुरु होतं... अगदी आताच्या क्षणापर्यंतही मला कोरोनानं गाठलेलं नाही...

पण, एक आघात असा झाला की रोज कोरोनाच्या बातम्या सांगतांना अगदी स्टेबल असणारी मी, तीच बातमी सांगतांना आतून हादरायला लागले...त्या बातमीतल्या रोजच्या हजार रुग्णांच्या आकड्यांमध्ये ३ आकडे माझ्या जीवलगांचे होते...

माझे मामा , मामी आणि माझा भाऊ हे तिघेही एकाच वेळी कोरोनाशीच नाही तर थेट यमाशीच झुंजत होते...खूप प्रयत्नांनंतरही मामी आणि दादाची झुंज संपली...अखेर यम जिंकला आणि ते दोघे हरले... मामा अजूनही व्हेंटिलेटरसोबत यमाबरोबर मांडलेला अखेरचा डाव खेळतायेत...

आमच्या संपूर्ण परिवारात वडीलधारे असणारे मामा-मामी सत्तरी ओलांडलेले. काळजी घेऊनही लागण झाली आणि यमानं पहिला डाव मामींवर साधला. कल्याणमधल्या डॉ. सचिन यादवांच्या साई आरोग्यम हॉस्पिटल मध्ये मामींनी शेवटचा श्वास घेतला. तो ही कृत्रीम यंत्राआधारे. डॉ. यादव आणि त्यांच्या टीम ने प्रयत्नांची शर्थ केलेली. सोबत धारावीला कोरोनातून बाहेर काढणारे डॉ. खालिद आणि वाहिदभाई यांनीही रात्री २ पर्यंत धावपळ केली. पण सगळं करुनही पहिली लढाई आम्ही हरलोच..

मामी गेल्यानंतर हात-पाय गाळून उपयोग नव्हता. दादा आणि मामांना वाचवायचं होतं. दादाचं वय कमी, कोणताही आजार नाही. पण, कोरोना लक्षात येण्याआधीच वेगानं फैलावला होता. दादाची स्थितीही क्रिटीकल झाली. तातडीनं मुंबईत हलवणं गरजेचं होतं. डॉ. राहुल घुले आणि मंगेश चिवटे हे दोन जवळचे, हक्काचे मित्र उभे राहिले. त्याआधी कधी बातम्यांसाठी यांच्याशी बोलायचे, तेव्हा हे कायम बिझी.

जेव्हा माझ्यावर वेळ आली. तेव्हा समजलं ही दोन्ही माणसं दिवसरात्रं फोनला का चिकटून असतात ते... कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी शब्दश: तहानभूक विसरुन ही माणसं लढत असतात. एरव्ही राजकारण्यांवर टीका करणं फार सोपं असतं. पण, एकनाथ शिंदेंनी कोरोना संकटात उभं केलेलं टीमवर्क वाखाणण्याजोगं आहे. एकनाथ शिंदेच्या कार्यालयातला फोन मदतीसाठी अखंड वाजतोय आणि महत्त्वाचं म्हणजे तो फोन उचलणा-या लहानातल्या लहान प्रत्येक कार्यकर्त्याकडे मदतीसाठी येणा-या प्रत्येक केस बाबत अपडेट आहे.

मूळचे आमचे नाशिककर असणारे आणि धारावीला कोरोनातून खेचून बाहेर काढणारे बीएमसीचे असिस्टंट कमिश्नर किरण दिघावकर. मी डगमगले तेव्हा या माणसानं मला मोठ्या भावासारखं समजावलंय...मामा आणि दादाला हिंदुजात दाखल केलं तेव्हा... हिंदुजातली सगळी पळापळ सोनु कनोजियानं केली. एकनाथ शिंदेंच्या टिमनं जशी कल्याण- ठाण्यात कोरोनाविरोधात आघाडी उघडलीय. तशीच मुंबईत राहुल शेवाळेंची टीम आहे.

अश्या वेळी ही लोकं, कार्यकर्ते- राजकारणी- नगरसेवक -अधिकारी राहात नाहीत. विश्वास ठेवा अगर नका ठेऊ पण, ती खरोखरीच माणसे नाहीत जीव वाचवणारी देवदूत होतात. सोनु कनोजिया काय, किंवा हिंदुजाचे सिओओ जॉय चक्रवर्ती यांनी अगदी बारीक-सारीक गोष्टीही मायेनं समजावून सांगितल्या...

कधीही घात होईल अश्या स्टेजला आलेल्या क्रिटीकल पेशंटला हलवण्याची जबाबदारी सहसा कुणी घेत नाही... पण, वेळेवर चांगली रुग्णवाहिका मिळाली नाही. म्हणून स्वत:च्या वडिलांना गमावलेल्या जीतु लालवानींनी मामा आणि दादाला सुखरुप हिंदुजात पोहोचवण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या डायल ४२४२ अॅम्ब्युलन्स सव्हिर्स नं हिंदुजात पेशंट क्रिटीकल असूनही सुखरुप पोहोचले. त्यानंतर बराच काळ हिंदुजाचे डॉक्टर दादासाठी यमाशी लढले. प्लाझ्मा ट्रिटमेंटही झाली. पण, शेवटी दादा आम्हांला सोडून गेलाच.

मित्रांनो, कोरोना इतका वाईट आहे की, "आई बरी आहे का?" या दादाच्या प्रश्नाला "ती गेली" हे खरं उत्तर आम्ही शेवटपर्यंत देऊ शकलो नाही.. शेवटचं त्राण असेपर्यंत फोनवर दादानं लाखवेळा विचारलेला हा प्रश्न टाळावाच लागला...

कोरोना इतका वाईट आहे की, कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या बाप-मुलामध्ये फक्त हॉस्पिटलमधल्या त्या एका पडद्याचं कुंपण आहे...पलिकडच्या पोटच्या पोरानं काही क्षणापूर्वी जीव सोडला... पण, बाप आधीच हार्ट पेशंट आहे...म्हणून बाजूलाच असणारा पोटचा गोळा गेला तरी त्या बापाला सांगु नका... हवं तर जेवणात गुंतवा असं नर्सला हात जोडून सांगावं लागतं...

कोरोना इतका वाईट आहे की, घरी बायको-पोरांना आपला खांब गेला तरी एकमेकांच्या मिठीत शिरुन मनसोक्त रडता येत नाहीय...

गेल्या महिनाभरातल्या चढ-उतारांनी मला दोन गोष्टी शिकवल्यायेत... एक - पैसा नसेल तरी चालेल... पण, वेळेला उभी राहणारी माणसं कमवायला हवीत...ही माणसंच लाखमोलाची असतात...आणि दोन- कुठलाही अहं, इगो, अस्मितेच्या भानगडी या व्हेंटिलेटरच्या बीप बीप आवाजापेक्षा मोठ्या नाहीत. तिथली रेष जोवर आपल्याला डोंगरद-या दाखवत वरखाली होतेय तोवर सगळं ठिक आहे. कधी ना कधी प्रत्येकाची रेष एका लायनीत येणारच आहे.

देवानं माझी जीवलग माणसं हिरावून नेलीयेत. पण, जीवाला जीव देणारी माणसं असतात. हे दाखवूनही दिलंय...या माणसांना लढण्यासाठी अजून बक्कळ बळ मिळू देत... कारण जंग अभी भी बाकी हैं...

Updated : 10 Aug 2020 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top