भयावह चक्रीवादळ आणि कैक मृतदेहांची विल्हेवाट !
A terrifying cyclone and the disposal of many dead bodies!
X
दिवाळी संपली आहे आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर उद्या मोंथा नावाचं आदळणार आहे. त्याचं नाव आहे मोंथा. चक्रीवादळामुळे मनुष्यहानी होऊ नये, वित्तहानी कमीत कमी व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पण चक्रीवादळ म्हटलं तरी छातीत एकदम धस्स होतं. याचं कारण 1977 सालचं अनुभवलेलं भयावह चक्रीवादळ. तेव्हा चक्रीवादळाला नाव दिलं जात नसे.
त्यावर्षी 8 नोव्हेंबरला दिवाळी सु्रू होऊन 12 नोव्हेंबरला संपली. त्यानंतर एका आठवड्यात म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी एक चक्रीवादळ आंध्रच्या किनाऱ्यावर धडकलं. भारतातील सर्वात मोठं चक्रीवादळ होतं ते. समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी लगेच पुढाकार घेऊन तिथं औषधं व मदत पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. एक डॉक्टरांचं पथक आणि एक स्वयंसेवकांचं. डॉक्टरांच्या पथकाच्या प्रमुख नीलम गोऱ्हे होत्या आणि मी होतो स्वयंसेवकांचा प्रमुख.
चक्रीवादळानंतर आम्ही मुंबईहून हैदराबाद, तेथून विजयवाडाला पोहोचलो. तिथून कृष्णा जिल्ह्यातील अवनीगड्डा गावी. चक्रीवादळाचा मोठा फटका तिथंच बसला होता. तिथून मदत व पुनर्वसन कामाचं नियंत्रणही सु्रू होतं.
चक्रीवादळातील जखमी, मानसिक धक्का बसलेले यांच्या उपचाराचं काम डॉक्टरांच्या पथकाला दिलं. आमचं काम फारच भयंकर होतं. खेडेगावात पाण्यात, नाल्यात, गटारात अनेक मृतदेह पडून होते. चक्रीवादळामुळे हजारो मृतदेह सडत पडले होते. ते उचलून जाळणं सरकारी यंत्रणेला शक्य झालं नव्हतं. त्यामुळे मृतदेह शोधायचे, ते पाण्यातून काढून त्यावर रॉकेल, डांबर ओतून ते जाळायचे, हे काम आम्हाला दिले गेले.
निखिल वागळे, संजीव तांबे, प्रविण वाळिंबे, प्रविण महाजन, दिलीप कदम आदी 10-12 जण रोज सकाळी अवनीगड्डा येथे काही तरी खाऊन निघायचो. बाहेर काही खायचं नाही, चहाही प्यायचा नाही, अशा सूचना आम्हाला होत्या. दुपारी भूक लागेल म्हणून बिस्कीटं वा ब्रेड आम्हाला दिला जायचा.
पहिल्याच दिवशी पाण्यात मृतदेह दिसला. पाण्यात जाणं शक्य नव्हतं आणि तो बाहेर काढणं अशक्य होतं. दोरखंडाला अर्धवट गाठ मारून एक टोक आम्ही काठीच्या मदतीने त्या मृत शरीराच्या हातात हातात अडकवला. दुसऱ्या हातातही तसा अडकवला. मृतदेहाच्या खाली काठी घालून तो खेचताच सडलेल्या मृतदेहाचे तुकडेच पाण्यात पसरले. ते कसेबसे रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यावर औषधी पावडर टाकली.
आम्ही रोज काही मृतदेहांची विल्हेवाट लावत असू. मानवी व जनावरांच्या मृतदेहांचा वास आमच्या नाकात भिनला होता. हे केल्यावर खूप भूक लागत असे. काही जण मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना काही जण तिथेच बिस्कीटं वा ब्रेड खात असत. एका गावातून जात असताना पायाखाली काही वेगळं लागलं. पाहिलं तर खाली मेलेली जनावरं व मानवी मृतदेह होते.
पुढेपुढे बराच वेळ मृतदेह दिसला नाही की आम्ही अस्वस्थ होऊ लागलो, विनोद करू लागलो. मृतदेहांची विल्हेवाट लावल्याने पुढे आमच्या अंगाला वाईट वास येऊ लागला. पण आमचं काम फारच कमी होतं. तरीही परत येताना किती मुदडे जाळले, याची चर्चा करत होतो. त्यावेळी 20 लाख लोक बेघर झाले होते. ते बऱ्याच काळानंतर परत आले, तेव्हा त्यांची घरं जमीनदोस्त झाली होती.
चक्रीवादळात 10 हजारांहून अधिक लोक मेले होते आणि मृत जनावरांची संख्या एक लाखाहून अधिक होती. त्या अनुभवावर मुंबई सकाळमध्ये लेख लिहिण्याची संधी संपादक माधव गडकरी यांच्यामुळे मिळाली. तो माझा वृत्तपत्रातील पहिला लेख. जणू पत्रकारितेची ती सुरुवातच.
आताही नेमक्या त्याच भागात उद्या मोंथा चक्रीवादळ आदळणार आहे. त्यामुळे भीती व लक्ष दोन्ही आहे. अर्थात उद्या फार नुकसान होणार नाही, याची खात्री आहे.






