Home > मॅक्स ब्लॉग्ज > काश्मीर डायरी २०२१

काश्मीर डायरी २०२१

काश्मीरबाबत संविधानात असलेले कलम 370 बाबत मोदी सरकार ने 2019 साली घेतलेल्या निर्णयानंतर काश्मीरच्या परिस्थितीत झालेल्या बदलाचे व्यंगात्मक वर्णन ॲड. अतुल सोनक यांनी केलं आहे.

काश्मीर डायरी २०२१
X

सकाळच्या विमानाने श्रीनगरला पोचलो. मी बुक केलेल्या हॉटेल च्या टॅक्सीचा चालक माझे नाव लिहिलेला एक कागद घेऊन विमानतळाच्या बाहेर पडल्यावर मला दिसला. मी त्याच्याजवळ पोचलो. 'अरे फोन का नाही केलास?' मी त्याला विचारलं. 'सर, इथे नीट नेटवर्क नाही, दोन वर्षे झालीत म्हणे'. त्यानं सांगितलं.

त्याला मराठीत बोलल्याचं बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी नेहमीच्या सवयीप्रमाणे मराठीत बोललो होतो. पण इथला माणूस कसा काय मराठीत बोलला? मला प्रश्न पडला. माझ्या चेहर्या वरील भाव बघून तोच म्हणाला. 'काय साहेब मराठी माणसाला ओळखत नाही? अहो मी आपल्या भंडार्याझचा. दिलीप नाईकवाडे. मोदी साहेबांनी काश्मीरचा प्रश्न सोडवला आणि मी आलो काश्मीरला.

माझी लहानपणापासून.....म्हणजे काश्मीरकी कली सिनेमा पाहिल्यापासून खूप इच्छा होती. काश्मीरलाच स्थायिक व्हायची. पण इथला आतंकवादाचा प्रश्न सुटेपर्यंत मुळीच जायचं नाही असं आमची आजी सांगून गेली आणि आम्ही लथडलो.'

'आपण पहिले हॉटेलवर जायचं का?' तिची बडबड थांबायचं लक्षण दिसत नव्हतं म्हणून मी मध्येच विचारलं.

'हो....हो.....चला ना. मी आपलं सहजच...........इथे आलेल्यांना घरच्यासारखं वाटावं म्हणून जरा गप्पा सुरू केल्या. एवढंच.' तो पुन्हा सुरू होणार एवढ्यात मीच टॅक्सीची डिकी उघडून बॅग आत टाकली आणि टॅक्सीच्या मागच्या सीटवर बसलो. मला टॅक्सीत बसलेलं बघून तो ओशाळला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला. काही क्षणात टॅक्सी विमानतळाबाहेर पडली.

मी रस्त्याच्या दुतर्फा बघू लागलो. दुकानांच्या आणि हॉटेल्सच्या पाट्या वाचत वाचत माझा प्रवास सुरू होता. 'लक्ष्मी बार अँड रेस्टॉरेंट', 'चितळे एक्सप्रेस', 'जगदंबा इस्लामी खाना', 'पुणेकर कोचिंग क्लासेस', 'हल्दिराम्स', 'गोगटे बिल्डर्स अँड कॉंट्रॅक्टर्स', 'तिरुपति वाईन मार्ट', 'पंडित हृदयनाथ म्युजिक क्लासेस', 'पंडित टेलर्स', 'गायकवाड टिफिन सर्विस', 'येवले अमृततुल्य चहा', 'भागवत दम बिर्यानी सेंटर' .............बघता बघता १५ मिनिटांत मी हॉटेल 'गॅलक्सी इन' मध्ये पोचलो. आधीच बुकिंग केलेलं असल्यामुळे रूम ताबडतोब मिळाली. रूम नंबर ४५९. चवथ्या मजल्यावरच्या प्रशस्त रूमच्या खिडकीबाहेर बघतो तर काय. "अॅड. व्ही. एस. देशपांडे (मुंबईकर)" अशी पाटी लावलेला एक प्रशस्त बंगला नजरेस पडला. भरदार मिशा आणि डोक्यावर फारतर पाच पन्नास केस असलेले देशपांडे वकील भव्य अशा अंगणातल्या बागेत माळ्याला काही सूचना करताना दिसत होते. आपण खरंच काश्मिरात आहोत की कुठे दुसरीकडेच, असा मला प्रश्न पडला.

'सर, चहा', वेटरचा आवाज आला आणि मी भानावर आलो. 'काय नाव बेटा तुझं?' मी लगेच विचारलं. 'सर, मी काशीनाथ....काशीनाथ फडणवीस' तो उत्तरला. 'अरे तूही मराठीच? मघाचा ड्रायव्हरही मराठीच होता.' मी म्हणालो. 'सर, या हॉटेल मध्ये जास्ती करून मराठी लोकच उतरत असतात. म्हणून मालकानं मराठीच लोक ठेवले आहेत कामावर'. त्यानं माहिती दिली.

'मालक कोण आहेत?' माझा प्रश्न.

'सर, मनोज पिंजानी.......रीयल इस्टेट जायंट आहेत. पाच सहाशे एकर जमीन, पाच हॉटेल्स आणि तीन वाईन बार्स आहेत त्यांचे.' त्यानं मालकाची माहिती दिली.

'एवढं सगळं केव्हा घेतलं त्यांनी?' मी प्रश्न केला.

'काय साहेब? तुम्ही भारतात राहता की कुठे दुसर्याे ग्रहावर? मोदी-शहांनी ३७० हटवून काश्मीर प्रश्न कायमचा सोडवून टाकला. आता काश्मीर हे गुजरात सारखंच प्रगत राज्य होणार याबद्दल, या ठिकाणी माझ्या मनात मुळीच शंका नाही', त्यानं ताबडतोब बदललेल्या परिस्थितीचं कारण सांगून टाकलं.

'पण तू असा पवारांसारखा का बोलतोय?', मला जरा उत्सुकता वाटू लागली.

'सर, मी पुण्याचा, नानांचा वंशज. पेशवाई जाऊन पवाराई आली आणि आम्ही नकळत तसं बोलायला लागलो. अॅडजस्ट करून घ्यायची सवय आमची.' त्याचं उत्तर ऐकून मी चाटच पडलो.

'पण नानांचा वंशज इथे येऊन वेटर चं काम करतो......ये बात कुछ हजम नही हुयी' मी चहाचा घोट घेत आपलं मत मांडलं.

'सर, एक चहावाला आपल्या देशावर राज्य करतोय हे विसरू नका. कालचक्र, या ठिकाणी कसं फिरेल..... कोणी सांगू शकत नाही. कुणी सांगावं तुम्ही पुढल्या वेळी याल तेव्हा मी इथला आमदार ही असू शकेन.' तो ठामपणे म्हणाला.

त्याचा आत्मविश्वास बघून मला त्याच्याशी अजून गप्पा कराव्याशा वाटल्या पण मला कोर्टात जायला उशीर होत होता म्हणून मी त्याला नाश्ता आणायला सांगून आंघोळीला गेलो.

पंधरा-वीस मिनिटांत काशीनाथ ब्रेड-बटर-आमलेट आणि पोह्याच्या डिशेस घेऊन आला. मी नाश्ता आटोपून कोर्टात जायला निघालो. दिलीप टॅक्सी घेऊन तयारच होता. आम्ही निघालो. मी सहज विचारलं. 'दिलीप. इथला आतंकवाद पूर्ण आटोक्यात आलाय की काही घटना घडतात अजूनही?'. 'सर, आतंकवाद राहिलाच नाही आता. आधी नोटबंदी आणि नंतर ३७० हटवल्याबरोबर सगळे आतंकवादी गायब झाले. आतंकवादी हल्ले, खून, बलात्कार तर सोडा साध्या मारामार्या देखील होत नाहीत आता.' त्यानं हे सांगितलं तेव्हा मी आश्चर्यजनक चेहर्याबने त्याच्याकडे बघत होतो.

थोड्याच वेळात आम्ही कोर्टात पोचलो. कोर्टात कोणीच नव्हतं. म्हणजे आपल्याकडे कोर्टाच्या आवारात प्रचंड गर्दी दिसते तसं चित्र इथे काही दिसत नव्हतं. श्रीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एकही चिटपाखरू का नाही असा मला प्रश्न पडला. तितक्यात एक वकील नजरेस पडला. आपल्या मोटर सायकलवर बसून फुटाणे खात होता. आज कोर्टात कोणीच कसं दिसत नाही असं मी त्याला विचारलं. तो म्हणाला, 'गेल्या दोन वर्षांपासून इथे लोकांमध्ये भांडणतंटे होतच नाहीत. इतके शहाणे लोक अख्या भारतात कुठे सापडणार नाहीत, आत्ताच चणेफुटाणेवाला येऊन गेला, तो पूर्वी लष्करे तोयबाचा सदस्य होता म्हणे. कोणीच ग्राहक दिसत नसल्यामुळे हिरमुसला होऊन परतत होता बिचारा म्हणून घेतले मी दहा रुपयांचे फुटाणे'. त्या वकिलाचे लांबलचक उत्तर ऐकून मला लक्षात आलं की याला कोणाशी तरी बोलण्याची प्रचंड इच्छा होत असावी.

'३७० कलम हटवलं आणि काश्मीरचे सर्व प्रश्न सुटले. आता सारं कसं शांत शांत......तिकडून ही कोणी आत यायची हिंमत करत नाही. काल पाच मारले, आज चार मेले..... हे सगळं सगळं बंद झालं आता.' त्या वकिलांनी माहिती पुरवली.

'मग ते सगळे आतंकवादी-घुसखोर गेलेत कुठे?' मी उत्सुकतेपोटी विचारलं. 'ते मुख्य प्रवाहात सामील झाले. त्यांनी दुकानं थाटली. बिर्याणी, पावभाजी, भेळ, पाणीपुरी, इडली-वडा-सांबार, वगैरेंचे ठेले लावले. काही भाजी, फळं, सुका मेवा विकू लागले.' त्यांनी सांगितलं.

'मग त्यांची हत्यारं, बंदुका, बॉम्ब हे सगळं कुठाय?', मी सहज विचारलं. 'तसं मी कोणाला याबाबत सांगत नाही. पण, तुम्हाला म्हणून सांगतो शहांची माणसं आली आणि घेऊन गेली म्हणे.. कोणाला सांगू नका. उगाच बोंबाबोंब व्हायची', वकिलांनी वार्निंग देत माहिती दिली. उगाच कोर्टात जायला उशीर नको व्हायला म्हणून मी त्याला नंतर भेटायचं आश्वासन देत कोर्टाकडे निघालो.

महाराष्ट्रातल्या एका जोशी दांपत्याने काश्मीरच्या मकबूल हुसेनची जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी त्या दांपत्यावर गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात काश्मिरात हा एकमेव गुन्हा नोंद झाल्याचे कळले. त्या दांपत्याच्या अटकपूर्व जामिनासाठी मी कोर्टात गेलो होतो. जजसाहेब आपल्या मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त होते. इतर स्टाफ ही फेसबुक, व्हाट्सअॅप चा आनंद लुटत होता. मी जज साहेबांना प्रकरणाबद्दल सांगायला लागताच त्यांनी दुसर्या दिवशीची तारीख दिली. मी कारण विचारताच ते म्हणाले, 'आमच्याकडे मोठ्या मुश्किलीने हे एक प्रकरण आले आहे. आता आजच का संपवायचं? काही दिवस तारीख पे तारीख खेळू. आम्हाला रोज काही काम नको का? उद्या सुनावणी घेऊ. परवा पुन्हा सुनावणी घेऊ. नरवा पुन्हा दोन्ही बाजू ऐकू आणि नरवा च्या परवा निकाल जाहीर करू.' जजसाहेब हे सर्व उर्दूमिश्रित हिंदीत बोलले. नाही तर तुम्ही समजाल जज ही मराठीच होते की काय? असो. मी ही काश्मीरचा पाहुणचार हाणण्याच्या दृष्टीने तारीख वाढल्याबद्दल समाधान व्यक्त करत बाहेर पडलो.

ते मघाचे वकील वाटच बघत होते. मी त्यांना काही काम सांगेन अशी आशा असावी त्यांना. मी त्यांना सकाळी हॉटेल बाहेर बघितलेल्या देशपांडे वकिलांबाबत विचारलं. ते म्हणाले, 'अहो साहेब, ते तुमच्याकडचेच. पूर्वी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी होते म्हणे. दोन वर्षांपूर्वीच इकडे आले. दोन काश्मिरी मुली... सलमा कौसर आणि तिची लहान बहीण सबा कौसर या दोघींशी त्यांनी लग्न केलं आणि मोदी-शहांना धन्यवाद देत काश्मीरचा आनंद लुटत आहेत.' कसं असतं बघा. एखाद्या निर्णयाचे किती दूरगामी परिणाम असू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण. मी वकील साहेबांना दुसर्यां दिवशी भेटण्याचं आश्वासन देत हॉटेलकडे परत निघालो.

संध्याकाळी हॉटेलमध्ये काश्मिरी पाहुणचार झोडून झोपी गेलो. नंतर आठवडाभर तारखा घेत घेत काश्मिरी पाहुणचार आणि काश्मिरी निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला आणि अटकपूर्व जामिनाचा आदेश घेऊन परत निघालो.

अॅड. अतुल सोनक.

९८६०१११३००

Updated : 11 Oct 2021 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top