Top
Home > News Update > ‘माय डिअर’ वटवाघूळ... !

‘माय डिअर’ वटवाघूळ... !

‘माय डिअर’ वटवाघूळ... !
X

मी पश्चिम घाटावर डॉक्युमेंटरी करत होते तेव्हाची ही गोष्ट. पश्चिम घाटांतल्या जंगलांमध्ये वटवाघळांच्या गुहा आहेत, असं ऐकलं होतं. महाबळेश्वरची रॉबर्स केव्ह ही अशीच एक रहस्यमय गुहा. या गुहेत जाऊन शूटिंग करण्याचं माझं स्वप्न होतं. याआधी मी डेव्हिड ॲटनबरोच्या एका शो मध्ये त्याला असं वटवाघळांच्या गुहेत शिरताना पाहिलं होतं. एका वटवाघळाला हातात घेऊन सोडून देऊन हा अवलिया म्हणाला... गो माय डिअर ! टेक केअर. वटवाघळाला कुणीतरी ‘डिअर’ असं म्हणतंय हे माझ्यासाठी नवीन होतं... गुहेत फडफडणारी ती वटवाघळं मला तेव्हापासून खुणावत होती.

आता कोरोनाच्या या दिवसांत वटवाघळांना कुणी डिअर म्हणणं सोडाच पण त्यांचं साधं नाव जरी काढलं तरी अनेकांना शिसारी येईल. त्याचं कारणही तसंच आहे. कोरोना विषाणू वटवाघळांमधून पसरला, असं म्हटलं जातंय. ते पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही पण इबोला आणि निफा व्हायरसमुळे आधीच बदनाम असलेली वटवाघळं आता आणखी बदनाम झाली आहेत. याबद्दल तज्ज्ञांनी बरंच काही सांगितलं आहे. अनेक समज, गैरसमज आहेत. बरीच शास्त्रीय माहिती पुढे येतेय. याबद्दल वेगळं लिहिणारच आहे पण आधी या वटवाघळांच्या गुहेत जाऊन येऊ...

तर... पश्चिम घाटावर फिल्म करताना मी खूपजणांना विचारून पाहिलं वटवाघळाच्या गुहेबद्दल. महाबळेश्वर, बेळगाव... इथे काही गुहा होत्या पण काही बंद केल्या होत्या... काही गुहा वटवाघळांनी सोडून दिल्या होत्या...त्यामुळे एक अशी चांगली गुहा सापडत नव्हती. पण मी हार मानायला तयार नव्हते. मला जायचंच होतं या डिअर वटवाघळांच्या गुहेत ! आणि एक दिवस मार्ग सापडला... वटवाघळांवर संशोधन करणाऱ्या एका झपाटलेल्या माणसाने मला गोव्यामध्ये ती गुहा दाखवली...आम्ही आधी महादई अभयारण्यात शूट केलं आणि दुसऱ्या दिवशी एका जंगलरस्त्याने गेलो.. गावातला एक उत्साही कार्यकर्ता घ्यायला आला होता. ही गुहा कुठे होती त्याचा तपशील न सांगण्याच्या अटीवरच आम्हाला तिथे नेण्यात आलं होतं. वीरप्पनच्या जंगलात डोळे बांधून नेल्यासारखं !

काऴ्याकभिन्न कातळामध्ये निसर्गाने अगदी वटवाघळांसाठीच बनवलेली गुहा होती ती ! माझा विश्वासच बसत नव्हता... मी माझ्या स्वप्नातल्या डोंगरातल्या गुहेजवळ आले होते... आम्हाला ही गुहा नुसती बघायची नव्हती तर शूट करायची होती... भारावून जायला वेळही नव्हता. मी आणि माझा सहकारी कुमार डोंगरे शूटिंगसाठी सज्ज झालो. गुहेच्या बाहेर एक काजूची बाग होती. तिथून आत जाता येत होतं. तुम्ही कधी मार्लेश्वरला किंवा शिवथर घळला गेला असाल तर कल्पना करू शकता. कातळाचा हा भलामोठा भाग जमिनीला टेकण्याआधी एक लांबरुंद, जमिनीला समांतर घळ होती तिथे. आत शिरताना वाकूनच जावं लागत होतं.

मी डोक्याला टॉर्च असलेला एक बेल्ट लावला होता आणि त्या प्रकाशात पुढेपुढे चालले होते. भर उन्हातही ही गुहा किती थंडगार होती... सगळीकडून पाणी झिरपत होतं. आतमध्ये जांभ्याच्या चिऱ्याचा तांबडा रंग होता. बाहेरून तर काहीच अंदाज येत नव्हता पण आतमध्ये ही गुहा केवढी खोल, लांब रुंद होती... या जंगलात राहणाऱ्या वटवाघळांची हवेलीच होती ती ! जसंजसं आत गेले तसतशी वटवाघळं भिरभिरू लागली... वाटलं होतं त्यापेक्षा खूपच लहान आकाराची होती. टॉर्चच्या प्रकाशात जेवढी दिसत होती तेवढीही खूप होती. आजुबाजूला भरपूर होती. आपण झाडावर लटकलेली फ्लाइंग फ़ॉक्स वटवाघळं पाहतो त्यांच्यात आणि या वटवाघळांमध्ये खूपच फरक होता... झाडावर लटकलेली वटवाघळं फळं खातात. ही कीटकभक्षी छोटी वटवाघळं होती...

गुहेला चिकटून दाटीवाटीने बसली होती... काही माद्यांना पिल्लं लुचत होती.. काही गुहेच्या या टोकांवरून त्या टोकावर भिरभिरत होती... सूं सूं असा काहीतरी आवाज गुहेमध्ये घुमत होता.. मी आतआत घुसले तेव्हा अचानक सगळी वटवाघळं गुहेच्या तोंडाशी जमून भिरभिरू लागली.. मी थोडी बिचकले पण भीती नाही वाटली त्यांची. आम्हाला जबरदस्त शॉट्स मिळत होते... मी गुहेत फिरून वटवाघळांबद्दल सांगत होते... माझ्या ध्वनिलहरी गुहेत घुमत होत्या... त्यामुळे ती वेगाने भिरभिरत होती. वटवाघळं निशाचर असतात. या रणरणत्या दुपारी झाडांच्या सावलीतल्या गुहेतल्या अंधारात ती विसावली होती...

‘ही वटवाघळं आपल्याला तर काहीच करत नाहीत पण आपणच त्यांच्या गुहेत आल्याची त्यांना भीती वाटते...’ बोलताबोलता थबकले मी...ही शांत सावळ्या पंखांची वटवाघळं मला एंजल्स वाटू लागली आणि ॲटनबरोचा आवाज वटवाघळांबद्दल बोलताना तेव्हा एवढा का मृदू झाला होता तेही कळलं.

मला त्या गुहेचा गारवा अनुभवत वटवाघळांच्या त्या गाभाऱ्यात बसून राहावंसं वाटलं... काही काळ शॉट्स घ्यायचं सोडून मी आणि कुमार नुसतंच त्यांचं भिरभिरणं पाहत राहिलो...आम्ही अचानक गुहेत आल्याने त्यांची शांतता भंग पावली होती... मला खूप अपराधी वाटलं. माझं काम झालं तेव्हा मग काही क्षण मी गुहेच्या बाहेर येऊन थांबले. आतमध्ये फक्त कुमार आणि त्याचा कँमेरा राहिले.

आमच्यासोबत असलेला आमचा गोवेकर मित्र म्हणाला... या गुहेच्या पुढची काजूची बाग आमची... पण काजूवर येत नाहीत कधी ती. आता संध्याकाळची जंगलात जातील. मागे अभयारण्यच आहे ना... तो मस्त गोव्याचे हेल काढून बोलत होता... आमचे आजोबा, पणजोबा या गुहेत येऊन ही वटवाघळं घेऊन जायचे आधी. तेव्हा खात असत, आता नाही. आता ही वटवाघळं आम्ही जपून ठेवलीयत. कुणाला सांगतही नाही या गुहेबद्दल. त्यांची शिकार करायला बंदी आहे ना ! हे शूट माझ्या डॉक्युमेंटरीसाठी होतं, जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेत होतो आम्ही. पण तुम्हाला सांगू... ही वटवाघळं आम्ही त्या गावचेच नाही असं वागतं होती. एकाही वटवाघळाने आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला नाही. ती भस्सकन अंगावरही आली नाहीत. दिवसा तशीही ती थोडी पेंगलेलीच असतात पण त्यांनी रात्रीही काही केलं नसतं आम्हाला.

वटवाघळांच्या गुहेतला हा अनुभव कितीही सांगितला तरी तो पाहिल्याशिवाय त्याचा थरार कळत नाही... आता संध्याकाळ होत आली होती... आज गुहेत काहीतरी आक्रित घडल्याने ती गुहेच्या तोंडापाशी जमली होती... हजारो होती.. त्यांना आता जंगलाच्या दिशेने निघायचं होतं...

मी, कुमार आणि ते गोवेकर मित्र... आमचे आम्ही होतो या गुहेत. एरव्ही जंगलात जातानाही मी तज्ज्ञांच्या सोबतीशिवाय जात नाही पण इथे वटवाघळांची माहिती देण्यासाठी फारसं कुणी नव्हतं. आम्ही फक्त जे दिसेल ते टिपत होतो. आता गुहेच्या अगदी बाहेर त्यांचा गोतावळा जमला. कुमारला मावळतीच्या सोनेरी किरणांमध्ये भिरभिरतानाचे त्यांचे शॉट्स मिळाले... अगदी शेवटचं वटवाघूळ जंगलात जाईपर्यंत आम्ही तिथेच बसून होतो.

त्यादिवशी होळी पौर्णिमा होती. डोंगराआडून, काजूच्या बागेतून भलंमोठ्ठं चंद्रबिंब उगवलं. वटवाघळांची ती गुहा आता जंगलातल्या चांदण्यात न्हात होती. रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. त्या नीरव शांततेत पुन्हा गुहेत गेलं तरी कुणी हटकणार नव्हतं आम्हाला पण आता तिथे वटवाघळं नव्हती... ती नसताना सु्न्यासुन्या झालेल्या गुहेत जावंसं वाटेना..

आता पहाटे येतील पुन्हा... आमचा गोवेकर मित्र म्हणाला... गुहेत वटवाघळं नव्हती पण आमच्या कँमेऱ्यात भिरभिरणारे ते एंजल्स मी आणि कुमार पुन्हापुन्हा पाहत होतो... उगवत्या चंद्रबिंबाखालची ती गुहा मागे ठेवून आम्ही गोव्यातून कारवारचा रस्ता धरला...माझं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्या काऴ्या पंखांच्या एंजल्सनी पूर्ण केलं होतं. गुहेतून बाहेर येणाऱ्या वटवाघळांना, ‘बायबाय माय डिअर’ असं म्हणताना मला ॲटनबरोची खूप आठवण आली.

Updated : 26 April 2020 1:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top