पुस्तकप्रेमी बाबासाहेब
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महामानव आहेत ज्यांनी ग्रंथालयासाठी बंगला बांधला आणि त्यात जवळपास बावीस हजारांपेक्षाही जास्त पुस्तकांचा संग्रह केला होता. बाबासाहेब लहान असताना त्यांचे वडील रामजी बाबा हे बाबासाहेब यांच्यावर विशेष लक्ष देत असत. बाबासाहेबांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. बाबासाहेबांना हवी ती पुस्तके ते आणून देत. पुरेसे पैसे नसतील तेव्हा ते आपल्या मुलींकडे जाऊन पैसे आणून पुस्तके आणत असत, पण बाबासाहेबांच्या अभ्यासात ते कधीच खंड पडू देत नव्हते. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत एका अस्पृश्य कुटुंबात दूरवर शिक्षणाचा कोणताही संबंध नसताना बाबासाहेबांच्या घरातील ही जागरूकता क्रांतिकारक होती.
बाबासाहेब एका परीक्षेत पास झाले होते तेव्हा त्यांचा गौरव व्हावा म्हणून त्यांच्या चाळीतील काही लोकांनी त्यांचा सत्कार कार्यक्रम करायचे ठरवले. त्या कार्यक्रमात बाबासाहेबांना गौतम बुद्ध यांचे चरित्र भेट देण्यात आले. ते पुस्तक वाचल्यानंतर तथागत गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला आणि बाबासाहेब यांनी बुद्ध यांना आपले गुरू मानले. नंतर सामाजिक क्षेत्रात ते बौद्ध धर्माकडे वळून धर्मांतराचा इतिहास घडला. एक छोटसं पुस्तक कोणाच्या जीवनात केव्हा परिवर्तन घडवेल हे सांगता येऊ शकत नाही. बाबासाहेब परदेशात शिकायला होते तेव्हा त्यांच्याकडे पुस्तके खरेदीसाठी पैसे नसत. तेव्हा ते ग्रंथालयात जाऊन ग्रंथालय जितका वेळ उघडं असेल तितका वेळ ते तिथे पुस्तके वाचत बसत..
बाबासाहेब एकदा म्हणाले होते, "तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल"
अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच पुस्तके ही देखील मानवाची मूलभूत गरज आहे असे बाबासाहेबांच्या या विचारातून स्पष्टपणे सांगतात.
बाबासाहेब यांचे पुस्तकप्रेम अपार होतं. पुस्तकांची आवड ही त्यांची कधीही न संपणारी तृष्णा झाली आणि त्यांसोबतचे एक वेगळेच नाते निर्माण झाले. जणू त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनून त्यांच्या आयुष्यभर सोबती म्हणूनच राहिली. या गोष्टीमुळे त्यांची स्मरणशक्ती अफाट बनली होती.
बाबासाहेब हे त्यांचा शेवटचा ग्रंथ 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' लिहीत होते तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक होते. एके रात्री उशीर झाल्याने बाबासाहेबांनी त्यांना घरी जायला सांगितले. ते गेल्यानंतरही बाबासाहेब लिहित बसले. सकाळी स्वीय सहाय्यक परत घरी आले त्यावेळी त्यांना बाबासाहेब लिहीतच बसलेले दिसले.
आपल्या अभ्यासात बाबासाहेबांना व्यत्यय अजिबात आवडत नसे. जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी १४ दिवस खोलीला बाहेरून कुलूप लावून स्वतः ला कोंडून घेतले होते. त्यावेळी त्यांना एका लहान खिडकीतून चहा व जेवनाची व्यवस्था केली होती. या प्रसंगातून समजते त्यांच्या लेखन व वाचनाची एकाग्रता किती पराकोटीची होती. अर्थातच त्यांची ही सर्व मेहनत मानवमुक्तीच्या लढ्यात न्याय व हक्कांसाठी सुरू होती.
एकदा परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तके पाठवली होती. पण ती बोट दुर्दैवाने बुडाली. जेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते. बाबासाहेबांच आपल्या पुस्तकांवर पराकोटीच प्रेम होतं. ते म्हणत, "लोकांनी माझी अवहेलना केली पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं. म्हणून मी पुस्तकांच्या बाबतीत इतका जागरूक आहे. पुढे ते म्हणतात, जर माझ्या घरावर जप्ती आली आणि तर माझ्या सर्व चीज वस्तू नेल्या तर मी शांत बसेन पण माझ्या पुस्तकांना कोणी हात लावला तर मी ते कदापि सहन करणार नाही.
बाबासाहेबांनी जगातल्या महत्वपूर्ण ग्रंथाचा अभ्यास केला लहानपणापासूच वाचनाने ते 'प्रज्ञासूर्य' होऊन जागतिक कीर्तीचे महापुरुष झाले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे ते सतत लोकांना सांगत. बाबासाहेबांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक ग्रंथ, अग्रलेख लिहिले. जे आजच्या काळातही देशाच्या जडणघडणीत दिशादर्शक आहेत. संविधान सभेतील त्यांची भाषणे अतिशय अभ्यासपूर्ण व बिडतोड ठरलेली आहेत.
पुस्तकांबद्दलची ही आस्था क्वचितच कोणाकडे दिसून येईल बाबासाहेबांचा हा गुण ज्ञानार्जनाकडे वळण्यासाठी सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे.