Home > मॅक्स ब्लॉग्ज > मराठी पत्रकारांचा सण

मराठी पत्रकारांचा सण

मराठी पत्रकारांचा सण
X

६ जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन, पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र सुरु केलं. हे वर्तमानपत्र द्विभाषिक होतं. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारनेही त्याची दखल घ्यावी ही धारणा त्यामागे होती. १८३२ पासून सुरु झालेली मराठी पत्रकारिता शिक्षित मराठी वाचकांमध्ये सामाजिक व राजकीय जागृती, प्रबोधन करणारी राष्ट्रवादी पत्रकारिता होती.

देश स्वतंत्र होईपर्यंत भारतीय पत्रकारितेचं स्वरुप प्रामुख्याने तेच होतं. माहीतीपेक्षा विचारांना या पत्रकारितेत प्राधान्य दिलेलं असायचं. लोकमान्य टिळक, गांधीजी, जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद, पेरीयार रामस्वामी नायकर, बाबासाहेब आंबेडकर इत्यादी बहुतांश नेते संपादक होते. माहिती वा विचार ही एक क्रयवस्तू नाही अशी या सर्वांची धारणा होती. केवळ समाजात नाही तर व्यक्तीच्या आचार-विचारात परिवर्तन करण्याची तळमळ त्यांना होती. ही पत्रकारिता जाहिरातींवर नाही तर वर्गणीदारांच्या पैशावर सुरु होती.

आज चर्चा सुरु आहे पर्यायी माध्यमांची, समाज माध्यमांची आणि माध्यमांच्या बिझनेस मॉडेलची म्हणजे उत्पन्नाचे नाविन्यपूर्ण मार्ग कोणते याची. हे सर्व नाविन्यपूर्ण मार्ग जाहिराती आणि मेटाडेटा इथेच घेऊन जातात. वाचक, ग्राहक, उपभोक्ता यापेक्षा अन्य मार्गांवर विसंबून राहाणंच माध्यमांना भाग पडतं आहे. बातम्या व माहितीसाठी वर्तमानपत्रं वा टिव्हीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण बातमी आता स्मार्ट फोनवरच पाह्यली वा वाचली जाते. यू ट्यूब चॅनेल तर ढिगाने आहेत. विविध विषयांवरील माहिती-विश्लेषणाचा पाऊस तिथे दररोज सुरु असतो.

टेक्नॉलॉजीमुळे ग्राहक वा मतदार वा उपभोक्त्यांचे गट तयार झाले आहेत. एका गटात कोणत्या प्रकारची माहिती व विश्लेषण व प्रचार प्रसारीत होतो आहे हे दुसर्‍या गटाला (म्हणजे दुसर्‍या गटातील प्रत्येक सदस्याला) उशिरा समजतं. उदाहरणार्थ भाऊ तोरसेकर यांचा चॅनेल पाहाणारे निळू दामले यांचा चॅनेल पाहात नाहीत. पुस्तक वाचनाबाबतही हेच घडतं. कथा, कादंबरी, कविता, नाटक यापेक्षा माहितीपर साहित्य, जीवनोपयोगी साहित्य म्हणजे व्यक्तीमत्व विकासासंबंधीची पुस्तकं यांना ग्रामीण व शहरी वाचकांची पसंती आहे. कारण या साहित्यातून बदलत्या जगाची ओळख होते, नव्या जगात कोणती कौशल्यं गरजेची आहेत हे समजतं. हे साहित्य सध्याच्या पिढीच्या आकांक्षांशी जुळणारं असतं.

टिव्हीवरच्या मालिकांची झळाळी संपली आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन इत्यादी माध्यमांकडे नवी पिढी वळली आहे. कला वा कौशल्य वा विचार, स्थानिक असो की एका समूहापुरता, जगाच्या बाजारपेठेत आपली जागा निश्चित करण्याकडे तरुणांचा कल आहे. बातमी, माहिती, विश्लेषण, करमणूक, मनोरंजन वा प्रचार, कोणत्याही क्षेत्रात. लोंढा प्रसारमाध्यम वा सामाजिक किंवा आंतरजालीय, दिशा तीच आहे. या परिस्थितीत मराठी माध्यमांचं स्थान कोणतं हा प्रश्न मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने विचारायला हवा.

Updated : 6 Jan 2021 8:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top