‘मोम’ची वेळ आलीय

757

मोबाईलचा वापर देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. इंटरनेट सुविधा देखील वाढायला लागल्या आहे, सरकारच वायफायस्पॉट तयार करायला लागली आहे. त्यामुळे कनेक्टीव्हीटीचा मुद्दादेखील निकालात निघायला लागला आहे. मग या सगळया यंत्रणेचा वापर करून मोबाईलनेच मतदान करता आलं तर ?

जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात निवडणुका या लोकशाहीचा उत्सव म्हणून जगाला सांगितल्या जातात. याबाबत देशातील प्रत्येकाला आनंदच असावा कारण लोकशाहीप्रमाणे मतदार देखील प्रगल्भ होत जातो. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलत असताना सांगितलं की हिंदुस्थानात आपण मतदानासाठी मशिनचा वापर करतो, इतर देशांमध्ये अजूनही बॅलट पेपरचा वापर करून निवडणुका घेतल्या जातात, अगदी ब्रेक्झिटसारख्या जनमतासाठी देखील बॅलट पेपरचाच वापर करण्यात आला होता. मात्र यामुळे आपण हुरळून जायचं का, भक्त असतील त्यांनी नक्की हुरळून जायला हरकत नाही, मात्र नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याला कदाचित इथे फुलस्टॉप लागलेला आवडणार नाही. नोटाबंदी, कॅशलेस व्यवहार अशी वेगळी वाट धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यात यश मिळतं का नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला. यात ते एक गोष्ट वारंवार सांगत होते की आता तुमचा मोबाईल हीच तुमची बँक आहे. सगळे व्यवहार आता मोबाईलद्वारेच करा. मग हाच विचार पुढे नेला तर ?

मोबाईलचा वापर देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. इंटरनेट सुविधा देखील वाढायला लागल्या आहे, सरकारच वायफायस्पॉट तयार करायला लागली आहे. त्यामुळे कनेक्टीव्हीटीचा मुद्दादेखील निकालात निघायला लागला आहे. मग या सगळ्या यंत्रणेचा वापर करून मोबाईलनेच मतदान करता आलं तर ? बऱ्याच काळापासून माझ्या डोक्यामध्ये हा विषय घोळत होता. आपण सकाळी उठतो, आपलं केंद्र कोणतं आहे ते शोधतो, रांग लावतो, मतदान करतो आणि घरी येऊन उरलेली सुट्टी विविध मार्गाने संपवून टाकतो. मतदानासाठी इतका खटाटोप आणि मनुष्यबळ वाया जाणं हे परवडणारं आहे का हा त्यातला महत्वाचा विचार डोक्यात येत होता.

गेल्या काही वर्षांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. जर  लेखामध्ये सुचवण्यात आलेला पर्याय अंमलात आणला तर देशातील मतदानाची टक्केवारी ही किमान 80 टक्क्यांपर्यंत हमखास पोहचेल असा अंदाज आहे.

मग काय करता येईल तर मोबाईलवरूनच मतदानाची सेवा सुरू करता येईल. जर मोबाईलवरून कोट्यवधींचे व्यवहार होऊ शकतात, तर मग त्या व्यवहारांसाठी जितकी सुरक्षा वापरली जाते तितकीच सुरक्षा वापरून मतदान केलं जाऊ शकत नाही का ? यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यायला पाहीजे, आणि देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला पाहीजे. टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊया की ही पद्धत अंमलात आणली तर काय फायदे होतील.

मी या पद्धतीला ‘मोम’असं नाव ठेवलंय, कारण क्लिष्ट  शब्दांना अशी नावं दिली की ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला पण बरं वाटत राहतं.  शब्दाचा अर्थ म्हणजे ‘मोबाईल मतदान’ निवडणूक आयोग भीमप्रमाणे सर्व विंडोज, अँड्रॉईड, आयओएस वैगेरे वैगेरे सारख्या  प्लॅटफॉर्मवर चालेल असं एक अॅप तयार करेल. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच आदेश दिले आहेत की देशातील सगळ्या मोबाईल नंबरची वैधता तपासा आणि जे अवैध आढळतील ते ताबडतोब बंद करा. या प्रक्रियेला किमान एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया निवडणूक आयोगासाठी फायदेशीर ठरू शकेल. ज्या मतदारांना मोबाईलवरून मतदान करायचं असेल ते निवडणूक आयोगाचं अॅप डाऊनलोड करतील. मतदानाच्या दिवशी सकाळीच मतदारांच्या मोबाईलवर ईव्हीएम मशिनवर जशी  यादी असते तशी यादी दिसायला सुरूवात होईल आणि मतदानाची वेळ जेव्हा सुरू होईल तेव्हा ती यादी अॅक्टीव्ह होईल. मतदाराने एकदा मत दिलं की ती आपोआप डीअॅकटीव्ह होईल म्हणजे एका नंबरवरून पुन्हा मतदान करता येणार नाही.

मतदानाच्या दिवशी टीव्हीवर आपण बघत असतो की सगळ्यात वयोवृद्ध व्यक्तीने केले मतदान,दिव्यांगांची जिद्द बघा व्हीलचेअरवरून मतदानाला आले. कशाला त्यांना त्रास द्यायचा त्यांना मोम चा पर्याय उपलब्ध करून दिला तर ते घरूनही मतदान करू शकतील. ज्येष्ठ नागरीक, गरोदर महिला यांनाही रांग लावण्याची गरज पडणार नाही. ते देखील घर बसल्या मतदान करू शकतील. या देशामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या तरी निवडणुका सुरूच असतात. दरवेळी या निवडणुकांसाठी सुट्टी जाहीर करावी लागते, जेणेकरून मदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी. हे करण्यापेक्षा मोमचा पर्याय दिल्यास सुट्टी देण्याची गरज पडणार नाही, माणसांची रोजीरोटी पण बुडणार नाही. फारतर सगळी कार्यालये किंवा आस्थापने मतदानासाठी जसा लंच ब्रेक देतात तसा अर्धा एक तासाचा ‘मोम ब्रेक’  देऊ शकतील जेणेकरून त्यावेळेत मतदान करता येऊ शकेल.

तासनतास रांगेत उभं राहणं, कार्यकर्त्यांना बूथपर्यंत मतदारांना नेण्यासाठी करावी लागणारी धडपड, निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च, अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था, नक्षलग्रस्त किंवा संवेदनशील भागातील तणावाचं वातावरण या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यास मोम हा उत्तम पर्याय ठरू शकेल कारण माणूस मतदानाच्या वेळेत कोणालाही,कुठेही बसून,केव्हाही मतदान करू शकेल. अर्थात ज्यांना पारंपरीक पद्धतीने मतदान करायचं असेल त्यांच्यासाठी काही वर्ष ईव्हीएमची व्यवस्था सुरू ठेवावी मात्र ती टप्प्याटप्याने बंद करणं गरजेचं आहे.

मोमची पद्धत वापरल्याने वेळ,पैसा तर वाचेलच शिवाय निकालही विक्रमी वेळत लागू शकतील. पोस्टल बॅलेटची झंझटही संपेल. त्यामुळेती वेळखाऊ प्रक्रिया देखील बाद होईल कारण जे मतदार मतदारसंघाच्या बाहेर आहेत जसे की सैनिक , त्यांनाही मोबाईल वापरून मतदान करता येईल. अर्थात हा एक विचार आहे, पण विचारातूनच नव्या प्रणालीचा, तंत्रज्ञानाचा जन्म होत असतो, आणि या विचाराच्या अंमलबजावणीमध्ये अशक्य असे काहीच नाहीये. मोबाईलचा सुरक्षित वापर हा एकमेव महत्वाचा मुद्दा यामध्ये थोडा अडचणीचा छरू शकतो, मात्र अॅपच्या बळकटीकरणातून तो मुद्दाही हद्दपार केला जाऊ शकतो.

  • खवचट पोपट