Home > मॅक्स ब्लॉग्ज > हे तर व्यवस्थेनं केलेलं ऑनर किलिंग

हे तर व्यवस्थेनं केलेलं ऑनर किलिंग

हे तर व्यवस्थेनं केलेलं ऑनर किलिंग
X

हो! शितल वायाळनं केलेली ही आत्महत्या नसून ते व्यवस्थेनं केलेलं ऑनर किलिंगच आहे. समाजानं घालून दिलेल्या रुढी परंपरांनी केलेलं ऑनर किलींग... शेतकऱ्याला गरिबच ठेवणाऱ्या बाजार व्यवस्थेनं केलेलं ऑनर किलींग... धोरणं आखून ही त्याची फलश्रुती न मिळवणाऱ्या सरकारनं केलेलं ऑनर किलींग... आणि हो शितलची मानसिक स्थिती समजून घेण्यात कमी पडलेल्या तिच्या आजूबाजुच्यांनी केलंलं ऑनर किंलीग आहे हे...

शितलनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ठळकपणे लिहीलं आहे की “बापावरील ओझं आणि मराठा समाजातील रुढी परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी आत्महत्या करत आहे”. पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या या आपल्या महाराष्ट्रात आजही मुलीच्या लग्नासाठी मोठा खर्च करण्याचा दबाव तिच्या बापावर असतो. जात, कुळ, पद, पूर्वजांचा इतिहास, आपसातील स्पर्धा अशा एक ना अनेक कारणांसाठी खोटी प्रतिष्ठा जपण्यात लोकांना नको तेवढा रस असतो. मग ऐपत नसतांनासुद्धा मोठ्ठी कर्ज काढून लग्नांचा थाट आण घाट घातला जातो.

मराठवाड्यात मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून त्याला फाटा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मराठवाड्यात आता ‘गेटकेन’ नावाचा लग्न प्रकार बराच प्रचलित झाला आहे. गेटकेन म्हणजे मोठ्या लग्न समारंभाला फाटा देऊन थोडक्यात आटोपलेलं लग्नं. म्हणजे एखादं साधारण लग्न जर तीन दिवस, लाखो रुपयांचा खर्च, हजारो पाहुणे त्यांचा मानपान आणि मोठ्या जेवणावळी असं होणार असले, तर गेटकेनचं लग्न एकाच दिवसात सर्व विधी आटोपून कमीकमी पाहुणे आणि कमीत कमी खर्चात केलं जातं. उसाच्या गाळप हंगामानंतर हातात जो पैसा येईल, त्यातून मुलीचं लग्न आटोपणं या मधूनच गेटकेन हा शब्द निर्माण झाला आहे. बऱ्याचदा लग्न ठरल्यानंतर साखरपुड्याच्या दिवशीच लग्न आटोपून टाकणं म्हणजेच गेटकेन.

पण, हे गेटकेनचं लग्न करणं मराठवाड्यात कमी प्रतिष्ठेचं किंवा हलकं मानलं जातं. गेल्यावर्षी याच दरम्यान मराठवाड्यात फिरत असतांना मला या लग्न प्रकाराविषयी कळालं. पण, त्याबाबत लोकांशी बोलतांना जाणवायचं, की त्यांना हा प्रकार काही फार रुचणारा नाही. दुष्काळ आहे, पिकपाणी नाही म्हणून गेटकेनचं लग्न ठिक आहे, असंच त्याचं म्हणणं होतं. खास करून महिला वर्गाची काहीशी याबाबत नाराजी असते. त्याची कारणं ‘पाय धुवण्याची’ प्रथा किंवा इतर महिला वर्गाशी संबंधित रुढी-परंपरा, मान-पान आणि रुसव्या-फुगव्यांमध्ये असल्याचं दिसून आली आहेत.

तरी अनेक गरीब शेतकऱ्यांमध्ये आजकाल गेटकेनला प्राधान्य दिलं जातंय. एकमेकांच्या कुटुंबांच्या अडचणी समजून घेऊन सोयरीकी केल्या जात आहेत. पण, शितलच्या नशिबी तेसुद्धा आलं नाही. तिच्या २ बहिणींची गेटकेन लग्न झाली आहेत, असं तिनं चिठ्ठीमध्ये लिहीलं आहे. पण, गेल्या पाच वर्षांमध्ये शेतात काहीच पिकलं नसल्यानं तिच्या बापाकडे शितलचं गेटकेन लग्न करू शकेल एवढे सुद्धा पैसे नव्हते.

सरकार आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर आपण सपशेल अपयशी ठरलो आहे, ते शितलच्या आत्महत्येतून स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यात सरकारला येत असलेलं अपयश तसंच मुलीचं गेटकेनचं तरी लग्न कर, असा शितलच्या वडीलांवर असलेला समाजाचा दबाव यातूनच शितलला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं.

शितलचं गेटकेनचं लग्न झालंही असतं पण, पुढे काय? हा मोठा प्रश्न तिला पडला असणार. कारण गेटकेन लग्न झालं म्हणजे पुढच्या 12 सणांपासून आणि इतर जबाबदाऱ्यांपासून काही बापाची सुटका होणार नाही, हे तिला ठाऊक होतं. म्हणूनच शितलची आत्महत्या नसून ते समाज, रुढी परंपरा, खोटी प्रतिष्ठा आणि सरकार या सर्वांनी मिळून केलेलं ऑनर किलिंग ठरतं.

नीलेश धोत्रे

Updated : 15 April 2017 8:06 AM GMT
Next Story
Share it
Top