Home > मॅक्स ब्लॉग्ज > सोन्याच्या ताटात मोत्याचा घास

सोन्याच्या ताटात मोत्याचा घास

सोन्याच्या ताटात मोत्याचा घास
X

“महाराज, यावे, महाराज.”

“प्रधानजी, काय आहे राज्याची हालहवाल ?”

“महाराज, आपल्या पारदर्शी, प्रगतीशील स्मार्ट राज्यात सगळीकडे आलबेल आहे.”

“प्रधानजी, आज हवेत गारवा पण जाणवतो आहे. पाउस पडला वाटते.”

“होय महाराज, नुकताच पाउस पडून गेला. पण हा काही खरा पावसाळा नव्हे. मान्सून सुरु व्हायला अजून वेळ आहे. पण यंदा चांगला पाउस होईल, असे भाकीत हवामान खात्याने दिले आहे.”

“प्रधानजी तुम्ही फार चिकित्सा करता बुवा. सारखेसारखे शासनआदेश काढल्यामुळे तुम्हाला शब्दछल करायची आणि अनावश्यक तपशिल द्यायची फार सवय लागलीये बुवा. अहो, आपल्याला लोकांना काय सांगायचे आहे? की पाउस आला आहे. यंदा पिकपाणी चांगले येणार आहे. त्यामुळे सुबत्ता येणार आणि हे सगळे आपल्यामुळे होत आहे - म्हणजेच ‘अच्छे दिन’ येत आहेत.”

“होय, महाराज, आपण म्हणता तसेच आहे. आपल्यामुळेच अच्छे दिन येत आहेत हे खरेच आहे.”

“प्रधानजी, आज पेपरवगैरे वाचले का? काही महत्वाच्या बातम्या?”

“महाराज, आपले शेतकरी नाराज आहेत. त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही. त्यांचे कर्ज माफ होत नाही म्हणून ते संपावर गेले आहेत.”

“काय हे प्रधानजी, आम्ही असे यापूर्वी तर कधी ऐकले नव्हते! शेतकरी संपावर?? अहो, शेती म्हणजे काही कारखाना आहे का,बंद करायला?”

“महाराज, खरे आहे आपले. परंतु शेतकरी संपावर गेले हे छापून आले आहे. तेही खरे आहे. ते त्यांचा माल, धान्य, भाजीपाला,दुध हे सगळे आता विक्रीसाठी पाठवणार नाहीत, असे म्हणताहेत.”

“म्हणजे ते रियासतीची रसद तोडणार म्हणा की !”

“होय महाराज.”

महाराज :- (एकदम विरोधी पक्षाच्या टोनमध्ये भाषणाचा चढा सूर लावत)

“हे असे चालणार नाही. शेतकऱ्यांना म्हणावे, आम्हीच त्यांना ‘अच्छे दिन’ दाखविले आहेत. ते आमची रसद तोडू शकत नाहीत. तोडली तरीही आम्ही घाबरणार नाही. आम्ही शिवरायाचे पाईक आहोत. महाराजांच्या गडाला दुश्मन जेंव्हा वेढा घालायचे त्यावेळी ६/६ महिने पुरेल एवढे अन्नधान्य गडावर ठेवलेले असायचे. तुम्हीही सागळीकडे वर्दी द्या. येत्या ६ हिन्यासाठी सर्व शहरात अन्नधान्याची बेगमी करून ठेवा. जाऊ द्या त्या कृतघ्न शेतकऱ्यांना संपावर.”

“महाराज, आपण म्हणताय ते बरोबर आहे, पण संप आधीच सुरु झालेला आहे. आता बेगमी करता येणार नाही. आपण जर सर्वच अन्नसाठे त्याब्यात घेतले तर जनता उपाशी मरेल. हाहाकार होईल.”

“असे आहे का? मग एक लगेच जाहिरात मोहीम काढा. आपल्या काळात झालेली कामे, लोकांपर्यंत न्या. त्यांच्या मनावर आपले कार्य ठसवा. त्यांना कळू तरी द्या आम्हीच त्यांचे तारणहार आहोत ते.”

“होय महाराज. ते करूच. पण हा संप मोडला पाहिजे.”

“प्रधानजी तुम्हाला काय म्हणायचे आहे, मोडायला हवा की मिटायला हवा?”

“महाराज, आपण उच्चविद्याविभूषित, त्यात पुन्हा कायद्याचे पदवीधर आहात! मी काय बोलणार, आपल्यापुढे? मला एवढेच म्हणायचे आहे की हा संप थांबला पाहिजे.”

“प्रधानजी, अहो ही विरोधकांची नीती आहे. त्यांचा संघर्ष काही यशस्वी झाला नाही म्हणून ते आता असे खेळ करताहेत. मला सांगा, गरीब शेतकऱ्यांना त्यांचा माल रस्त्यावर फेकायला कसे परवडेल? त्यांना तो रोखीने विकूनही परवडत नाही अशी तक्रार तेच करीत असतात ना? शिवाय अन्नदाताच स्वत: अन्नाची नासाडी कशी काय करेल? हेच प्रश्न जनतेसमोर येतील असे जाहिरात अभियान घेऊन जा तुम्ही लोकांपुढे !”

“हो महाराज, पण आजच्या जेवणाचे काय करायचे?”

“प्रधानजी, एवढी वर्षे आमच्याबरोबर काम केलेत तरीही हे असले छोटेमोठे प्रश्न तुम्ही आम्हालाच विचारता?”

“सॉरी महाराज.”

महाराज प्रसन्नपणे अगदी छोट्या बाळासारखे निरागस हसले. आणि खुशीत येऊन म्हणाले, “प्रधानजी, कार्यलयातील सगळ्यांसाठी पंचतारांकित हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर द्या. नाहीतरी घरचा मेथीपालक खावून कंटाळा आलाच आहे. आता परदेशी ब्रोकोलीचे सूप मागवा आणि आपल्याला लागणारी फळे आणि भाज्यासाठीही परदेशी ऑर्डर देवून टाका. चला मला आता ‘मेक इन इंडिया’च्या सेमिनारला जायचे आहे.”

*******

एके काळी एक अमीर माणसाला स्वत:च्या वैभवाचा फार अहंकार झाला होता. त्याचा पूर्ण महाल सोन्याचा होता. महालाला आतून हिऱ्याचे खांब लावलेले होते. सर्व मोठमोठ्या खिडक्यादारांना त्याने मोत्याच्या झालरीचे पडदे बसविले होते. महालात जगभरातील उत्तमोत्तम वस्तूंचा संचय होता. एक दिवस अमीर ऐटीत महालात प्रवेश करताना त्याने प्रवेशद्वाराजवळच मागे पहिले तर एक साधू महालाजवळून जात होता. त्याला साधूची टिंगल करण्याची लहर आली. त्याने साधूला बोलाविले आणि म्हणाला,

“महाराज, कशासाठी आपण अनवाणी पायांनी एवढी पायपीट करताहात ? दारोदार भिक्षा मागत फिरण्यापेक्षा माझ्या महालात चला, तुम्हाला इच्छाभोजन देतो. कशाला उगाच गावभर वणवण करीत फिरता?” यावर साधू म्हणाला,

“अहो, सेठ मी तर ईश्वराच्या शोधात आहे. हे दोन वेळचे जेवण ही काही माझी खरी भ्रांत नाही. भोजन ही फक्त या नश्वर शरीराची तात्पुरती गरज आहे. आसपासची वस्ती शेतकऱ्यांची आहे, मी त्यांच्याकडे भिक्षा मागून जेवतो. ते मला भुकेच्या वेळी मीठभाकर देतात ती मला पुरते. मी त्यात पूर्ण समाधानी आहे.”

यावर अमीर माणूस म्हणाला,

“तुम्हाला कदाचित माहित नसेल या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे ते ! तुम्ही त्या गरीब शेतकऱ्यांच्या मीठभाकरीचे फार कौतुक करता. चला, आज मी तुम्हाला पंचपक्वान्नाचे भोजन खाऊ घालतो.”

साधूला लगेच लक्षात आले की याचा गर्वाचा फुगा खूपच फुगला आहे. टाचणी टोचून त्याची हवा कमी करायची गरज आहे. साधू शांतपणे म्हणाला,

“हे धनाढ्येश्वरा, अरे वा ! तू मला पाहुणचार देणार आहेस म्हणून मी प्रसन्न झालो आहे. पण मला हवे तसेच इच्छाभोजन तू देऊ शकशील की नाही, याची मात्र मला थोडी शंका येते.”

“शंका कसली महाराज, चला तर खरे, तुम्ही जेवाल तेंव्हा तुम्हाला कळेल की आज कुणी तुम्हाला भोजनाचे आमंत्रण दिले होते ते!”

“नुसत्या भोजनाचे नाही, इच्छाभोजनाचे !”

“हो, हो इच्छाभोजनाचे!” असे म्हणत अमीर प्रसन्नपणे हसला. तो असे म्हणेपर्यंत ते दोघे महालात प्रविष्टही झालेले होते.

हातपाय धुतल्यावर, अमिराचा नोकर साधूसाठी सुंदर नक्षीदार सोन्याच्या पेल्यात केशरी दुध घेऊन आला. साधू म्हणाला,

“हे धनेश्वरा, इच्छाभोजन म्हणजे इच्छाभोजन हं. पण माझ्या काही फार अटी नाहीत बरे का.”

“महाराज तुम्ही फक्त आज्ञा द्या.”

“मला रोज त्या गरीब शेतकऱ्यांच्या घरचे बेचव अन्न खाऊन खरेच कंटाळा आला होता. मला तुझे म्हणणे पटले. माझी फार अपेक्षा नाही, बस्स, तू असे काही कर की ज्यात त्या शेतकऱ्यांकडून आलेला कुठलाही पदार्थ असणार नाही!”

घरातल्या नोकरचाकरांना पंचपक्वान्न करायचा आदेश देतान अमीर म्हणाला, “आज शेतातून आलेले काहीही वापरायचे नाही रे बाबांनो ! सर्व आचारी मान खाली घालून उभे झाले. आमिरने दरडावून विचारल्यावर म्हणाले, “मालक, सर्व अन्नधान्य,दुध, तूप, दही, फळफळावळ तर शेतातूनच आलेले आहे. त्यामुळे आम्ही स्वैपाक कसला करावा ते आता तुम्हीच सांगा.”

अमीर माणूस विचारात पडला. मग त्याने सोन्याच्या तबकात चांदी हिरे मोती, अशी अनमोल रत्ने घेऊन तो आला. दुसऱ्या तबकात उंची वस्त्रे आणि रुपयांच्या राशी होत्या. तो नजराणा अमिराने साधूला सादर केला. साधू म्हणाला, “याचा मला काय उपयोग? मी हे वापरू शकत नाही. दुपारचे १२ वाजले आहेत. आता माझे प्राण कंठाशी आले आहेत. मला खाण्यासाठी अन्न वाढ, अन्न !

अमीराने मान खाली घातली. तो म्हणाला, “माफ करा महाराज, मलाही खूप भूक लागली आहे. परंतु तुमच्या अटीमुळे मी हतबल आहे. आता तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा.”

साधू हसतो. “शेठ, एक लक्षात ठेवा. जगातली सगळी रत्ने, माणिक पोटाच्या भूकेपुढे कवडीमोल आहेत. कितीही श्रीमंत असो की कितीही गरीब, माणूस जगतो तो केवळ अन्नावरच. आणि ते आपल्याला देणाऱ्या त्या अन्नदात्याला कधीही तुच्छ लेखू नये. आता असा माझ्यासमोर समोर बैस”

असे म्हणून साधूने त्याचा झोळीत हात घातला आणि भिक्षा म्हणून कुणीतरी वाढलेले एक पिवळेधम्मक ताजेतवाने केळे काढले. त्याचे दोन तुकडे करून, साधूने अर्धे केळ आमिरला दिले. साधू, प्रसन्न मुद्रेने उरलेले दुसरे अर्धे खावू लागला.

(वरचा प्रसंग आणि खालची कथा याचा एकमेकाशी काहीही संबध नाही. काही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)

- श्रद्धा बेलसरे खारकर

Updated : 2 Jun 2017 5:42 PM GMT
Next Story
Share it
Top