Home > मॅक्स ब्लॉग्ज > सूवर्णमध्य ! तोही सोशल मीडियात? शक्य आहे !

सूवर्णमध्य ! तोही सोशल मीडियात? शक्य आहे !

सूवर्णमध्य ! तोही सोशल मीडियात? शक्य आहे !
X

सध्याचे युग हे इंटरनेट युग म्हणून ओळखले जाते. प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा वाढता वापर, आपले जगणे सोपे आणि सोयीस्कर करणारा ठरला. तर सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप सारख्या सोशल साईट्समुळे लोक एकमेकांच्या जवळ आले. स्थळ आणि काळाची बंधनं झुगारून लोकांना संपर्क करणे खूप सोयीस्कर झाले. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. तसेच काहीसे आपल्या सोशल मीडियाच्या बाबतीत झाले आहे. सोशल मीडिया क्रेझमुळे समाजावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यांचा विचार वेळीच करणे गरजेचे आहे..

१. कुटुंबियांशी संवाद कमी होत आहे

एकीकडे सोशल मीडियामुळे आपण जगाशी जोडलो गेलो आहोत. पण याच सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपल्या कुटुंबियांशी आपला संवाद कमी होत चालला आहे. सतत मोबाईल, लॅपटॉपच्या अति वापरामुळे आपण आपल्या कुटुंबियांशी संवाद साधत नाही. म्हणून घरातील नाती दुरावत चालली आहेत.

२. तरुणाईत वाढणारे सेल्फी क्रेझ

सध्या तरुणांमध्ये वाढणारे सेल्फीचे क्रेझ हाही सोशल मीडियाचाच एक परिणाम आहे. अलीकडच्या काळातच आपण सेल्फीमुळे झालेले अनेक भयानक अपघात पहिलेच असतील. सेल्फी काढणे हे वाईट नाही, पण सेल्फी काढण्याच्या उद्वेगात आपण काय करतोय? याचे भान न राहणे, हे नक्कीच काळजी करण्यासारखे आहे.

३.आरोग्यावर दुष्परिणाम

एका संशोधनानुसार, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांची झोप कमी झाली आहे. आणि त्याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहेत. झोप कमी झाल्यामुळे मनःशांती राहत नाही, त्यामुळे कामात मन लागत नाही. खूप दिवस झोप पूर्ण नाही झाली, तर आपल्याला मानसिक आजारही होऊ शकतात. काही लोकांमध्ये मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे दृष्टिदोष निर्माण झाल्याचेही लक्षात आले आहे.

४.नको त्या गोष्टींचा प्रचार, प्रसार सोशल मीडिया मुळे सोपा झाला

सोशल मीडियावर आपण कुठलीही गोष्ट अगदी सहजरित्या अपलोड करू शकतो. त्यामुळे लोकांना एक व्यासपीठ मिळाले आहे आपली मतं मांडण्यासाठी. पण काही लोकं याचा दुरुपयोग करतानाही दिसतात लोकांच्या धार्मिक किंवा सामाजिक भावना भडकावणारे बरेचसे पोस्ट सोशल मीडिया वर अगदी सहज दिसतात. त्यामुळे समाजाला हानी पोहचू शकते. याचाही विचार व्हायला हवा.

५. सोशल मीडिया मुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले

एका सर्वेक्षणानुसार सोशल मीडियाच्या अर्थात फेसबुक, whatsaap च्या जास्त वापरामुळे घटस्फोटाच्या केसेसचे प्रमाण वाढले आहे. व्हाट्सऍप, फेसबुकच्या अति वापरामुळे समाजावर असाही दुष्परिणाम झाला आहे.

सोशल मीडिया चांगला की वाईट? या वादात पडण्यापेक्षा, सोशल मीडियाचा जो अतिवापर होत आहे, तो चुकीचा आहे असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरेल. प्रत्येक गोष्टीची चांगली वाईट बाजू असतेच, आपण कशाचा स्वीकार करायचा हे आपण ठरवायचे. एकूणच काय तर सुवर्णमध्य साधता येणे हे खुप महत्वाचे असते. सोशल मीडिया, मोबाईल, इंटरनेट या सर्व गोष्टी आपल्या सोयीसाठी बनवण्यात आल्या आहेत. त्यांचा आपल्या सोयीसाठी, मनोरंजनासाठी वापर करणे यात काही गैर नाही. पण त्याचे दुष्परिणाम जर आपल्यावर होत असतील तर ते टाळण्यासाठी एकदा विचार नक्की करा.

संजीवनी तबिब, हैदराबाद

Updated : 27 April 2017 6:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top