Home > मॅक्स ब्लॉग्ज > सावित्रीच्या लेकी पवारवाडीत श्रमदान करतात तेव्हा...

सावित्रीच्या लेकी पवारवाडीत श्रमदान करतात तेव्हा...

सावित्रीच्या लेकी पवारवाडीत श्रमदान करतात तेव्हा...
X

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर जवळील 'पवार वाडी'त शुक्रवारी संध्याकाळी पद्मभूषण वसंत दादा पाटील विद्यालयात लगबग सुरु होती. इचलकरंजीच्या बस मधून मुलं, मुली शाळेच्या आवारात उतरली, पाठोपाठ मुंबईचे चंद्रकांत म्हात्रे, महादेव पाटील आपली टीम घेऊन आले, विद्याधर ठाकूर सोबत पालघरची मुले -मुली शाळेत आली, पुण्याहून दामिनी पवार आली, दत्ता ढगे छात्र भारतीच्या मुलांसोबत आला. गेटवर छात्र भारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि या शिबिराचे आयोजक प्रा.रामदास निकम, संजय रेंदाळकार आणि कोल्हापूरच्या टीम सोबत हेमंत डिग्रजे स्वागताला उभे होते. हळू हळू कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली. एकमेकांच्या ओळखी सुरु झाल्या. शाळेच्या लॉनमध्ये मुले आणि मोठ्या माणसाच्या गप्पाचे फड रंगू लागले.

रात्रीचे जेवण झाले आणि इचलकरंजीच्या संजय रेंदाळकर, विनायक होगाडे यांनी शॉर्ट फिल्म दाखविण्यास सुरुवात केली. शिबिराची दिशा स्पष्ट झाली होती. रात्री दीड वाजता मिरजेहुन रोहित शिंदे आला. पहाटे महाराष्ट्राचे सचिव नचिकेत कोळपकर नासिकहुन आले. रायगड येथून संतोष ढोरे, दोडामार्ग सिंधूदुर्ग येथून डॉ.प्रज्ञा कुमार गाथाडे, सुनील स्वामी, वैशाली हुबळे, श्वेता दिब्रिटो, उषा कोष्टी, शोभा स्वामी, गडहिंग्लज मधून शहाजी गोंगाणे, इंदापूर मधून सलीम शेख, खंडाळा येथून सुभाष सावंत, साताराहून मोहनराव सावंत, रहिमतपूरचे विश्वास भोसले, मेढा येथून जयश्री माजगावकर, धनंजय धोत्रे, इंद्रायणी पाटील, भावसार काका, निलेश कुडाळकर असे अनेक ठिकाणाहून कार्यकर्ते जोडत गेले.

शनिवार दिनांक 20 मे रोजी सकाळी राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, या शिबिराचे समन्वयक मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, महाराष्ट्राचे सचिव नचिकेत कोळपकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 7 वाजता 175 कार्यकर्ते पवार वाडीत श्रमदाना साठी पोहचले यात मुलींची संख्या लक्षणीय होती.

सेवा दल बढाना है,परिवर्तन लाना है अशा घोषणा देत सेवा दलाचे कार्यकर्ते गावातून डोंगराच्या दिशेने निघाले. सेवा दलाचा झेंडा डौलाने फडकू लागला. डोंगरावर 2 फूट खोल आणि 2 ×2 चे खड्डे खोदायला सुरवात झाली. 9च्या सुमारास खंडाळा, मेढा, वाई, सातारा, इंदापूर, रहिमतपूर येथून कार्यकर्ते येऊ लागले 225 हुन अधिक कार्यकर्ते आता तापत चाललेल्या उन्हात काम करू लागली. राष्ट्र सेवा दलातल्या 'सावित्रीच्या लेकी 'समवेत राज्यभरातून आलेल्या शेकडो राष्ट्र सेवा दल सैनिकांनी श्रमदान केले.

मुंबई, पालघर, पनवेल, सिंधुदुर्ग, नासिक, मालेगाव, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर अशा राज्यभरातील सेवा दल शाखांमधून कार्यकर्ते श्रमदानासाठी पवार वाडीत दाखल झाले होते.

दोन दिवसामध्ये या मुलांनी चारशेहुन अधिक खड्डे खणले. येत्या पावसाळ्यात तिथं झाडे लावली जाणार आहेत. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यानी सीड बँकेच्या माध्यमातून शाळा-शाळा मधून गोळा केलेल्या हजारो बिया गावच्या सरपंचांकडे दिल्या.

दुपारी आंघोळीसाठी कार्यकर्ते गावातल्या तलावावर गेले. तासभर मनसोक्त डुंबल्यानंतर जेवण झाल्यावर गावातील देवळामध्ये कार्यकर्त्यांच्या संवादाला सुरवात झाली. पत्रकार अश्विनी सातव, महाराष्ट्राचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाहीर कैलास जाधव याने खड्या आवाजात दोन गाणी म्हणून चर्चेचा रोख स्पष्ट केला. त्यानंतर लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी कार्यकर्त्यांसमोर काही प्रश्न उपस्थित केले. सेवा दलात आलो म्हणजे केवळ श्रमदान केले, गाणी म्हटली, अभ्यास वर्गाला आला म्हणजे सेवा दल नाही तर कमकुवत घटक, शोषित, दलित, अल्पसंख्य आणि वंचित समूहाच्या बाजूने जो उभा राहतो तो सेवा दल सैनिक असे सांगितले.

धर्म, जात, लिंग भेद करणार नाही, स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार करीन.हुंडा घेणार नाही, आणि देणार नाही, हुंडा बंदीच्या कायद्याचे तंतोतंत पालन करीन, लग्न झाल्यानंतर मूल होईल तेव्हा गर्भ लिंग निदान करणार नाही. स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार करीन अशी शपथ वर्षा देशपांडे यांनी सर्वांकडून घेतली.जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म अशी भूमिका घेईल तो कार्यकर्ता अशी आपली ओळख बनली पाहिजे.

संध्याकाळी पुन्हा एकदा तलावा शेजारी असलेल्या डोंगरात कार्यकर्ते श्रमदानाला गेले.

रात्री ज्वारीची भाकरी,भाजी आणि आमटी भाताच्या जेवणा नंतर देवळाच्या आवारात कार्यकर्त्या सोबत गावातल्या बाया माणसे आणी मुले, मोठी माणसे जमू लागली रात्रीचे 10 वाजले तरुण कीर्तनकार हभप सचिन महाराज पवार यांचे प्रवचन सुरु झाले.

संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम ,शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा देण्याचे काम केले आहे. आपण नव्या पिढीचे प्रतिनिधी आहोत, नवे आहे म्हणून चटकन स्वीकारू नये आणि जुने आहे म्हणून टाकू नये. विवेकाच्या आधारे हे केले पाहिजे. समतेचा विचार हा संत परंपरेतून सातशे वर्षा पूर्वी या मातीत आला. स्त्रीयांना प्रतिष्ठा देण्याचे काम संत नामदेव यांच्या काळा पासून सुरु होते.

नामदेवाच्या कीर्तनात जनाबाई संचलन करायच्या. आज आपण श्रम दानाला इथे आलो आहे. पण तुकाराम महाराजांनी देहू मध्ये श्रमदानाने देऊळ बांधले आणि नंतर आळंदीच्या गाभाऱ्याचे काम श्रम दानाने केले. दुष्काळ पडला असता तुकोबांनी आंधळेपणानी समाजाला पैसे वाटले नाहीत तर समाजाला उघड्या डोळ्यांनी मदत केली. समतेच्या चळवळीची पाया भरणी वारकरी संप्रदायाने केली. आणि समता ही स्वातंत्र्याची पूर्व अट असते असे साने गुरुजी सांगत. त्या काळात महाराष्ट्राची धार्मिक राजधानी पैठण येथून हलवून ती पंढरपूर येथे आणण्याचे काम संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांनी केले."खेळ मांडीयेला वाळवंटी बाई,नाचती वैष्णव ठायी हो' हा त्या काळातला विचार होता. नामदेव, तुकाराम, ज्ञानोबा हे समतेचे पूर्वसुरी होते असे हभप सचिन महाराज पवार यांनी सांगितले.

राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी गावकरी मोकळा संवाद करताना दिसत होते. या पुढे" स्मार्ट व्हिलेज " करण्याचा संकल्प या गावचे तरुण सरपंच राजेंद्र पवार यांनी बोलून दाखविला. जल संधारणाबरोबर या गावातील लोकांचे मनसंधारण या निमित्ताने झाले ही या पाणी फौंडेशन च्या 'सत्यमेव जयते वॉटर कप ' स्पर्धेची आणि 'राष्ट्र सेवा दला' सारख्या विचार देणाऱ्या संघटनेचे यश आहे असे पवार वाडीचे सरपंच राजेंद्र पवार यांनी सांगितले.

राष्ट्र सेवा दलाच्या श्रमसंस्कार छावणीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी या गावाला भेट दिली. त्या भेटीने गावकऱी आश्चर्यचकीत झाले .सेवा दल कार्यकर्ते दोन दिवस गावात येणार म्हणून त्या आधी मुख्यमंत्र्यांची भेट आयोजित झाली की काय ?असा प्रश्न गावातील तरुण मुले सेवा दल कार्यकर्त्यांना विचारत होती. त्या पार्श्वभूमीवर पवारवाडीचे तरुण सरपंच श्री राजेंद्र पवार सेवा दल श्रम छावणीच्या समारोपप्रसंगी म्हणाले, या पवारवाडीत इतक्या वर्षात कधीही राज्यमंत्री किंवा कॅबिनेटमंत्री आले नव्हते.परंतु राष्ट्र सेवा दलाच्या श्रम छावणी शिबिराच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस गावात आले, ही गावाच्यादृष्टीने आनंदाची बाब आहे.

जल आणि मृद संधारणाचे आमचे काम उभे राहात असताना सेवा दलाचे कार्यकर्ते योग्य ठिकाणी, योग्य वेळी आले.त्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री गावात आले.त्यामुळे आमचे काम नीट सुरु आहे, याचा विश्वास आम्हाला आला.'सत्यमेव जयते- वॉटर कप स्पर्धे'चे पवारवाडी गाव प्रबळ दावेदार आहे. पाणी फौंडेशनच्या या स्पर्धेच्या माध्यमातून बांधावरून गावात सुरु असलेले वाद 100 टक्के मिटले आहेत. जलसंधारणाबरोबर मनसंधारणेचे काम या निमित्ताने झाले. माणसे जोडण्याचे सेवा दलाचे हे काम आम्ही पुढे नेऊ असे ते म्हणाले, 26 जानेवारी पासून श्रमदाना सुरवात झाली 8 एप्रिल पर्यंत फक्त रविवारी श्रमदान चालायचे आणि त्यानंतर आज पर्यंत सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 गावातील वृद्ध,तरुण ,स्त्रिया असे 300 ते 400 लोक दररोज काम करतात.आज पर्यंत 5 मातीचे बंधारे,एक शेत तळे,गरबायन बंधारा,टायरचा बंधारा,मशीनच्या साहाय्याने 5 बंधारे,सलग समतल चर, खोल समतल चर,दगडी ताली, उतारावर आडवी ताली, स्टोर बडिंग,रोप लागवड,वृक्षारोपणा साठी खड्डे आदी कामे या निमित्ताने गावकऱ्यांनी तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पूर्ण केली आहेत.

दुपारी जेवणानंतर समारोपाला सुरवात झाली.इचलकरंजीच्या सुनील स्वामी सरांनी संविधानावर पोवाडा सादर केला.

समारोपाला राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ अभिजीत वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाला येण्या अगोदर त्यांनी सेवा दलाच्या कार्यकर्त्यानी आणि ग्रामस्थानी केलेल्या कामाची पाहणी करून आले होते. त्याचा धागा पकडून ते म्हणाले, निर्मितीचे काम माझा सैनिक करतो आहे ते अभिमानास्पद आहे. या पुढच्या काळात पवार वाडी आणि सेवा दलाचे नाते अधिक घट्ट होईल. आमच्या सोबत सरपंच राजेंद्र पवार हे नाते पुढे नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशामध्ये धर्माच्या, जातीच्या नावावर जे राजकारण सुरु आहे त्याच्या विरोधात श्रमदाना बरोबरच वैचारिक श्रमदान करण्याची आज गरज आहे असे त्यांनी सांगितले. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना आणि राष्ट्र गीताने शिबिराची सांगता झाली.

या गावामध्ये एकजुटीची ताकद निर्माण करून 26 जानेवारी पासून संपूर्ण गावाला रचनात्मक कामाला जोडून घेण्याचे काम रहिमतपूर येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयाचे चेअरमन सुनील माने यांनी केले आहे. तरुण आणि कृतिशील असलेले सुनील माने दररोज सकाळी 10 किमी असलेल्या पवार वाडीत जातात स्वतः कुदळ फावडे घेऊन कामाला सुरुवात करतात. त्यांचे शिक्षक, विद्यार्थी त्यांच्या सोबत काम करतात हे सारे विलक्षण आहे.पवार वाडीत परिवर्तन करायचे या ध्यासाने ते झपाटलेले आहेत. जागो जागी अशी माणसे आहेत म्हणूनच आपली जबाबदारी अधिक वाढते आहे.

शरद कदम,

कार्याध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, मुंबई

Updated : 23 May 2017 7:01 AM GMT
Next Story
Share it
Top