Home > मॅक्स ब्लॉग्ज > राकेश मारिया- बस नाम ही काफी है!

राकेश मारिया- बस नाम ही काफी है!

राकेश मारिया- बस नाम ही काफी है!
X

मुंबई पोलिसात गेल्या २० वर्षांपासून दबदबा राहीलेले राकेश मारिया आता निवृत्त झालेत. क्राईम पत्रकारीता करतांना त्यांना जवळून पाहण्याचा योग आलेल्या मयांक भागवत यांनी त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.

राकेश मारिया...महाराष्ट्र पोलीस...हे नावं मुंबईकरांना माहीत नसेल असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मुंबईकर असतील. राकेश मारिया हे नाव फक्त नाव नाही तर ती ओळख आहे मुंबई पोलिसांची.

2008-09च्या वर्षात इस्लामिक दहशतवादानं धुमाकुळ घातला. ज्वाइंटसीपी क्राइम आणि नंतर एटीएसमध्ये असताना मारियांनी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचं मुळ उखडून काढलं. इंडियन मुजाहिद्दीनचा कणा तोडण्यात मारियांची प्रमुख भूमिका राहीली आहे.

राकेश मारिया म्हटलं की आठवतं मुंबईचं अंडरवर्ल्ड, 1993चे साखळी बॉम्बस्फोट, २००८चा मुंबई दहशतवादी हल्ला आणि शिना बोरा मर्डर केस. अंडरवर्ल्डचे शार्पशूटर्स असोत, दहशतवादी असोत किंवा मग गॅगस्टर्स सर्वांची नावं आणि कुंडली मारियांची तोंडपाठ. मारियांचा एक किस्सा आठवतो, एकदा एका पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांना आरोपींची नावं तर त्यांनी सांगितलीच. पण, आरोपीने वापरलेल्या गाडीचा चेसीनंबरही न पहाता सांगितला. म्हणून आम्ही क्राइम रिपोर्टर्स मारियांना अंडरवर्ल्डचा एन्सायक्लोपिडीया म्हणतो.

35 वर्षांच्या पोलीस दलातील कार्यकाळात, राकेश मारियांनी सर्वकाही कमावलं. प्रसिद्धी, लोकांचं प्रेम, पोलीस दलातील कर्मचा-यांचा विश्वास असं सर्वकाही... या काळात मारियांसोबत अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं. पण, मारियांना कायम साथ दिली ती त्यांच्या डायरीनं. मारियांची डायरी, हा आम्हा क्राइम रिपोर्टर्ससाठी नेहमीच उत्सूकतेचा विषय. ऑफिसमध्ये येताना-जाताना प्रत्येक वेळी त्यांची ही डायरी त्यांच्यासोबत नेहमीच असायची.

१९८८ ते १९९२ चार वर्ष राकेश मारिया रायगडचे पोलीस अधीक्षक होते. दोन वेळा ट्रान्सफर ऑर्डर आली. पण जनप्रक्षोभापुढे सरकारला बदलीचे आदेश रद्द करावे लागले. महाराष्ट्रातला ग्रामीण भाग पिंजून मारिया मुंबईत आले. ट्रॅफिक विभागात बदली झाली. हा काळ बाबरी मस्जिद पडल्यानंतरचा काळ होता. मुंबई जळत होती. त्यातच १९९३ साली साखळी स्फोटानं मायानगरी हादरली. तपासाची धुरा मारियांच्या खांद्यावर देण्यात आली.

मारीया अंडवर्ल्डचाचे एन्सायक्लोपिडीया असले तरी त्यांची अंडरवर्ल्डची माहिती गोळा करण्यामागची सुरूवात फार कमी लोकांना माहीत आहे. गोष्ट अशी आहे की १९८०साली मारिया मुंबई झोन-४ चे डीसीपी होते. त्यावेळी अरूण गवळी टोळीनं मुंबईत धुमाकुळ घातला होता. त्यावेळी मारियांच्या कार्यक्षेत्रात गवळीचा बॉस रमा नाईकचा एका एजन्सीनं एन्काउंटर केला. आपल्या परिसरात अंडरवर्ल्ड फोफावतंय हे मारियांना सहन झालं नाही. त्यानंतर मारियांनी अंडरवर्ल्डचा खरा अभ्यास सुरू केला.

त्यानंतर अंडरवर्ल्ड आणि गॅंगस्टर्सचा खात्मा कारण्यासाठी आयपीएस अधिका-यांनी आपले हिट स्व्कॉर्ड तयार केले. पण, मारियांचा स्व्कॉर्ड असलेला आठवत नाही. मारियांची काम करण्याची पद्धत वेगळीच होती. त्यांच्या टेरेटरीमध्ये कोणत्या ऑफिसरनं येणं त्यांना खपत नसे, पण दुस-यांच्या टेरिटरीत घुसून केस ओपन करण्यात त्यांना मजा येत असे.

१९९२ मध्ये मुंबई आल्यानंतर मारियांनी कधीही मुंबईला सोडलं नाही आणि मुंबईनही मारीयांना सोडलं नाही. अंडरवर्ल्डचा कर्दनकाळ म्हणून मारियांची ओळख झाली. शार्पशूटर्स, गॅंगस्टर्स मारियांच्या नावानं थरथर कापू लागले. राकेश मारियांच्या अंगात केस डीटेक्ट करण्याची एक वेगळी नशा आहे. पण, फक्त केस डीटेक्ट करण नाही, ती केस कोर्टात उभी करून आरोपीला शिक्षा होईपर्यंत मारिया त्या केसचा फॉलोअप घेत असतात. त्यांच्या टीममध्ये काम करत असलेले अधिकारी आणि कर्मचा-यांना कधी काही गोष्टी आठवणार नाहीत, पण मारियांना प्रत्येक गोष्ट तोंडपाठ असतेच.

मुंबई क्राइमब्रांचचं ज्वाइंट कमिश्नर पद हे मुंबईत सर्वात महत्त्वाचं पद मानलं जातं. क्राइम ब्रांचचा अनुभव असल्यानं मारियांकडे सरकारनं ज्याइंट सीपी क्राइमची जबाबदारी सोपवली. 2008ला मुंबईत देशातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. मारिया आणि देवेन भारतींच्या टीमनं पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा साऱ्या जगासमोर फाडला. कसाबला शिक्षा झालीच, पण मारियांच्या तपासानं पाकिस्तानलाही अजमल कसाब आमचाच आहे हे मान्य करावं लागलं. पण, 26-11च्या त्या रात्री मारिया कंट्रोल रूममध्ये का होते, फिल्डवर का नव्हते असा प्रश्नही विचारण्यात आला.

IB म्हणजे इंटेलिजन्स ब्यूरोसोबत मारियांच्या कोल्डवॉरची चर्चा नेहमीच रंगायची. मारियांचं स्वत:चं एक नेटवर्क आहे. त्यामुळे आयबी-मारिया हे कोल्डवॉर नेहमीच चर्चेत असायचं.

अंडरवर्ल्ड, गॅगस्टर्स आणि दहशतवाद्यांचा कणा मोडल्यानंतर मारिया मुंबई पोलीस आयुक्त बनण्याचं स्वप्न पहात नसतील तरच नवलं. राकेश मारियांवर आयुक्तपदाची धुरा सोपवली गेली. २०१५ मध्ये मारिया पुन्हा चर्चेत आले. शीना बोरा हत्याकांडाची चौकशी मारियांच्या टीमनं केली. पण, या केसच्या चौकशी दरम्यानच मारियांवर आरोपही झाले. शीनाच्या केसमध्ये आयुक्त म्हणून इतका इंस्ट्रेस्ट का. असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. पीटर मुखर्जीला अटक का केली नाही? यात मारियांचा काही संबंध आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आणि एकदिवस देवेंद्र फडणवीस सरकारनं अचानक मारियांची आयुक्तपदावरून उचलबंगली केली. मी, पोलीस आहे, शो-पीस नाही. पोलीस म्हणून मला जे योग्य वाटलं ते मी केलं. असं मारियांनी क्राइम रिपोर्टर्सना सांगितलं. असो, मारियांसारखे महाराष्ट्र पोलिसात अनेक पोलीस अधिकारी आहेत. मारियांच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीवर लिहीण्यासारखं बरच काही आहे. शब्दही कमी पडतील. पण, राकेश मारियांसारखा अधिकारी आता मला पुढच्या काळात तरी दिसत नाही. निवृत्तीनंतरच्या लाईफसाठी राकेश मारीयांना शुभेच्छा

Updated : 31 Jan 2017 11:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top