Home > मॅक्स ब्लॉग्ज > युपीचा निकाल आणि उद्याचा भारत

युपीचा निकाल आणि उद्याचा भारत

युपीचा निकाल आणि उद्याचा भारत
X

मला राजकारणाचं (म्हणजे निवडणुकीच्या राजकारणाचं) फारस कळत नाही, पण काँग्रेस आणि भाजपा सत्तेवर असतांना ब्युरोक्रसी कशी काम करते याचा मात्र मला बऱ्यापैकी अनुभव आहे. त्यामुळे युपीचा विजय देशाला कशा प्रकारे पुढची दिशा देणार किंवा देऊ शकतो याचा अंदाज थोडाफार फरकाने बांधू शकतो. मोदी सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे बरेच प्रयत्न सुरु आहेत, सुरुवातीला अधिकाऱ्यांची साथ मिळाली नाही असं बहुतेक ठिकाणच चित्र आहे, खासकरून ज्या राज्यात भाजपाचे पूर्ण बहुमत नाही, तिथे सरकारी यंत्रणा सुद्धा शासनाला मदत करत नाहीत, केंद्रात, खासकरून दिल्लीत मोदींनी बरेच तसे प्रयत्न केल्याचं ऐकिवात आहे. म्हणजे सकाळी १० वाजता वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लँडलाईनवर पंतप्रधान कार्यालयातून फोन जाणे, हे तपासण्यासाठी की वरिष्ठ अधिकारी वेळेत येतात का? आणि तसेच मंत्र्यांच्या बाबतीत पण झाल्याचे ऐकिवात आहे. इथपासून ते कुठला मंत्री कुठलं काम करतो आहे याच नियमित रिपोर्टींग मोदींना जाते असंही ऐकलं आहे.

मोदींची लेहेर, लाट, २०१४ चे मोदींच अभूतपूर्व यश हे फ्लूक आहे का? याची शंका सगळ्यांनाच होती, ती तशी सरकारी यंत्रणेलाही होती, त्यामुळे पहिली दोन वर्ष त्याची चाचपणी अधिकाऱ्यांच्यात आपापल्या पद्धतीने सुरु होती, त्यात बिहारमध्ये निवडणूक हरल्यानंतर पुन्हा मोदींचे यश साशंक झाले. परंतु युपीचा विजय महत्वाचा एवढ्यासाठी की सरकार किती काळ राहणार आणि स्थिर राहणार हे अधिकाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे. खासकरून हजार पाचशेच्या नोटा अचानक बंद करणे, याचा फटका भ्रष्ट अधिकाऱ्यांना सर्वात जास्त बसला असणार हे एखाद लहान मूल देखील सांगू शकत. त्यामुळे सरकारी यंत्रणा ज्यांच्यावर शासनाच्या उद्देशपूर्तीची म्हणजे अंमलबजावणीची जबाबदारी असते त्यांची भूमिका संपूर्ण देशासाठी महत्वाची असते. खासकरून आयएएस अधिकारी किंवा त्यांच्या दर्जाचे इतर विभागातले अधिकारी, यांच्यासाठी हा युपीचा विजय विशेष महत्वाचा. आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जावे लागले आणि त्यांचे राजकीय भवितव्य निकाली निघाले आहे, पण आयएएस अधिकाऱ्यांचे तसे झाल्याच्या फारशा घटना नाहीत. पंतप्रधान पाच वर्षांनी बदलू शकतो पण अधिकारी फक्त निवृत्तच होतात, त्यामुळे त्यांना सेक्युरिटीची भीती नाही. आणि अधिकारी वर्ग हा समाजात कधीही लक्षात येत नाही. यूपीतला विजय त्यामुळेच महत्वाचा आहे, कारण असेम्बली आणि पार्लिमेंटच्या सर्वात जास्त जागा यूपीत आहेत त्यामुळे ज्या पक्षाचा युपीवर कब्जा त्यांना देशात सत्ता मिळवणे सोपे जाते. २०१४ च्या निवडणुकीतून मिळविलेल्या प्रचंड यशाचा फायदा भाजपाने आत्ताच्या निवडणुकीत घेतला यात काही शंका नाही, आणि आत्ताच्या निवणुकीच्या विजयाचा फायदा पुढच्या २०१९च्या निवडणुकीत पुन्हा भाजपाला मिळणार आणि परत पुढची पाच वर्ष, म्हणजे आजपासून पुढची साडेसात वर्ष मोदीच पंतप्रधान असणार असं आत्तातरी स्पष्ट दिसून येतेय. त्यामुळे अधिकाऱ्यांना भाजपच पहिल्यापेक्षा जास्त ऐकावं लागणार आणि भाजपला आणि पर्यायाने मोदींना सरकारी यंत्रणेची साथ पहिल्यापेक्षा जास्त मिळणार.

अशा वेळी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे? फक्त निवणुकीच्या वेळी पक्ष, योजना, आढावा न घेता, शासकीय योजना जास्तीत जास्त पारदर्शकतेने राबवल्या जातील हे बघणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या योजनेचा प्रसार, प्रचार आपल्याकडून देखील व्हायला हवा, पण त्यासाठी आपण स्वतः जागरूक राहून सर्व योजना समजावून घेतल्या पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या गरजू व्यक्तींना त्याची माहिती दिली पाहिजे. युपीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच असं अस्पष्ट दिसते आहे की यावेळी जनतेने जात-पात न बघता विकास या मुद्द्याला मत दिले आहे. त्यामुळे विकास फक्त सरकारनेच करायचा, ही फक्त त्यांचीच जबाबदारी आहे हे समजून इतक्या वर्षात केलेल्या चुका आता सुधारल्या पाहिजेत.

एक गोष्ट चांगली आहे, सध्याचे सरकार सोशल मीडियाचा भरपूर वापर करत आहे, त्यामुळे सोशल मीडियावरील सर्व लोकांनी सोशल मीडियाचा वापर सकारात्मक करावा आणि निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या बाबतीत आपापले अनुभव आणि मत मांडावे. केवळ मोदी आवडत नाही, किंवा भाजपा धार्मिक पक्ष आहे म्हणून त्यांना विरोध करणे वेगळे, आणि प्रत्यक्ष ज्या योजना तुम्हाला पटतात त्यांचा प्रसार करणे वेगळे. त्यामुळे उगीच आपल्या आवडत्या पक्षाचे प्रवक्ते असल्याच्या पोष्टी टाकत बसण्यापेक्षा स्वच्छता अभियान असो, बेटी बचाओ अभियान असो, याचा प्रचार आपणच केला पाहिजे, कारण हे प्रश्न तुमच्या आमच्या मतांच्या आणि पक्षाच्या पलीकडचे आहेत. स्वच्छता असावी याच्यासाठी अजूनही आपल्याला स्वच्छता अभियानाची गरज पडते आहे, हे आपलं वास्तव आहे, ते फेसबुकवर उलटसुलट लिहून थांबणार नाहीये, तुमच्या व्हाट्स ऍपच्या मेसेजेसने डास मरणार नाहीत, त्यासाठी प्रत्यक्षच कामच करावे लागेल.

त्यामुळे आपापल्या आवडीनुसार विषय निवडून त्यावर लक्ष देऊन आपापल्या परीने काम करण्याची गरज आहे. काही युपीच्या निकालाने आनंदीत झाले असतील तर काही नाराज, पण त्यामुळे निकाल बदलू शकणार नाहीत. त्यामुळे समर्थन देणाऱ्यांनी जमिनीवर काम करावे आणि विरोध करणाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवून कामातल्या चुका दाखवून द्याव्यात. आणि एक विनंती सोशल मीडियाच्या जागरूक नागरिकांना करावीशी वाटते की आपण आपल्या आवडत्या पक्षाचा किंवा स्वतःच्या तत्वाचा मुद्दा पटविण्यासाठी जेवढे कष्ट घेतात, तेवढेच कष्ट जर समस्या सोडविण्यासाठी घेतलेत तर त्याचा फायदा आपल्यालाच होईल, कारण तुम्ही ज्यांची बाजू घेऊन फेसबुकवरील तुमच्याच "मित्राशी" भांडतात, शिव्या देतात, ते नेते मंडळी स्वतः कधी पक्ष बदलतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे मुद्दा सोडून मूळ प्रशांवर जागृती, जनमत तयार झाले, वस्तुस्थितीवर चर्चा झाली तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. त्यामुळं निवडणुकीचा निकाल लागला आहे, जो आहे सो आहे, तुम्ही आम्ही आत्ता तरी बदलू शकत नाही, त्यामुळे चांगलं काम होईल याकडे लक्ष देऊयात, पुढची निवडणूक आल्यावर नाही तर आत्तापासूनच. चुका होणारच नाहीत, किंवा चुका होऊ लागल्याच तर वेळीच आवाज उठवणं गरजेचं आहे. ते म्हणतात ना, पोस्ट बदला, देश बदलेल !!!!

गिरीश लाड

Updated : 12 March 2017 2:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top