Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'मुंबईच्या स्पिरिट'ला सलाम!.. पण कशासाठी?

'मुंबईच्या स्पिरिट'ला सलाम!.. पण कशासाठी?

मुंबईच्या स्पिरिटला सलाम!.. पण कशासाठी?
X

गेला आठवडा वर्तमानपत्रे व माध्यमांसाठी खूपच धामधुमीचा गेला. आधी हरयाणाच्या बाबा राम रहीमच्या कहाण्या व नंतर त्याच्यावर न्यायालयाने केलेल्या कठोर कारवायांच्या रिपोर्टिंगमुळे सारेच व्यग्र राहिले आणि तो ज्वर उतरण्याच्या आतच महाराष्ट्रावर वरुणराजाने असे काही आक्रमण केले की, ते थोपवता थोपवता प्रशासनाच्या नाकी नऊ आलेच, शिवाय त्याच्या बातम्या देताना पत्रकार मंडळी पावसाने व नंतर घामाने भिजून थिजली. बारा वर्षांपूर्वी - २६ जुलै २००५ रोजी मुंबईत प्रलय झाला होता. त्याचे स्मरण करून देणारा पाऊस २९ ऑगस्टला मुंबई परिसर आणि कोकणात झाला. विदर्भ व मराठवाड्यातही अशाच संततधारा बरसल्या. थोडक्यात महाराष्ट्र ओलाचिंब झाला. पावसाबरोबर जोराचे वारेही सुटले. या वाऱ्याने जसे अनेक वृक्ष उन्मळून पडले, तशीच प्रशासनाची अब्रूहीचव्हाट्यावर टांगली गेली.

बराच काळ जोराचा पाऊस झाला की, मुंबईत रस्त्यांवर पाणी साचतेच. रेल्वे मार्गांवरही नद्या वाहू लागल्या की, मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वेची लोकल वाहतूक कोलमडतेच. रस्त्यांवर कुठे गुढघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी साचले की, टॅक्सी, कार बंद पडतातच; क्वचित प्रसंगी बेस्टच्या बसेसही निसर्गासमोर शरणागती स्वीकारतात. हे असे होते, तेव्हा मुंबई ठप्प होते. घड्याळ्याच्या काट्यांबरोबर चोवीस तास धावणारी मुंबई अचानक थांबते. असे होते, तेव्हा त्याच्या मोठाल्या बातम्या बनतात. टीव्हीचे कॅमेरे चौखूर उधळतात आणि भिजलेले टीव्ही रिपोर्टर्स तशाच अवस्थेत बातम्या टिपतात व देतात. मग दिवसभर याच चर्चा चालतात. टीव्हीवरून शहरवासीयांना घरांतून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जातात. दुसऱ्या दिवशी सारे काही पुन्हा जैसे थे होते. काल रात्रीपर्यंत सुने सुने वाटणारे रस्ते पुन्हा माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीने दुथडी भरून वाहू लागतात. शेअर बाजारात गर्दी उसळते. कालच्या पावसाच्या कथा रंगवून सांगत चाकरमानी दुपारचे डबे खाऊ लागतात. थोडक्यात मुंबई पूर्वपदावर येते. पावसाचे कवित्व पुढील काही दिवस माध्यमांना खाऊ पुरवते पण 'शिळ्या कढीला ऊत' या पलिकडे त्यांना कुणी फारसे मनावर घेत नाही. तसे करण्यात तसा काही अर्थही नसतो. तसेच आताही होत आहे.

झाले गेले विसरून व मागे टाकून नव्या दिवसाला सामोरे जायचे, हा महानगरांचा खास गुण हे तर खरेच. पण बॉम्बस्फोटांची मालिका असो वा पावसाचा प्रकोप, जातीय दंगली असोत किंवा भूकंपाचे हादरे, हे सारे होऊन गेल्यावर जर शहर दुसऱ्याच दिवशी सकाळी पूर्वपदावर येत असेल, तर ते चांगले लक्षण की एखाद्या जीवघेण्या आजाराची चाहूल? जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले असे माध्यमे उच्चरवात सांगत राहतात, ते नक्की खरे किती? लोकल गाड्या पुन्हा सुरू झाल्या, त्यात जीव दरवाज्याला टांगून लोक पुन्हा कामाला जाऊ लागले; मॉल्समधली गर्दी वाढली; शेअर बाजार वधारला; कार्यालयांत रोजच्या प्रमाणे काम सुरू झाले, म्हणजे खरेच जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले?

मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिकाच झाली, नंतर २६/११चा भीषण हल्ला झाला. २६ जुलै २००५च्या प्रलयात अर्धी मुंबई बुडाली, मिठीच्या इवल्याशा पात्राने अचानक आपला आकार उपनगरांना गिळून टाकण्याइतका मोठा केला. हे सारे झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी मुंबई पूर्वपदावर आली, अशी टिमकी आपली माध्यमे व पुढाऱ्यांनी वाजवली. आपण साऱ्यांनी माना डोलावून 'मुंबईच्या स्पिरिट'ला सलाम केला. या दुर्घटनांमुळे अनेकाचे प्राण गेले, शेकडो कुटुंबे रस्त्यावर आली, त्यांची स्वप्ने उध्वस्त झाली. ज्यांनी 'मुंबईच्या स्पिरिट' चे कौतुक केले, त्यांनी या कुटुंबाच्या घरांत कधी डोकावून पाहिले? 'मुंबईच्या स्पिरिट'बद्दल जे भरभरून बोलत होते व आताही बोलत आहेत, त्यापैकी कितींच्या कुटुंबाना या दुर्घटनांची झळ पोहोचली? कितींच्या घरात पाणी शिरले? कितींच्या घरांची छपरे उडाली? कितींच्या घरांतील कुणी कायमचे बेपत्ता झाले वा दगावले? कितींच्या रोजी-रोटीचे साधन कायमचे नष्ट झाले?

ज्यांनी व्यक्तिगत आयुष्यात त्या दिवसाच्या त्रासापलिकडे काहीच गमावले नाही, अशी मंडळी 'मुंबईच्या स्पिरिट'ला सलाम करतात व आपण माना डोलावतो. परदु:ख शीतलम् हा निसर्ग नियमच आहे, पण ते इतके शीतल की दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याची दाहकता नष्ट व्हावी? हे सुदृढ समाजाचे लक्षण की, आतून पोखरल्या गेलेल्या, तुटलेल्या व पिचलेल्या मानवी समुहांचे चित्रण? कुणीच कुणासाठी आयुष्यभर कुढत, रडत बसत नाही, हे खरे, पण निदान काही काळ तरी कुणाच्या डोळ्यात अश्रू का तरळू नयेत? मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका साऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडवून गेली. ठिकठिकाणी स्फोट होऊन शेकडो निरपराध लोक प्राणाला मुकले. त्यांची कुटुंबे शोकसागरात बुडाली. त्यांच्या जविनाचा आधारच हरपला. त्यापैकी अनेकांच्या मृतदेहांची ओळख पटण्यास काही दिवसांचा अवधी लागला. पण हे होण्याच्या आतच दोनच दिवसांत मुंबईचा शेअर बाजार सुरू झाला आणि सर्वांनी एकच गलका करून 'मुंबईच्या स्पिरिट'ला सलाम केला. हे जीवंत व समंजस समाजाचे लक्षण आहे का? विचार करूया.

मंगळवारी मुंबई व आसपासच्या प्रदेशाला पावसाने अचानक गाठले. बारा तासांत ३०० मी. मी. पाऊस झाला. त्यामुळे पाणी पुरवठा करणारे जलाशय भरले, हे खरे पण अनेक कच्ची घरेही पडली. रस्त्यांवरील खड्डे पुन्हा उघड्यावर आले. मुंबईची भौगोलिक रचना ध्यानात घेतली, तर भरतीच्या वेळीच मोठा पाऊस झाल्यास पाणी समुद्रात जाण्याऐवजी समुद्राचेच पाणी रस्त्यावर येते, हे खरे. पण या भौगोलिक स्थितीवर मानवी उपाय आहेतच. अशा आपत्तीच्या काळात साचलेले पाणी समुद्रात आतवर फेकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून सहा पंप बसवण्यात आले आहेत. त्यांचे काय झाले? नाल्यांमधील गाळ काढून रस्त्यालगतचे नाले मोकळे ठेवण्यासाठी दरवर्षी महापालिका करोडो रुपये खर्च करते. तसे ते यावेळीही खर्च झालेच. त्याची वाजत गाजत पाहणी करणारे नेते, अधिकारी, नगरसेवक यांचे फाटो प्रसिद्ध झाले. नाल्यांतून उपसलेला गाळ दूरवर न नेता, तो नाल्यांच्याच काठावर टाकण्यात येत असल्याच्या बातम्या व चित्रे प्रसिद्ध झाली आणि टीव्हीवरही दिसली. त्यांचे काय झाले?

'मुंबईच्या स्पिरिट'ला सलाम करणाऱ्यांनी या 'स्पिरिट'ची चाचणी दरवर्षीच व्हायला नको, म्हणून काय करावे लागेल, याचा लेखाजोखा घेण्याची गरज का बोलून दाखवली नाही? मुंबईचे आयुक्त कागदाच्या भेंडोळ्यांमधील आकडेवारी घोकत समोरच्याला निरुत्तर करतात व नगरसेवक आणि पत्रकारही त्यावर माना डोलावतात, हा काय प्रकार आहे? गेल्या वर्षभरात रस्ते सुधारणा, गटारांची डागडुजी, नालेसफाई, मिठीच्या पात्राची निगा या आणि अशा कामांवर महापालिकेचा जो निधी खर्च होतो, तो जनतेच्या करातूनच जमा होतो. त्याचे ऑडिटिंग केवळ बाबू ऑडिटर्सतर्फे न करता, त्याची जाहीर चौकशी का नको? गेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी 'कारभारातील पारदर्शकता' हा मुद्दा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत आणला. त्याचे वाद रंगले. पावसाळ्याच्या आधी जी कामे झाली, त्यातील पारदर्शकतेचे काय झाले? की तीही नाल्यातील गाळाप्रमाणे किनाऱ्यावर टाकण्यात आली व मुसळधार पावसात ती वाहूनही गेली? त्याचे ऑडिटिेंगही व्हायला हवे व जे जबाबदार असतील, त्यांची नावे जनतेसमोर यायला हवीत.

मागे मुख्यमंत्र्यांनीच मुंबईविषयीच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमण्याची घोषणा केली होती. आता सहा महिने उलटून गेले, तरी उपलोकायुक्त आलेला नाही, तो केव्हा येणार? असे शेकडो प्रश्न आहेत. 'मुंबईच्या स्पिरिट'ला सलाम करण्याच्या नादात ते कुणी अलगदपणे विसरून जायला नको. नाहीतर पुढील वर्षी पुन्हा एकदा मुंबई अशीच बंद पडेल, केइएम रुग्णालयातही पाणी शिरून तिथे रुग्णशय्येवर असलेल्यांना जीव वाचवण्यासाठी आपली उरली-सुरली शक्ती एकवटून पळावे लागेल, झोपड्यांमध्ये हाहाकार माजेल आणि यापैकी कशाचीही यत्किंचितही झळ न पोहोचलेली मंडळी व नेते 'मुंबईच्या स्पिरिट'ला सलाम करून टाळ्या मिळवतील!

-भारतकुमार राऊत

[email protected]

Updated : 31 Aug 2017 12:03 PM GMT
Next Story
Share it
Top