Home > मॅक्स ब्लॉग्ज > माझ्या रोज्याचे त्यांच्या गणपतीचे कौतुक थांबवा..

माझ्या रोज्याचे त्यांच्या गणपतीचे कौतुक थांबवा..

मशिदीत बसणाऱ्या गणपतीचे आणि हिंदूंनी ठेवलेल्या रोजाचे महत्व जोपर्यंत अधोरेखित होत राहिल तोपर्यंत दोन्ही समाज वेगळे आहेत, हा संदेश जात राहिल, असं परखड मत व्यक्त करणारा पत्रकार सुरेश ठमके यांचा लेख गणेशोत्सवानिमीत्त पुनःप्रसिध्द करत आहोत.

माझ्या रोज्याचे त्यांच्या गणपतीचे कौतुक थांबवा..
X

शाळेत गेल्यापासून "सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि मी सर्वधर्मसमभाव राखण्याचा प्रयत्न करीन"अशी प्रतिज्ञा करण्यात माझी बरीच वर्षे गेली. शाळेत सोबत असलेला सलीमही हीच प्रार्थना म्हणायचा. त्याचा माझ्या घरातला वावर आणि माझा त्याचा घरातला वावर कधीच परक्यासारखा नव्हता. त्याचे अब्बु आणि माझे आबा सारखेच वाटायचे आम्हाला. ग्रामीण भागातल्या आमच्या खेड्याच त्याच्या घरात दिवाळीला काहीतरी गोडधोड असायचे आमच्या घरीही शिरखूर्मा व्हायचा. पण गणपती आणि रोजे एकाच वेळी यायचे गणपतीच्या डेकोरेशनला सगळ्यात आधी सलीम जुंपायचा आणि डेकोरेशनच्या नादात आमचेही कधी रोजे घडायचे कळायचे नाही. पण त्यात आम्ही काही ग्रेट किंवा जगावेगळे करतोय, वागतोय असे वाटले नाही. लपाछपी खेळताना तर देवळात आणि तुरबतीत लपण्याच्या आमच्या जागा ठरलेल्या असायच्या. पण त्याचं कधीच कसलंच महत्त्व आम्हाला वाटलं नाही. कारण आमच्या मनात परकेपणाचा लवलेश नव्हता.

पत्रकारितेत आल्यानंतर मात्र कुरूंदवाडच्या मशिदींमध्ये कसा गणपती बसतो. आणि तिथले हिंदु कसे रोजे ठेवतात याच्या सुरस आणि जातींचे रंग चढवून मीच बातम्या केल्या. तेव्हा हे सर्व किती सहज आणि आपसुक घडणारी प्रक्रिया आहे. तिथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्य असलेल्या वातावरणाचा तो परिपाक होता. त्यात फारसे काही वेगळे नाही हे माहित असूनही आम्हीच त्याच्या एक्सक्लुसिव्ह वगैरे बातम्या केल्या. मोठ मोठ्या पीटीसी मारल्या आणि आपलीच पाठ थोपटून घेतली. पण खरंच हे असं किती काळ चालणार.

हिंदुने रोजा ठेवल्याच्या आणि मुस्लिम व्यक्तीने हिंदुच्या देवतांची पूजा केल्याच्या बातम्या जोपर्यंत बातम्या म्हणून प्रसिद्ध होत आहेत तोवर आपण समाजातील स्वतःला शहाणे किंवा विवेकवादी मानणारी मंडळी सुद्धा यो दोन समाजांचे वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे हे दोन समाज वेगळे आहेत त्यांच्या जगण्याच्या आणि पूजण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत हे सतत दाखवत राहणार आहोत का. हिंदूने रोजा ठेवला आणि मुस्लिमाने गणपती बसवला तर आपण काहीतरी अघटित, विपरित घडल्याचा आव का आणतो. का या घटनांकडे सहजगत्या पाहिले जात नाही. धर्मनिरपेक्षता अथवा सर्वधर्मसमभाव मानताना परधर्माचा आदर करावा हे अपेक्षित आहे. परधर्मातील परंपरांचा आदर केला किंवा त्या अंगि्कारल्या तर त्याचा बाऊ का केला जावा. एखाद्या धर्मातील चालीरीती स्विकारल्यानंतर त्याकडे आश्चर्याने पाहण्याची आपली वृत्ती बदलत नाही तोपर्यंत आपण सर्वधर्मसमभाव अथवा धर्मनिरपेक्षता ही केवळ प्रतिज्ञेपुरतीच मानतो हे मान्य करावे लागेल. त्यामुळं मी ठेवलेल्या रोज्याचे आणि सलीमच्या गणपतीचे कौतुक थांबवा एवढीच विनंती.

सुरेश ठमके

Updated : 31 Aug 2022 6:39 AM GMT
Next Story
Share it
Top