Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'महार रेजिमेंट'चा इतिहास

'महार रेजिमेंट'चा इतिहास

महार रेजिमेंटचा इतिहास
X

फोडा आणि झोडा या इंग्रजांच्या कूटनीतीवर खूप चर्वण झालेलं आहे. कालपासून राज्यभर आंदोलन करणाऱ्या दलित बांधवांना कळकळीने विनंती करतो की त्यांनी हिंसाचारावर उतरू नये. कारण भीमा-कोरेगाव लढाईनंतरचा इतिहास वेगळा आहे.

लाॅर्ड राॅबर्ट्स याने “लढवैय्या” जमातींच्या ज्या पलटणी उभारल्या त्यात महारही समाविष्ट केले. यातील काही तुकड्यांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला. पुढे भारतातील इंग्रजी लष्करात पंजाब्यांचं प्रस्थ वाढायला लागलं. याचा एकत्रित परिणाम असा झाला की १८९३ साली, महार पलटणच मोडीत काढली गेली. महारांना हा मोठा मानसिक धक्का होता. गोपाळ बाबा वाळंगकर आणि शिवराम जानबा कांबळे या दोन माजी सैनिकांनी महार पलटण पुन्हा सुरू करण्यासाठी इंग्रज सरकारला निवेदन दिलं. डाॅ. आंबेडकरांचा या मागणीला पाठिंबा होताच. जाती-जमातींच्या आधारावर पलटणी करण्यास विरोध असलेले गोपाळ कृष्ण गोखले यांनीही या मागणीला पाठिंबा दिला.

१९४१ साली डाॅ. आंबेडकर सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य झाले आणि त्यांच्या रेट्यामुळे आजची महार रेजिमेंट अखेर जन्माला आली. कर्नल एच.जे.आर. जॅक्सन आणि सुभेदार मेजर शेख हुस्नउद्दीन हे तिचे सुरुवातीचे कमांडिंग ऑफिसर होते. आज तिचं मुख्यालय महू इथे आहे. म्यानमार, इराण, अफगाणिस्तान अशा विविध ठिकाणी तिने पराक्रम गाजवला आहे. फाळणीच्या वेळी स्थलांतरीत होत असलेल्या लोकांना संरक्षण देण्याचं नाजुक आणि जिकिरीचं काम महार रेजिमेंटकडे होतं. केवळ दंडुकेशाहीने दंगे अधिक भडकले असते. थंड डोक्याने करायचं हे काम त्यांनी उत्तम प्रकारे केलं.

एक यादी वाचा. ६३ सेवा, २२ विशिष्ट सेवा, १२ शौर्य, १ कीर्ती, २९ वीर, ४ महावीर आणि १ परमवीर चक्र अशा १३२ पदकांनी महार रेजिमेंट आजपर्यंत सन्मानित झाली आहे. या जाज्वल्य इतिहासाला गालबोट लागेल असं काहीही घडू नये.

डाॅ. जितेंद्र आव्हाड

Updated : 9 Jan 2018 4:10 AM GMT
Next Story
Share it
Top