भाजप सैराट!

भाजप सैराट!
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरू लागल्याचे गुरुदासपूरपासून अनेक ठिकाणी दिसू लागले आहे. समाज माध्यमे व भाजपने ज्यास ‘पप्पू’ ठरवले, त्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सूर सापडू लागला आहे. पप्पूच मोदींना टप्पू मारू लागला आहे... त्यामुळे कमळपंथीय संतापले आहेत. गुजरातमध्ये ढोकळा व उंधियो खाण्यासाठी मोदी वारंवार दौरा करत आहेत. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याची मागणी केल्याच्या वृत्तानंतर, मोदींनी त्यांचे विधान पूर्णपणे न वाचता नव्हे, तर संपूर्णपणे वाचूनच त्याचा गैर अर्थ काढला. 370 व्या कलमामध्येच जी स्वायत्तता देणे अभिप्रेत आहे, ती तरी द्या, असे चिदंबरम यांचे प्रतिपादन आहे. स्वायत्तता व स्वातंत्र्य यात फरक आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असेच चिदंबरम व काँग्रेसचे मत आहे. परंतु लगेच चिदंबरम व काँग्रेसला पाकवादी ठरवणे, हे मोदींचेच क्षुद्र राजकारण आहे. काश्मीरसाठी हजारो जवानांनी बलिदान दिले आहे, असे उद्गारही त्यांनी काढले. म्हणजे काँग्रेसला या बलिदानांचे काही पडलेले नाही, असे सुचवून, भाजपच देशभक्त व काँग्रेस देशद्रोही, असे संकेत त्यांना द्यायचे आहेत. मागे कारगिलच्या वेळीही भाजपने असेच राजकारण केले होते. हे उघड उघड धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण आहे.

तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते आणि मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी संगीत सोम यांनी आग्र्याच्या ताजमहलचा निर्माता, म्हणजे शाहजहाँ हा हिंदूंचा इतिहास मिटवू पाहत होता, असे वाह्यात विधान केले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहलला भेट देऊन तिथे साफसफाई करण्याचा इव्हेंट साजरा केला. कारण सोम यांच्या उद्गारांमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मुसलमानांनी अजिबात मत दिले नाही, तर काय घ्या, ही चिंता. त्यामुळे मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना तातडीने ताजमहलला भेट देण्यास जा, असा आदेश योगींना दिला असावा. मध्यंतरी 15 वर्षीय जुनैद खानला रेल्वेमध्ये ठार मारण्यात आले. देशभरात या घटनेमुळे खळबळ उडाली. या प्रकरणी चंदीगडमध्ये खटला चालू आहे. त्यात सरकारी वकील आरोपींचीच बाजू घेत असल्याचे खुद्द न्यायमूर्तींनीच म्हटले आहे. सरकारच्या दबावतूनच हे घडले असणार.

छत्तीसगडमध्ये भाजपचे सार्वजनिक बांधकाममंत्री राजेश मुनत यांच्या सेक्सकांडाची सीडी निघाली. मुनत हे मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या जवळचे आहेत. रमण सिंग व त्यांचा पुत्र अभिषेक सिंग यांचा राजनंदगाव हा मतदारसंघ आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुनत आहेत. पक्षात त्यांचे वजन वाढले असून, त्यांचे पक्षांतर्गत शत्रू बरेच आहेत. यापैकी कोणीतरी मुनत यांच्या भानगडीची सीडी काढली असू शकेल. वास्तविक मुनत यांच्या खासगी भानगडीशी जनतेचा संबंध येत नाही. पदाचा दुरुपयोग करून त्यांनी एखाद्या स्त्रीचे शोषण केले असेल, तरच तो गंभीर प्रश्न बनेल. मात्र या प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना अटक करण्यात आली आहे. माझ्याकडे सीडी आहे असे सांगून त्यांनी म्हणे मुनत यांना ब्लॅकमेल केले, असा आरोप करण्यात आला. आपण खंडणीसाठी फोन केल्याचा आरोपच वर्मा यांनी फेटाळून लावला आहे. सत्ताधारी भाजपमधील आणखी आठ मंत्र्यांच्या ‘अश्लील’ सीडी तयार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ‘बीबीसी’ व ‘अमर उजाला’ साठी काम करण्याचा दीर्घ अनुभव वर्मा यांना आहे. सध्या ते काँग्रेसच्या छत्तीसगमधील समाज माध्यम विभागात सक्रिय आहेत. वर्मा सदस्य असलेल्या एडिटर्स गिल्डच्या पथकाने पूर्वी छत्तीसगडमध्ये जाऊन केलेल्या पाहणीनंतर तेथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याचा निषाकर्ष काढला होता. तसेच पनामा पेपर्समध्ये अभिषेक सिंग यांचे नाव असल्याचे वर्मा यांनी म्हटले होते. राजनंदगावमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रचारमोहिमांत ते भाग घेत होते. त्यामुळे वर्मा यांच्यावर भाजपचा दात असावा, असे प्रथमदर्शनी तरी दिसते. त्यामुळे थेट त्यांना अटक करण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे. या घटनेबाबत आताच कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नसला, तरी रमण सिंग सरकारबाबत शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे.

आदिवासींमध्ये कार्य करणाऱ्या सोनी सोरीला छत्तीसगडमध्ये त्रास देण्यात आला. ‘द हिंदू’च्या प्रतिनिधी मालिनी सुब्रमण्यम यांना तर त्यांच्या लिखाणामुळे छत्तीसगडमधून अक्षरशः पळवून लावण्यात आले. अनेक पत्रकारांना ‘नक्षलवादी समर्थख’ ठरवून छळण्यात आले वा अटक करण्यात आले. एवढे सगळे होऊनही, राजकीय अधःपतनाबद्दल मुनत हे काँग्रेसलाच दोषी ठरवत आहेत...विशेष म्हणजे, ‘परिवारा’तील ज्येष्ठ नेते संजय जोशी यांना अशाच एका कांडात गुंतवून मोदी गटाने गुजरातबाहेर काढले होते. हे शस्त्र स्वतःवरच उलटल्यावर भाजपची गडबडगंडी उडाली आहे. तिकडे राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारने मंत्री, सरकारी बाबू, न्यायाधीश यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत संरक्षण देण्यासाठी वटहुकूम आणण्याचे ठरवले आणि विरोध होताच, माघार घेण्याची पाळी आली! मध्य प्रदेशच्या सिवनी येथील भाजपच्या महिला नेत्याने ‘आमच्या भागात सफाई केव्हा करणार?’ असा सवाल करून, एका सफाई कामगारास घाणेरड्या शिव्या देत भर रस्त्यात पोलिसांसमक्ष मारहाण केली. थोडक्यात, स्पष्ट शब्दात सांगायचे, तर भाजपला सत्तेचा माज आला आहे. आपली अपकृत्ये बाहेर आल्यामुळे, इतरांपेक्षा आपण वेगळे नाही, हे जनतेला कळाल्यामुळे भाजपला इंगळ्या डसत आहेत. त्यामुळे मग कधी चिदंबरम यांना पाकवादी ठरवायचे, तर कधी काँग्रेसचे खासदार अहमद पटेल यांनी आयसिसच्या लोकांना थारा दिल्याचा आरोप करायचा, असे सर्व सुरू आहे. आपले स्थान धोक्यात आले की विरोधकांचे प्रतिमाभंजन करायचे, ही जुनी काँग्रेसी परंपरा आहे. भाजपला त्याच परंपरेचे पालन करावेसे वाटत आहे...

Updated : 31 Oct 2017 7:56 AM GMT
Next Story
Share it
Top