Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्रत्येक नवीन वर्षी जनसेवेसाठी उर्जा मिळते!

प्रत्येक नवीन वर्षी जनसेवेसाठी उर्जा मिळते!

प्रत्येक नवीन वर्षी जनसेवेसाठी उर्जा मिळते!
X

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ते आजपावेतो ‘जनसेवा’ हाच आमचा श्वास राहिला आहे आणि आमचे सामाजिक असो वा राजकीय जीवन असो, ‘जनसेवा’ हाच एकमेव ध्यास राहिला आहे. समाजकारण, राजकारण ही जनसेवेप्रत जाणारी निव्वळ साधनं आहेत, हेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेबांचे संस्कार घेऊन आमची आजची पीढीही सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. त्यामुळेच मागील अनेक पिढ्यांपासून आमचा प्रत्येक संकल्प हा जनसेवा केंद्रस्थानी ठेवूनच होत राहिला आहे. फरक इतकाच की प्रत्येक नव्या वर्षात जनसेवेच्या माध्यमातून अधिकाधिक उपेक्षित, वंचितांचे अश्रू पुसण्याचे बळ एकवटून नव्या उमेदीने आम्ही निरलसपणे काम करीत आलो आहोत व यापुढेही करीत राहू. त्यामुळे प्रत्येक नवीन वर्ष हे नव्या उत्साहाने समाजकार्याकरिता कटीबद्ध होण्यासाठी आम्हाला उर्जा देणारे असते.

आजमितीस महाराष्ट्रातील अनेक समाजघटक संकटात आहेत. शेतकरी तर अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांनी भरडून निघाला आहे. शेतकरी आत्महत्या आणि कुपोषण व बालमृत्युंचं मळभ अधिकाधिक गडद होत चाललं आहे. उद्योजक, व्यापारी, कामगारांसारखे घटक सरकारच्या नियोजनशून्य धोरणांमुळे प्रभावित झाले आहेत. पुरेशी रोजगारनिर्मिती नसल्याने तरूणाई निस्तेज झाली आहे. वैचारिक कट्टरवादाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला गेलेला तडा दिवसेंदिवस रुंदावतच चालला आहे. भ्रष्टाचाराविरूद्ध कारवाईबाबत विद्यमान राज्यकर्त्यांचं धोरण अत्यंत उदासीन झालं आहे. संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोठं योगदान देणारं महाराष्ट्र राज्य आज आर्थिकदृष्ट्या खंगत चाललं आहे. या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने आम्ही मागील दोन वर्षांपासून सतत संघर्ष करीत आलो आहोत. नव्या वर्षात हा लढा अधिक तीव्र करण्याचा आमचा मानस आहे.

वर्षभरापूर्वी ३० डिसेंबर २०१६ रोजी आमचे वडील माजी केंद्रीय मंत्री, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालं. त्या घटनेला आता वर्ष उलटलं आहे. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचं व्यक्तीमत्व आणि कर्तृत्व चौफेर होतं. ते राजकारणात होते, समाजकारणात होते, सहकारात होते, शिक्षण क्षेत्रात होते, कृषी क्षेत्रात होते. सर्वसामान्य शेतकऱ्याशी संबंधित प्रत्येक विषयात त्यांना कमालीचा जिव्हाळा होता आणि त्या विषयांमध्ये ते सतत कार्यमग्न राहिले. मावळत्या वर्षाच्या सुरूवातीला आमचं संपूर्ण कुटूंब शोकमग्न होतं. त्यामुळे नव्या वर्षासाठी नियोजन वगैरे असा काही विचारच मनाला शिवला नव्हता. पण आता त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानंतर आम्हाला नक्कीच पुढील वाटचालीसाठी नवी दिशा मिळाली आहे.

डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचं व्यक्तीमत्व अत्यंत व्यासंगी होतं. प्रवरा अभ्यास मंडळाचं मोठं काम त्यांनी उभं केलं आहे. पुढील काळात या अभ्यास मंडळाचं स्वरूप अधिक व्यापक करून त्याचं कार्यही अधिक गतिमान आणि सर्वांगिण करण्याचा आमचा मानस आहे. साहित्याप्रती त्यांचा विशेष ओढा होता. शेतीविषयक संशोधनामध्ये, नव्या तंत्रज्ञानामध्ये त्यांना कमालीचा रस होता. जलनियोजन, कृषी पतपुरवठा आणि शेतीशी संबंधित जोडउद्योग अधिक बळकट करण्यासाठी ते सतत कार्यरत असायचे. समाजाप्रती त्यांच्या या सर्व योगदानाचा वारसा भविष्यात अधिक प्रभावीपणे चालवण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो तडीस नेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी झटण्याचा निश्चय केलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील २०८ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दत्तक घेऊन आम्ही या कामाला सुरूवातही केली आहे.

सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा! नवीन वर्ष सर्वांनाच आनंदाचे, सुख-समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

राधाकृष्ण विखे पाटील,

विरोधी पक्षनेते, विधानसभा

Updated : 30 Dec 2017 9:20 AM GMT
Next Story
Share it
Top