Home > मॅक्स ब्लॉग्ज > ट्रम्प युद्धखोरीच्या वाटेवर

ट्रम्प युद्धखोरीच्या वाटेवर

ट्रम्प युद्धखोरीच्या वाटेवर
X

अणूबॉम्ब नसणारा पण जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब (मदर ऑफ ऑल बॉम्ब्स) म्हणजे जीबीयू 43 /बी. जवळपास 10 हजार किलो वजन आणि 5 हजार किलोमीटर पर्यंत विध्वंसक्षमता असणारा हा बॉम्ब आहे. जीपीएस च्या आधारे या बॉम्बचा अचूक मारा केला जातो. 2003 मध्ये अमेरीकेने इराकवर मारा करण्यासाठी तो बनवला होता. पण तेव्हाचे अमेरिकेचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना जे जमले नाही ते ट्रम्प यांनी 13 एप्रिलला करून दाखविले. इसिस या दहशतवादी संघटनेच्या अफगानिस्तानातील तळावर हा बॉम्ब टाकण्यात आला. तिथे खरोखर दहशतवादी होते का? जर होते तर हाच बॉम्ब टाकण्याची गरज होती का? हे प्रश्न अप्रस्तुत ठरतात. कारण आपणच एकमेव महासत्ता आहोत आणि जे आमच्या विरोधात जातील त्यांची आम्ही काय दशा करू शकतो हे जगाला दाखविण्यासाठी आशा प्रकारच्या कारवाया करणे अमेरिकेसाठी काही नवीन नाही. इराकचे प्रमुख सद्दाम हुसैन अमेरिका आणि मध्य पूर्व आशियातील अमेरिकेचे मित्र देश यांच्या विरोधी होते. केवळ या कारणासाठी इराकमध्ये रासायनिक अस्त्रे नसताना सुद्धा ती आहेत असे म्हणत अमेरिकेने इराक वर 2003 मध्ये हल्ला केला होता हा इतिहास फार जुना नाही.

मग या बॉम्ब हल्ल्याचे नेमके काय महत्व आहे? तर परराष्ट्र धोरणाविषयी नेमकी भूमिका नसणारे डोनाल्ड ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण कोणत्या दिशेने जाईल याचा ठोकताळा बांधण्याच्या दृष्टीने ही महत्वाची घटना आहे.

21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरू झालेले अफगाणिस्तान, इराक, लिबिया वरील हल्ले, अण्वस्त्रनिर्मिती करू पाहणाऱ्या इराण आणि उत्तर कोरिया यांना 'अक्सिस ऑफ एव्हील' संबोधणे, नाटो (शीतयुद्धाच्या काळात कम्युनिस्ट सोविएत युनियनला शह देण्यासाठी स्थापन झालेली सुरक्षा आघाडी. नाटोच्या एखाद्या सदस्य देशावर झालेला हल्ला हा सर्व सदस्य देशांवर झाला आहे असे समजले जाते.) शीतयुद्ध संपल्यानंतरही जिवंत ठेवणे आणि नाटोचा अधिक विस्तार करणे यासारख्या धोरणांचा तात्विक आधार 'निओ-कॉन्झर्वेटीजम' (नव-पुराणमतवाद) यामध्ये सापडतो. जिथे अमेरिका एकमेव महासत्ता आहे असे एकध्रुवीय जग कायम ठेवणे हा 'निओ-कॉन्झर्वेटीजम' चा अजेंडा आहे. त्यासाठी अमेरिकाच्या हितसंबंधाला धोका निर्माण करू शकणाऱ्या शक्तींविरोधात, चिथावणी असो नसो लष्करी कारवाई करायला हवी. याचबरोबर लोकशाही व्यवस्थेचाही बळाचा वापर करत प्रसार करायला हवा अशी मांडणी ‘निओ-कॉन्झर्वेटीजम'वाद्यांकडून केली जाते. अमेरिकेतील ही अत्यंत प्रभावी विचारधारा आहे. जॉर्ज डब्लू बुश हे या विचारधारेचे पाईक होते.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे 'निओ-कॉन्झर्वेटीजम'वाद्यांचे अत्यंत नावडते व्यक्तिमत्व बनले होते. कारण ट्रम्प हे नाटो च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. रशिया शी सबुरीचे धोरण ठेवावे म्हणत होते, सीरिया-अफगाणिस्तानवर अधिक ऊर्जा खर्च करू नये अशी भूमिका घेत होते. यासारख्या त्यांच्या भूमिका ‘निओ-कॉन्झर्वेटीजम' धोरणाविरोधी होत्या. पण, राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतरच्या केवळ 80 दिवसात ते 'उक्ती पासून यू टर्न घेणारी कृती' धोरण राबवत असल्याचे दिसत आहे. याचा पहिला पुरावा म्हणजे सीरिया मधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद नियंत्रित 'अल-शरियत' या हवाईतळावर डागलेली 59 टॉमहॉक क्षेपणास्त्रे. इसिस नियंत्रित भागात नागरिकांविरोधात 'सरीन गॅस' या रासायनिक अस्त्राचा वापर असाद यांनी केला म्हणून हा हल्ला केला गेला. असा रासायनिक अस्त्राचा वापर 2013 मध्ये ही झाला होता. तेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी सीरियावर हल्ला केला नव्हता आणि तो तसा करू नये अशी भूमिका ट्रम्प यांनी त्या वेळी घेतली होती. गॅसमुळे मृत लहान मुलांचे फोटो पाहून ट्रम्प यांनी हल्ला केला असे सांगितले जाते. यातून ट्रम्प यांची चंचलता (इम्पलसिव्ह) त्यांच्या निर्णयप्रक्रियेत कशी महत्वाचे ठरती लक्षात येते. या हल्ल्यामुळे असाद समर्थक रशिया बरोबरचे अमेरिकेचे संबंध निश्चित बिघडले आहेत. पण नेमक्या याच कारणासाठी ट्रम्प 'निओ-कॉन्झर्वेटीजम'वाद्यांच्या गळ्यातील ताईत बनलेत.

https://youtu.be/MZ8j4QlYcYk

याचबरोबर 'नाटो'विषयी ची ट्रम्प यांची भूमिका सकारात्मक झाली आहे. मोंटेनिग्रो या देशाच्या नाटोतील सदस्यत्वाला त्यांनी आनंदाने मान्यता दिली आहे. नाटो आणि नाटोचा विस्तार ही रशियाची दुखरी नस आहे. अमेरिका-रशिया संबंध सुधारण्यातील तो एक मोठा अडथळा आहे.

दुसरीकडे 2015 मध्ये अणवस्त्रांच्या संदर्भात इराण बरोबर झालेला करार आपल्याला मान्य नसल्याचे ट्रम्प यांनी घोषित केले आहे. उत्तर कोरियाची आण्विक अस्त्रांची चाचणी घेण्याची आगळीक आपण खपवून घेणार नाही. चीनने सहकार्य केल्यास ठीक नाहीतर आपण एकटे उत्तर कोरियाला धडा शिकवू अशी ट्रम्प यांनी भूमिका घेतली आहे .

त्यामुळे एकूणच ट्रम्प यांचा ओबामा प्रमाणे 'डिप्लोमसी'( चर्चा, वाटाघाटी) च्या मार्गाने इराण, उत्तर कोरिया सारखे महत्वाचे प्रश्न सोडवण्यावर विश्वास नाही हे स्पष्ट आहे. यात त्यांचे वर्तन जॉर्ज डब्लू बुश यांचा जुळा भाऊ असल्यासारखे आहे. ट्रम्प यांनी चंचलतेमुळे /तात्काळ त्या वेळी योग्य वाटेल तो निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे असो किंवा त्यांची समज अधिक वास्तववादी झाली यामुळे असो ते 'निओ-कॉन्झर्वेटीजम' च्या युद्धखोर वाटेवर चालू लागले आहेत एवढे मात्र निश्चित. ही वाट त्यांना कुठे नेईल हे सांगणे कठीण नाही. टॉमहॉक, जीबीयु43/बी यांचा वर्षाव उत्तर कोरिया आणि इराणवर झाल्यास आजिबात आश्चर्य मानू नये. बुश यांनी अस्थिर केलेले जग ट्रम्प मार्गाने अस्थिरतेच्या अधिक खोल गर्तेत जाईल यात शंका नाही.

  • भाऊसाहेब आजबे

Updated : 14 April 2017 2:29 PM GMT
Next Story
Share it
Top