Home > मॅक्स ब्लॉग्ज > केजरीवाल, केजरीवाल सारा पंजाब तेरे नाल?

केजरीवाल, केजरीवाल सारा पंजाब तेरे नाल?

केजरीवाल, केजरीवाल सारा पंजाब तेरे नाल?
X

पंजाबची निवडणूक 4 फेब्रुवारीला पार पडली. यूपी इतकेच किंवा त्यापेक्षा थोडसे जास्त महत्व पंजाबच्या निकालाला असणार आहे. अकाली-भाजपचा धुराळा उडणार आहे म्हणून नाही. किंवा 2014 पासून पिछेहाटीत सातत्य ठेवणाऱ्या काँग्रेसचा कमबॅक होण्याची शक्यता आहे म्हणूनही नाही. तर सत्ताधारी म्हणून किंवा तगडा विरोध पक्ष म्हणून आम आदमी पार्टीचा उदय होणार आहे यासाठी आहे. हा उदय येत्या काळात गुजरात आणि हरियाणात मुसंडी मारण्यासाठी आपला पुरेसा कॉन्फिडन्स देईल. मोदींना थेट शिंगावर घेऊन धोबीपछाड देण्याचा कॉन्फिडन्स आणि जिगर सध्या तरी संघटनात्मक जीव छोटा असला तरी केवळ केजरीवाल यांच्यामध्येच आहे. दिल्लीमध्ये 'न भूतो..' बहुमत असूनही दिल्लीवर केंद्राचे नियंत्रण अधिक असल्यामुळे मोदींनी सातत्याने केजरीवाल यांची प्रत्येक मार्गाने कोंडी केली आहे. ही कोंडी पंजाबमुळे फुटेल. केजरीवाल यांना खऱ्या अर्थाने ' गुड गव्हर्नन्स' चं मॉडेल पंजाबच्या निमित्तानं 2019 पर्यंत सिद्ध करता येईल. राज्यशकट हाकण्यात आपण मोदींपेक्षा कैकपट उत्तम आहोत याचा पुरावाच ते पंजाब च्या माध्यमातून देणार यात शंका नाही. त्यामुळे ही 'एके 49' मोदींवर फायर होऊन त्यांना 2019 च्या निवडणुकीत उत्तरेच्या पट्ट्यात निष्प्रभ करू शकते.

दिल्ली मधील विधानसभा निवडणुकीत 'मांगे दिल्ली दिल से केजरीवाल फिरसे' हे गाणं आप समर्थकांच्या तोंडी होत. आणि दिल्लीकरांनी 70 पैकी 67 जागा देऊन ते गाण्याचे शब्द शब्दशः खरे ठरवले. पंजाबमध्ये यावेळी आप समर्थकांच्या तोंडी 'केजरीवाल, केजरीवाल सारा पंजाब तेरे नाल' हे गाणं होतं. आप समर्थकांच्या मते, बहुमतासाठी आवश्यक 117 पैकी 59-60 जागा तर केकवॉक आहेत. प्रश्न असा आहे की 90-100 जागा देऊन 'सारा पंजाब तेरे नाल' होईल का?

पंजाबमधील निवडणुकीय राजकीय चर्चा दोन पातळ्यांवर पाहता येईल. एक म्हणजे अकाली दल विषयी दुस्वास आणि दुसरं म्हणजे आप पक्ष हा बदलाचा दूत वाटणं.

अकाली दल (भाजपसह) सतत दहा वर्षे सत्तेवर आहे. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, उपमुख्यमंत्री मुलगा सुखबरसिंग, महत्वाची खाती सुखबिरसिंगचे मेव्हणे बिक्रमसिंग मजिठिया यांच्याकडे. राज्यातील हॉटेल्स, खाजगी बस सेवा, केबल सेवेवर बादल कुटुंबाची मक्तेदारी! त्यात एका ड्रग्स सप्लायरने बिक्रमसिंगचे ड्रग्स व्यापारात हितसंबंध असल्याची कबुली दिली. धार्मिक बाबींमध्येही अकाली दलचा प्रभाव. धर्मग्रंथाचे पाने फाडली गेली पण अकाली दल काही गुन्हेगारांना पकडू शकली नाही. ते कृत्य 'डेरा सच्चा सौदा' या पंथाने केले अशी लोकांमध्ये चर्चा. 'डेरा' चा जाहीर पाठींबा अकाली-भाजपला. त्यामुळे गुन्हेगार का सापडत नाहीत याचे लोकांसाठी उत्तर स्पष्ट. समृद्ध पंजाबात गेल्या दहा वर्षांत अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ड्रग्सच्या बाबत काय स्थिती आहे याची 'उडता पंजाब' सिनेमातून कल्पना येऊ शकते. 'किती ड्रग्सग्रस्त यापेक्षा किती नाहीत याची मोजणी करावी लागेल' अशी एका सामान्य माणसाची टीव्ही वरील प्रतिक्रिया. अमृतसरजवळ तर 'मकबुलपुरा'नावाचे एक गाव 'विधवांचे गाव' म्हणून ओळखले जाते. प्रत्येक घरात तिथे ड्रग्स मुळे किमान एक विधवा आहे. आणि आश्चार्याची गोष्ट म्हणजे 2012 च्या निवडणुकीपर्यंत ड्रग्स हा निवडणुकीत चर्चेत यायचाच नाही. तो का यायचा नाही याची आपनं लोकांना दिलेले उत्तर म्हणजे काँग्रेस आणि अकाली (भाजप) मधील नेते मंडळींचेच ड्रग्स व्यापारात हितसंबंध होते.

तर एकूण अशा सर्व गोष्टींमुळे अकाली दल विषयी दुस्वास निर्माण करणे आपला सोपे गेले. 2014 मध्ये इतरत्र सर्वत्र सफाया झालेला असताना आपला पंजाबने चार खासदार दिले. त्यामुळे गेले तीन वर्षे आप ने पंजाबात शड्डू ठोकला होता. निवडणूक प्रचारही त्यांनी एक वर्ष आधी सुरु केला होता. अकालिंच्या 'पापांची' लोकांना जाणीव करून देऊन अकालींपासून आपली मुक्ती झाली पाहिजे ही भावना आपने लोकांमध्ये निर्माण केली. त्याचबरोबर आप हाच एकमेव पर्याय आहे हेही अधोरखीत केले गेले. ड्रग्स हा शत्रू नंबर एक ठरवून त्यांचा पोशिंदा बिक्रमसिंग मजिठिया (असा परसेप्शन तयार करण्यात ते यशस्वी झाले) याला सत्ता आल्यास 15 एप्रिलला तुरुंगात टाकू अशी घोषणा केली. दलित समाजातील ( पंजाबात दलित मतदारांची संख्या देशात सर्वात जास्त आहे -32℅) व्यक्तीला सुखबिरसिंगच्या जागी बसवू म्हणजे उपमुख्यमंत्री करू हे स्पष्ट केले. अशी आपची आक्रमकता ही लोकांना आवडणारी आहे. शिवाय बादल पिता पुत्र, आणि माजिठिया समोर जे तगडे उमेदवार त्यांनी उभे केले त्यातून आपची निर्भयता आणि विरोधकाला शिंगावर घेण्याचे धाडस अधोरेखित झाले आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट यासारख्या गोष्टीतून आपचा वेगळेपणा ही पुढे आलाय. पंजाबातील अनेक लोक परदेशात नोकरी-व्यवसाय करतात. यांची मोठी टीम आपच्या प्रचारासाठी कार्यरत होती. अकाली पंथिक पक्ष आहे. त्यामुळे एका मोठी शीख वोटबँक काँग्रेसला कधीच मतदान करत नाही. हा बालेकिल्ला आपने काबीज करण्यासाठी अकालीपासून फटकून राहणाऱ्या पण धार्मिक बाबतीत कट्टर असणाऱ्या लोकांशीही हातमिळवणी केली.

परिणामी आप हा इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे आणि सध्याची शोचनीय स्थिती नक्की बदलू शकतो असे परसेप्शन निर्माण करण्यात आप यशस्वी झालीय. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेसच्या पापांवर उतारा आपणच आहोत अशा प्रकारची प्रतिमा मोदींनी यशस्वीरीत्या तयार केली होती अगदी तशीच प्रतिमा केजरीवाल यांनी पंजाबात तयार केली आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसलाही लोकांचा पाठिंबा असला तरी तो आपला गतिरोध निर्माण करण्याइतपत मोठा आहे का यात शंका आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वोटबँकेला फारसा धक्का पोचला नव्हता. पण काँग्रेसची बहुतांशी वोटबँक गिळंकृत करून आप ने 67 जागा जिंकल्या. त्याचप्रमाणे पंजाब मध्येही काँग्रेसलाच्या वोटबँकेला फारसा धक्का न लागता ही अकाली-भाजपची वोटबँक गिळंकृत करून आप जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात किती जागा मिळतात हे 11 मार्चला कळेलच पण गृहीतकांच्या पातळीवर 'सारा पंजाब तेरे नाल' होईल अशी चिन्हे आहेत.

भाऊसाहेब आजबे (99606 11870)

Updated : 7 Feb 2017 9:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top