Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'ओखी' गुजरातच्या दिशेने

'ओखी' गुजरातच्या दिशेने

ओखी गुजरातच्या दिशेने
X

दिवसभर राहिली पावसाची रिपरिप

कालपासून मुंबईसह कोकणवासीयांची त्रेधा तिरपिट उडवणाऱ्या ओखी चक्रीवादळाने गुजरातच्या दिशेने कुच केल्याने मुंबईत पावसाचा जोर आता काहीसा मंदावला आहे. आधीच लांबलेल्या पावसाने त्रासलेल्या मुंबई महाराष्ट्राला दक्षिणेतून आलेल्या चक्रीवादळाने झालेल्या अवकाळी पावसामुळे कालपासून चांगलेच झोडपून काढलय. दक्षिणेकडून येत व्हाया मुंबई करत गुजरातच्या दिशेने ओखी वादळ सरकल्याने निदान मुंबईकरांनी सुस्कारा टाकला आहे.

चाकरमान्यांनी घरी बसणे केले पसंद

सोमवार संध्याकाळ पासून अवचीत अवतरलेला पावसाची मंगळवारी ही दिवसभर रिपरिप चालू आहे. ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जराशा पावसाचं निमित्तही पुरेसे असलेल्या मुंबईतील मध्य रेल्वेची सेवा नेहमी प्रमाणे मंदावलेली राहिली. हवामान खात्याने कालच दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे आज मंगळवारी मुंबई महानगर प्रदेशातील शाळांना सुट्टी देण्यात आली. त्यातच संभाव्य वादळी परिस्थितीमुळे बऱ्याच जणांनी कामाला खाडा करुन घरी बसणेच पसंद केले. त्यामुळे दिवसभर रस्त्यावरही वाहतुक तशी कमीच राहिली.

ओखी गुजरातच्या दिशेने, लष्कर आणि नौदलाला सतर्कतेचे आदेश

दक्षिण भारताला झोडपूण ओखी चक्रीवादळ मुंबईमार्गे आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे. मात्र जाता जाता ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या चोवीस तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ओखी चक्रीवादळ सध्या ताशी १८ किलोमीटर वेगाने ईशान्यकडे सरकत आहे. मुंबईपासून ४२० किलोमीटर अंतरावर असलेले हे वादळ हळूहळू गुजरातकडे सरकत आहे. मंगळवारी मध्यरात्रीपर्यत ते सुरतजवळ स्थिरावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये संभाव्य हानी टाळण्यासाठी भारतीय लष्कर आणि नौदलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

Updated : 5 Dec 2017 2:59 PM GMT
Next Story
Share it
Top