Home > मॅक्स ब्लॉग्ज > उद्धव ठाकरेंंचं 'राम के नाम'

उद्धव ठाकरेंंचं 'राम के नाम'

उद्धव ठाकरेंंचं राम के नाम
X

उद्धव ठाकरेंचा बहुचर्चित अयोध्या दौरा सुरु झाला आहे. आज ते अयोध्यासाठी रवाना झाले आहेत, तर शिवसैनिक दोन दिवसांपासून अयोध्येत ठाण मांडून वातावरणनिर्मिती करत आहेत. या एका दौऱ्यामुळे उद्धव यांना राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात मायलेज मिळालं आहे. सर्व माध्यामांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे आहे. शिवसेनेची सूत्र हातात घेतल्यानंतर अशाप्रकारे राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक होत त्यांनी उचललेलं हे पाऊल भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीला वळण देणारे ठरेल.

उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय पातळीवर भाजपला कोंडीत पकडण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. देशात हिंदुत्व आणि राममंदिर यां मुद्द्यांना मुख्य प्रवाहात आणू शकतील असे भाजपा आणि शिवसेना हे दोनच पक्ष आहेत. 25 वर्षांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असलेली या दोन पक्षांची युती गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुटली. सत्तेसाठी वाटाघाटी होत नसल्याने दोघांनी निवडणुकांत वेगळी चूल मांडली. परंतू सत्तेनेच त्यांना पुन्हा एकत्र आणलं.

आता परिस्थिती वेगळी आहे. भाजप सत्तेतला मोठा भाऊ आहे. शिवसेनेपेक्षा भाजपवर जास्त जबाबदारी आहे. निवडणुकांमध्ये स्वप्न दाखवलेल्या राममंदिराच्या मुद्द्यावर भाजपने गेल्या 4 वर्षात अवाक्षरही काढलं नाहीय किंवा सांगितल्याप्रमाणे त्यासाठी काही ठोस पाऊलंही उचलली नाहीत. त्यामुळं हा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा आहे.

भाजपची नेमकी हीच परिस्थिती ओळखून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या धाडसाचे कौतुकच करायला हवं. राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहुनही वारंवार आपण सत्तेपेक्षा वेगळे कसे आहोत हे शिवसेना दाखवत आलीय. त्यामुळं अनेक मुद्द्यांवर भाजपची कोंडी झाली. आता तर गेल्या निवडणुकांचा सर्वात महत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी हायजॅक केला आणि भाजपाकडे बघत रहाण्याशिवाय पर्याय उरला नाही.

यामुळे काय होऊ शकतं?

उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व आणखी गडद होईल. देशभरात भाजपावर नाराज असलेल्या हिंदुत्वावादी जनतेला शिवसेना जवळची वाटू शकते. कदाचित निवडणुकांमध्ये भाजपासोबत युती न केल्यास शिवसेनेला ही मतं मिळू शकतात.

राज्यातल्या शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अनेक दिवसांनंतर शिवसैनिकांना पक्षाच्या मूळ शैलीत आक्रमक होण्यासाठी मुद्दा मिळाला आहे. हा उत्साह निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चितपणे फायदेशीर ठरू शकतो.

Updated : 24 Nov 2018 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top